पस्तीस वर्षांपूर्वी रखडलेला बंधारा श्रमदानातून मार्गी

पस्तीस वर्षांपूर्वी रखडलेला बंधारा श्रमदानातून मार्गी
पस्तीस वर्षांपूर्वी रखडलेला बंधारा श्रमदानातून मार्गी

तिवरे धरण फुटल्यानंतर संभाव्य पाणीटंचाईवर मात कशी करायची हा प्रश्‍न आकले, कादवड गावांसह परिसरातील १६ वाड्यांसमोर होता. अशातच विद्यार्थी आणि शिक्षणसंस्था मदतीला आल्याने ३५ वर्षांपूर्वी रखडलेल्या बंधाऱ्याचे काम श्रमदानातून मार्गी लागले आणि पाणीप्रश्‍न सुटला. आकले आणि कादवड या दोन गावांच्या सीमेवर ३५ वर्षांपूर्वी बंधाऱ्याचे काम शासनाकडून हाती घेण्यात आले. तिवरे धरणाचे काम सुरू झाल्यानंतर हा बंधारा अर्धवट राहिला. जुलै २०१९ मध्ये तिवरे धरण फुटले. कोट्यवधी रुपयांची हानी झाली. या वर्षीच्या उन्हाळ्यात परिसरातील २४ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवण्याची भीती आहे. तिवरे धरण फुटल्यानंतर झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासन आणि सामाजिक पातळीवर हजारो हात पुढे आले. हे वर्ष महात्मा गांधींच्या १५० वे जयंती वर्ष आहे. त्याचे औचित्य आणि तिवरे परिसरातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चिपळूण (रत्नागिरी) येथील डीबीजे महाविद्यालयाने नवकोकण एज्युकेशन संस्थेच्या पाठिंब्याने पुढाकार घेतला.

खेड्याच्या जीवनातील संघर्ष कोकणातील विद्यार्थ्यांना नवीन नाही. काहीतरी केल्याच्या समाधानाऐवजी नेमके काय केले पाहिजे, याचे विचारमंथन झाल्यानंतर बंधारा बांधण्याचे ठरले. नवकोकणचे अध्यक्ष मंगेश तांबे, डीबीजेचे प्राचार्य बाळ यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांवर बंधारा बांधण्याची जबाबदारी दिली. ३५ वर्षांपूर्वी अर्धवट स्थितीत ठेवलेला आकले गावातील बंधारा पूर्ण करण्याचे ठरले. त्यासाठी लागणारे २ लाखांचे अर्थसाह्य संस्थेने दिले.

प्लॅस्टिक, सिमेंटच्या पोती, जेसीबी व त्यासाठी लागणारे इंधन या कामी हा निधी खर्च करण्यात आला. गावच्या सरपंच सौ. विद्या कदम, विजय टाकळे, गणेश गजमल यांनी मार्गदर्शन केले. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी ८ दिवस श्रमदान करून ४४ मीटर लांब आणि ४ फूट उंच बंधारा उभा केला. नदीचे पात्र ४ फूट खोल केले. पावसामध्ये बंधाऱ्याच्या फळ्या काढून तो पुन्हा घालायचे नियोजन करण्यात आले आहे. बंधाऱ्यामुळे नदीचे पाणी थांबले आहे. परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. परिणामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

डीबीजे महाविद्यालयातर्फे सरपंचांची परिषद घेण्यात आली होती. यातूनच वेगळा मार्ग सुचला. कोकणात श्रम करणारी पिढी आहे. शिक्षकांची दृष्टी आणि संस्थेचा पाठिंबा यातून आकलेसारखे काम उभे राहिले. जलसंधारणाचे हे शाश्‍वत काम दीर्घकाळ टिकणार आहेच; त्याशिवाय वेगळी दिशा देणारे आहे. - मंगेश तांबे, चेअरमन, नवकोकण एज्युकेशन सोसायटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com