आवळा प्रक्रियेने दिली आर्थिक साथ (video सुद्धा)

आवळा प्रक्रियेने दिली आर्थिक साथ
आवळा प्रक्रियेने दिली आर्थिक साथ

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन औरंगाबाद येथील अनिता गोविंद मोरे यांनी आवळा प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली. ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांनी विविध पदार्थ बाजारपेठेत आणले. गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि थेट ग्राहकांना विक्री सुविधा असल्याने पदार्थांच्या मागणीत चांगली वाढ झाली. यामुळे कोरडवाहू शेतीला आर्थिक आधार मिळाला आहे. खरीप पिकांवर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतीतून एकत्रित कुटुंबाचा खर्च भागवणे शक्‍य नव्हते. त्यामुळे रोजंदारीसाठी मोरे दांपत्याने औरंगाबाद शहर गाठले. परंतू तिथे मिळणाऱ्या मिळकतीतून कुटुंबाचा चरितार्थ भागविणे शक्‍य नव्हते. त्यामुळे अर्थार्जन वाढविण्यासाठी काय करता येऊ शकते, या विचारातून प्रक्रिया उद्योग प्रशिक्षणाचा पर्याय समोर आला. अनिता गोविंद मोरे यांनी औरंगाबादच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आवळा प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले. तयार केलेल्या पदार्थांच्या विक्री व्यवस्थापनाची जबाबदारी अनिताताईंचे पती गोविंदराव यांनी घेतली. कुटुंबाच्या गरजेतून निर्माण झालेला आवळा प्रक्रिया उद्योग आता 'सई' ब्रॅंडने आकार घेत आहे. त्यांनी प्रक्रिया उद्योगाची नोंदणी केली आहे. प्रत्यक्ष पहा आवळा प्रक्रियेचा घरगुती उद्योग... video शेतीतून प्रक्रिया उद्योगाकडे ः मोरे कुटुंबाची टेळकी (ता. लोहा, जि. नांदेड) गावामध्ये एकत्रित आठ एकर कोरडवाहू शेती. परंतू या शेतीमध्ये केवळ खरिपाच्या पिकाची शाश्वती. त्यामुळे गोविंद मोरे यांनी औरंगाबाद शहरातील खासगी कंपनीत नोकरी पत्करली. २००६ मध्ये त्यांचा विवाह अनिता यांच्याशी झाला. येणाऱ्या मिळकतीत कुटुंबाचा चरितार्थ भागविणे शक्‍य नसल्याने २००८ मध्ये मोरे दांपत्य गावी परतले. परंतू शेती ही निसर्गाच्या भरवशावरच ठरलेली. शेतीतूनही फारसे उत्पन्न हाती येत नव्हते. त्यामुळे २०१० मध्ये पुन्हा गोविंद मोरे यांनी औरंगाबाद गाठून खासगी कंपनीत नव्याने नोकरी सुरू केली. २०११ मध्ये गोविंद मोरे यांनी पत्नी अनितासह मुलांना औरंगाबादमध्ये आणले. मिळकत वाढविण्यासाठी त्यांनी परभणी येथे उत्पादित होणारे दर्जेदार आवळा पदार्थ, लोणची आदी पदार्थांची थेट ग्राहकांच्या घरी जाऊन विक्री सुरू केली. या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून आपणच आवळ्याचे काही पदार्थ का तयार करू नयेत असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. प्रक्रिया उद्योगासाठी प्रशिक्षणाची तयारी अनिताताईंनी दाखविली. प्रशिक्षणासाठी त्यांनी औरंगाबाद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला. या केंद्राच्या तत्कालीन गृहविज्ञान शाखा प्रमुख प्रा. दीप्ती पाटगावकर यांनी आवळा प्रक्रियेबाबत संपूर्ण मार्गदर्शन केले. अलीकडे मोरे दांपत्याने जमवलेल्या मिळकतीतून औरंगाबाद शहरातील साईराज नगरमध्ये छोटे घर घेतले आहे. या ठिकाणी त्यांनी आवळा प्रक्रिया उद्योग सुरू केला. प्रक्रिया उद्योगाला सुरवात ः अनिता मोरे यांनी आवळा प्रक्रिया प्रशिक्षण घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात आवळा ज्यूस व पावडर निर्मितीला सुरवात केली. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी टप्प्याटप्प्याने आवळा कॅंडी, सुपारी, लोणचे, मुरंबा आणि पावडर निर्मितीस सुरवात केली. पदार्थांची गुणवत्ता आणि थेट विक्रीतून जोडलेल्या ग्राहकांमुळे उत्पादनांना मागणी वाढू लागली. सध्या आवळा कॅंडी ३६० रुपये किलो, आवळा पावडर ४०० रुपये किलो या दराने विकली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार लोणचे, सरबत, मुरंबा बॉटल पॅकिंग करून दिले जाते. या दरम्यान उद्योगाची वाढ करण्यासाठी अनिताताईंनी एमसीईडीच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीविषयी प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणामुळे त्यांना सुरू केलेल्या आवळा प्रक्रिया उद्योगासह विविध गृह व लघू उद्योगातील संधी लक्षात आल्या. मागणीनुसार उत्पादनांची विक्री ः केवळ आपल्याकडील उत्पादित प्रक्रिया पदार्थ विकण्यापुरते मर्यादित न राहता गोविंद मोरे हे परभणी येथील मंगल जाधव यांनी तयार केलेल्या आवळा, लिंबू प्रक्रिया उत्पादनांची विक्री करतात. ग्राहकांना कोणते पदार्थ हवेत ते देण्याचा प्रयत्न गोविंदरावांचा असतो, त्यामुळे मिळकतीमध्येही वाढ होत आहे. ज्यूस विक्रीचा स्टॉल मोरे दांपत्याने औरंगाबाद शहराच्या म्हाडा कॉलनीतील चौकात सकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत 'सई' ब्रॅंडच्या विविध आरोग्यवर्धक ज्यूसची विक्री सुरू केली. या ठिकाणी आवळा, कारले, दुधी भोपळा ज्यूस तसेच गव्हांकूर रस, गूळवेल रस, कडूलिंब रसाची दहा रुपये ग्लास या दराने विक्री होते. विविध प्रकारच्या ज्यूस विक्रीतून प्रति दिन अडीचशे ते तीनशे रुपये मिळतात. असा आहे प्रक्रिया उद्योग ः १) दरवर्षी १५ क्‍विंटल आवळा प्रक्रिया. २) थेट शेतकऱ्यांकडून आवळा खरेदीला प्राधान्य. ३) मोरे दांपत्य करते आवळा तोडणीचे काम. ४) ग्राहक तसेच सरकारी कार्यालयातून थेट विक्री. ५) यंदाच्या वर्षीपासून हळद पावडर निर्मिती. ६) छोट्या चक्‍कीवर धान्य दळणाचे काम. ७) दर महा सरासरी वीस हजारांची उलाढाल. कागदी पिशव्यांची निर्मिती ः प्लॅस्टिकबंदी झाल्यामुळे बाजारपेठेत कापडी, कागदी पिशव्यांची मागणी वाढली. त्याचा फायदा अनिताताईंनाही झाला. कागदी पिशव्या बनविण्याचे तंत्र अवगत करून अनिताताई मागणीनुसार कागदी पिशव्या पुरविण्याचे काम करतात. सरासरी ४५ रुपये प्रतिशेकडा या प्रमाणे विक्री होते. संपर्क ः अनिता मोरे, ९०११८९१३१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com