करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ 

करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ 
करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ 

करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी आवडीने खाल्ली जाते. डोंगरदऱ्यांमध्ये येणारी ही रानभाजी लागवडीचे काही प्रयोग झाले असले तरी हे काही रुळलेले पीक नाही. मात्र, या काहीशा कारल्यासारख्या चवीच्या व दिसणाऱ्या भाजीचे औषधी गुणधर्म महत्त्वाचे आहेत. 

स्थानिक नाव ः कुटले, करटोली, कातोंले  शास्त्रीय नाव ः Momordica dioica  इंग्रजी नाव : Spine Gourd  संस्कृत नाव ः काटकोटाकी, ककोंटकी  कूळ, कुटुंब ः क्युक्रविटसिटा  जीनस ः मोमोर्डिका   

औषधी गुणधर्म 

  • करटोलीचा आहारामध्ये वापर केल्यास शरीरातील सी जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढते, त्यामुळे शरीरातील विषारी घटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 
  • गर्भवती स्त्रियांच्या आहारामध्ये करटोलीचा समावेश केल्यास गर्भाच्या वाढीस मदत होते. गर्भ चांगल्या प्रकारे विकसित होऊन जन्मतः विकृती दूर राहतात. 
  • बिटा - कॅरोटीन, अल्का कॅरोटीन, लुहेन, झिकझाँटीन व जीवनसत्त्व - सी अशा घटकांमुळे त्वचा निरोगी होते. 
  • जीवनसत्त्व सी मुळे केसांच्या समस्या दूर होतात. केसांची वाढ सुरू होऊन गळती बंद होते. 
  • जीवनसत्त्व अ असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. 
  • ५ ग्रॅम करटोली पावडर ५ ग्रॅम साखरेमध्ये मिसळून दिवसातून दोन खाल्ल्यास मूळव्याध नियंत्रणात राहण्यास मदत होते. 
  • १ ग्लास दुधामध्ये १० ग्रॅम कराटोली पावडर मिसळून पिल्यास मूतखडा व मूत्रल विकार दूर होतात. 
  • यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण भरपूर असल्याने पचनसंस्था व चयापचयाच्या क्रिया सुधारतात. 
  • करटोलीपासून बनवता येणारे विविध पदार्थ ः  लोणचे 

  • प्रथम करटोली मधोमध चिरून त्याचे पातळ काप करून घ्यावेत. त्यात चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा. 
  • तेल तापवून त्यात मेथी दाणे परतून घ्या. मिक्सरमध्ये मेथी दाणे, मोहरी, हळद व हिंग घालून बारीक वाटून लोणच्याचा मसाला तयार करून घ्या. 
  • एका छोट्या कढईत तेल तापवून घ्या. 
  • तयार लोणच्याचा मसाला, लाल मिरच्याचे तुकडे, लिंबाचा रस व तापवून गार केलेले तेल, चिरलेल्या करटोलीत घालून मिश्रण एकत्रित करून घ्या. 
  • तयार झालेले करटोलीचे लोणचे निर्जंतुकीकरण केलेल्या काचेच्या बरणीत ठेवा. २ ते ३ दिवसांत लोणचे मुरते. चवीला उत्कृष्ट लागते. 
  • करटोली पावडर 

  • करटोली चिरून त्याचे काप करून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन उन्हात वाळवावेत. किंवा ट्रे ड्रायरमध्ये ६० ते ७० अंश सेल्सिअस तापमानास २२ ते २४ तास वाळवून घ्यावेत. 
  • वाळलेली करटोली मिक्सरमध्ये किंवा पॅल्व्हरायझरमध्ये दळून त्याची भुकटी तयार करावी. 
  • करटोलीची भुकटी ही औषधी असून, त्याचा वापर हा बवासीर, किडणीस्टोन व अपचन यांवरील उपचारात केला जातो. 
  • करटोली चिप्स : 

  • २५० ग्रॅम करटोली पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यात थोडेसे मीठ घालून मध्यम आकाराचे काप करावेत. 
  • त्यातील बिया काढून टाकाव्यात. त्यात थोडेसे मीठ घालून एका भांड्यात ३ ते १० तासांसाठी ठेवावे. मीठ आतपर्यंत मुरेल, त्यामुळे त्याचा कडसरपणा कमी होण्यास मदत होईल. सकाळी किंवा १० तासांनंतर त्यामधील मिठाचे द्रावण काढून काप थोडे पिळून घ्यावेत. चवीनुसार लाल तिखट, मिरची पावडर मिसळून घ्यावी. 
  • नंतर झालेले मिश्रण सूर्यप्रकाशात स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवून २ दिवसांपर्यंत कडक वाळवून घ्यावे. काप वाळल्यानंतर हवाबंद स्थितीमध्ये एक वर्षापर्यंत टिकतात. 
  • तयार झालेले करटोलीचे काप गरजेनुसार मध्यम गरम तिळाच्या तेलात तळून घ्यावेत. आवश्यकतेनुसार त्यामध्ये जिरा भुकटी, मसाले टाकून तयार करावे. 
  • - सचिन शेळके, ८८८८९९२५२२  कृष्णा काळे, ८८०५९६८५३६  (साहाय्यक प्राध्यापक, लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com