शेळीपालन : परतफेड हप्ते ठरवण्यासाठी तांत्रिक बाबी महत्त्वाच्या

 परतफेड हप्ते ठरवण्यासाठी तांत्रिक बाबी महत्त्वाच्या
परतफेड हप्ते ठरवण्यासाठी तांत्रिक बाबी महत्त्वाच्या

शेळीपालनामुळे शेतमजूर स्त्रियांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ झाल्याची बातमी सुरेशच्या वाचनात आली. त्यात शेतमजूर महिलांना ५ शेळ्या अधिक १ बोकड देण्याच्या योजनेचा उल्लेख होता. या महिला शेतात जाताना शेळ्या सोबत नेत असल्यामुळे चाऱ्याच्या खर्चात बचत होते. यामुळे सुरेशच्या मनात शेळीपालनाविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्याला बंदिस्त शेळीपालनाविषयी समजले. हे आपल्याला जमू शकेल, असा विश्वास वाटला. मात्र, नेमक्या किती शेळ्यांचा प्रकल्प करायचा, हे समजत नव्हते. शेवटी सुरेशने शेळी महामंडळ तसेच विविध बाजारपेठामध्ये फिरून अधिक माहिती मिळवली. जातिवंत उस्मानाबादी शेळ्या उपलब्ध होण्याची खात्री झाल्यानंतर सुरेशने १०० शेळ्यांचा प्रकल्प करण्याचे ठरवले. भांडवलाचा प्रश्न होताच. सुरेशने बँकेतील अधिकाऱ्यांची भेट घेतली. १०० शेळ्या अधिक ५ बोकड अशा प्रकल्पासाठी कर्जप्रकरण करण्याचा विचार मांडला. बँकेतील कृषी अधिकाऱ्यांनी शेळी पालनातील तांत्रिक व आर्थिक बाबी समजून सांगितल्या. बाजारातील सद्यकिंमतीनुसार संभाव्य खर्चाची यादी करण्यास सांगितले. ती कशी करावी, याने तो गोंधळून गेला. या वेळी त्याला योगेश या मित्राची आठवण झाली. याने सहा महिन्यांपूर्वी शेळी पालनाचा एक कोर्स केला होता. योगेशने अधिक माहिती दिली. सोबतच त्याला प्रशिक्षणादरम्यान शेळी पालनाचा एक नमुना प्रकल्प मिळाल्याचेही सांगितले. त्यानुसार आपण प्रकल्प अहवाल बनवू असे म्हणत तो मदतीला आला. योगेशला स्वतःचा प्रकल्प उभारायचा होता. पण दुसऱ्याच आर्थिक अडचणी उद्भवल्यामुळे त्याचा विचार थोडा मागे पडला होता. आपल्या मित्राला मदत करताना त्यालाही आनंद झाला. ‘‘चल तुझा प्रकल्प तर आधी उभारू या, नंतर मीही कामाला लागतो.’’ असे म्हणत त्याने सुरेशला धीर दिला. तांत्रिक बाबी स्पष्ट होणे आवश्यक १) योगेशकडून उपलब्ध झालेल्या नमुना प्रकल्प अहवालाप्रमाणे सुरेशने तांत्रिक व आर्थिक बाबींची यादी तयार केली. त्यामध्ये बंदिस्त शेळी पालनातील महत्त्वाच्या गोष्टींची नोंद केली. उदा. शेळीची जात कोणती घेणार? (उस्मानाबादी), त्यांची संख्या व किंमत (१०० शेळ्या व ५ बोकड), प्रत्येक शेळीला आवश्यक जागा, त्यानुसार एकूण शेडचा आकार. मग शेडची लांबी रुंदी ठरवत त्याच्या बांधकामाचा खर्चही एका ठेकेदाराकडून काढून घेतला. २) नियोजनातील महत्त्वाच्या बाबींमध्ये शेळीचा गर्भ कालावधी (आठ महिने), एका शेळीला सर्वसाधारणपणे होणारी करडे (दोन करडे), करडांचे विक्रीचे वय (आठ महिने), होणाऱ्या करडामध्ये नर व मादी यांचे प्रमाण (१:१), करडामधील मृत्यूचे प्रमाण (१०%), दर आठ महिन्यांनी करडे होतात म्हणजे दोन वर्षांत तीनदा करडे होतात वगैरे. म्हणजेच शंभर शेळ्यापासून मिळणारी करडांची एकूण संख्या ठरवत पहिल्या वर्षअखेर, दुसऱ्या वर्षअखेर त्यांचे प्रमाण ठरवले. प्रकल्पामध्ये दर आठ महिन्यांनी विक्रीसाठी उपलब्ध शेळ्या व बोकड यांची संख्या काढली. त्यांच्या विक्रीचा सध्याचा दर (घावूक आणि किरकोळ बाजारातील) मिळवला. त्यातून प्रति वर्ष होणाऱ्या उत्पन्नांचा अंदाज काढला. ३) शेळीपालनातील शेळी, बोकड व करडू यांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक चारा व खाद्य यांचे प्रमाण तज्ज्ञांकडून मिळवले. त्याचा सध्याचा दर किती आहे. एकूण खाद्यावरील प्रति वर्ष होणारा खर्चही मांडला. ४) जनावरांच्या रोग, आजार व औषधोपचाराचाही खर्च धरला. अचानक मोठ्या प्रमाणातील मरतुकीपासून आर्थिक संरक्षणासाठी विम्याची रक्कम आणि प्रीमियम किती भरावा लागेल, याचीही माहिती घेतली. त्याचा उल्लेख प्रकल्पामध्ये घेतला. ५) शेळीपालन प्रकल्पासाठी आवश्यक वीज व पाणी याचा खर्च, मजुरांची संख्या व मजुरीचा दर या बाबीही नोंदवल्या. ६) बॅंकेतील अधिकाऱ्याशी पुन्हा चर्चा करून मिळणाऱ्या कर्जाचा व्याज दर, कर्ज परत फेडीचा कालावधी वगैरे बाबी समजून घेतल्या. त्याचाही उल्लेख करत एकूण खर्च, अपेक्षित उत्पन्न यांचा ताळेबंद तयार केला. कागदावर मांडले की स्पष्ट होते... अनेकांशी बोलल्यामुळे शेळीपालनातील बरीच माहिती सुरेशकडे गोळा झाली होती. मात्र, जेव्हा प्रकल्पासाठी त्याच्या नोंदी तो करू लागला, तेव्हा अनेक बाबी स्पष्ट होऊ लागल्या. अगदी शेळ्यांच्या संपूर्ण व्यवस्थापन कसे केले, तर हा प्रकल्प यशस्वी होईल, याचा अंदाज त्याला आला. कोणतेही नियोजन कागदावर व्यवस्थित मांडले की ते अधिक सुस्पष्ट होते, याचा प्रत्यय सुरेशला आला. हे सर्व करताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे पहिल्या वर्षाअखेर शेळ्या व बोकड विक्रीसाठी उपलब्ध होणार. म्हणजे मग पहिल्या वर्षीच्या बॅंकेच्या हप्त्याचे काय? त्याने आपली शंका बॅंकेतील अधिकाऱ्यांना विचारली. त्यांनी त्याला काळजी न करण्याचे सांगत पहिले वर्ष हे "ना हप्ता" राहील, असे सांगितले. दुसऱ्या वर्षी एकदा शेळ्या व बोकड यांची विक्री होणार, म्हणजे बॅंकेचा एकच हप्ता असेल. मात्र, तिसऱ्या वर्षी शेळ्या व बोकडांची दोन वेळा विक्री करणे शक्य असल्याने दोन हप्ते भरावे लागतील. म्हणजेच एक वर्षाआड दोन हप्ते या प्रमाणे परत फेडीची योजना तयार करावी लागेल. अधिकाऱ्यांनी परतफेडीबाबतचा त्यांच्याकडे असलेला एक तक्ता दाखवला. या प्रमाणे शेळीपालनाच्या तुझ्या प्रकल्पाचा तक्ता तयार करण्यास सुचवले. पण त्याची एकूण धडपड पाहून शेड बांधण्याची जागा पाहण्यासही आले. कर्जमंजुरीची प्रक्रिया सुरू झाली. दिनेशलाही हा सारा वृत्तांत समजला. त्याने सुरेशची भेट घेत कौतुक केले. तो म्हणाला, ‘‘प्रशिक्षण घेऊन आठ महिने झाले. मात्र, अडचणीमुळे माझा प्रकल्प रखडला. तुझ्यापाठोपाठ मीही १०० शेळ्यांचा व्यवसाय सुरू करतो.’’ सुरेश म्हणाला, ‘‘आपल्यासारखे आणखी दोन तीन प्रकल्प आपल्या गावात उभे राहिले, तर शेळ्या विक्रीसाठी मोठे व्यापारी आपल्या गावात स्वतःहून येतील. आपली विक्रीसाठीची धडपड कमी होईल. आपल्या शेळ्यांचा दरही आपल्याला ठरवता येईल.’’ दिनेशने मग वेगळीच कल्पना काढली. तो म्हणाला, ‘‘आपण हे बँकेला पटवू शकलो, तर आपल्या एकत्रित प्रस्तावांचा बॅंक नक्कीच विचार करेल. सर्वांनाच कर्ज पुरवठा करणे बँकेला व व्यवसाय करणाऱ्याला सोपे होईल. सर्वांना एकत्रित विक्रीचा विचार केला तर ज्या महिन्यात शेळ्या व बोकड यांना मागणी असते अशा वेळी, उदाहरणार्थ, आषाढ महिना, रमजान, बकरी ईद, नाताळ, ३१ डिसेंबर, होळी या काळात विक्रीसाठी विशेष मार्केटिंग योजना, ऑनलाईन बुकिंग इ. सुरू करता येईल. यामुळे सर्वांचे उत्पन्न वाढेल.’’    सुरेशला त्याच्या कर्जमंजुरीचे पत्र मिळाले. त्या वेळी दिनेशही बरोबर होता. त्या दोघांनी आपला विचार बँक अधिकाऱ्यांना सांगितला. त्यांनाही ते पटले. ते म्हणाले, ‘‘योग्य पत असलेल्या तरुणांना अशा प्रकल्पासाठी नक्कीच कर्ज देऊ शकतो. एकाच भागामध्ये प्रकल्प होत असतील, तर बँकेच्या दृष्टीने चांगलेच आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com