नद्यातील मानवी हस्तक्षेपामुळे माशांच्या जैवविविधतेत घट

नद्यातील मानवी हस्तक्षेपामुळे माशांच्या जैवविविधतेत घट 
नद्यातील मानवी हस्तक्षेपामुळे माशांच्या जैवविविधतेत घट 

कॅलिफोर्नियातील मानवांनी हस्तक्षेप केलेल्या नद्यांतील चिनूक सॅलमोन मासे धोक्यामध्ये आल्याचा निष्कर्ष दी नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमॉस्फिअरीक अॅडमिनिस्ट्रेशन या अमेरिकन संस्थेने काढला आहे. या हस्तक्षेपामुळे त्यांच्या गटांमध्ये राहण्याच्या आणि स्थलांतराच्या वेळेवर परिणाम होत आहे. याचा फटका त्यांच्या समुद्रामध्ये शिरण्याच्या आणि वाढून प्रौढ होण्याच्या एकूण प्रक्रियेला बसत आहे. गेल्या काही शतकांमध्ये नद्यांसह पाण्याच्या विविध स्रोतांमध्ये माणसांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा फटका त्यामध्ये राहण्याच्या जलचरांच्या एकूण परिसंस्थेला बसत आहे. कॅलिफोर्नियातील नद्याच्या पाण्याचे प्रवाह धरणापासून शेवटपर्यंत स्थिर ठेवण्याच्या प्रक्रियेमुळे थंडी पडून नद्या गोठण्यापूर्वी समुद्राकडे स्थलांतरित होणाऱ्या जलचरांवर अनेक मर्यादा येत आहेत. सॅक्रामेंटो - सॅन जोआक्विन डेल्टा या टप्प्यातील दलदलीचे प्रदेशही आक्रसले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये उशिरा स्थलांतर करणाऱ्या माशांना उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानाचा फटका बसतो. वास्तविक आकाराने थोडे मोठे असूनही, त्यांच्या तग धरण्याच्या शक्यता कमी होत जातात. जे मासे वसंताच्या मध्यावधीपर्यंत स्थलांतर करतात, त्यांच्या तग धरण्याच्या शक्यता सर्वाधिक असतात. स्टॅनिलाऊस सारख्या नदीमध्ये प्रौढ सॅलमोन मासे चांगल्याप्रकारे वाढू शकतात. संशोधनाचे हे निष्कर्ष ग्लोबल चेंज बायोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. पाण्याच्या प्रवाहातील बदल आणि रहिवासाचा ऱ्हास या दोहोंचे एकत्रित परिणाम सॅलमोन माशांच्या तग धरण्याच्या क्षमतेवर होतात. या समस्येवर मात करण्यासाठी पोर्टफोलिया परिणाम उपयुक्त ठरू शकतो. त्यामध्ये सॅलमोन माशांच्या स्थलांतराच्या पर्यावरणानुसार बदलत जाणाऱ्या पद्धतींचा विचार करण्यात आला आहे. हे एखाद्या आर्थिक गुंतवणुकीच्या पोर्टफोलियोप्रमाणे आहे. कॅलिफोर्नियातील चिनूक सॅलमोन या माशांने स्थलांतराच्या वेगवेगळ्या वेळांप्रमाणे स्वतःला उत्क्रांत केले आहे. यामुळे तो वातावरणातील बदल, समुद्र आणि नद्यातील स्थिती यातील विविध परिस्थिती यावर मात करू शकतो. कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील संशोधिका अॅना स्टूरॉक यांनी सांगितले, की भविष्यामध्ये सातत्याने बदलणाऱ्या वातावरणाच्या स्थितीमध्ये कोणते धोरण योग्य ठरेल, याचा अंदाज सांगता येणार नाही. सध्या तरी प्रत्येक उपलब्ध मार्गाचा विचार करणे आवश्यक आहे. धरणातून कमी प्रमाणात सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे माशांचे उत्पादन कमी होत आहे. यामध्ये रहिवासाचे आक्रसणे आणि माशांसाठी खाद्याची कमी उपलब्धता या दोन्ही कारणांचा समावेश आहे. जीवशास्त्रज्ञांनी गेल्या दोन दशकांमध्ये सॅलमोन माशांच्या स्थलांतराच्या एकूण माहितीचे विश्लेषण केले. त्यांनी स्टॅनिसलाऊस नदीन स्थलांतर करणाऱ्या सॅलमोन माशांच्या सात पिढ्यांचा मागोवा घेतला. त्यांच्या माशांच्या कल्ल्यांच्या हाडातील (त्याला इंग्रजीमध्ये ओटोलिथ्स असे म्हणतात. ) विशिष्ठ रासायनिक गंधाचा वापर केला. हे ओटोलिथ्स माशांच्या प्रमाणामध्ये वाढतात आणि आजूबाजूच्या पाण्याच्या रासायनिक स्थिती सांगण्यात मदत करतात. यामुळे सॅलमोन माशांच्या लहान पिल्लावरही (ज्यांना टॅग लावणे शक्य नसते) लक्ष ठेवणे सोपे होते. थोड्या बदलांनीही सुधारणा शक्य ज्या वेळी भरपूर पाणी उपलब्ध असते, त्या वेळी स्थलांतर करणाऱ्या पिल्लांचे प्रौढांमध्ये रूपांतरणांच्या शक्यता वाढतात. मात्र, सॅक्रोमेन्टो सॅन जोआक्वेन डेल्टा प्रदेशातील दलदलीच्या रहिवासाचे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षा कमी राहिले आहे. या टप्प्यातील अन्नांचे प्रमाण कमी झाल्याचा फटका स्थलांतर करणाऱ्या माशांना बसतो. केवळ आपण पाण्यांच्या नैसर्गिक चढउतारावर काही प्रमाणात नियंत्रण ठेऊ शकलो तरी माशांच्या बचावासाठी त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे संशोधक सांगतात. सॅलमोन माशांचे लहान पिल्ले मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करत असतात. डेल्टा दलदलीच्या टप्प्यामध्ये त्यांच्या तग धरण्याच्या स्थितीत थोडी जरी सुधारणा झाली, तरी प्रौढ माशांच्या परतीची आपण आशा करू शकतो.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com