कीड व्यवस्थापनासाठी पूर्वहंगामी नियोजन

कपाशीवरील गुलाबी बोंडअळी, मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी आणि उसासह अन्य पिकामध्ये दिसणारी हुमणी या किडींच्या नियंत्रणासाठी पूर्वहंगामी नियोजन करणे गरजेचे आहे.
कीड व्यवस्थापनासाठी पूर्वहंगामी नियोजन
कीड व्यवस्थापनासाठी पूर्वहंगामी नियोजन

कापसावरील गुलाबी बोंडअळी ः साधारणपणे ७ जून - १५ जुलै दरम्यान ६० - ८० मिमी पाऊस पडल्यानंतर कपाशीची लागवड करण्याची शिफारस आहे. मात्र, अनेक ओलिताखालील क्षेत्रात व ठिबक सिंचनाच्या मदतीने बहुतेक शेतकरी मागील हंगामातील कपाशीची फरदड घेतात. डिसेंबर महिन्यानंतर पाणी देऊन एप्रिलपर्यंत पीक ठेवल्यामुळे ते शेतामध्ये वर्षभर राहते. पुढील हंगामात कापसाची लागवड एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे महिन्यादरम्यान करतात. यालाच पूर्वहंगामी लागवड असे म्हणतात. गुलाबी बोंडअळीचे मादी पतंग कोवळ्या पात्या, कळ्या व अंडी घालण्यास जास्त पसंती देतात. पूर्वहंगामी लागवड केलेल्या कापसाला पात्या -फुले लागण्याची अवस्था जुलै महिन्याच्या दरम्यान येते. मागील हंगामातील कपाशीच्या पऱ्हाट्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेतात रचून ठेवलेल्या असतात. त्यामध्ये सुप्तावस्थेत असणाऱ्या गुलाबी बोंड अळ्यापासून निघणारे पतंगही याच कालावधीमध्ये बाहेर पडतात. या गुलाबी बोंडअळीची नवीन हंगामातील पहिली पिढी पूर्वहंगामी पिकावरच तयार होते. त्यानंतर ह्याच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जून-जुलै मध्ये लागवड केलेल्या कपाशी पिकावर प्रसारित होतो. अशा प्रकारे सतत खाद्यपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे गुलाबी बोंडअळीच्या जीवनक्रमात खंड पडत नाही. ही जीवनक्रमाची साखळी तोडण्यासाठी पूर्वहंगामी कपाशीची लागवड करणे टाळावे. पुढे जून-जुलैमध्ये सुप्तावस्थेतून निघालेल्या मादी पतंगांनी घातलेल्या अंड्यातून अळ्या बाहेर पडल्या तरी त्यांना उपजीविकेसाठी पात्या, फुले व कोवळी बोंडे उपलब्ध होत नाहीत. त्या मरून जातात. याला पतंगाचा "आत्मघाती उदय " असे म्हणतात. उपाययोजना :

  • पेरणीपूर्वी मे महिन्यात जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील बोंडअळीच्या सुप्तावस्था पृष्ठभागावर येवून प्रखर सुर्यप्रकाशाने मरतात किंवा त्यांना पक्षी वेचून नष्ट करतात.
  • मागील हंगामातील कपाशीच्या पऱ्हाट्या श्रेडरच्या साह्याने बारीक चुरा करून कंपोस्ट खतासाठी वापराव्यात. यामुळे मागील हंगामातील गुलाबी बोंडअळीच्या सुप्तावस्था नष्ट होतील.
  • गावनिहाय सर्व शेतकऱ्यांनी विविध संकरित कपाशी वाणाची लागवड वेगवेगळ्या वेळी करू नये. त्याऐवजी एकाच वाणाची व एकाच वेळी लागवड करावी.
  • कपाशीच्या पिकाची तृणधान्य किंवा कडधान्य पिकाबरोबर फेरपालट करावी.
  • कपाशीमध्ये चवळी, मुग, उडीद यांचे आंतरपिक घ्यावे, त्यामुळे मित्रकीटकांचे संवर्धन होईल.
  • माती परिक्षणानुसार नत्र खताचा वापर करणे.
  • जिनींग मिलमध्ये १० कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग बाहेर काढून नष्ट करावेत.
  • अशाप्रकारे पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळून गुलाबी बोंडअळीची पुढील उत्पत्ती रोखता येईल.
  • मक्यावरील लष्करी अळी मागील दोन वर्षांपासून मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी (फॉल आर्मी वर्म) या कीडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. मागील वर्षांपासून ह्या कीडीचा प्रादुर्भाव मक्यासह ज्वारी, ऊस व कापूस या पिकावर देखील दिसून आला. ही कीड अल्प कालावधीत पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते, त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासून कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या कीडीचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा. १. मागील हंगामातील पिकांच्या अवशेषाची विल्हेवाट लावावी. २. जमिनीची खोल नांगरट करावी. ३. पेरणीपूर्व २०० किलो प्रति एकरी निंबोळी पेंडीचा वापर करावा. ४. एकाच वेळी मका पिकाची पेरणी करावी, टप्याटप्याने पेरणी टाळावी. ५. सरी-वरंब्यावर मका पिकाची पेरणी करावी. ६. सायॲन्ट्रानिलीप्रोल (१९.८ टक्के) अधिक थायामिथोक्झाम (१९.८ एफएस) ६ मिली प्रती किलो बियाणे या प्रमाणे बिजप्रक्रीया करावी. ७. मक्यामध्ये मूग किंवा उडीद यांचे आंतरपीक घ्यावे. ८. पिकाची फेरपालट करावी. वारंवार एकाच शेतात मका पीक घेण्याचे टाळावे. ९. मका पिकाभोवती नेपियर गवताच्या ३ ते ४ ओळी लावाव्यात. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. १०. मित्रकीटकांना आकर्षित करण्यासाठी शेताच्या बांधावर झेंडू, कोथिंबीर, सूर्यफूल व तीळ या पिकाची लागवड करावी. ११. रासायनिक खताचा अतिरेकी वापर टाळावा. १२. सध्या निंबोळी बिया उपलब्ध असतात. त्या गोळा करून ठेवाव्यात. या निंबोळी बियापासून ५ टक्के निंबोळी अर्क तयार करणे. त्याचा वापर किडीच्या प्रथम अवस्थेत करावा, त्यामुळे प्रभावी नियंत्रण मिळेल. हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्यांचे नियंत्रण मागील काही वर्षापासून बऱ्याच ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव ऊस, हळद, सोयाबीन इ. पिकांवर आढळून येत आहे. सध्या पूर्वमोसमी पावसाच्या आगमनानंतर हुमणी अळीचे प्रौढ भुंगेरे कोषातून बाहेर पडतात. त्यांचे मीलन बाभूळ, कडुनिंब, बोर इ. झाडावर होऊन पुढील अंडी देण्यास सुरुवात होते. हुमणीची प्रचलित नावे : हुमणी, उन्नी, उकरी, खतातील अळी, मे-भुंगेरे अथवा जून-भुंगेरे, चाफर, मुळे खाणारी अळी इ. ओळख :

  • प्रौढ भुंगा- तपकिरी किंवा गडद विटकरी अथवा काळपट रंगाचा, पंख जाड व टणक तर पाय तांबूस रंगाचे असतात. भुंगेरे निशाचर असून उडताना घू घू असा आवाज करतात.
  •  अळी पांढरी असून तिचे डोके गडद तपकिरी रंगाचे असते. तिला ३ पायाच्या जोड्या असतात. शेतात नांगरणी करताना किंवा शेण खताच्या खड्ड्यात दिसणारी इंग्रजी सी (C) अक्षराच्या आकाराची अळी म्हणजेच हुमणी होय.
  • नुकसान :

  • हुमणीची अळी अवस्था मुळे कुरतडून पिकांना नुकसान पोचवते. झाड सुरुवातीला पिवळे आणि नंतर वाळून जाते. प्रादुर्भावग्रस्त झाडे सहज उपटली जाऊ शकतात. या अळीचा प्रादुर्भाव एका रेषेत असतो.
  • प्रौढ भुंगा बाभूळ, कडुनिंब, बोर इत्यादी झाडावर उपजीविका करतात.
  • जीवनक्रम :

  • पहिल्या पावसानंतर मे किंवा जूनमध्ये प्रौढ भुंगे सुप्तावस्थेतून बाहेर निघतात. संध्याकाळच्या वेळी प्रौढ भुंग्यांचे मीलन बाभूळ किंवा कडुनिंबाच्या झाडावर होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी सकाळी मादी जमिनीमध्ये ७-१० सें.मी. खोलीवर सुमारे ५० ते ७० अंडी घालते.
  • अंडी ९ ते २४ दिवसामध्ये उबतात व त्यातून अळी बाहेर पडते. अळी दोनदा कात टाकून ५ ते ९ महिन्यामध्ये पूर्ण वाढते. जमिनीत कोशावस्थेमध्ये जाते.
  • कोषातून १४-२९ दिवसांनी प्रौढ भुंगे बाहेर पडतात.
  • प्रौढ १.५ - ३ महिन्यापर्यंत जगतात. हुमणी किडीची एक वर्षामध्ये एकच पिढी होते. खरीप हंगामामध्ये या किडीचा अधिक प्रादुर्भाव जाणवतो.
  • आर्थिक नुकसानीची पातळी :

  • झाडांवर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास.
  • एक अळी प्रती चौरस मीटर
  • प्रौढ भुंगेऱ्यांचे व्यवस्थापन

  • उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी. नांगरणी केल्यानंतर उघडे पडलेले सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे हाताने वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात मिसळून त्यांचा नायनाट करावा.
  • पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.
  • ज्या क्षेत्रामध्ये मागील २ वर्षापासून हुमणीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे, अशा क्षेत्रात पेरणी करताना जमिनीतून जैविक बुरशी मेटारायझीम ॲनिसोप्ली या बुरशीजन्य कीटकनाशकाचा १० किलो प्रति हेक्टर या प्रमाणे जमिनीतून वापर करावा.
  • एरंडीच्या वासाकडे हुमणीचे भुंगेरे आकर्षित होतात. एरंडी आमिष सापळ्यांचा वापर करावा. त्याकडे हुमणीचे भुंगेरे आकर्षित होऊन त्याखालील पाण्यात पडून मरतात.
  • मे- जून महिन्यात पहिला पाऊस पडताच भुंगेरे सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर येणारे भुंगेरे बाभूळ, कडुनिंब इ. झाडांवर असतात. रात्री ८ ते ९ वाजता बांबू अथवा काठीच्या साह्याने झाडाच्या फांद्या हालवून खाली पाडावेत. ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.
  • हा प्रयोग प्रक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी जोपर्यंत भुंगेरे झाडावर सापडतात, तोपर्यंत चालू ठेवावा.
  • त्याच प्रमाणे प्रति हेक्टर एक या प्रमाणे प्रकाश सापळे संध्याकाळी ७ ते ९ च्या दरम्यान लावावेत. त्यातील भुंगे गोळा करून मारावेत.
  • सध्याच्या टप्प्यात सामुदायिकरीत्या प्रौढ भुंगेऱ्यांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे.
  • डॉ. अनंत बडगुजर (सहाय्यक प्राध्यापक), ७५८८०८२०२४ डॉ. संजोग बोकन (संशोधन सहयोगी), ९९२१७५२००० (कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com