कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर उत्पादन

कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर उत्पादन
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर उत्पादन

सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी विविध पर्यायांचा शोध घेत आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सेलगाव (ता. अर्धापूर) येथील कृषी पदवीधर शेतकरी हनुमंत राजेगोरे यांनी सीताफळ लागवडीचा पर्याय निवडला आहे. तुलनेने कमी पाणी व खर्चामध्ये व्यवस्थापन होत असल्याने किफायतशीर उत्पादन मिळत आहे. ३० गुंठ्यांपासून सुरू केलेली सीताफळ लागवड वाढवत आठ एकरांपर्यंत नेली आहे. २००३ मध्ये परभणी येथील कृषी विद्यापीठांतर्गत कृषी पदवी घेतल्यानंतर हनुमंत माणिकराव राजेगोरे यांनी पुढील दोन वर्षांमध्ये व्यवस्थापन (मार्केटिंग) यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयामध्ये झालेल्या मुलाखतीतून एका बॅंकेमध्ये रुजू झाले. बॅंकेमध्ये पाचस-ाडेपाच वर्षे सेवा करत असतानाच नोकरीत आपले मन रमत नसल्याचे जाणवत होते. शेवटी धाडसी निर्णय घेत २०१० मध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला. राजेगोरे कुटुंबीयांची सेलगाव (ता. अर्धापूर) आणि नांदुसा (ता. नांदेड) या गावांच्या शिवारात एकूण ३० एकर मध्यम प्रकारची जमीन आहे. हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील येलदरी सिद्धेश्वर प्रकल्पाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात त्यांची जमीन येते. शेताजवळून गेलेल्या कालवा आणि नियमित आवर्तनामुळे काही वर्षांपूर्वीपर्यंत पाण्याची भरपूर उपलब्धता होती. या काळामध्ये राजेगोरे यांचा केळी, ऊस या प्रमुख नगदी पिकांवर भर असे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातून होणाऱ्या आवर्तनांमध्ये नियमितता राहिली नाही. पाण्याची समस्या जाणवू लागली. राजेगोरे यांनी पीक पद्धतीत बदल केला. कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन, तर हंगामी बागायती क्षेत्रात हळद पिकाचा पर्याय निवडला. भविष्यामध्ये औषधी वनस्पतीच्या शेतीला महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी २०१८ मध्ये नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम.एस्सी. (हर्बल मेडिसीन) ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. छोट्या क्षेत्रापासून सुरुवात पाण्याची कमतरता लक्षात घेता कमी पाण्यातील पिकाची शोध सुरू झाला. त्यात सीताफळाची निवड केली. नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, भोकर तालुक्यांतील डोंगराळ भागात नैसर्गिकरीत्या आलेल्या गावरान जातीची सीताफळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीस येतात. या गावरान सीताफळाचा हंगाम संपल्यानंतर येणाऱ्या सुधारित जातीच्या सीताफळांची लागवड करण्याचे राजेगोरे यांनी ठरविले. बार्शी (जि. सोलापूर) येथील एका अनुभवी शेतकऱ्याच्या शेतीला भेट देऊन, लागवड, व्यवस्थापन याविषयी जाणून घेतले. २०१३-१४ मध्ये त्यांच्याकडून सीताफळाची (गोल्डन एनएमके १ वाण) रोपे प्रति रोप ७० रुपये प्रमाणे खरेदी करत नांदुसा शिवारातील शेतामध्ये ३० गुंठे क्षेत्रावर लागवड केली. लागवडीचे अंतर १६ बाय ८ फूट ठेवले असून, ३०० झाडे बसली. पहिली दोन वर्षे योग्य पाणी, खत व्यवस्थापनावर भर दिला. बागेमध्ये सोयाबीन, हरभरा इ. आंतरपिके घेऊन खर्च भागवला. तिसऱ्या वर्षापासून पाण्याचा ताण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पाण्याचा ताण दिला जातो. एक जूनला छाटणी केली जाते. छाटणी केल्यामुळे झाड डेरेदार होऊन फळफांद्याची संख्या वाढते. प्रतिझाड अधिक उत्पादन मिळते. गावरान सीताफळांचा हंगाम संपल्यानंतर राजेगोरे यांची सीताफळे बाजारपेठेत विक्रीसाठी पोचतात. पर्यायाने चांगले दर मिळण्यास फायदा होतो. व्यवस्थापनातील महत्त्वाचे

  • लागवडीनंतरची पहिली दोन वर्षे महत्त्वाची असतात. या कालावधीत आंतरपिके घेता येतात.
  • फळमाशी ही सीताफळावरील प्रमुख कीड असून, तिच्या नियंत्रणासाठी बागेत कामगंध सापळे लावतात. सोबतच रान तुळशीची लागवडही बागेमध्ये केली आहे.
  • ढगाळ वातावरणाचा फळांच्या उत्पादनावर होते.
  • सीताफळाचा काढणी हंगाम दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये असतो. यंदा पावसामुळे हंगाम लांबणीवर पडला आहे.
  • सीताफळाची तोडणी केल्यानंतर क्रेटमध्ये भरून विक्रीसाठी पाठविली जातात.
  • एनएमके १ या वाणाची सीताफळे हिरव्या, पिवळसर रंगाची असून, कवच तुलनेने टणक असते. परिपक्व काढणीनंतर फळ पाच सहा दिवस टिकून राहते. गावरान वाणाच्या तुलनेत गराचे प्रमाणही अधिक असल्यामुळे ग्राहकांची अधिक पसंती मिळते.
  • उत्पादन खर्च ः

  • रोपांच्या किमतीसह लागवडीचा खर्च प्रतिरोप साधारणपणे १०० रुपये इतका होतो.
  • आंतरपिकाची लागवड सीताफळ बागेत केली जाते. त्यासाठी केलेल्या मशागत, खत व्यवस्थापनाचा बागेला फायदा होतो. वेगळे व्यवस्थापन करावे लागत नाही.
  • पहिली दोन वर्षे शेंडा छाटणी करावी लागते. ती स्वतः काळजीपूर्वक करतो.
  • बागेमध्ये फुलोऱ्यानंतर ५ ते ६ फवारण्या कराव्या लागतात. त्यासाठी एकरी ४ ते ५ हजार रुपये खर्च होतो.
  • बेसल डोससह ठिबकद्वारा विद्राव्य खतांचा एकरी एकूण खर्च २० हजार रुपये होतो.
  • फळबागेसह अन्य शेतीमध्ये काम करण्यासाठी तीन मजूर आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येकी ८० हजार रुपये प्रतिवर्ष मजुरी दिली जाते.
  • विक्रीचे नियोजन ः

  • २०१६ मध्ये सीताफळांचे उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला नांदेड येथील मार्केटमध्ये स्वतः नेऊन विक्री केली. पहिल्या वर्षी मिळालेल्या १० क्विंटल उत्पादनाला सरासरी ८० रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला.
  • दुसऱ्या वर्षापासून व्यापारी त्यांच्या शेतातून सीताफळाची खरेदी करतात. २०१७ मध्ये १४ क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला प्रतिकिलो सरासरी १०० रुपये दर मिळाला.
  • २०१८ मध्ये ३० क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला प्रतिकिलोला सरासरी ११० रुपये दर मिळाला.
  • यंदा आजवर साडेआठ क्विंटल फळांचे उत्पादन मिळाले असून, सरासरी १२५ रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. यंदा अतिपावसामध्ये एकूण २० क्विंटलपर्यंत उत्पादन येणे अपेक्षित आहे.
  • विक्रीसाठी व्हॅाटसअप ग्रुप, फेसबुक यांसारख्या सामाजिक माध्यमांचा वापर करतात. नांदुसा हे गाव नांदेड शहराजवळ असल्याने अनेक ग्राहक शेतातून ताजी सीताफळे खरेदी करतात.
  • यंदा प्रथमच हैदराबाद येथील बंजारा हिल परिसरातील मॉलमध्ये नमुन्यादाखल सीताफळे पाठविली असून, त्यांचा प्रतिसाद सकारात्मक आला आहे. पुढील वर्षी नागपूरसह अन्य बाजारपेठांमध्येही बॉक्स पॅकिंगसह विक्री करण्याचे त्यांचे नियोजन आहे.
  • सीताफळ लागवड क्षेत्राचा विस्तार

  • कमी सिंचन, माफक उत्पादन खर्च आणि तुलनेने शाश्वत उत्पादन यामुळे हनुमंतरावांनी सीताफळाच्या क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली.
  • २०१७ मध्ये सीताफळाची ३ एकर १० गुंठे क्षेत्रावर ११०० झाडांची लागवड केली. गेली दोन वर्षे या पिकामध्ये सोयाबीन व हळदीचे आंतरपीक घेतले. सोयाबीननंतर रब्बीमध्ये हरभऱ्याचे उत्पादन घेतले.
  • आत्मविश्वास वाढल्याने २०१९ मध्ये ३ एकर २० गुंठे क्षेत्रावर आणखी सीताफळ लागवड केली. त्यांच्याकडील सीताफळाचे क्षेत्र ८ एकरांवर पोचले आहे.
  • हळद, सोयाबीनचे उत्पादन ः

  • राजेगोरे यांच्याकडे दरवर्षी दोन एकर क्षेत्रावर हळद लागवड असते. गादीवाफा पद्धतीने लागवड करताना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते. द्रवरूप खतांवर भर असतो. वाळलेल्या हळदीचे एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
  • राजेगोरे दरवर्षी १६ ते १७ एकरवर सोयाबीनचे उत्पादन घेतात. एकरी सरासरी १० ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
  • जलसंधारणासाठी खोदला चर ः शेतीच्या सिंचनासाठी विंधनविहिरीची व्यवस्था आहे. त्याला पाणी टिकून राहावे, यासाठी पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी त्यांची धडपड असते. त्यासाठी त्यांनी शेतामध्ये सुमारे ८०० फूट लांबीचा १२ ते १५ फूट खोली, रुंदीचा चर खोदला आहे. यामुळे शेतातून वाहून जाणारे पाणी चरामध्ये मुरते. त्याचा फायदा जलसंवर्धनासाठी होतो. जपला शेतीसह चळवळीचाही वारसा ः हनुमंतराव यांचे वडिल माणिकराव हेही प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जात. त्यांनी मोसंबी, आंबा, चिकू, कापूस बीजोत्पादनासोबत काजू लागवडीचाही प्रयोग केला होता. ते शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. वडिलांच्या प्रगतिशील शेतीबरोबरच त्यांच्या शेतकरी चळवळीचा वारसाही हनुमंतराव चालवत आहेत. संपर्क ः हनुमंत राजेगोरे, ९७६५५५८२२२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com