वेलवर्गीय काशीफळ लागवड फायदेशीर

काशीफळ हे वेलवर्गीय पीक उत्पादन खर्च आणि लागवड व्यवस्थापनाचा विचार करता शेतकऱ्यांना परवडणारे आहे. सणासुदीसह वर्षभर या फळांची मागणी भाजी व गोड पदार्थांसाठी वाढत आहे.
वेलवर्गीय काशीफळ लागवड फायदेशीर
वेलवर्गीय काशीफळ लागवड फायदेशीर

काशीफळ हे वेलवर्गीय पीक उत्पादन खर्च आणि लागवड व्यवस्थापनाचा विचार करता शेतकऱ्यांना परवडणारे आहे. सणासुदीसह वर्षभर या फळांची मागणी भाजी व गोड पदार्थांसाठी वाढत आहे. दक्षिण आणि मध्य अमेरिकेतून प्रसार होऊन काशीफळ हे जगातील बहुतांश देशांत पोहोचले आहे. या फळासाठी वापरला जाणारा स्क्वॅश हा शब्द अमेरिकेतील आदिवासी लोकांच्या नॅरॅगॅनसेट भाषेतील ‘अस्कृटास्क्वॅश’ या मूळ शब्दातून आला आहे. याचा अर्थ कच्चे किंवा अपरिपक्व खाणे असा असून, स्क्वॅश कुळामध्ये शेकडो फळे येतात. त्याचे साधारण वर्गीकरण पुढील प्रमाणे... हिवाळी स्क्वॅश  थंड वातावरणात काढणी केले जाणारे, कडक कवच असलेली व काही महिन्यांपर्यंत साठवली जाणारी फळे. थोडेसे उशिरा येणारे, ओबडधोबड, खरबरीत, वेगवेगळ्या प्रकारचे लहान ते मध्यम आकाराचे फळ. त्यातही बाहेरील आवरण कडक असलेल्या आणि जास्त काळ साठवता येणाऱ्या फळांना ‘विंटर स्क्वॅश’ म्हणतात. हे फळ कुकुरबिटा मॅक्सिमा आणि कुकुरबिटा मोशाटा प्रजातीमध्ये येतात. उदा. अकॉर्न स्क्वॅश, बटरकप स्क्वॅश, बटरनट स्क्वॅश, डेलिकेटा स्क्वॅश, डुंपलिंग स्क्वॅश, हब्बर्ड स्क्वॅश, कंबोचा स्क्वॅश, पम्पकिन स्क्वॅश, स्पॅघेटी स्क्वॅश इ. उन्हाळी स्क्वॅश  लहान आकाराचे फळ, लवकर येणारे आणि फळाचे कवच आणि बिया पूर्णपणे परिपक्व होण्याच्या आधीचे खाल्ल्या जाणाऱ्या फळांना समर (उन्हाळी) स्क्वॅश म्हणतात. हे फळ कुकुरबीटा पेपो प्रजातीमध्ये येतात.जास्त काळ साठवता न येणारे आणि उष्ण/ उबदार वातावरणात काढणी केली जाणारी फळे. उदा. झुकीनी स्क्वॅश, राउंड झुकीनी, कृकनेक स्क्वॅश, पॅटी पॅन स्क्वॅश, कौसा स्क्वॅश, टॅटूम स्क्वॅश, ट्रोमबोनसिनो स्क्वॅश इ.  लागवड व्यवस्थापन  काशीफळ (पंपकिन) हे हिवाळी स्क्वॅश असून, कुकुरबीटा पेपो, कुकुरबीटा मॅक्सिमा आणि कुकुरबीटा मोशटा या प्रजाती आहे. त्यातील मोठा आकार, उशिरा येणारे, नरम, बांधेसूद प्रकाराला आपण काशीफळ म्हणतो. इतर नावे : डांगर, गंगाफळ, तांबडा भोपळा, लाल भोपळा. पूर्वी परसबागेत किंवा शेतात कुठेतरी बांधावर, कोपऱ्यातील मोकळ्या जागेत एक दोन वेलीची लागवड केली जाई. बहुतांश वेळी आपोआप बिया पडून उगवून येणारे हे दुर्लक्षित वेलवर्गीय वनस्पती आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून उपयुक्त खाद्य म्हणून विशेष करून शेतामध्ये लागवड होऊ लागली आहे.  पोषक घटक  यात अ, क आणि इ जीवनसत्त्व असून, बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते. प्रथिने, प्रोटीन, कर्बोदके, कॉपर, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम यांचेही चांगले प्रमाण असते.  काशीफळाच्या सेवनाने हृदयाचे व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, थकवा कमी होतो. आपल्याकडे श्रावणातील विविध सणांमध्ये या फळाला मोठी मागणी असते. ही भाजी उपवासाला देखील चालते. दक्षिण भारतात सांबरामध्ये प्राधान्याने वापर केला जातो.याची पाने, नवीन शेंडा, फुले, फळे व बी अशा सर्व घटकांचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश होतो. लागवड  भारतात सर्वच राज्यांत काशीफळाची लागवड केली जाते. जागतिक पातळीवर लागवड आणि उत्पादनामध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. काशीफळ हे कुकुरबिटा कुळातील वेलवर्गीय पीक आहे. जवळपास ३० प्रजातींपैकी प्रामुख्याने पुढील जाती या लागवडीसाठी वापरल्या जातात.  कुकुरबिटा पेपो, कुकुरबिटा मोशाटा, कुकुरबिटा मॅक्सिमा, कुकुरबिटा अग्रीरोस्पर्मा, कुकुरबिटा फिसिफोलिया. रंगाने व आकाराने वेगवेगळ्या प्रजाती काशीफळ पिकात उपलब्ध आहेत. सुधारित वाण  भारतीय कृषी संशोधन संस्था, दिल्ली १) पुसा विश्वास (महाराष्ट्रासाठी शिफारस),२) पुसा विकास. ३) पुसा हायब्रीड १. भारतीय फळबाग संशोधन संस्था, बंगळूर १) अर्का सूर्यमुखी (लाल १ किलो, फळमाशीकरिता प्रतिरोधक.)  २)अर्का चंदन  भारतीय भाजीपाला संशोधन संस्था, वाराणसी १) काशी हरित, २) काशी शिशिर एफ१ आनंद कृषी विद्यापीठ, गुजरात. १) आनंद पंपकीन १.  तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोइमतूर. १) को १, २) को २

१ किलोपासून ३०-३५ किलो वजनापर्यंत वाढणारे काळा, मोठा गर्द हिरवा, मोठा गोल, चपटा हिरवा, पिवळा, लाल अशा विविध प्रकारांच्या काशीफळाचे संकरित वाण उपलब्ध आहेत. हवामान  सुरुवातीच्या काळात चांगल्या वाढीसाठी किमान १८ अंश सेल्सिअस तापमान गरजेचे आहे. या पिकास उष्ण हवामान चांगले मानवते. वाढलेली थंडी या पिकाला उपयुक्त ठरते. सरासरी तापमान २५-३५ अंश सेल्सिअस लागवडीसाठी उपयुक्त आहे. कमाल तापमान ४० अंशापर्यंत, तर किमान १८ अंशांपर्यंत असावे. जास्त तापमानात नर फुलांची संख्या वाढून मादी फुलांची संख्या कमी होते. परिणामी उत्पादनामध्ये घट येते.  लागवडीसाठी हंगाम  

  • उन्हाळी हंगाम - जानेवारी ते मार्च.
  • खरीप हंगाम - जून-जुलैमध्ये २ ते ३ चांगला पाऊस झाल्यानंतर लागवड करावी.
  • उन्हाळी हंगामाच्या तुलनेत खरीप हंगामात अधिक उत्पादन मिळते. रब्बी हंगामामध्ये तुलनेने उत्पादन कमी येते. अशी लागवड फायदेशीर ठरत नाही. हरितगृहामध्ये नियंत्रित वातावरणामध्ये रब्बीतही लागवड करणे शक्य आहे. 
  • लागवडीचे अंतर

  • जमिनीचा पोत बघून दोन ओळींतील अंतर ६ किंवा ८ फूट आणि दोन वेलींतील अंतर ३ किंवा २ फूट ठेवावे. 
  • बियाणे २ ते २.५ सेंमी पेक्षा जास्त खोल टोकू नये.
  • जमीन  
  • हलकी ते मध्यम स्वरूपाची पोयटा माती, सेंद्रिय पदार्थ युक्त व निचऱ्याची जमीन  चांगल्या वाढीस उपयुक्त आहे. जमिनीचा सामू ६-७ पर्यंत  असावा.
  • पाणी व्यवस्थापन  
  • खरीप हंगामात हवामानाचा अंदाज बघून पाणी व्यवस्थापन करावे. साधारणपणे दोन पाण्यातील अंतर ७-१० दिवस ठेवावे. उन्हाळी हंगामात ४-६ दिवसांनी पाणी द्यावे.
  •  बियाण्याचे प्रमाण -  साधारण १ ते १.५ किलो प्रति हेक्टरी. खत व्यवस्थापन 

  • लागवडीपूर्वी हेक्टरी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत.
  • ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश.
  • संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी, नत्र तीन समान हप्त्यात विभागून द्यावे. त्यातील पहिला हप्ता लागवडीच्या वेळी, दुसरा हप्ता ४०-४५ दिवसांनी आणि तिसरा हप्ता फळ लागायला सुरवात झाल्यावर द्यावा.
  • आंतरमशागत - पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात हलकी कोळपणी व २-३ खुरपण्या कराव्या.
  • पिकाचा कालावधी - १०० ते १२० दिवस.
  • काढणी 

  • दोन अवस्थांमध्ये काशीफळांची काढणी केली जाते. 
  • अपरिपक्व फळ हे भाजीसाठी वापरतात.
  • पूर्ण परिपक्व झालेले फळ हे गोड पदार्थ व जास्त दिवस साठवून ठेवण्यासाठी वापरले जाते.  
  • साधारपणे ९० दिवसांपासून विविध वाणांची फळे काढणीस येतात.
  • पिकाची काढणी जातिपरत्वे पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यावर करावी.
  • काढणी करताना फळाला १ इंच देठ ठेऊन तोडणी करावी.
  • उत्पादन - २० ते ४५ टन प्रति हेक्टर. 
  • बाजारपेठ व दर ः 
  • वेगवेगळ्या प्रकारच्या फळानुसार दर मिळतो.
  • सरासरी १०-१५ रुपये किलो. किमान दर १० रुपये आणि कमाल मिळणारा दर २० रुपये.
  • एका वेलीवर दोन फळ अशाप्रकारे नियोजन केल्यास फळांचे वजन चांगले मिळते. जितके जास्त वजन तितकी अधिक मागणी बाजारपेठेमध्ये असते. स्थानिक बाजारांसोबत अन्य राज्यातील व्यापाऱ्याकडूनही मोठ्या प्रमाणात व वर्षभर मागणी असते.
  •  : गणेश सहाणे, ९६८९०४७१०० (लेखक खासगी कंपनीत वेलवर्गीय पीक पैदासकार आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com