agriculture stories in marathi Precautions for sowing with sowing machines | Agrowon

पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना घ्यावयाची काळजी

शंकर तोटावार
बुधवार, 17 जून 2020

सोयाबीन पिकाची पेरणी ट्रॅक्‍टरद्वारे करताना साध्या पेरणी यंत्राचे योग्य कॅलिब्रेशन करणे, पेरणीची खोली ३ ते ५ सेंमी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे हेक्टरी रोपांची संख्या योग्य राहते. उगवण चांगली होते. 

प्रशिक्षित ट्रॅक्‍टरचालक हवा   
    सोयाबीन पिकाची पेरणी करताना बियाणे ३ ते ५ सें.मी. खोलीवर पडेल, अशा पद्धतीने ट्रॅक्‍टरच्‍या लिव्हरची सेटिंग करावी. 
    लिव्हर सेटिंग करतेवेळी पेरणी यंत्र समपातळीत जोडले असल्याची खात्री करावी. पेरणी यंत्राची पातळी व लिव्हरचे सेटिंग तपासूनच पेरणी करावी. पेरणी करताना बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्‍त खोलीवर पडल्‍यास बियाणे कुजते. त्याचा विपरीत परिणाम उगवणशक्‍तीवर होतो. 
    पेरणीचा कालावधी कमी असल्‍याने पेरणीसाठी ट्रॅक्‍टर १६ ते १७ तास चालवणे गरजेचे असले तरी अनुभवी चालकांची उपलब्धता ही समस्या ठरते. ६ ते ७ तास पेरणी कुशल चालकामार्फत केल्यानंतर उर्वरित तासासाठी नविन शिकाऊ चालकामार्फत पेरणी केली जाते. या नविन ट्रॅक्‍टर चालकांना पेरणी यंत्राचे योग्‍य गेज लावण्‍याचे तांत्रिक ज्ञान असेलच असे नाही. तो अंदाजाने पेरणी करतो. परिणामी एकरी  कमी/ जास्‍त बियाणे वापरले जाते. 

कमी अश्वशक्तीचा ट्रॅक्टर वापरावा
सोयाबीन पिकाच्‍या पेरणीकरिता ४५ एच. पी. पर्यंतच्‍या ट्रॅक्‍टरचा वापर करावा. पेरणीकरिता शक्य तितक्या कमी अश्‍वशक्‍तीचा  ट्रॅक्‍टर वापरावा. ट्रॅक्‍टरची वेग मर्यादा ताशी ५ कि मी. पर्यंत ठेवल्‍यास चांगल्‍या पद्धतीने सोयाबीन पिकाची पेरणी होते. ज्‍यांच्याकडे ५० एच.पी. किंवा त्‍यापेक्षा अधिक क्षमतेचे ट्रॅक्‍टर आहेत, त्यांनी जमिनीच्‍या पूर्व मशागतीसाठी वापरावेत. मात्र, पेरणीकरिता लहान ट्रॅक्टरचा वापर आवश्यक. कारण मोठ्या ट्रॅक्‍टरला मोठे व रुंद टायर असून, ट्रॅक्‍टरचे वजन जास्‍त असल्‍यामुळे जमीन जास्‍त दबते. टायर खालील दोन्‍ही ओळीतील पेरलेले बियाणे कमी प्रमाणात उगवते. हेक्‍टरी रोपसंख्‍या योग्‍य न राहिल्याने उत्‍पादनात घट येते.
    
पेरणी यंत्राचा योग्‍य गेज ठेवणे
बऱ्याच शेतकऱ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारची पेरणी यंत्र उपलब्‍ध आहेत. पेरणी यंत्रावर ज्‍या गाळ्यातून बियाणे किंवा खते पेरली जाते. त्‍याचे योग्‍य प्रमाणात बियाणे/ खताची मात्रा पेरण्‍यासाठी वेगवेगळे दोन्‍ही बॉक्‍ससाठी वेगवेगळे अॅडजेस्‍टेबल कंट्रोल डिव्हाईस देण्‍यात आले आहेत. या डिव्हाईसच्‍या साह्याने फ्लुटेड रोलर अॅडजेस्‍ट करून प्रति एकरी लागणारे बियाणे/खते खाली दिलेल्‍या उदाहरणानुसार अचूक मोजमाप करून, डिव्हाईसवरील नॉब निश्‍चित करून शिफारशीप्रमाणे बियाणे किंवा खतांची पेरणी करावी. 

 गेज ठरवताना येणाऱ्या अडचणी 
वाशिम जिल्‍ह्यात एका खासगी शेतकऱ्यांकडे वापरात असलेल्‍या पेरणी यंत्रामध्ये ० ते ५० पर्यंत आकडे , मशीनवरील खुणांचा व अॅडजस्‍ट करावयाच्या गेजचा कोणताही संबंध दिसून येत नाही. कारण अॅडजस्‍टेबल डिव्हाईसवर एकूण ३८ खुणा आहेत. त्यांपैकी दोन्‍ही बाजूच्‍या एकूण १३ खुणा अनावश्‍यक आहेत. मोजमाप करताना ० व ५० वर खूण करून आतील खुणा मोजाव्‍यात. या पेरणी यंत्रामध्‍ये ० ते ५० यामधील एकूण २५ खुणा असल्यामुळे ० नंतरच्‍या प्रत्‍येक खुणेस २,४,६,८,१०.......५० असे समजून खुणा करून घ्‍याव्यात. या पेरणी यंत्रावर प्रात्‍यक्षिक करून पडणाऱ्या बियाण्‍याची मात्रा काढल्‍यानंतर जवळपास १ खुणेस २ किलोच्‍या आसपास बियाणे पडत असल्‍याचे निदर्शनास आले. या पेरणी यंत्रावर प्रति एकरी २६ किलो बियाण्‍यासाठी वरीलप्रमाणे खुणा करून आवश्‍यक असलेली मात्रा ठरवून पेरणी करता येते. 
वाशिम जिल्‍ह्यात वापरात असलेल्‍या अन्य कंपन्यांच्या पेरणी यंत्राबाबतही हीच अडचण आहे. अॅडजस्‍टेबल नॉबवरील खुणा व ० ते ५० पर्यंत लिहिलेले आकडे आणि बियाण्‍याची मात्रा ठरविण्याकरिता करण्‍यात आलेल्‍या विश्‍लेषणाशी अचूक संबंध लावता येत नाही. 
जिल्‍ह्यातील सर्व तालुक्‍यात बियाण्‍याची मात्रा काढण्‍याबाबत ट्रॅक्‍टर चालकांची  प्रशिक्षणे आयोजित केली होती.
सध्या बहुतेक अनुभवी ट्रॅक्‍टर चालक सोयाबीन पेरणीसाठी फ्लुटेड रोलरवर तर्जनीच्‍या आकाराचा फरक ठेऊन, लिव्हरच्या मदतीने पेरणी करतात. हरभरा पेरणीसाठी फ्लुटेड रोलरवर अंगठ्याच्या आकाराचा फरक ठेऊन पेरणी केली जाते. कोणताही ट्रॅक्‍टर चालक फ्लुटेड रोलरवर असलेल्‍या बियाणे अॅडजस्‍टेबल डिव्हाईसवरील खुणा मोजून पेरणीची मात्रा ठरवत नसल्‍याचे चर्चेत निदर्शनास आले. परिणामी बियाण्‍याची मात्रा प्रती एकरी कमी /जास्‍त वापरली होते. 

पेरणी करताना घाई न करणे 
    खरीप हंगामात कोणत्‍याही पिकाची पेरणी ७५ ते १०० मी.मी. पाऊस झाल्‍यानंतर व वापसा आल्‍यानंतरच पेरणी करावी. 
    पारंपरिक पद्धतीने जमीन चार इंच ओल उपलब्‍ध असल्‍याची खात्री करून पेरणीबाबत निर्णय घ्‍यावा. 
    बैलाच्‍या साहाय्याने चार फणी/ दोन फणी पेरणी यंत्राने एका दिवसात ५ ते ७  एकर पेरणी होऊ शकते. ट्रॅक्‍टरचलीत सात किंवा नऊ फणी पेरणी यंत्राने एका दिवसात (आठ तासात) १० एकर पेरणी होणे अपेक्षीत आहे. पेरणीसाठी उपलब्‍ध अत्‍यल्‍प कालावधीचा विचार करता प्रति दिन १० ते १२ तास (दोन वाहन चालक ) पेरणी केल्‍यास शास्‍त्रोक्‍त पद्धतीने १५ ते २० एकर प्रति दिवस पेरणी करता येते. प्रत्‍यक्षात वाशिम जिल्‍ह्यात ट्रॅक्‍टरद्वारे प्रति दिन (१८ तास- दोन ते तीन शिफ्टमध्ये) ३० ते ३५ एकरावर पेरणी केली जाते. पेरणी करतात. 
    पेरणी करीत असताना ट्रॅक्‍टर हा सेकंड लो गिअरमध्ये १.९६० आरपीएम ठेवून प्रति तास ५ कि.मी. या वेगाने ट्रॅक्‍टर चालवावा.  
    पेरणीमध्‍ये चुका झाल्‍यास शेतकऱ्याचा संपूर्ण हंगाम वाया जातो. पेरणी करतेवेळी व्‍यवस्थित अंतर व योग्‍य खोलीवर (५ सें.मी.) योग्‍य अंतरावर बियाणे पडते किंवा नाही, याकडे स्‍वतः शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. 
    पेरणीबरोबर रासायनिक खताची पेरणी केली जाते. मात्र, खत बियाण्‍यावर पडणार नाही, याची काळजी घ्‍यावी.      

पेरणी यंत्र शास्त्रीय पद्धतीने 
कसे वापरावे ?

सोयाबीन‍ पिकाची पेरणी करण्‍यासाठी लागणाऱ्या बियाण्‍याची मात्रा निश्‍चित करण्‍याची पद्धत खालील प्रमाणे.
    प्रथम ट्रॅक्‍टरला पेरणी यंत्र जोडून पेरणी यंत्र समपातळीत ठेवावे. 
    ट्रॅक्‍टरचे हायड्रॉलिकद्वारे पेरणी यंत्र जमिनीपासून उंच उचलावे.
    पेरणी यंत्राच्‍या एकूण फणाची संख्‍या मोजावी.
    पेरणी यंत्राच्‍या टाकीमध्‍ये बियाणे भरून घ्‍यावे. 
    पेरणी यंत्राच्‍या चाकाला एका ठिकाणी खूण करण्याकरिता लाल कापडाची चिंधी बांधून चाकाचा परीघ मोजून घ्‍यावा. 
    पेरणी यंत्राच्‍या बियाण्‍याच्‍या नळ्यांना खालच्‍या बाजूस प्‍लॅस्‍टिक पिशव्‍या बांधाव्‍या.
    पेरणी यंत्राचे चाक जागेवरच हाताने दहा राऊंड पूर्ण होईल अशा प्रमाणात फिरवावे. 
    वरीलप्रमाणे चाक फिरवल्यानंतर बियाणे नळ्याद्वारे प्‍लॅस्‍टिक पिशवीत जमा होईल. 
    जमा झालेले प्रत्‍येक पिशवीतील बियाणे मोजून घेऊन सर्व नळ्याद्वारे सारखेच बियाणे पडत असल्‍याची खात्री बियाण्‍याचे वजन करून घ्‍यावी. सर्व पिशवीतील एकत्रित बियाण्‍याचे वजन घेऊन खालीलप्रमाणे त्रैराशिक मांडून एकरी बियाण्‍याची मात्रा ठरविता येते.  

उदा. समजा एकरी पेरावयाचे बियाणे - २६ किलो.
पेरणी यंत्राच्‍या बियाण्‍याचा  गेज - २६ नंबर.
पिकाच्‍या दोन ओळीतील अंतर - ४५ से.मी.   
पेरणी यंत्राच्‍या एकूण फणाची संख्‍या - ७ .
पेरणी यंत्राच्‍या चाकाचा परीघ - १ मीटर. 
वर्तुळाकार चाकाच्‍या दहा राऊंडची लांबी - १० मीटर. 
सात पिशव्यांमध्ये पडलेल्‍या एकूण बियाण्‍याचे वजन - २०५ ग्रॅम. (०.२०५ किलो) 

चाक फिरवल्‍याने पडणाऱ्या बियाण्‍यात किती क्षेत्रफळ पेरले जाईल, हे काढण्‍यासाठी सूत्र  -
दोन ओळीतील अंतर (मी.) X पेरणी यंत्राच्‍या फणांची संख्‍या = रुंदी (मी.)
०.४५ मी. x ७ फण = ३.१५ मीटर

चाकांचे दहा राऊंड फिरवल्‍यानंतर प्रति राऊंड एक मीटर प्रमाणे  = लांबी (मी.)
 १० राऊंड x १ मी. प्रति राऊंड  = १० मीटर 
क्षेत्रफळ (चौ. मी.)  = लांबी x रुंदी 
क्षेत्रफळ (चौ. मी.)= १० मी x  ३.१५ मी 
क्षेत्रफळ (चौ. मी.)=  ३१.५ चौ. मी. 
    
प्‍लॅस्‍टिकच्‍या सात पिशव्यांमध्ये एकूण जमा झालेल्‍या बियाण्‍याचे वजन = २०५ ग्रॅम. (०.२०५ किलो)
एकरी पेरणीसाठी पडणारे बियाणे प्रमाण  =
   ३१.५ चौ.मी : ०.२०५ किलो  : ४००० चौ.मी. :  ?  (किती किलो) 
=  ४००० x ०.२०५     भागिले ३१.५
= २६.०३ किलो प्रति एकर. 
          
आपण पेरणीसाठी पेरणी यंत्राचा ठेवलेला  गेज (२६ किलो/एकर) व कॅलिब्रेशनद्वारे आलेला बियाण्‍याचा दर २६.०३ किलो प्रति एकर दोन्ही एकसारखे आहेत. याचा अर्थ बियाणे सोडण्याच्या उपकरणामध्ये केलेली खूण योग्य आहे. त्यातून एकरी २६ किलो बियाणे पेरणी केली जाईल.  

बीबीएफ यंत्रासाठी शेतकऱ्यांनी आग्रह धरावा

वाशिम जिल्‍हा हा हमखास पावसाचा प्रदेश असून, ७५० मी. मी. पेक्षा जास्‍त पाऊस पडतो. मागील १० ते १५ वर्षात पडलेल्‍या पावसाचा विचार करता पावसाचे दिवस कमी झाले आहेत. तर कधी कधी एका दिवसात ८० ते १५० मी.मी. इतका पाऊस पडतो. परिणामी पिकात पाणी साचून उत्‍पादनात घट येते. याकरिता प्रत्‍येक १० ते ११ फुटावर बळीराम नांगराच्‍या साहाय्याने सर्व पिकांकरिता चर काढूनच पेरणी करावी. तसेच चिबड जमीन व पाणथळ जमिनीवर चर अवश्य काढावेत.
पेरणीपूर्वी चर काढणे शक्‍य न झाल्‍यास पेरणी करताना पेरणी यंत्राच्‍या दोन्‍ही बाजूस नांगराचे फाळ लावून पेरणीबरोबर चर काढावेत.

  • स्‍थानिक किंवा साध्‍या पेरणी यंत्राला नेहमी गेज लावणे, दोन रोपातील योग्‍य अंतर ठेवणे, एकरी बियाण्‍याचे प्रमाण योग्‍य राखणे इ. बाबी साध्‍या पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना अडचणी निर्माण होतात.
  • सदर अडचणीचा विचार करून कृषी विद्यापीठाने रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पेरणी यंत्र विकसित केले आहे. यात प्रत्येक पिकासाठी दोन रोपातील अंतर योग्य ठेवण्यासाठी वेगळ्या चकत्‍या बसवलेल्‍या असतात. परिणामी बियाण्याचा ज लावण्‍याची गरज पडत नाही. बियाणे योग्‍य अंतरावर पेरले जाते.
  • पेरणीसाठी उपलब्‍ध असलेला अल्‍प कालावधी व पावसाची अनिश्‍चितता यामुळे शेतकऱ्यांची व ट्रॅक्टरचालकांची गडबड उडते. वेगाने पेरणी करण्याकडे लक्ष असल्याने पेरणी यंत्र व पेरणीची खोली याकडे फारसे लक्ष शेतकरी देत नाहीत. मात्र, उत्पादनामध्ये त्याचा फटका बसू शकतो.
  • साध्‍या पेरणी यंत्राद्वारे कमी वेळात जास्‍त जमीन पेरणी होते. पेरणी यंत्रधारक हे प्रति बॅग/ एकर या तत्त्वावर पेरणी करून देतात. याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षाही ट्रॅक्‍टर मालकास होत. शेतकऱ्यांसाठी ते अडचणीचे ठरते. यावर उपाययोजना म्‍हणजे यंत्रधारकाने प्रति एकर किंवा प्रति बॅग भाडे न आकारता प्रति तास या दराने पेरणी करून द्यावे. शेतकऱ्याने तसा आग्रह धरावा.
  • बीबीएफ यंत्रामध्ये योग्य पिकाच्या चकत्या लावल्या की नाही, पाहायचे असते. शिफारशीप्रमाणे बियाणे व खताची मात्रा योग्‍य ठेवता येते
  • अति पाऊस झाल्‍यास सरीद्वारे पाणी शेताबाहेर पडते, तर पावसात खंड पडल्‍यास सरीमध्‍ये मुरलेल्‍या पाण्‍याचा ओलावा पिकांना मिळू शकतो.

 ः शंकर तोटावार, ८३०९३६४४४९
(प्रकल्‍प संचालक, आत्‍मा तथा जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम)


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
कमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत...ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी...
जांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक...औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड...
यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्यभाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक,...
एका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहतअर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व...
कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी...कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ...
सुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून...तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या...
यंत्राद्वारे भात रोपांची लावणीभात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप...
भात पेरणीसाठी सुधारित यंत्रेभात लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर...
पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना...प्रशिक्षित ट्रॅक्‍टरचालक हवा    ...
जनावरांतील निदानासाठी क्ष-किरण तपासणीक्ष-किरण तपासणीद्वारे जनावरांतील जठराचा दाह,...
कामाच्या स्वरूपानुसार करा ट्रॅक्टरची...आज बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे व क्षमतेचे...
रासायनिक खतातील भेसळ कशी ओळखाल?खरीप हंगामातील पेरणीला सुरवात होणार असून, शेतकरी...
‘शनेश्‍वर’ शेतकरी कंपनीने उभारली अवजारे...राघोहिवरे (ता. पाथर्डी, जि. नगर)) या दुष्काळी...
पीक व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पीक व्यवस्थापन, कीडनाशकांची फवारणी, सिंचन,...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
आव्हाने जाणून उतरा गूळ उद्योगातगुळाची मागणी गेल्या काही वर्षामध्ये वाढू लागली...
स्प्रेअरची निवड करताना राहा जागरूकपारंपरिक पाठीवरील पंपापासून अत्याधुनिक स्प्रेअरचा...
नेमकेपणाने फवारणी करण्यासाठी यंत्रमानव...सध्या पुणे येथील टाटा टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये...
कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी सामाजिक...छोट्या उद्योगापासून बहुराष्ट्रीय कंपन्यापर्यंत...
लसूण प्रक्रिया उद्योगासाठी पेस्ट अन्‌...हाताने लसूण सोलण्यासाठी वेळखाऊ व कष्टदायक ठरू...