भातावरील खोडकिडीचे एकात्मिक नियंत्रण 

भातावरील खोडकिडीचे एकात्मिक नियंत्रण 
भातावरील खोडकिडीचे एकात्मिक नियंत्रण 

महाराष्ट्रात कोकणासह पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांत प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. भाताच्या कमी उत्पादकतेच्या विविध कारणांपैकी या पिकावर येणाऱ्या किडी हे एक मुख्य कारण आहे. भात पिकावर रोपवाटिकेपासून भातकापणीपर्यंत विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. पूर्व विदर्भात भात पिकाला दुसरा पर्याय नसल्यामुळे पीक फेरपालट होत नाही. अनेक वेळा पाण्याची सोय असल्यामुळे उन्हाळी भाताचेही उत्पादन घेतले जात असल्याने किडीसाठी पर्यायी खाद्य उपलब्ध होते. परिसरातील अन्य वनस्पतींवर किडींच्या असंख्य पिढ्या अखंड उपजीविका करत असतात. खोडकिडा ही यातील एक मुख्य कीड असून, तिचे वेळीच नियंत्रण केले पाहिजे.  खोड किडा :  या किडीचा पतंग १ ते २ से.मी. लांब, समोरील पंख पिवळे व मागील पांढरे असे असतात. मादी पतंगाच्या पंखाच्या खालील भागावर काळसर ठिपका असतो; तर नर पतंगाच्या पंखावर काळसर ठिपका नसतो.  नुकसानीचा प्रकार :  सुरवातीच्या काळात अळी कोवळ्या पानांवर उपजीविका करून नंतर खोडात प्रवेश करते. आतील भाग पोखरून खाते. परिणामी, फुटवा सुटण्यास सुरवात होतेवेळी रोपाचा गाभा मरतो. यालाच ‘डेट हर्ट’ किंवा ‘कीडग्रस्त फुटवा’ असे म्हणतात. या रोपाचा फुटवा ओढल्यास सहजासहजी निघून येतो. पीक तयार होण्याच्या वेळी खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात. या लोंब्यांना कोकणात ‘पळिंज’ तर विदर्भामध्ये ‘पांढरी पिशी’ असे म्हणतात.  आर्थिक नुकसानीची पातळी :  १) पुनर्लागवड झाल्यानंतर त्वरित : ५ % कीडग्रस्त फुटवे किंवा एक अंडीपुज प्रति चौ.मी. दिसल्यास  २) फुटवा मध्यावस्थेत : ५% सुकलेले फुटवे  ३) लोंब्याच्या तयार होण्याच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत : १ पतंग प्रति चौ.मी.  एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन :  १) खोडकिडा प्रतिकारक धानाच्या जाती उदा. साकोली-८, सिंदेवाही-५, रत्ना या जातीची लागवड करावी.  २) रोवणीपूर्वी रोपांचे शेंडे तोडून बांबूच्या टोपलीत जमा करावीत. ती टोपली खांबावर टांगावी, त्यामुळे रोपाच्या शेंड्यावर असणारी खोडकिड्याची अंडी नष्ट होण्यास मदत होते.  ३) रोपांची मुळे रोवणीपूर्वी क्‍लोरपायरीफॉस (२०% प्रवाही) १ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावणात १२ तास बुडवून ठेवावीत. नंतर रोवणी किंवा लागवड करावी.  ४) पिकाची वरचेवर पाहणी करून कीडग्रस्त फुटवे काढून नष्ट करावेत. हे काम हंगामातून तीन ते चार वेळा करावे.  ५) शेतात पक्षीथांबे लावावेत.  ६) जर शेतामध्ये ५% कीडग्रस्त फुटवे दिसल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी  क्विनॉलफॉस ३.२ मिली  ७) शक्‍य असल्यास ट्रायकोग्रामा जपोनिकम या परोपजिवी किटकाची हेक्‍टरी अंडी ५० हजार या प्रमाणात दर ७ ते ८ दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा शेतात सोडावे.  ८) भातकापणी जमिनीलगत करावी. वापसा झाल्यावर नांगरणी करून धसकटे गोळा करून ती जाळून टाकावीत.  संपर्क ः  आर. डी. चव्हाण, ८४८४९८४१२०  डॉ. एन. एस. देशमुख, ८२०८१६६७६६  (कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, गोदिंया.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com