नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
कडधान्ये
हरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड
वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा तर संरक्षित ओलितात दहा नोव्हेंबरपर्यंत पेरणी करता येते. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अपेक्षित व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे शक्य आहे.
कोरडवाहू तसेच ओलीताखाली हरभऱ्याच्या विजय, दिग्विजय, राजविजय, जाकी, डॉलर, साकी, हिरवा चाफा, पीकेव्ही हरिता, आयसीसीव्ही-१० या देशी (सुधारित) वाणांची शिफारस करण्यात आली आहे. वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा तर संरक्षित ओलितात दहा नोव्हेंबरपर्यंत पेरणी करता येते. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून अपेक्षित व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे शक्य आहे.
हरभरा लागवड तंत्रातील टिप्स
- कोरडवाहू तसेच ओलीताखाली काबुली हरभऱ्यासाठी विराट, आयसीसीव्ही-२, पीकेव्ही काक-२, पिकेव्ही काबुली-४ या टपोऱ्या दाण्यांच्या वाणांची शिफारस
- वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोबरचा दुसरा पंधरवडा तर उशिरा पेरणीसाठी संरक्षित ओलिताची सोय असल्यास दहा नोव्हेंबर पर्यंत पेरणी शक्य
- देशी (सुधारित) वाणांसाठी पेरणीचे अंतर -३० सें.मी. x १० सें.मी.
- त्यासाठी एकरी ३०-४० किलो बियाणे वापर
- याद्वारे एकरी दीड लाखांपर्यंत झाडांची संख्या राखणे शक्य
काबुली वाणासाठी पेरणीचे अंतर ४५ सें.मी. x १० सेंमी.. त्यासाठी एकरी ४०-५० किलो बियाणे वापर. याद्वारे एकरी एक लाखपर्यंत झाडांची संख्या राखणे शक्य
सुधारित पेरणी पद्धतींचा वापर
बीबीएफ प्लँटरचा वापर
- सोयाबीनसाठी वापरले जाणारे बीबीएफ प्लँटर हरभऱ्यासाठीही वापरता येते.
- याद्वारे पेरणी करताना प्रत्येक ४ ओळीनंतर दोन्ही बाजूला सऱ्या पाडल्या जातात. त्यामुळे तुषार संचाद्वारे तसेच सरीद्वारे पाणी देणे सोयीचे.
- यात प्रत्येक पाचवी ओळ खाली राखल्यामुळे बियाण्याचे प्रमाण २० टक्के कमी लागते.
पट्टा पेरपद्धत
- हरभऱ्यात ही पद्धती उपयुक्त सिद्ध झाली आहे.
- हरभरा पेरणीसाठीचे ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्र सहा दात्यांचे. पेरणी करताना प्रत्येक वेळी पलटून येताना व जातांना सातवी ओळ खाली ठेवावी. याद्वारे सहा- सहा ओळीच्या पट्ट्यात पेरणी. प्रत्येक सातवी ओळ खाली राखल्यामुळे बियाण्याचे प्रमाण १५ टक्के कमी लागते.
अन्य पद्धत
ट्रॅक्टरचलित सहा दात्याच्या पेरणी यंत्राचे दोन्ही काठावरील प्रत्येकी एक छिद्र बोळा कोंबून बंद करावे. म्हणजे पेरणीच्या वेळी आपोआपच काठावरच्या ओळी खाली राहतील. पलटून येताना व जातांना खाली ठेवलेल्या ओळीतच शेवटचे दाते ठेवावे. म्हणजे प्रत्येक चार ओळीनंतर एक ओळ खाली राखली जाऊन त्या ठिकाणी हलकी सरी तयार होते.
पट्टापेर पद्धतीत डवऱ्याच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून केवळ खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी दांड अथवा सरी अथवा गाळ पाडून घ्यावे.
सुधारित पद्धतीचे फायदे
- बीबीएफ प्लँटर अथवा ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राने व पट्टापेर पद्धतीद्वारे फवारणीसाठी योग्य जागा उपलब्ध
- ओलिताची सोय असल्यास सरीद्वारे पाणी देता येते.
- तुषारसंच असल्यास पाईप ठेवण्यासाठी तसेच पिकाची देखभाल व निरीक्षणासाठी जागा उपलब्ध
- शेतात हवा खेळती राहते. सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग.
- पिकाची अवास्तव वाढ होत नाही.
- बियाणे प्रमाणात १५-२० टक्के व खर्चातही बचत होते.
उत्पादनवाढीच्या टिप्स
- पेरणीच्या आदल्या दिवशी बियाणे तीन ते चार तास पाण्यात भिजवावे.
- हवेशीर ठिकाणी ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून रात्रभर सुकू द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी पेरणीसाठी वापरावे. याद्वारे कमी उगवणीचा धोका टाळता येतो. उगवण लवकर व एकसारखी होते.
- आदल्या दिवशी भिजवून सुकविलेल्या प्रति किलो बियाण्याला ५ मिली रायझोबिअम, ५ मिली पीएसबी व ३ ते ५ मिली ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत अर्धा तास वाळवून पेरणी करावी. जिवाणू संवर्धकाची १० मिली प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया.
- उशिरा पेरणी अवस्थेत ओलिताची सोय असल्यास तुषार संचाद्वारे जमीन ओली करून घ्यावी. वाफसा आल्यावर पेरणी बीबीएफ प्लँटर अथवा ट्रॅक्टरचलित यंत्राने पट्टापेर पद्धतीने करावी.
- उगवणीनंतर पुन्हा हलके ओलित द्यावे. तुषार संचाचा वापर करायचा असल्यास पाण्याची सिप (संच सुरू ठेवण्याचा कालावधी) तीन-चार तासांदरम्यान जमिनीच्या प्रकारानुसार राखावी.
- हलक्या मध्यम जमिनीसाठी चार तास, मध्यम भारी जमिनीसाठी तीन तास तसेच भारी ते अतिभारी जमिनीसाठी दोन तास या प्रमाणे पाण्याची सिप राखता येते. जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावा.
अन्नद्रव्ये व रसायनांचा वापर
- पेरणीच्या वेळी १०० किलो चांगले कुजलेले शेणखत अधिक दीड बॅग डीएपी अधिक अर्धा बॅग एमओपी अधिक दहा किलो झिंक सल्फेट अधिक ५ किलो फेरस सल्फेट योग्य प्रकारे मिसळून पेरणी यंत्राद्वारे द्यावे.
- मागील वर्षी भुईकिड्याचा प्रादुर्भाव झाला असल्यास उगवणीपश्चात जमिनीवर क्लोरपायरीफॉस अथवा क्विनॉलफॉस तसेच कॉपर ऑक्सीक्लोराईड यांची एकत्रित फवारणी. यात सुरवातीलाच मर रोगालाही रोखता येते.
- पिकाची अतिरिक्त वाढ टाळण्यासाठी निंदणीवेळी शेंडे खुडून घ्यावे. त्यामुळे फांद्यांच्या संख्येत वाढ होऊन उत्पादनात वाढ शक्य होते. शेंडे खुडणी यंत्राचा वापर करून मजुरीखर्चातही बचत शक्य.
तणनियंत्रण
- सुरवातीचे ४५ दिवस तणांची स्पर्धा. त्यामुळे निंदणी महत्त्वाची.
- ओलिताचा हरभरा असल्यास पेरणी ओलित करून करावी. पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी (पेरणीपासून ४८ तासांत) पेंडीमिथॅलीन तणनाशक फवारणी- प्रति १० लिटर पाण्यात ५० ते ७० मिली. जमिनीच्या पृष्ठभागात ओल असणे गरजेचे.
कमी उत्पादनासाठी कारणीभूत बाबी
- योग्य खोलीवर अथवा ओलाव्यात बियाणे न पडल्यास कमी उगवणीचा धोका
- भुईकिडा (काळी म्हैस) या किडीचा उगवणीपश्चात त्वरित प्रादुर्भाव
- पेरणीपासून १५ ते १७ दिवसांत मरची सुरवात. रोपे लहान असल्यामुळे त्वरित ध्यानात येत नाही.
- पिकाची उंची अकारण वाढल्यास फांद्यांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट
- अवेळी ओलित अथवा ओलिताचा असमतोल झाल्यास अथवा उभ्या पिकात युरियाचा अवाजवी वापर केल्यासही पिकाची अवास्तव वाढ
- घाटेअळी, घाट्यांतील दाणे पक्व होताना बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव
पाण्याचे व्यवस्थापन
- कळ्या सुटण्याच्या अवस्थेत येताना हलके संरक्षित ओलित. तुषारसिंचनात सिप २ ते ३ तासांनी बंद करावे. जेणेकरून जमिनीत ओल ७-८ सेमी खोलीपर्यंत पोचेल.
- वरीलप्रमाणेच संरक्षित ओलित आवश्यकतेनुसार घाट्यांमध्ये दाणे भरताना.
- हे पीक मर या बुरशीजन्य रोगास अत्यंत संवेदनशिल. त्यामुळे पिकाच्या बुडाशी पावसाचे पाणी साचणार नाही हे पाहावे.
- संरक्षित ओलितात पाणी अतिरिक्त देऊ नये. बीबीएफ प्लँटर अथवा पट्टापेर पद्धतीत अतिरिक्त पाणी सरीत जमा होऊन मरचा कमी धोका संभवतो.
पीक संरक्षण ( फवारणी प्रमाण प्रति १० लिटर पाणी)
- कळी अवस्थेत- शेंडे खाणारी अळी नियंत्रणासाठी, क्लोरपायरीफॉस अथवा क्विनॉलफॉस २० मिली
- मर रोग- मॅंकोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझिम १० ग्रॅम अधिक एक टक्के युरियाची (१०० ग्रॅम).
- घाट्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत- वरीलप्रमाणेच कीटकनाशक अधिक बुरशीनाशक अधिक १३:००:४५ हे ५० ग्रॅम प्रमाणे आवश्यकतेनुसार फवारणी. घाटे व पाने पिवळी पडण्यास सुरवात झाल्यानंतर ओलित करू नये.
संपर्क- जितेंद्र दुर्गे-९४०३३०६०६७
(श्री. दुर्गे हे श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथे सहयोगी प्राध्यापक तर डॉ. लीना शिंदे या पी.आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय, अमरावती येथे कार्यरत आहेत
- 1 of 3
- ››