संगोपनगृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून संरक्षण
संगोपनगृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून संरक्षण

संगोपनगृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून संरक्षण

सध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील रेशीम कीटकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. वाढीच्या विविध अवस्थेत लागणारे नेमके तापमान जाणून ते ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत.

महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याचे चार महिने वगळता रेशीमकीटक संगोपनगृहात तापमानाचे समायोजन करावे लागते. सापेक्ष आर्द्रता वाढवावी लागते. बाल्य कीटक संगोपन काळात संगोपनगृहातील तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस आणि प्रौढ संगोपन काळात २४ ते २५ अंश सेल्सिअस व सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के ठेवल्यास रेशीम कीटकांची वाढ चांगली होते. यासाठी बाल्य कीटक संगोपनगृहात तापमान मोजण्यासाठी तापमापी आणि आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटरचा वापर करावा.  विशेषतः महाराष्ट्रात बीजगुणन केंद्रातून अंडीपुंज जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोचेपर्यंत ६ किंवा ७ दिवस जातात. या अंडीपुंजाच्या प्रवास काळात किंवा अंडी फुटण्यापर्यंत अंडी उबवण काळात तापमान २५ अंश सेल्सिअस व ६५ टक्के आर्द्रता ठेवणे आवश्यक  असते. याचे योग्य समायोजन केले नाही तर अंड्याच्या उबण्यावर परिणाम होतो.

थंडीच्या लाटेत कीटक संगोपनाची काळजी डिसेंबर - जानेवारी महिन्यात वाढलेल्या थंडीच्या तीव्रतेमध्ये संगोपनगृहातील वातावरण उष्ण करण्यासाठी इलेक्ट्रिक शेगडी, कोळशाची शेगडी किंवा सच्छिद्र मातीचे माठ (ज्यात २ किलो कोळसा बसेल) वापरावेत. भारनियमनामुळे इलेक्‍ट्रिक शेगडी वापरण्यामध्ये अडचणी येतात. अशा वेळी स्वस्तातील तंत्र म्हणून सच्छिद्र मातीचे माठ वापरावेत. संगोपनगृहाबाहेर माठात कोळशे भरून पेटवून धूर कमी झाल्यानंतर संगोपनगृहात झाकणीने झाकून ठेवावेत. संगोपनगृहाच्या आकारानुसार ८ ते ९ तास माठ ठेवावे. आवश्यकतेनुसार नंतर दुसरे कोळशे भरलेले माठ तेथे ठेवावेत. सध्या संगोपनगृहात रात्रीचे तापमान १४ ते १५ अंशापर्यंत खाली आले असून, त्यात १० ते १२ अंश सेल्सिअसने वाढ करायची गरज  आहे.  ह्युमिडीफायर किंवा डेझर्ट कूलरच्या साह्याने संगोपनगृहातील आर्द्रता वाढविता येते. किंवा खिडक्यांना गोणपाटाचे आच्छादन करून त्यावर पाणी मारून आर्द्रता वाढविता येते. फांद्या ताज्या राहण्यासाठी आच्छादन म्हणून  निळ्या पॉलिथिन पट्टीचा वापर करावा. 

बाल्यकीटक संगोपनगृहात घ्यावयाची काळजी

  1. संगोपनगृह व संगोपन साहित्याचे पूर्णतः निर्जंतुकीकरण करणे आवश्यक.
  2. अंडीपुंजाची वाहतूक सकाळी किंवा सायंकाळी बाष्पयुक्त (फोम कोटेड) पिशवीतून करावी.
  3. अंडी ऊबवण काळात संगोपनगृहात २५ अंश सेल्सिअस तापमान व ७५ ते ८० टक्के आर्द्रता आणि ब्लू अंडे अवस्थेपर्यंत १६ तास प्रकाश व ८ तास अंधार असावा. अंडीपुंजाची ब्लॅकबॉक्सिंग पीन हेड स्टेजमध्ये करावी. या काळात अंडीपुंजांची फार हालचाल करू नये. 
  4. दुसऱ्या अवस्थेपर्यंत संगोपनगृहात २७ ते २८ अंश सेल्सिअस तापमान व ८० ते ८५ टक्के सापेक्ष आर्द्रता ठेवावी.
  5. बाल्य रेशीम कीटकांना उच्च प्रतीची ८० टक्के आर्द्रता असलेली कोवळी तुती पाने खाद्य म्हणून द्यावीत. तुती पानात १३ टक्के शर्करा, २४ टक्के प्रथिने आणि १० टक्के कर्बोदके हे प्रमाण असावे.
  6. प्रत्येक दिवशी संगोपन ट्रेमध्ये रेशीम कीटकांना आवश्यक तेवढे अंतर द्यावे.
  7. बाल्य कीटक संगोपनगृहाबाहेर/ आत स्वच्छता ठेवावी.
  8. कोष पीक काढणीनंतर दोन पिकांत ८ दिवसांचा खंड ठेवणे आवश्यक आहे. या काळात निर्जतुकांने संपूर्ण गृह व साहित्य निर्जंतूक करून घ्यावे. कडक उन्हात वाळवून घ्यावे. 
  9. बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना प्रवेश बंद करावा. बाल्य कीटक संगोपनगृहात प्रवेश करतेवेळी पादत्राणे बाहेर ठेवून हात १ टक्का ब्लिचिंग पावडरमध्ये धुऊन आत जावे.
  10. कीटक संगोपनगृहात आत/बाहेर ५ टक्के ब्लिचिंग पावडरसोबत चुन्याची निवळी मिसळून (१ः१९ या प्रमाणात) २०० ग्रॅम प्रतिचौरस मीटर याप्रमाणे ५ दिवसांच्या अंतराने शिंपडत राहावे.
  11. रोगट व मृत रेशीम कीटक प्लॅस्टिकच्या घमेल्यात ५ टक्के ब्लिचिंग पावडरच्या द्रावणात निवडून घेऊन टाकावेत. संगोपनगृहापासून लांब अंतरावर जमिनीत गाडून टाकावे.
  12. प्रत्येक दिवशी संगोपन ट्रे स्वच्छतेनंतर २ टक्के ब्लिचिंग पावडरने जमिनीवर शिंपडणी करावी किंवा फरशी पुसून घ्यावी.
  13. चौथी कात अवस्था पूर्ण केलेल्या रेशीम कीटकांना संगोपन रॅकमध्ये व्यवस्थित सारख्या प्रमाणात दररोज तीन वेळा फांद्या खाद्य द्यावे.
  14. खाद्य देत असताना जास्त परिपक्व, रोगट किंवा धुळीने माखलेल्या फांद्या/पाने खाद्य म्हणून देणे टाळावे. त्यापासून अळ्यांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

आपल्याकडे ८० टक्के रेशीम कीटक संगोपनगृह कच्च्या स्वरूपाचे आहेत. संगोपनगृहासाठी शेडनेटचा मोठा वापर होतो. अशा संगोपनगृहामध्ये थंडीमुळे रेशीम कोष उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. मजुरीत वाढ होते. कीटक संगोपनाचा कालावधी २५ दिवसांऐवजी ३० ते ३५ दिवसांपर्यंत वाढतो. विशेषतः दुबार रेशीम संकरवाण अशा वातावरणास बळी पडते. कोष उत्पादनात घट येते. कच्च्या शेडनेट संगोपनगृहात हिवाळ्यात थंडीपासून व उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यात अडचणी येतात. हळूहळू कच्च्या संगोपन गृहाचे रूपांतर पक्क्या बांधकामात करून घ्यावे. तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली किंवा ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असेल तर कीटकांची पाने खाण्याची क्रिया मंदावते. रेशीम कीटकवाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत लागणारे तापमान आणि आर्द्रतेसाठी तक्ता १ पहा. 

रेशीम कीटक वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेतील आवश्यक तापमान व आर्द्रता 
वाढीची अवस्था तापमान अंश से  आर्द्रता (टक्के) १०० अंडीपुंजांसाठी तुती पाने (कि.ग्रॅ.)  संगोपन ट्रेची संख्या (२ × ३ फूट आकार) एकूण पाने खाद्य टक्केवारी 
 पहिली २७-२८ ८५-९० ३.०० ते ३.५० ०.४
दुसरी २७ ८५ ८.५० ते १० १.४
तिसरी २५-२६ ७५-८० ४५ ते ५० ८ ते १५ ५.०
चौथी २४-२५ ७५-८० १०० ते १२५ १५ ते ३० १०
पाचवी २५   ६५-७० ९०० ते १००० ४० ते ५० ८०

        ः डॉ. चंद्रकांत लटपटे, ७५८८६१२६२२   ः योगेश मात्रे, ७३८७५२१९५७ (डॉ. लटपटे हे रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे प्रभारी अधिकारी असून, योगेश मात्रे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com