नवनाथ कसपटे यांच्या सीताफळ वाणाला स्वामित्व हक्क !

 नवनाथ कसपटे यांच्या ‘एनएमएके-१’ (गोल्डन) सीताफळ वाणाला स्वामित्व हक्क!
नवनाथ कसपटे यांच्या ‘एनएमएके-१’ (गोल्डन) सीताफळ वाणाला स्वामित्व हक्क!

सोलापूर जिल्ह्यातील गोरमाळे (ता. बार्शी) येथील प्रगतिशील शेतकरी नवनाथ कसपटे यांनी निवड पद्धतीने विकसित केलेल्या एनएमके-१ (गोल्डन) या सीताफळाच्या वाणाला पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम २००१ अंतर्गत स्वामित्व हक्क मिळाला आहे. कोरडवाहू शेतीसाठी वरदान, तरीही तुलनेने दुर्लक्षित असलेल्या सीताफळाची शेती करताना गोरमाळे (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील नवनाश कसपटे यांनी निवड पद्धतीने नवा वाण विकसित केला आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाने त्यासंबंधीचे नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच कसपटे यांना दिले आहे. एखाद्या शेतकऱ्याला असे हक्क मिळणे, हे कौतुकास्पद मानले जात आहे. प्रयोगशील सीताफळ उत्पादक म्हणून श्री. कसपटे यांचे नाव महाराष्ट्राला परिचित आहे. पण आज या कामगिरीने ते आणखी उंचावले आहे. १९८५ पासून कसपटे शेती करत असून, त्यांच्याकडे बोर, द्राक्ष, डाळिंब यासारखी फळपिकेही आहेत. मात्र, कमी पाण्यामध्ये उत्तम उत्पादन देणाऱ्या सीताफळाविषयी त्यांना सर्वाधिक आकर्षण होते. कोरडवाहू शेतीला आधार देण्याची ताकद सीताफळात असल्याचे जाणून ते सीताफळाकडे वळले. केवळ लागवडीवरच न थांबता सीताफळ संघाची स्थापना करण्यात आणि वाढवण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. जवळपास २० वर्षाहून अधिक काळ ते सीताफळात प्रयोग करत आले आहेत. आज त्यांच्याकडे ५५ एकर शेती आहे. त्यात स्वतः निवड पद्धतीने विकसित केलेल्या एनएमके-१ (गोल्डन) या सीताफळाची सर्वाधिक ३५ एकरवर लागवड आहे. शिवाय अन्य सुमारे सहा एकर क्षेत्रावर केवळ सीताफळाच्या विविध वाणांवर प्रयोग सुरू आहेत. त्यातूनच आतापर्यंत सीताफळाच्या जवळपास ४० वाणांचा संग्रह त्यांनी केला आहे. निवड पद्धतीने वाणांची निर्मिती केल्यानंतर आठ-नऊ वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज त्यांना या वाणाचे स्वामित्व हक्क मिळाले आहेत. सीताफळाचे नावही आणले अधिसूचित नवनाथ कसपटे यांनी २०१२ मध्ये पहिल्यांदा स्वामित्व हक्कासाठी अर्ज केला. तेव्हा राष्ट्रीय पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे असलेल्या अधिसूचित ‘सीताफळ’ हे फळच नव्हते. त्यामुळे त्यांना प्रथम त्यासाठी पाठपुरावा करावा लागला. त्यानंतर बंगळुरू येथील राष्ट्रीय बागवानी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने कसपटे यांच्या शेतीची पाहणी केली. त्यांच्या शेतातील सीताफळाची झाडे, फळे, पाने, लागवड पद्धती, खते-रसायनांच्या वापराच्या नोंदी घेतल्या. त्यानंतर या पथकाने आपला पूरक अहवाल दिला. त्यानंतर या अधिसूचित यादीत सीताफळाचा समावेश झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथील तज्ज्ञांनी या कामात मदत केली. कसपटे यांच्या सातत्यपूर्ण धडपडीमुळेच प्राधिकरणाने २०१५ मध्ये ‘प्लॅन्ट जिनोम सेवियर फार्मर ॲवाॅर्ड’ देऊन त्यांना गौरवले. २०१६ मध्ये पुन्हा त्यांनी सीताफळ वाणाच्या स्वामित्व हक्कासाठी अर्ज केला, या सगळ्या प्रक्रियेनंतर अखेरीस यंदा तीन वर्षांनी त्यांना स्वामित्व हक्काचे प्रमाणपत्र मिळाले. एनएमके-१ (गोल्डन)ची वैशिष्ट्ये श्री. कसपटे यांनी आतापर्यंत सीताफळाच्या जवळपास ४० वाणांचा संग्रह केला आहे. त्यातूनच १५ वर्षापूर्वी निवड पद्धतीने त्यांनी एनएमके-१ गोल्डन, एनएमके-२, एनएमके-३, एनएमके-४ व फिंगरप्रिंट अशी वाणे विकसित केली. त्यातून एनएमके-१ (गोल्डन) हे वैशिष्ट्यपूर्ण सीताफळ वाण आकारास आले. या वाणाची फळे १५-२० दिवसांच्या फरकात काढता येतात. फळामधील बियांची संख्या १५ ते २० असून, फळातील गराचे प्रमाण ७० ते ७५ टक्के आहे. एकरी सरासरी १२ टनांपर्यंत उत्पादन मिळते. हंगामात उशिरा उत्पादन येत असल्याने बाजारात दराशी स्पर्धा होत नाही. फळाच्या क्रॅकिंगचे प्रमाण फक्त २ टक्के आहे. टिकवण क्षमता चांगली असल्याने निर्यातीलाही वाव आहे. स्वामित्व हक्क म्हणजे काय स्वामित्व हक्क प्रमाणपत्रामुळे सीताफळाच्या एनएमके-१ (गोल्डन) या वाणावर श्री. कसपटे यांचा अधिकार असणार आहे. या वाणापासून रोपे तयार करणे, ती विकसित करणे आणि विक्री करणे, याचे सर्व अधिकार कसपटे यांच्याकडे असतील. त्यांच्या परवानगीशिवाय अन्य कोणालाही या रोपाची निर्मिती, विक्री करता येणार नाही. तसे केल्यास संबंधितांविरुद्ध दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कारवाई होऊ शकते.

आजपर्यंत सीताफळामध्ये प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे हे फळ आहे. एका शेतकऱ्याने विकसित केलेल्या वाणाला हा हक्क मिळाला, याहून दुसरे समाधान ते काय असू शकते. - नवनाथ कसपटे (संस्थापक, सीताफळ उत्पादक संघ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com