त्रिपक्षीय करार म्हणजे काय?
त्रिपक्षीय करार म्हणजे काय?

पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा... त्रिपक्षीय करार म्हणजे काय?

विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या निवृत्त प्राध्यापिका. त्यांनी गावातील महिलांचे बचत गट तयार केले आहेत. त्यांच्या कार्यात सुमनचा सहभाग हा मोलाचा आहे. तीन वर्षांपूर्वी लग्नानंतर गावात आलेली ही पदवीधर तरुणी. तिचे पती माध्यमिक शिक्षक. पण शेतीकडेही प्राध्यान्याने लक्ष असते. आपल्या शिक्षणाचे चीज झाले पाहिजे, या उद्देशाने सुमनच्या मनातही शेतीपूरक व्यवसाय करण्याचे शिजत होते. नवऱ्यासमोर विषय काढताच त्याने विमलताईंचा सल्ला घेण्यास सांगितले. त्यानुसार विमलताईंना भेटत सुमनने विचारले की, ‘माई, मला ब्रॉयलर पोल्ट्री सुरू करायची आहे. तिच्या विचाराचे माईंनाही कौतुक वाटले. त्यांनी बोलता बोलता अनेक गोष्टी सुमनला विचारून घेतल्या. गेल्या आठवड्यात माहेरी गेल्यानंतर एका मैत्रिणी पोल्ट्री व्यवसाय सुरू केल्याचे समजले. मग त्याला भेट देत सर्व माहिती घेतली. अगदी एक दिवसाचे पक्षी कोठून मिळतात, शेड, किमान पक्ष्यांची संख्या, मजूर, पक्ष्यांचे खाद्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्ष्यांची विक्री याबाबत मैत्रिणीकडून बरीच माहिती मिळाली होती. त्यामुळे आपणही हे सर्व सहज करू शकू, असा आत्मविश्वास सुमनला वाटत होता. तिच्या मैत्रिणीने एका पोल्ट्री कंपनीशी करार केला असून, करारानुसार कंपनीतर्फे एक दिवसाचे पक्षी, खाद्य, आवश्यक ती पशुवैद्यकीय सेवा मिळते. योग्य वजनाचे पक्षी तयार झाल्यानंतर त्याचे वजन करून कंपनी घेऊन जाते. ठरलेल्या दराप्रमाणे आपल्याला पैसे मिळतात. माई शांतपणे सर्व ऐकत होत्या. त्यांनी विचारले, ‘‘मग, आपण काय करायचे?’’ सुमन म्हणाली, ‘‘शेतकऱ्याने आपल्या जागेत शेड बांधून, पक्ष्यांची वाढ करायची. वीज, पाणी व मजूर यांची व्यवस्था करायची’’ माईंनाही त्यांच्या बचतगटासाठी हा व्यवसाय चांगला वाटला. त्या म्हणाल्या, ‘‘हे चांगले आहे. तू तुझी पोल्ट्री चालू कर. तुझ्या अनुभवाप्रमाणे मागोमाग आपल्या बचतगटातील महिलांनाही तयार करू.’’

नवऱ्याचे पाठबळ आणि माईंनी दिलेला दिलासा यामुळे सुमनला हुरूप आला. तिने कामांना सुरुवात केली. ज्या कंपनीशी करार करायचा, त्यांच्यांशी बोलून घेतले. ते एकदा येऊन शेताला भेट देऊन गेले. त्यांची जागेची बारकाईने पाहणी करून पक्षी, खाद्याच्या वाहतुकीसाठी रस्ता आहे का, पाणी व वीज यांची उपलब्धता अशा सर्व बाबींची खात्री केली. करार करण्यासोबत बॅंकेमध्ये आपला प्रस्ताव मंजूर होईल याची खात्री दिली. आता सुमन माईंना घेऊन बॅंकेत कर्जाची विचारणा करण्यासाठी गेली. तिची धडाडी पाहून विमलताईंना तिचे पुन्हा कौतुक वाटले.  बचतगटाच्या कामांमुळे त्यांचा बॅंकेतील अधिकाऱ्यांशी परिचय होताच. त्यामुळे शाखाधिकाऱ्यांकडे जाऊन सुमनची ओळख करून देत ब्रॉयलर पोल्ट्री करण्याचे नियोजन सांगितले. त्यांना प्रथमदर्शी प्रकल्प आवडला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही हा कर्ज मागणी अर्ज भरा. त्यासोबत प्रकल्प अहवाल व त्यात नोंद केल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे जोडा.’’ बोलता बोलता ते म्हणाले, ‘‘या प्रकल्पात त्रिपक्षीय करार आवश्यक भाग आहे. तोही आणा.’’ सुमनला प्रश्न पडला. तिने विचारले, ‘‘हा त्रिपक्षीय करार काय असतो?’’

त्याबरोबर शाखाधिकारी म्हणाले, ‘‘ज्या कंपनीशी करार करणार ती कंपनी, कर्जदार व बँक या तिघात एक करार करावा लागतो. त्याला त्रिपक्षीय करार म्हणतात. कंपनी व तुम्ही यांच्यातील करारामध्ये कंपनी तुम्हाला एक दिवसाची पिल्ले पुरवठा करणे, खाद्य पुरवणे, पशुवैद्यकीय सेवा देणे या सोबत पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या खरेदीसंदर्भातील अनेक मुद्दे असतात. त्यातील तयार पक्ष्यांचे निकष आणि वजनाप्रमाणे देऊ केलेली रक्कम यांचा समावेश असतो. तसेच कंपनी बॅंकेला कराराद्वारे परतफेडीची हमी देणे याबाबत कंपनी, कर्जदार व बँक यांच्यात तिघांचा करार होतो.’’ सुमनचा जीव भांड्यात पडला.

दुसऱ्याच दिवशी बँक अधिकाऱ्यांनी शेड बांधायची त्यांच्या शेतातील जागा पाहिली. प्रत्यक्षामध्ये पाणी, वीज यांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. नेमके त्याच वेळी शेडचे आराखडे आणि अंदाजपत्रक देणारे अभियंतेही तेथे सुमन यांच्या घरी आलेले होते. एकूण ५ हजार पक्ष्यांसाठी आवश्यक जागा आणि अन्य सोयींचा विचार करून शेड बांधण्याबाबत चर्चा केली. दोन दिवसांनी त्यांच्याकडून शेडचे आराखडे आणि अंदाजपत्रक आल्यानंतर अन्य साऱ्या गोष्टींचा विचार करून सुमन व तिच्या पतीने खर्चांचा एकूण अंदाज घेतला. होणारा खर्च व संभाव्य उत्पन्न यांचा ताळेबंद तयार केला. बँकेला लागणारी कागदपत्रे, बँकेचा कर्ज मागणी अर्ज, जमिनीचे दाखले (७/१२, ८/अ), कंपनीशी झालेला करार, वीज व पाणी उपलब्धतेचे दाखले यासाठी काही हेलपाटे ग्रामपंचायत, वीज मंडळ, तलाठी यांच्याकडे घालावे लागले. सर्व कागदपत्रे जमा करताना आलेल्या अडचणी सोडवताना सुमनला आत्मविश्वास मिळत गेला. एकदाची सर्व कागदपत्रे जमा झाली. ते घेऊन सुमन बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटली.

बँकेच्या अधिकाऱ्याने सर्व आराखडे, कागदपत्रे तपासून पाहिली. काही सूचना केल्या. ते म्हणाले, ‘‘या कर्जाची पाच वर्षांत परतफेड करायची आहे. दर तीन महिन्यांनी हप्ता असेल. याप्रमाणे हप्ता व व्याज यांचा पाच वर्षांचा परतफेडीचा तक्ता तयार करा. पहिले सहा महिने हप्ता ठेऊ नका. त्या कालावधीला ‘हप्ता नाही’ (Gestation Period) कालावधी म्हणतात. म्हणजे एकूण परतफेडीचा कालावधी होईल साडे पाच वर्षांचा.’ पुढे त्यांनी स्पष्ट केले की, ‘‘परतफेड ठरवताना दोन महिन्याला एक बॅच असली तरी शेड स्वच्छ्तेचा कालावधी गृहीत धरता केवळ पाच बॅचपासून उत्पादन मिळणार आहे. निदान पहिल्या वर्षी तरी पाच बॅच मिळतात. पुढे अत्यंत काटेकोर नियोजन केल्यास एका वर्षात सहा बॅचेस मिळू शकतात. त्यानुसार तक्ता तयार करा.’’

यावर सुमनने एक शंका व्यक्त केली. ती म्हणाली, ‘‘हप्ता नाही हे काय आहे.’’ बँक अधिकाऱ्यांनी ते समजून दिले. ते म्हणाले, ‘‘कर्जाची परतफेड ही प्रकल्पातून ज्या वेळी उत्पन्न सुरू होते, त्यानंतर सुरू होते. तुमच्या प्रकल्पात शेड उभे करण्याचा कालावधी, त्यानंतर एक दिवसाचे पक्षी आणल्यानंतर त्यांची विक्री होऊन त्याचे पैसे मिळण्यापर्यंतचा कालावधी म्हणजे ‘हप्ता नाही’ हा कालावधी होय. या काळात केवळ कर्जावरील व्याज आकारले जाते. तेही सहा महिन्यांनंतर हप्त्याबरोबर भरायचे असते.’’ या स्पष्टीकरणानंतर सुमनला हायसे वाटले. कारण पहिल्या हप्त्याचे त्यांच्या कुटूंबाला नाही म्हटले तरी टेंशन होतेच.

बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र मिळताच सुमनने शेड बांधण्यास सुरुवात केली. शेड पूर्ण झाल्यावर एक दिवसाची पिल्ले शेडमध्ये सोडताना छोटासा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमास बँकेचे अधिकारी, करार केलेल्या पोल्ट्री कंपनीचे अधिकारी, सर्व बचत गटातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. विमलताईंच्या हस्ते पोल्ट्रीचा शुभारंभ झाला. या प्रसंगी विमलताईनी सुमन व तिचे पती यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘महिला सबलीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणजे सुमनने सुरू केलेला पोल्ट्री व्यवसाय. यातून तिने गावातील महिला व तरुण मुलांसमोर आदर्श निर्माण केला आहे. तिने दाखवलेली चिकाटी, आत्मविश्वास, धाडस व तिची अभ्यासूवृत्ती हे सर्व कौतुकास्पद आहे.’’ याशिवाय त्यांनी सुमनचे पती आणि तिच्या घरातील इतर वडीलधारी व्यक्तीही तिच्या पाठीशी उभ्या राहिल्याबद्दल त्यांचेही कौतूक केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com