कीटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी

एकात्मिक कीड व्यवस्थापनात किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा महत्त्वाचा वाटा आहे. शेती करताना शेतकऱ्यांना सातत्याने दक्ष राहून कीड रोगांच्या नियंत्रणासाठी उपाय योजावे लागतात. मात्र, ही कीटकनाशके विषारी असून, हाताळणी व फवारणी करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
कीटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी
कीटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी

एकात्मिक कीड व्यवस्थापनात किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा महत्त्वाचा वाटा आहे. शेती करताना शेतकऱ्यांना सातत्याने दक्ष राहून कीड रोगांच्या नियंत्रणासाठी उपाय योजावे लागतात. मात्र, ही कीटकनाशके विषारी असून, हाताळणी व फवारणी करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. १. कीटकनाशकाची निवड :

  • किडींच्या नुकसानीचा प्रकार, प्रादुर्भावाची तीव्रता, आर्थिक नुकसानीची पातळी, अवस्था आणि किडीच्या तोंडाची रचना कशी आहे, यावरून कीटकनाशकाची निवड करावी.
  • सर्वसाधारणपणे पाने, फुले, फळे खाणाऱ्या अळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता उदर विष (stomach poison ) आणि रसशोषक किडीच्या व्यवस्थापनाकरिता आंतरप्रवाही (systemic poison ) आणि जमिनीत वास्तव्य करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनाकरिता धुरीजन्य किंवा जमिनीतून द्यावयाच्या कीटकनाशकांची निवड करणे अधिक फायदेशीर ठरते.
  • फवारणीसाठी सर्वप्रथम मवाळ कीटकनाशकांची म्हणजेच ज्या कीटकनाशकाच्या डब्यावर हिरवा किंवा निळा त्रिकोण आहे, अशाच कीटकनाशकाची निवड करावी. त्यानंतर गरज भासल्यास शेवटी जहाल (लाल, केशरी, पिवळा त्रिकोण असलेली ) कीडनाशके वापरावीत.
  • एकच एक किंवा एकाच गटातील कीटकनाशकांची वारंवार फवारणी करू नये.
  • वरील बाबीचा विचार करून कीटकनाशकांची फेरपालट करून केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारशीत केलेली (लेबल क्लेम ) कीटकनाशकांची फवारणी करावी.
  • २. कीटकनाशकांची विषकारकता :

  • केंद्रीय कीटकनाशक बोर्डाच्या २०१९ मधील शिफारशीनुसार कीटकनाशकांचे सुधारित वर्गीकरण पुढीलप्रमाणे.
  • कीटकनाशकांचे विषकारकतेनुसार अतितीव्र विषारी, फार विषारी, मध्यम विषारी, किंचित विषारी आणि संभवत: हानिकारक.
  • अ) कीटकनाशकांच्या आवेष्टनावर (डब्यावर) पतंगाच्या आकारात लाल त्रिकोण असून त्रिकोणाच्या वरच्या बाजूस धोक्याचे चिन्ह व लाल अक्षरात Fatal Poison (प्राणघातक विष) असे लिहिलेले असते.
  • ब) फार विषारी कीटकनाशकांच्या आवेष्टनावर (डब्यावर) पतंगाच्या आकारात केशरी त्रिकोण व त्रिकोणाच्या वरच्या बाजूस लाल रंगात धोक्याचे चिन्ह व लाल अक्षरात Poison (विष) असते.
  • क) मध्यम विषारी कीटकनाशकांच्या आवेष्टनावर पतंगाच्या आकारात पिवळा त्रिकोण व त्रिकोणाच्या वरच्या बाजूस लाल अक्षरात Poison (विष) असे दर्शविलेले असते. ही कीटकनाशके जहाल गटात मोडतात.
  • ड) किंचित विषारी कीटकनाशकांच्या आवेष्टनावर पतंगाच्या आकारात निळा त्रिकोण व त्रिकोणाच्या वरच्या बाजूस अक्षरात Danger (धोका) असे लिहिलेले असतात.
  • ई) संभवत: हानिकारक कीटकनाशकांच्या आवेष्टनावर पतंगाच्या आकारात हिरवा त्रिकोण व त्रिकोणाच्या वरच्या बाजूस अक्षरात Caution (दक्षता) असे दर्शविलेले असते. सदर कीडनाशके मवाळ गटात मोडतात.
  • ३. कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी :

  • कीटकनाशके परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत.
  • खरेदी केलेल्या कीटकनाशकांचे विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे.
  • लेबलक्लेम आणि शिफारस असलेले कीटकनाशक फवारणीसाठी आवश्यक तेवढ्याच प्रमाणात खरेदी करावीत.
  • कीटकनाशके खरेदी करताना माहिती (लिफलेट ) पत्रकाची मागणी विक्रेत्याकडे करावी. ते माहितीपत्रक वाचून/ऐकून समजून घेऊन पूर्ण सूचनांचे पालन करावे. नंतरच खरेदी करावे.
  • मुदत न संपलेल्या, कालबाह्य झालेल्या किंवा आवेष्टन खराब झालेल्या कीटकनाशकांची खरेदी करू नये.
  • ४. हाताळताना व फवारताना घ्यावयाची काळजी :

  • कीटकनाशकांची शेतात फवारणी करतेवेळी प्रथमोपचार साहित्य नेहमी तयार ठेवावे.
  • खाद्य पदार्थ, औषधे व कीडनाशकांचा संपर्क येऊ देऊ नये.
  • कीटकनाशके लहान मुलांच्या संपर्कात येणार नाही, अशा ठिकाणी कुलूपबंद ठेवावीत.
  • कीडनाशकांच्या डब्यावरील पतंगाच्या आकाराचे चिन्ह व त्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य कीटकनाशकाची निवड करावी.
  • पीक, कीड व रोगनिहाय कीटकनाशकांची निवड करून शिफारशीत प्रमाणातच फवारणी करावी.
  • कीटकनाशक वापरण्यापूर्वी लेबल व माहितीपत्रक व्यवस्थित वाचून त्यावर दिलेल्या खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे.
  • तणनाशके फवारणीसाठी वापरलेला पंप चुकूनही कीडनाशकांच्या फवारणीसाठी वापरू नये.
  • गळक्या फवारणी पंपाचा वापर फवारणीसाठी करू नये.
  •  कीटकनाशक हाताळताना व फवारणी करताना अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, गमबुट इ. चा वापर करावा व संपूर्ण शरीर झाकले जाईल याची काळजी घ्यावी.
  • कीटकनाशके द्रावण हाताने न ढवळता काडीच्या साहाय्याने हातात हातमोजे घालूनच ढवळावीत.
  • कीटकनाशके अंगावर पडू नयेत यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये.
  • कीटकनाशके फवारणीसाठी हाता पायावर जखम असलेल्या व्यक्तीची निवड करू नये.
  • फवारणी एकाच व्यक्तीकडून करून न घेता आळीपाळीने करून घ्यावी.
  • फवारणी दरम्यान नोझल गच्च झाल्यास किंवा कचरा अडकल्यास तोंडाने साफ न करता तारेच्या साहाय्याने साफ करावे.
  • फवारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर अंगावरील कपडे स्वच्छ धुवावेत. त्यानंतर सर्व अंग साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावे. अंग कोरड्या स्वच्छ टॉवेलने पुसून दुसरे कपडे घालावेत.
  • कीटकनाशकांचे रिकामे डब्बे तसेच शेतात फेकून न देता पाण्याचे स्त्रोत विहीर, नदीपासून दूर जमिनीत खोल गाडून टाकावेत.
  • फवारणी करताना पंपाच्या विशिष्ट दाबानुसार फवारणीचे तुषाररूपी द्रावण बाहेर पडतात. त्यानुसार चालण्याचा वेग नियंत्रित करून झाडे सर्व बाजूंनी ओलेचिंब होतील हे पाहावे. द्रावण थेंबरूपाने खाली पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • ५ . विषबाधित व्यक्तीची काळजी

  • विषबाधा झाल्यास वेळ न घालवता बाधित व्यक्तीस अपघात स्थळापासून सावलीच्या ठिकाणी न्यावे. ताबडतोब प्रथमोपचार करावा.
  • विषबाधित व्यक्तीचे बाधित अवयव ताबडतोब साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावेत. कोरड्या स्वच्छ टॉवेलने पुसावे.
  • विषबाधित व्यक्तीला जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे.
  • कीडनाशक पोटात गेलेले असल्यास विषबाधित व्यक्तीला ताबडतोब ओकारी करण्याची उपाययोजना करावी.
  • विषबाधित व्यक्तीला पिण्यासाठी दूध, विडी/ सिगारेट व तंबाखू देऊ नये. थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून द्यावे.
  • विषबाधित व्यक्तीला झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी.
  • विषबाधित व्यक्ती त्वरित कीटकनाशकांच्या माहितीपत्रकासह डॉक्टरकडे दाखवावे किंवा आवश्यकतेनुसार दवाखान्यात दाखल करावे. डॉक्टरच्या देखरेखीखाली उपचार सुरू करावेत.
  • विषबाधित व्यक्ती बरी झाल्यावर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
  • डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८ (विषय विशेषज्ञ -कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com