शेती, आरोग्य, अपारंपरिक ऊर्जेला दिली दिशा

संस्थेच्या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीवर शिवारफेरीचे नियोजन
संस्थेच्या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीवर शिवारफेरीचे नियोजन

बुलडाणा जिल्ह्यातील कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था शेती आणि शेतकरी विकासासाठी प्रयत्नशील आहे. शेती, आरोग्य, ऊर्जा संवर्धनाच्या प्रसारासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि बाहेर राज्यातही या संस्‍थेने ग्रामविकासाची कामे हाती घेतली अाहेत.  

बुलडाणा जिल्ह्यातील कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यातील निवडलेल्या गावांमध्ये मृद व जलसंधारण, शेती, आरोग्य, शिक्षण, पूरक व्यवसायांची उभारणी, अपारंपरिक ऊर्जा अशा विविध क्षेत्रांतील कामे केली जात अाहेत. संस्थेच्या जलसंधारणाच्या कामांमधून बुलडाणा, जळगाव, नगर, पुणे आणि गडचिरोली जिल्ह्यातील पंचवीस गावात चांगल्या प्रमाणात पाणीसाठा तयार झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी मदत होत अाहे. ‘बिसा’ या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि एटापल्लीसारख्या दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेज कार्यक्रमा’तून शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान व पीकपद्धती शिकवण्यात येते. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी शेतकरी कुटुंबांना एकत्र करीत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून मार्केट लिंकेजचा प्रयत्न संस्था करत अाहे. राज्यात असलेल्या लघू सिंचन प्रकल्पांचा पूर्ण क्षमतेने वापर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनासोबत अकोला, अमरावती व वाशीम जिल्ह्यामध्ये संस्थेने ‘सहभागीय कृषी विकास कार्यक्रम’ हा पथदर्शी प्रकल्प राबविला. यातून पाणी वापर संस्थांची स्थापना व बळकटीकरण करण्याचे काम करीत संबंधित सिंचन प्रकल्प या संस्थांना हस्तांतरित करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यामध्ये संस्थेने बचत गट, शाश्वत शेती, शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना व बळकटीकरण या माध्यमातून काम सुरू ठेवले आहे. यावर्षीसुद्धा नाबार्डसोबत ‘जलदूत’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनजागृतीचे काम केले जात अाहे.

बायोगॅस उभारणीला चालना संस्थेने जळगाव, नगर व पुणे जिल्ह्यामध्ये खासगी बँकेच्या सहकाऱ्याने परिवर्तन सामुदायिक विकास प्रकल्पांतर्गत काही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडल्या. नगर जिल्ह्यातील अंजनापूर आणि चांडकापूर या गावात बायोगॅसची उभारणी सुरू आहे. संस्थेच्या प्रकल्पातून प्रेरणा घेऊन अंजनापूर गावाने ‘एलपीजी फ्री व्हिलेज’ निर्माण करण्याचा वसा घेतला. या गावात १०० बायोगॅसची उभारणी सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांचे सिलिंडरचे पैसे वाचतील, सोबतच शेतीसाठी सेंद्रिय खताची उपलब्धता होणार आहे. याशिवाय स्मोकलेस चूल, सोलर पथदिवे व सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर वाढविण्यावर प्रकल्पात भर दिला अाहे.

पूरक व्यवसायाचे प्रशिक्षण विविध गावांमध्ये जनावरांचे लसीकरण, आधुनिक गोठा पद्धती, दूध काढणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, चारा व्यवस्थापन अशा अनेक बाबी शेतकऱ्यांना शिकविण्यासाठी संस्थेचा पुढाकार अाहे. काही गावांमध्ये जमीन क्षारयुक्त आहे. तेथे लसूण घास लागवड आणि विक्री हा या भागातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत सदर गावांमधून माती व पाणी यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. पाणी निचऱ्यासाठी जमिनीत आधुनिक सब सरफेस ड्रेनेज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

कार्याचा गौरव सप्टेंबर २०१७ मध्ये ‘इंडिया सीएसआर समीट` या कार्यक्रमामध्ये संस्थेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरविण्यात आले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ काॅर्पोरेट अफेअर्स, नवी दिल्ली या केंद्रीय काॅर्पोरेट मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थेद्वारा तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्थेद्वारे संस्थेला एम पॅनेल करण्यात आले आहे. ‘काॅर्पोरेट सोशल फोकस` या राष्ट्रीय स्तरावरील मासिकाने संस्थेच्या कार्याची दाखल घेत लेख प्रसिद्ध केला. संस्थेचे अध्यक्ष दिलीप नाफडे यांना राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान तसेच बुलडाणा जिल्हा परिषदेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांना गती    केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी संसाधन संस्था तसेच केंद्र शासनाच्या ‘इक्विटी ग्रॅंट’ आणि इतर काही योजनासाठी सल्लागार म्हणून काम करण्यास मान्यता दिली आहे. या अंतर्गत संस्थेने महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना विनामूल्य फायदा मिळवून दिला.

    शेतमाल खरेदीचा पथदर्शी प्रकल्प  शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांच्या शेतमालाची शासनाद्वारे हमीभावाने खरेदी झाल्यास शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ मिळेल असा युक्तिवाद करीत संस्थेने सन २०१३-१४ मध्ये ‘एसएफएसी’ सोबत या योजनेचा पथदर्शी प्रकल्प बुलडाणा जिल्ह्यात राबवण्यास सुरवात केली. नाफेड व एनसीडीईएक्स यांच्या सोबतसुद्धा शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे शेतमालाची खरेदी करण्याचे काम संस्थेने केले. एसएफएसी व व्हेजिटेबल ग्रोवर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सोबत शेतकरी उत्पादक कंपन्यांचे भारतातील पहिले फेडेरेशन ‘महाएफपीसी’ या नावाने महाराष्ट्रामध्ये उभारले. त्याला सक्षम करण्यासाठी योगदान दिले. 

महिला शेतकरी सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न    संस्थेने यवतमाळ, बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यात चार ‘महिला शेतकरी उत्पादक कंपन्या` उभारल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व नाबार्डसोबतच एफडब्लूडब्लूबी या आंतरराष्ट्रीय संस्थेचे यासाठी चांगले सहकार्य मिळाले. नाबार्डच्या ‘नाबफिन्स’ या संस्थेसोबत संस्था लवकरच काम सुरू करीत अाहे. या माध्यमातून बचत गट सक्षम करण्यास मदत होणार आहे.  डिजिटल प्रशिक्षण, आरोग्यसेवेवर भर  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे म्हणाले की, ‘फार्मर डिजिटल लिट्रसी सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाने सक्षम करण्यावर भर दिला. या प्रयोगाला नुकतीच सुरवात झाली. शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी ‘परिवर्तन कक्ष’ ही संकल्पना संस्थेद्वारे राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रकल्पातील गावांमध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक सुधारणा व मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. अनेक शेतकरी आपले दुखणे अंगावर काढतात. अशा शेतकऱ्यांसाठी विशेषतः गावातील वृद्ध शेतकरी व महिलांसाठी संस्थेद्वारे आरोग्य शिबिरे भरविली जातात.

संपर्क ः अमित नाफडे, ८५५१९१९२९३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com