जिद्द, अपार कष्टाने हरवले अपंगत्वाला...

जिद्द, अपार कष्टाने हरवले अपंगत्वाला...
जिद्द, अपार कष्टाने हरवले अपंगत्वाला...

शेतीत काम करताना वीस वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात उजवा पाय गुडघ्यातून काढावा लागला. मात्र, त्याची खंत ना चिंता. आता काय करायचे याचा विचार करत न बसता समोर येईल त्या परिस्थितीचा मुकाबला रुपेश पाटील यांनी केला आणि सर्व संकटांशी दोन हात करीत यशस्वी भाजीपाला उत्पादक म्हणून नाव कमावले.. गिरनोलीच्या (ता.पालघर) रुपेश रमेश पाटील या तरुण आणि उधमशील शेतकऱ्याने एका अपघातात अपंगत्व आल्यानंतरही शेतीत स्वयंशिस्त आणली, प्रभावी नियोजन, जोडीला अपार कष्ट आणि मेहनतीची सांगड घालत कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध तर केलेच शिवाय पंचक्रोशीत प्रेरणादायी आदर्शही घालून दिला आहे. पालघरपासून सतरा किलोमीटर अंतरावर गिरनोली हे छोटेस गाव आहे. गावातच श्री.पाटील कुटुंबीयांची सात एकर शेतजमीन आहे. रुपेश यांचे वडीलही शेतकरीच. त्यामुळे शेतीचे बाळकडू कुटुंबातून लहानपणापासून मिळत गेले. रुपेश यांना सुरुवातीपासूनच शेतीची विशेष आवड आहे. शिक्षण सुरू असतानाही ते वडिलांना शेतीकामात मदत करत. दुर्दैवाने वीस वर्षापूर्वी झालेल्या एका अपघातात त्यांचा उजवा पाय गुडघ्यातून काढावा लागला. छोट्या पॉवर टिलर ट्रॅक्टरने शेतीत नांगरट करीत असताना त्यांना कायमचे अपंगत्व आले. पण परिस्थितीपुढे झुकतील ते रुपेश पाटील कसले. परिस्थितीबाबत कोणतीही तक्रार न करता समोर आलेल्या सर्व संकटांशी दोन हात करीत त्यांनी शेतीची धुरा यशस्वीपणे पेलली आहे. नव्हे तर गेल्या पंधरा वर्षात जिद्द, कठोर परिश्रम आणि नियोजनबद्धपणे त्यांनी शेती यशस्वी करून दाखवली आहे. त्याचमुळे आजघडीला पंचक्रोशीत एक प्रगतिशील भाजीपाला उत्पादक शेतकरी म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली आहे. श्री.पाटील सुमारे चार एकरात आलटूनपालटून भाजीपाला आणि कडधान्ये ही पिके घेतात. तर उर्वरित तीन एकरात केशर आंबा लागवड केली आहे. त्यांनी पावसाळ्यात भात शेती आणि हंगामात भाजीपाला, कडधान्ये असा पॅटर्नच तयार केला आहे. पावसाळ्यानंतर दोन एकरात दुधी भोपळा, दोडका, भेंडी, काकडी, कांदा अशी पिके ते घेतात. तर उर्वरित दोन एकरात वाल, चना, तीळ, तूर अशी कडधान्ये घेतात. प्रत्येक वर्षी पिकांमध्ये फेरपालट केला जातो. साधारण भात कापणीनंतर नोव्हेंबरपासून भाजीपाला लागवडीची लगबग सुरू होते. तर जानेवारीपासून काढणी सुरू होते. त्यानंतर पुढचे पाच ते सहा महिने त्यांचा रात्रीचा-दिवस सुरू असतो. दिवसाआड भाजीपाला काढणी असते. भाजीपाला काढणीचे काम पहाटेच सुरू होते. भाजीपाला वाहतुकीसाठी श्री.पाटील यांनी एक मिनी ट्रॅक्टरही घेतला आहे. बँकेकडून सात वर्षांच्या दीर्घ मुदती कर्जावर त्यांनी हा ट्रॅक्टर खरेदी केला होता. पण अवघ्या दोनच वर्षांत त्यांनी ट्रॅक्टरच्या सर्व कर्जाची परतफेड करून आर्थिक शिस्तीची चुणूक दाखवून दिली आहे. हा ट्रॅक्टर ते स्वतःच चालवीत, भाजीपाला वाहतूक करतात. प्रतवारी आणि पॅकिंग केलेला दर्जेदार भाजीपाला गावापासून जवळच असलेल्या चहाडी नाक्यापर्यंत नेला जातो. त्याठिकाणाहून पालघरचे व्यापारी परिसरातील सर्व शेतकऱ्यांचा भाजीपाला मुंबईला पाठवतात. शेतीची बहुतांश कामे पाटील स्वतःच करतात. याकामी त्यांना आई-वडिलांचे मार्गदर्शन तर सदैव मिळतेच शिवाय पत्नी रुपाली यांचीही मोलाची साथ लाभते. हंगामात गरजेनुसार मजुरांची मदत घेतली जाते. त्यांच्या शेतावर तीन मजूर नियमितपणे असतातच शिवाय गरजेनुसार गावातील आणखी सात ते आठ मजुरांना सोबत घेतले जाते. अशारीतीने श्री. पाटील शेतीचा हा डोलारा लीलया पेलत आहेत. उत्कृष्ट नियोजनामुळे हंगामातील अवघ्या सात ते आठ महिन्यांच्या भाजीपाला पिकातून सर्व खर्च वजा जाता दीड ते दोन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न श्री. पाटील यांच्या हाती येते. दीड ते दोन एकरांतील भाजीपाला पिकातून हंगामात दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवणे वाटते तितके सोपे नाही. यामागे त्यांचे अपार कष्ट, नियोजन, आर्थिक शिस्त असे सगळे कसब पणाला लागलेले असतात. श्री. पाटील यांनी शेतीला दूध आणि कुक्कुटपालनाचीही जोड दिली आहे. त्यांच्या गोठ्यात सात ते आठ जनावरे आहेत. त्यापैकी दोन जनावरे दुभती आहेत. तसेच सुमारे चाळीस ते पन्नास देशी कोंबड्यांचे कुक्कुटपालनही ते यशस्वीपणे करतात. शहरांमध्ये देशी कोंबड्यांच्या अंड्यांना आणि मांसालाही चांगली मागणी असते. अशारीतीने कौटुंबिक गरज भागवतानाच जोडधंद्यातूनही थोडे-फार अर्थार्जन मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. रुपेश यांना तीन भावंडं. एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी. रुपेश सगळ्यात मोठे, त्यांचे बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. धाकटे भाऊ एमएसस्सी बीएड असून ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नोकरीनिमित्त ते बोईसरला राहतात. श्री. पाटील यांना दोन मुली आहेत. छोटे कुटुंब सुखी कुटुंब अशी त्यांची धारणा आहे. रुपेश यांचे प्रेरणादायी जीवन एकंदर प्रवासात श्री. पाटील यांना एक पाय नसल्याची पुसटशीही जाणीव होत नाही. किंबहुना एका कृत्रिम पायाच्या मदतीने ते यशस्वी शेती करतात हे कुणाला सांगूनही न पटणारे आहे. मात्र, जयपूर फूटच्या साहाय्याने श्री. पाटील यांचा गेल्या १५ वर्षांपासून शेतीतील दिनक्रम अव्याहतपणे सुरू आहे. अगदीच सांगायचे तर धडधाकट माणसांसाठी श्री. पाटील यांची यशोगाथा निश्‍चितच आदर्श आणि प्रेरणादायी आहे, अनुकरणीय आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com