सातारा : ‘‘या वर्षी चांगला पाऊस पडला.
नगदी पिके
खोडवा ऊस व्यवस्थापनाचे सुधारित तंत्र
खोडवा पीक घेणे हे शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांसाठी फायद्याचे असले तरी उत्पादन वाढविण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
राज्यामध्ये तिन्ही हंगामांतील ऊस
तुटून गेल्यानंतर त्यांचा खोडवा ठेवला जातो. खोडव्याखाली सर्वसाधारणपणे ३५ ते ४० टक्के क्षेत्र असते. खोडवा पीक घेणे हे शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांसाठी फायद्याचे असले तरी उत्पादन वाढविण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
खोडवा पिकाची जोपासना आधुनिक तंत्राने
केल्यास उत्पादन लागवडीच्या उसाएवढे, किंबहुना त्यापेक्षा जास्त येऊ शकते, असे संशोधनात दिसून आले आहे.
खोडवा ऊस पीक घेण्याचे फायदे
- पूर्वमशागत करावी लागत नाही. कष्ट व खर्चात बचत.
- बेणे, बेणे प्रक्रिया व ऊस लागवड इ. खर्चात बचत.
- पहिल्या पिकाची मुळे, डोळे तयार असल्यामुळे खोडवा उसाचे फुटवे झपाट्याने वाढतात. फुटवे एकाच वेळी येऊन पक्व उसाची संख्या चांगली मिळते.
- लागवडीपेक्षा खोडवा एक ते दीड महिना लवकर तयार होतो.
- उपलब्ध पाचटाचे आच्छादन केल्यास तणनियंत्रण, आंतर मशागतीवरील खर्चात व सिंचनाच्या पाण्यात बचत.
- खोडवा पीक पाण्याच्या ताणासाठी जास्त सहनशील असते. उत्पादनात फारशी घट येत नाही.
- खोडवा पीक घेताना...
- सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा. त्याच्यानंतर खोडवा घेतल्यास खोड किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
- ज्या लागवडीच्या उसाचे उत्पादन हेक्टरी १०० टनांपेक्षा जास्त आहे, अशा उसाचा खोडवा ठेवावा.
- ऊस पीक विरळ असल्यास नांग्या भरण्यासाठी प्लॅस्टिक ट्रेमध्ये तयार केलेली रोपे वापरावीत.
- शिफारशीत ऊस जातीचाच खोडवा ठेवावा.
- खोडवा ठेवण्याची जमीन सुपीक व निचऱ्याची असावी.
- लागवड केलेल्या उसामध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव नसावा.
- मध्यम ते भारी जमिनीमध्ये लवकर ते मध्यम पक्व होणाऱ्या ऊस जातींचा खोडवा ठेवावा.
खोडवा राखण्याची योग्य वेळ
उसाची तोडणी ऑक्टोबर पासून एप्रिल/ मे महिन्यापर्यंत केली जाते. उसाचा खोडवा ठेवण्यास जसजसा उशीर होतो, त्याप्रमाणात उत्पादन कमी होत जाते. साधारणपणे १५ फेब्रुवारीनंतर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास उत्पादनांमध्ये घट होत असल्याचे आढळले आहे. फेब्रुवारीनंतर तापमान वाढ झाल्याने खोड किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यात पाण्याचा ताण पडल्यास खोडवा उत्पादनात लक्षणीय घट येते.
पाचटातून मिळणारी अन्नद्रव्ये
- एक हेक्टर क्षेत्रामधून ८ ते १० टन पाचट मिळते.
- ऊस पाचटात ०.५ टक्का नत्र ०.२ टक्का स्फुरद आणि ०.७ ते १.० टक्का पालाश आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब असते. म्हणजेच त्यातून ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद, ७५ ते १०० किलो पालाश आणि ३ ते ४ हजार किलो सेंद्रिय कर्ब जमिनीत मिसळते. हे पाचट जाळल्यास त्यातील सेंद्रिय कर्बाचा पूर्ण नाश होतो. पाचटातील नत्र आणि स्फुरदाचा ९० टक्क्यांहून अधिक भाग जळून जातो, केवळ पालाश काही प्रमाणात शिल्लक राहते.
- मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे खोडव्यात पाचट आच्छादनाचे तंत्र विकसित केले असून, त्याचे चांगले निष्कर्ष मिळाले आहेत.
पाचट आच्छादनाचे फायदे
- जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. ओलावा जास्त काळ टिकतो. पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढले तरी उसाची वाढ चांगली होते.
- तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. तण नियंत्रण खर्चात बचत होते. सेंद्रिय पदार्थ वाढून जमिनीची जलधारण शक्ती व अन्य भौतिक गुणधर्म सुधारतात. उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते.
- यात खते पहारीने दिली जातात. खतांचा ऱ्हास रोखला जातो. सेंद्रिय पदार्थाचे विघटन होताना त्यातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
- पाचट कुजण्याच्या प्रक्रियेमुळे सूक्ष्म जिवाणू, गांडुळे, विकरे व सेंद्रिय आम्ले यांचे जमिनीतील प्रमाण वाढल्याने उसाची चांगली वाढ होते.
- जमिनीचे तापमान थंड राहून मुळांची वाढ भरपूर होते. उन्हाळ्यातही पिकाला उन्हाचा त्रास होत नाही.
- सेंद्रिय पदार्थ कुजत असताना त्यातून कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो. वनस्पतीला कर्बग्रहणाच्या क्रियेसाठी हा कार्बन डायऑक्साइड वायू लागतो. हवेमध्ये असलेल्या नेहमीच्या (३०० पीपीएम) प्रमाणापेक्षा शेतात त्याचे प्रमाण वाढून पिकाच्या कर्बग्रहणाचा वेगही वाढतो. उसाची जोमदार वाढ होते.
- सूक्ष्म अन्नद्रव्ये : माती परीक्षणांनुसार जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास हेक्टरी झिंक सल्फेट २० किलो, फेरस सल्फेट २५ किलो, मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो व बोरॅक्स ५ किलो यांचा वापर करावा.
असा करा पाचटाचा वापर
- ऊस तोडणीवेळी पाचट ओळीत न लावता जागीच राहू द्यावे.
- शेतात एखाद्या ठिकाणी राहिलेला पाचटाचा ढीग पसरवून घ्यावा.
- उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून बुडखे मोकळे करावेत. बुडख्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन जोमदार कोंब येतात.
- बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो. असे फुटवे जोमदार असून, फुटव्यांची एकूण संख्या वाढते. बुडख्यांची छाटणी न केल्यास जमिनीवरील कांडीपासून डोळे फुटून कमजोर फुटवे येतात.
- बुडख्यांच्या छाटणीनंतर बुरशीजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी त्वरित कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन समप्रमाणात पसरून टाकावे.
- त्यानंतर उसास पाणी द्यावे. पाचटामुळे सुरुवातीस पाणी पोचण्यास वेळ लागत असला तरी सर्वत्र पाणी बसेल याची काळजी घ्यावी.
- जमीन ओली असताना पाचट पायाने दाबून घ्यावे. किंवा शेतात जनावरे मोकळी सोडावीत. जनावरांच्या पायाने पाचट दबण्यास मदत होते. पाचटाचा मातीशी संबंध येऊन हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते.
- वरील पाचट वापराचे तंत्र योग्य प्रकारे अंमलात आणण्यासाठी त्याची तयारी ऊस लागवडीपासून करायला हवी. उसाच्या दोन सऱ्यांमध्ये अंतर किमान १.२० मीटर (४ फूट) असावे किंवा जमिनीच्या मगदुरानुसार रुंद सरी अथवा जोड ओळ पद्धतीने ऊस लागवड करावी. पट्ट्यात पाचट चांगले बसते.
- ऊस तोडणी यंत्राने तोडणी केली असल्यास बुडख्यावरील पाचट बाजूला करणे किंवा बुडखे छाटणी ही कामे करावी लागत नाहीत. या यंत्राने पाचटाचे लहान तुकडे होऊन जमिनीवर समप्रमाणात हलका पाचटाचा थर तयार होतो.
ऊसतोडणी
- ऊसतोडणीपूर्वी १२ ते १५ दिवस पिकास पाणी देऊ नये. तोडणी जमिनीलगत करावी.
- तुटलेला ऊस २४ तासांपर्यंत गाळल्यास ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात घट येत नाही.
डॉ. शरद जाधव, ९९७०९९६८९०,
विषय विशेषज्ञ (कृषी विद्या), कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर,
डॉ. सुभाष घोडके, ९४०५४१८२०४,
सहायक प्राध्यापक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव
- 1 of 9
- ››