agriculture stories in marathi processed products from Sapota | Agrowon

चिकूपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थ

सचिन अर्जुन शेळके
शनिवार, 18 जुलै 2020

नोव्हेंबर महिन्यापासून जास्त प्रमाणात चिकू फळांची आवक होते, हे लक्षात घेऊन बाजारपेठेच्या मागणीनुसार चिकूपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.

चिकू  (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) हे गोड, थंड भरपूर औषधी गुणांनी भरलेले चविष्ट फळ आहे. भारतात गुजरात राज्यातील सौराष्ट्र व दक्षिण गुजरात आणि महाराष्ट्रातील उत्तर कोकण या भागांच्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशांत आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू, प. बंगाल या राज्यांच्या समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशांत चिकूची लागवड केली जाते.  चिकूच्या झाडास वर्षभर फळे येतात. फळ झाडावरून काढल्यानंतर पिकते. या जैवरासायनिक क्रिया जलद घडत असल्याने लवकरच पक्व होऊन ते अल्पायुषी बनते.  

 • पिकलेले चिकू फळ गोड आणि चवदार असते. ग्लुकोज व फ्रुक्टोजयुक्त शर्करेचे प्रमाण जास्त (१२ ते १४ टक्के) असून, सुक्रोजचे प्रमाण फक्त दोन टक्के असते. यामुळे शरीरात ऊर्जा, उत्साह, चैतन्य निर्माण होते.
 • चिकूची साल तापनाशक आहे. चिकूच्या सालीमध्ये टॅनिन असते.
 • चिकूमध्ये अधिक मात्रेत अँटीक्सिडेन्ट असून, त्यात क जीवनसत्त्व आणि पोटॅशिअम भरपूर असते. त्यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने आतडे व पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त ठरते.
 • चिकूमध्ये 'सॅपोनिज' हे अल्कलॉइड असते.
 • चिकूमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, ५.२ ते ७.५ मिलिग्रॅम तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्त्व क असते.
 •  चिकूच्या पिकलेल्या फळापासून उत्तम प्रकारची पेये, पाकातील फोडी, जॅम, जेली, स्क्वॅश, स्लाईस, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. अपरिपक्व फळ व सालीपासून निघणाऱ्या दुधाळ चिकापासून च्युईंगम तयार करतात. 

चिकूपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ -
चिकू रस ः

 • रस तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत.
 • फळे स्वच्छ धुऊन त्यांची साल काढावी. बिया काढून फोडी कराव्यात.
 • चिकूच्या फोडींचा ज्युसरमध्ये लगदा करून, ०.२ टक्के पेक्टीनेज विकर (एन्झाइम) टाकून २ तास ठेवावे.
 • हा लगदा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. त्यातून मिळालेला रस बाटलीमध्ये पॅक करावा.
 • या रसाचा वापर चिकूची वेगवेगळ्या पेये बनवण्यासाठी करतात. उदा. चिकू रसात साखर, सायट्रिक आम्ल व पाणी मिसळल्यास उत्तम सरबत होते.
 • रस १५ मिनिटे गरम करून, त्यात सोडिअम बेन्झोएट मिसळावे. हे सरबत निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरून, हवाबंद करून साठवता येते.

चिकू स्क्वॅश -

 • पूर्ण पिकलेली गोड फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत.
 • स्टेनलेस स्टीलच्या चाकूने साल काढून घ्यावी.
 • चिकूमधील मधला पांढरा भाग व बिया काढून त्याच्या फोडी कराव्यात.
 • चिकूच्या फोडी मिक्‍सरमध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा.
 • हा लगदा जाडसर कापडात बांधून घेऊन त्यातला रस काढून घ्यावा.
 • १ किलो चिकूचा लगदा, १ किलो साखर, १ लीटर पाणी व ३५ ग्रॅम सायट्रिक आम्ल हे सर्व घटक एकत्र करून त्यांचे चांगले घोटून मिश्रण तयार करावे.
 • हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. तयार झालेल्या मिश्रणात पोटॅशिअम मेटाबायसल्फेट ६०० मिलिग्रॅम प्रति किलो किंवा सोडिअम बेंझोएट ७१० मिलिग्रॅम प्रति किलो प्रमाणात मिसळावे किंवा तयार स्क्वॅश ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत २० ते २५ मिनिटे गरम करून साठवावा.
 • तयार स्क्वॅश भरलेल्या बाटल्या साध्या पाण्याखाली धरून थंड कराव्यात.
 • बाटल्यांमध्ये साठविलेला स्क्वॅश थंड कोरड्या जागेत ठेवावा. स्क्वॅश ६ महिन्यांहून अधिक काळ टिकतो-.

चिकू जॅम -

 • पूर्ण पिकलेली गोड फळे स्वच्छ धुऊन त्याची साल काढावी.
 • त्यातील बिया काढून टाकून त्याच्या फोडी कराव्यात.
 • चिकूच्या फोडी मिक्‍सरमध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा.
 • प्रथम चिकूचा गर १ किलो, साखर १ किलो व सायट्रिक आम्ल २ ग्रॅम हे घटकपदार्थ एकत्र मिसळून मिश्रण ठरावीक घट्टपणा (६८.५ अंश ब्रिक्‍स) येईपर्यंत मिश्रण शिजवावे. शिजवताना मिश्रण पळीने सारखे ढवळत राहावे.
 • शिजलेले मिश्रण (जॅम) गरम गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत भरावे. नंतर पॅरिफिन वॅक्सने सील करावे.
 • बाटल्या थंड व कोरड्या वातावरणात साठवाव्यात.
 • चांगली पक्व फळे घेऊनही जॅम घट्ट झाला नाही तर त्यात थोडी पेक्‍टिनची भुकटी मिसळावी.

चिकू कॅन्डी ः

 • चिकू कॅन्डी बनविण्यासाठी फोडी साखरेच्या पाकात काही दिवस ठेवून व मग बाहेर काढून वाळवल्यास कॅन्डी तयार होते. ड्रायफ्रूट म्हणून चिकू कॅन्डीचा वापर करता येतो.
 • पूर्ण पिकलेली गोड फळे स्वच्छ धुऊन त्याची साल काढावी. नंतर बिया काढून टाकून त्याच्या फोडी कराव्यात. फोडीचे ३ ते ४ सेंटिमीटर लांबीचे तुकडे पाडावेत.
 • तुकडे ५० टक्के साखरेच्या पाकात टाकावेत. त्यामध्ये ४ टक्के सायट्रिक आम्ल मिसळावे.
 • हे मिश्रण १२ ते १४ तास मुरवण्यासाठी ठेवावे.
 • दुसऱ्या दिवशी चिकू फोडी ६० टक्के साखरेच्या पाकात टाकून परत १६ तास ठेवाव्यात.
 • अशाच प्रकारे शेवटी ७० टक्के साखरेच्या पाकात चिकू फोडी टाकून ते २ ते ३ दिवस तसेच ठेवावेत.
 • ३ दिवसांनंतर चिकू फोडी साखरेच्या पाकातून काढून चांगले निथळून घ्याव्यात. सावलीत पंख्याखाली सुमारे २५ ते ३० तास सुकवाव्यात. नंतर सुकलेल्या चिकूच्या कॅन्डीवर बारीक केलेली  साखर टाकावी.
 • चिकू कॅन्डी स्वच्छ काचेची भरणीत भरून हवाबंद करावी.

चिकू खोबरा बर्फी ः

 • चिकूपासून रस काढून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या लगद्यापासून चिकू बर्फी तयार करता येते.
 • एक भांड्यात १०० ग्रॅम तूप घेऊन त्यात नारळ ३५० ग्रॅम चांगला भाजून घ्यावा. नंतर त्यात १ किलो साखर, ७० मि. ली. सायीचे दूध व ६५० ग्रॅम चिकूचा लगदा मिसळून ते मिश्रण चांगले मिसळून शिजवावे.
 • मिश्रणाचा ब्रिक्स ७० अंश आल्यावर, त्यात ३ ग्रॅम मीठ व ४ ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकावे. मिश्रणाचा ब्रिक्स ८२ अंश येईपर्यंत मिश्रण शेगडीवरती गरम करावे.
 • मिश्रण घट्ट झाल्यावर तूप लावलेल्या ट्रेमध्ये १ सेंमी. थर येईपर्यंत पसरावे. चांगले थापून थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर सुरीने योग्य आकारमानाच्या वड्या पाडाव्यात.
 • त्यानंतर तयार झालेली चिकू खोबरा बर्फी पंख्याखाली सुकवून प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळावी. ही गुंडाळी पिशवीत पॅक करून साठवता येते.
 • चिकू खोबरा बर्फी चिकूच्या नैसर्गिक रंगामुळे चांगली दिसते व चविष्ट लागते.

चिकू चिप्स ः

 • पूर्ण पिकलेली गोड फळे स्वच्छ धुवावीत.
 • स्टेनलेस स्टीलच्या चाकूने साल काढून दोन भाग करावेत. त्यातील मधला पांढरा भाग व बिया काढून घ्याव्यात. त्यानंतर चिकूचे २ ते ४ सें.मी. पातळ काप करावेत.
 • हे काप सोलर ड्रायर (वाळवण यंत्रामध्ये) ५० ते ५५ अंश. सेल्सिअस तापमानास ८ ते १२ तास वाळवावे.
 • कडकडीत वाळवलेले चिकू चिप्स हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

चिकू पावडर ः

 • कडकडीत वाळवलेले चिकूच्या फोडी घ्याव्यात.
 • त्यानंतर ग्राइंडरच्या साह्याने वाळलेल्या फोडींची भुकटी करावी.
 • ही भुकटी १ मि.मी छिद्राच्या स्टीलच्या चाळणीतून चाळून घ्यावी.
 • २५० गेजच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सीलबंद करून साठवून ठेवावी.
 • चिकू पावडरपासून चिकू मिल्कशेक व आइस्क्रीम हे स्वादिष्ट पेये करता येतात. त्यासाठी चिकूची भुकटी दुधामध्ये मिसळून ढवळावी. त्यानंतर साखर मिसळून चिकू मिल्कशेक तयार करावा.

चिकू लाडू ः

 • पूर्ण पिकलेली गोड फळे स्वच्छ धुवावीत.
 • स्टेनलेस स्टीलच्या चाकूच्या साह्याने चिकूची साल काढून दोन भाग करावेत. त्यातील मधला पांढरा भाग व बिया काढून घ्याव्यात. -चिकूच्या फोडी करून वाळवून घ्यावेत. त्यानंतर ग्राइंडरच्या साह्याने वाळलेल्या फोडींची चिकू पावडर करावी.
 • चिकू लाडू तयार करण्यासाठी प्रथम २५० ग्रॅम रवा ३०० ग्रॅम तुपात भाजून घ्यावा.
 • २०० ग्रॅम सुके खोबरे किसून, भाजून व वाटून घ्यावे. नंतर एका भांड्यात भाजलेला रवा, भाजलेला खोबरे कीस, ४५० ग्रॅम चिकू पावडर, ९०० ग्रॅम साखर, १५ ग्रॅम वेलची पावडर, १५ ग्रॅम चारोळी व ३५ ग्रॅम बेदाणे इतर सर्व साहित्य एकत्र करावे. उरलेले तूप तापवून त्यात मिसळावे. आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे लाडू बनवून घ्यावेत. हे लाडू पौष्टिक असतात.

सचिन अर्जुन शेळके, ८८८८९९२५२२ 
(आचार्य पदवी विद्यार्थी,  अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग,  सॅम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय,  प्रयागराज, उत्तरप्रदेश.)


फोटो गॅलरी

इतर कृषी प्रक्रिया
लघू प्रक्रिया उद्योगांना चांगली संधीलघू उद्योगासाठी बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी...
ड्रॅगन फळापासून कॉर्डीयल, स्क्वॅश...ड्रॅगन फळ हे हायलोसेरियस आणि सेलेनेसियस या...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
मखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्कीदलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे भरपूर...
कृषी क्षेत्रामध्ये आहेत व्यावसायिक संधीव्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न बाबींकडे...
चिकूपासून बनवा आइस्क्रीमआइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला...
पपईपासून पेपन,पेक्टिन निर्मितीपपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी...
भोपळ्यापासून बर्फी, चिक्कीभोपळा हृदयरोगांसाठी  उपयुक्त आहे. यातील घटक...
चिकूपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थचिकू  (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) हे गोड,...
प्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...
शेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...
श्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने...
फणसामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...
फणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...
प्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत...
बहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....
प्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...
कोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...
करवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...