अर्थशास्त्राला शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न कधी विचारणार?

अर्थशास्त्राला शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न कधी विचारणार?
अर्थशास्त्राला शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न कधी विचारणार?

सन २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांच्यासह ईस्थर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना मिळाले. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या अशा पुरस्काराच्या प्राप्तीनंतर त्या व्यक्तीने मांडलेल्या अर्थविचारांना मान्यता मिळाल्याचे मानले जाते. कोणत्याही पुरस्कारानंतर त्याचे कौतुक, अभिमान किंवा एकदम टोकाला जाऊन होणारी टीका या कोणत्याही समाजाच्या किंवा विचाराच्या लोकांकडून दिल्या जाणाऱ्या सामान्य प्रतिक्रिया दिसतात. या साऱ्या भावना बाजूला ठेवून आपण त्या मूळ सिद्धांतावर बोलले पाहिजे. त्यातून शेती आणि एकूणच समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांची तड लावली पाहिजे. कारण तोच खरा सुसंस्कृततेकडे जाण्याचा उत्तम मार्ग आहे. भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यानंतर या वर्षीचे नोबेल हे भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांच्यासह ईस्थर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना मिळाले. २०१७ मध्ये रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. या तीनही अर्थविचाराचा विचार केला असता वर्तनशास्त्र, अर्थशास्त्र आणि सामाजिकशास्त्र (त्यातील विशेषतः गरिबीशी संबंधित) या तीन वेगळ्या शास्त्रांचा प्रामुख्याने धांडोळा घ्यावा लागतो. कोणत्याही पुरस्कारानंतर त्याचे कौतुक, अभिमान आणि एकदम टोकाला जाऊन होणारी टीका या कोणत्याही समाजाच्या किंवा विचाराच्या लोकांकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांतून दिसून येते. या सामान्यांच्या उपजत भावना बाजूला ठेवून आपण मूळ विचारांवर बोलले पाहिजे. सामान्यतः अर्थशास्त्रातील अनेक संकल्पना या अमूर्ताच्या पातळीवर जाणाऱ्या आणि एकमेकावर अवलंबून असणाऱ्या आहेत. पैशाचा उपयोग आणि त्यांचे विनिमयातील स्थान याच्या संबंधीच्या अनेक बाबी अगदी विद्वान म्हणवणाऱ्यांना लवकर लक्षात येत नाहीत. त्यांच्या लवकर लक्षात येत नाहीत, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुठून माहित होणार? अगदी भारतामध्ये मंदी किंवा मंदीसदृश्य वातावरण आहे, त्याचे मोजमाप करण्यासाठी सामान्यतः ऑटोमोबाईल क्षेत्रातील उलाढाल. गाड्यांच्या खरेदीमध्ये झालेली घट आणि त्यातून या उद्योगाला सातत्याने घ्यावे लागणारे ले ऑफ किंवा नोकऱ्यातील कपात या बाबींचा आधार घेतला जातो. या क्षेत्रातील व्यक्तींशी बोलताना अनेकांना मी साधारणपणे पुढील प्रश्न विचारले.

  1. भारत हा जर कृषिप्रधान देश आहे आणि सुमारे ६५ टक्के जनता ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, असे आपण ज्या वेळी म्हणतो, त्या वेळी मंदीचा निकष हा ऑटोमोबाईल क्षेत्राशी का जोडला जातो ?
  2. सध्या आपण भांडवलशाही व्यवस्थेमध्ये असल्यामुळे बाजारामध्ये हालचाल करणारा किंवा घडवून आणणारा (क्रयशक्ती असलेला) वर्ग हा केवळ मध्यमवर्गच आहे का? सध्याच्या सेवा उद्योगाच्या साऱ्या भराऱ्या केवळ या वर्गासाठी राबवल्या जाताना दिसतात. मंदी आणि एकंदरीतच अर्थशास्त्रामध्ये सामान्य शेतकऱ्यांचा विचार का होत नाही?
  3. वर उल्लेख केलेल्या नोबेल पुरस्कारामध्ये गरिबांचा धोरणात्मक कोनातून विचार केला जातो. मागेही बांगलादेशातील महमंद युनूस यांच्या गरिबी कमी करणाऱ्या आणि सर्वसामान्यांना मायक्रोफायन्सिंगद्वारे आधार देणाऱ्या विचाराला व कामाला नोबेल मिळाले होते. तसाच विचार गरीब म्हणून नव्हे, तर शेती आणि शेतकऱ्यांच्या अर्थ समस्या समोर ठेवून का होत नाही?
  4. शेती हा जर माणसाचा सुमारे १४ हजार वर्षांपासूनचा परंपरागत व्यवसाय असेल, तर त्यांच्या अर्थ समस्यांना प्राधान्य का दिले जात नाही? कदाचित असा अभ्यास होत असला तरी त्याला राजकीय, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय (नोबेल प्रमाणे) पाठिंबा मिळत नाही. यामध्ये नोबेल हा पुरस्कार हा मूलभूत संशोधनासाठी दिला जात असल्याने त्यामध्ये शेतीसारख्या उपयोजित शास्त्राचा विचार होत नाही. अगदी डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनाही त्यांच्या कृषिक्षेत्रातील असामान्य कार्याबद्दल नोबेल दिला गेला, तो शांततेचा होता.

शेती हे एकच मूलभूत शास्त्र नाही. तुम्हाला शेती शिकायची म्हटले, की अनेक मूलभूत शास्त्रांचा एकत्रित अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याकडचा किंवा जगभरातील कृषी शास्त्राचा अभ्यासक्रमही अशाच सर्व शास्त्रांचा मेळ घालणारा तयार करावा लागतो. अशाच जॅक ऑफ ऑल प्रकारच्या कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातून शिकून पुढे आल्यामुळे कदाचित माझा अर्थविषयक अभ्यास कच्चा आहे, हे गृहित धरून जाणून घेण्याच्या उद्देशाने माझे हे प्रश्न आहेत. ते क्षणभर बाजूला ठेवून आपण यावर्षीचे नोबेल पुरस्कार प्राप्त अभिजित बॅनर्जी, ईस्थर डफलो, मायकेल क्रेमर यांनी गेल्या २० वर्षांमध्ये प्रचलित केलेल्या विशिष्ट प्रयोगात्मक अर्थविचारांविषयी पाहू. (त्याला इंग्रजीमध्ये रॅण्डमाईज्ड कंट्रोल ट्रायल म्हणतात.) खरेतर ही संख्याशास्त्रातील पद्धत. १९२० च्या दशकांमध्ये तिचा अर्थशास्त्रामध्ये आर. एल. फिशर यांनी आणली. त्यात कोणत्याही मूलभूत शास्त्राप्रमाणे मांडले जाणारे गृहितक, प्रश्न, समस्या समोर ठेऊन केल्या जाणाऱ्या विविध प्रयोग आणि चाचण्या केल्या जातात. मात्र, कोणत्याही सामाजिक शास्त्रामध्ये केल्या जाणाऱ्या प्रयोगांतील सर्व मर्यादा- राहणाऱ्या त्रुटी यातही राहतात. हे खरे असले तरी धोरण ठरवण्यासाठी केवळ नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अंतर्गत प्रेरणा, विचारांवर अवलंबून राहण्यापेक्षा त्यातल्या त्यात अधिक शास्त्रीय पद्धत आहे, हे मान्य करावे लागते. याचे टीकाकार प्रामुख्याने अशा प्रयोगांसाठी होणाऱ्या प्रचंड खर्चाचा मुद्दा मांडतात. तो गरीब राष्ट्रांना न परवडणारा असू शकतो, असे मत मांडतात. या अर्थतज्ज्ञांच्या ‘पुअर इकॉनॉमिक्स’ या पुस्तकांमध्ये मांडलेल्या अनेक अभ्यासांसाठी किती खर्च आला असेल, याचा विचार केल्यास ते खरेही वाटते. पण माझ्या दृष्टीने यातील सर्वात महत्त्वाची मर्यादा ही तुम्ही प्रयोगासाठी कोणता प्रश्न विचारता हीच आहे. धोरणकर्त्यांकडून विचारले जाणारे प्रश्न व त्यांचे प्राधान्य सामान्यतः काय असतात, हे सर्वज्ञात असल्यामुळे याविषयी खरेतर मी भाष्य करायला नको. पण राहवत नाही म्हणून फक्त न्याय या कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीपूर्वी आणलेल्या योजनेचा उल्लेख करतो, म्हणजे सुज्ञांना अधिक सांगावे लागणार नाही. लोकशाहीमध्ये लोकांच्या हिताचे दावे करत कोणत्या प्रकारचे राजकारण केले जाते, हे सर्वाना माहीत आहे. या अर्थशास्त्राला शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न कधी विचारले जाणार? म्हणूनच वर्तनशास्त्राला आपण कितीही नावे ठेवत असलो तरी आपल्याला पुन्हा वर्तनशास्त्रापाशीच जावे लागते. इथे आपला संबंध येतो, तो २०१७ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल मिळालेल्या रिचर्ड थेलर यांच्या यांच्या ‘नज थिअरी’ शी (याला मी मराठीमध्ये ‘कोपरखळी सिद्धांत’ म्हणतो.) त्याविषयी नज (लेखक ः रिचर्ड थेलर, कॅस सनस्टेन) हे एक सुंदर पुस्तक इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. आणि ती ज्या पायावर उभी आहे, त्या डॅनिअल काहनेमन यांच्या मानवी मेंदू आणि त्याच्या विचार करण्याच्या दोन पद्धतींशी. काहनेमन यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मानवी मेंदू कसा विचार करतो, किंवा अजिबात विचार न करता कृती करतो, या विषयी आपल्या ‘थिंकिंग, फास्ट ॲण्ड स्लो’ या पुस्तकांमध्ये सविस्तर मांडले आहे. अजिबात विचार न करता अंतप्रेरणेने केल्या जाणाऱ्या अनेक कृती किंवा निर्णय मानवी प्रेरणा या कदाचित जनुकीय, सामाजिक आणि लहानपणापासूनच्या घटनांमुळे तयार झालेल्या स्वभावामुळे केल्या जातात. तसेच प्रत्येक वेळी संपूर्ण विचार करून निर्णय घेण्याचे काम मानवी मेंदू टाळत असतो. यातून कदाचित ऊर्जेची बचतही होत असावी. कारण दररोज शरीरामध्ये घेतल्या जाणाऱ्या अन्नातून तयार होणाऱ्या ऊर्जेचा मोठा वाटा हा मेंदूद्वारे खर्चला जातो. त्यामुळे अनेक निर्णय हे फारसा विचार न करता घेण्याकडे कल असतो. याचा फायदा थेलर अर्थशास्त्रांमध्ये किंवा सामाजिक वर्तनामध्ये घेतात. तीच त्यांची नज थिअरी आहे. या पुस्तकावरील मुखपृष्ठ अत्यंत बोलके असून, त्यात हत्तीण आपल्या लहान पिल्लाला सोंडेने धक्का देत आहे. कोणत्याही समस्येमध्ये पर्याय निवडण्याची सोय तर ठेवायची, पण त्यातील आपोआप (डिफॉल्ट) होणारी निवड ही सामाजिक, आर्थिक किंवा नैतिकदृष्ट्या उत्तम राहील, याची काळजी घ्यायची. उदा. स्पेनमध्ये अवयव दाता हा आपोआप निवडला जाणारा पर्याय आहे. त्यापेक्षा वेगळा पर्याय निवडण्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागतात. यापेक्षा भिन्न स्थिती अन्य देशांमध्ये आहे. भारतामध्ये अवयवदान करायचे असूनही त्यासाठी अर्ज भरा, नोंदणी करा, असे सव्यापसव्य करावे लागतात. म्हणून मग अवयवदान करायचे असूनही मागे पडून जाते. केवळ पर्याय निवडीतील छोट्याशा बदलामुळे स्पेन हा देश अवयव दानात आघाडीवर आहे. याचा फायदा सर्व समाजाला होतो, यात शंका नाही. आपल्याकडे कृषी क्षेत्राशी संबंधित गोष्टींसाठी अशा योग्य डिफॉल्ट निवडी कशा ठरवता येतील, हा प्रश्न आपल्या देशांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये कुणीच विचारला नाही. त्यामुळे या वर्षीच्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्राप्त पद्धतीलाही शेतीविषयक योग्य प्रश्न विचारले जातील का, याबाबत माझ्या मनात शंका आहेत. संपर्क ः ९९२२४२१५४० (लेखक ॲग्रोवन मध्ये उपसंपादक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com