शेतीचे भवितव्य शाश्‍वत करताना

वातावरण बदल आणि त्याचे कृषी क्षेत्रावर अनिष्ट परिणाम, त्यावरील उपाय यांचा शोध घेतानाच यामधून निर्माण झालेल्या शाश्वत यशोगाथाही या लेख मालिकेमधून पाहणार आहोत.
 शेतीचे भवितव्य शाश्‍वत करताना
शेतीचे भवितव्य शाश्‍वत करताना

मी  १९६०-७० च्या दशकात अनुभवलेली, जगलेली शेती आजही माझ्या स्मृतीमध्ये ध्रुव बाळासारखी अढळ आहे. तो मृगाचा पहिला पाऊस, मातीचा सुगंध, खरिपामधील ८-१० पिके, शेतामधील गोठा, बैलजोडी, तुडुंब भरलेली विहीर, मोटेचे पाणी, शेतातील खळे, बैलगाडीत टाकून घरी आलेली धान्याची पोती, परतीचा हवा तेवढाच पाऊस, रब्बीची पेरणी, पुन्हा तेवढीच पिके, घरामध्ये शेणाने लिंपलेल्या कणगी, त्यात साठविलेले धान्य. गोरगरिबांना मोफत आणि बारा बलुतेदारांचा सन्मानसुद्धा. ५० वर्षांपुर्वीची शेती म्हणजे खरा आनंद उत्सव होता. सुट्टीत घरी आल्यावर शेत मला बोलावत असे, ती माझी खरी आनंद यात्रा होती. भेटीला आसुसलेला मी आणि निसर्ग परिसरामधील आमची शेती. शेतात गेल्यावर नकळत माझे डोळे पाणावत. माझी ही दुसरी आई ऊन, पावसात भिजत मुबलक धान्याच्या रूपामध्ये कायम हसत असे. “सुजलाम्, सुफलाम्” याचा खरा अर्थ मला आमच्या शेतामध्ये अनुभवण्यास मिळाला. वातावरण बदलाचा आज जेव्हा मी अभ्यास करतो, तेव्हा ही स्मृतीची सुगंधी पाने आपोआप उलटली जातात. कोण, कसे, कुठे चुकले याचा मनात गोंधळ सुरू होतो. मनात प्रश्नांची भेंडोळी तयार होता आणि त्याचे उत्तर परत फिरून पुन्हा वातावरण बदलाच्या मैलाच्या दगडापाशी येऊन थांबते.  मराठी शब्दकोशामधील ध्यास आणि हव्यास हे दोन शब्द प्रत्यक्ष शेती बरोबर जोडलेले आहेत. मी पाहिलेल्या शेतीमध्ये ध्यास होता, आनंद होता. आज मात्र हा शब्द शेतीच्या शब्दकोशामधून वजा झाला आहे, सर्वत्र एकच शब्द दिसतो तो म्हणजे हव्यास. सध्याच्या शेतीला जोडलेली वातावरण बदलाची समस्या ही या हव्यासामधूनच निर्माण झाली आहे. आपण प्रत्येकजण कोणत्या तरी एका मार्गाने पर्यावरणाची हानी करून निसर्ग देवतेवर ओरखडे ओढत असतो. कुणाचे ओरखडे पटकन मिटतात, तर अनेकांचे कायम राहतात. पायामध्ये वहाण घालून आपण शेतात जातो तेव्हा प्रत्येक पावलाखाली लाखो सूक्ष्म जीव नष्ट होत असतात. हा ओरखडाच नव्हे काय? माझी आई मला सांगत असे, शेताच्या बांधावर उभे राहून अगोदर हात जोडावे, चप्पल बाजूला ठेवावी आणि अनवाणी पायाने भूमीला स्पर्श करावा, यालाच तर ध्यास, ओढ आणि स्पर्श प्रेम म्हणतात. आज आमच्या हव्यासाने या हळव्या प्रेमास आम्ही केव्हाच दूर लोटले आहे. आज आमच्या कृषी समस्यांच्या भल्या मोठ्या यादीमध्ये नष्ट झालेली एकत्र कुटुंब पद्धती, अल्पभूधारकांच्या वाढत्या वेदना, बी-बियाण्यात फसगत, रासायनिक खते, कीडनाशके, आटलेले भूजल तर काही ठिकाणी अनियंत्रित पाणीवापरामुळे जमिनीची नापीकता, वादळ, वारे, लांबलेला पाऊस, संकरित बियाण्यांचा अतिरेक, डोक्यावर कर्ज, उपलब्ध नसलेली धान्य साठवणक्षमता, धान्य वाहतूक आणि मॉन्सूनवर अवलंबून असलेली शेती या समस्यांची कायम भर पडत असते. प्रत्येक प्रश्नाचे स्वतंत्र उत्तर शोधण्याचा आमचा प्रयत्न विविध मार्गांनी सुरू असतो आणि यातूनच नैराश्येकडे प्रवास सुरू होतो. या सर्व समस्यांचे मूळ उगमस्थान वातावरण बदल या शेती निगडित काळ्या ठिपक्याजवळ येऊन थांबते. शेतकरी वातावरण बदलामुळे पर्यावरणाशी जोडलेल्या दुष्काळ, महापूर, गारांचा वर्षाव, चक्रीवादळे, पावसाचे लांबणे, शेत पिकांचे जीवनचक्र बदलणे, भूजल पातळी, रोगांचा प्रादुर्भाव, त्यात पडणारी नवीन भर आणि वाढते तापमान यांच्याशी लढा देत असतो. सोबतच आर्थिक स्तरावरही कमी उत्पन्न, कर्जाचा डोंगर, त्याची परतफेड, बियाण्यात फसगत, दुबार पेरणी, बाजार भाव न मिळणे, शेत मजुरांची कमतरता, साठवणक्षमता नसल्याने कमी दरात विक्री, दलालांची वाढणारी श्रीमंती हे सर्व घटक बळीराजाच्या सामाजिक प्रश्नांबरोबर घट्ट जोडलेले आहेत. याचा आपणास कायम विसर पडलेला असतो. शेतकरी आत्महत्या, गरीब अल्पभूधारकांची उपेक्षा, शेती आणि तिच्याशी जोडलेल्या प्रश्नाबद्दल शेतकऱ्यामध्ये वाढत असलेली निरक्षरता या सामाजिक समस्यांची उकल त्वरित होणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आहे, असे आपण समजतो. येथेच आपली फसगत होते. दुर्दैवाने दुसऱ्याची होणारी फसगत यात आपण आपल्या यशाचे मोजमाप करत असतो. स्वत: अभ्यास करून त्याचे स्वहस्ते टिपण तयार करणे, असे न करता आपण इतरांच्या वह्यांमध्ये डोकावतो, त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. तिथेच शेतीचे गणित वजाबाकीकडे वळू लागते. सर्व कृषी समस्यांचे मूळ असलेल्या वातावरण बदलाचे गणित आणि त्याची साधी, सोपी उकल जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला समजेल, उमजेल तो भारतीय शेतीसाठी सुवर्णक्षण ठरावा. आज आपण निसर्गाशी कृतघ्न आहोत. शेती ही आपणास जंगलाची देण आहे. नैसर्गिक अन्नावर अवलंबून असलेला आदिमानव घनदाट जंगलाचे दान स्वीकारत होता. शेतीचे क्षेत्र थोड्या प्रमाणात विस्तारत गेले. जंगलानेच आम्हाला त्याच्या माध्यमातून नवीन वाणांची निर्मिती करून दिली. सोबत काळानुसरा सकस मातीही बदलत गेली. अतिथी आणि दाता यामधील फरक क्षीण होत जाऊन आज तो संपूर्ण अस्तंगत झाला आहे. दात्याचे असे नष्ट होणे ही आपल्या देशामधील वातावरण बदलाची सूचक घंटा होती. आपण परतंत्र्यात असताना ब्रिटिशांना जंगलाची आवड होती, कारण त्यांची सुट्ट्यांमधील विश्रांतीची रम्य ठिकाणे घनदाट जंगलामध्येच होती. शहरे बांधताना अथवा विस्तार करताना त्यांना जंगल तोड करावी लागली. मात्र त्या बदल्यात त्यांनी अन्य भागात जंगलाची जोपासना करण्याचा प्रयत्न केला.  त्यांच्या आवडीतूनच विदेशी वृक्षांचा आपल्या देशात प्रवेश झाला. या प्रवेशास अढळ स्थान देण्याचे महान कार्य आम्हीच केले. आजही त्यांचे दुष्परिणाम माहित असतानाही ते अव्याहत चालू आहे, कारण आमचे अज्ञान. १९४७ मध्ये आपणास स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा देशात सरकारी मालकीचे ४९ टक्के जंगल होते. तेवढीच टक्केवारी खासगी क्षेत्राची होती. अर्थात, यात मोठमोठ्या फळबागांचा अंतर्भाव होता. शेती हा त्या वेळी जंगलाचाच एक घटक होता. ३५ कोटी लोकसंख्येला हे कृषी उत्पादन भरपेट होते. आज देशामध्ये जंगल जेमतेम सरासरी २० टक्के आहे. जंगल नष्ट करून कृषिक्षेत्र वाढले आणि शहरांचा विस्तार सुद्धा. पूर्वी दोन घास पोटात गेले तरी तृप्तीचा ढेकर येत असे. आज कृषी क्षेत्र वाढले आहे, ठरावीक धान्याच्या उत्पादनाने शासनाची धान्य कोठारे ओसंडून वाहू लागली. अन्नधान्य उत्पादनात स्वयंपुर्ण होताना आम्ही अनेक विक्रम मोडले, पण निसर्गास तिलांजली देऊन. बांधावर एकाही वृक्षास स्थान न देता आम्ही वातावरण बदलास सन्मानाने आमंत्रित केले आहे. आता वातावरण बदलावर एकटे शासन अथवा त्यांची धोरणे नियंत्रण ठेवू शकणार नाहीत. यासाठी आपल्या सर्वांनाच पुढे यावयास हवे. देशविदेशांमधील अनेक शेतकऱ्यांनी वातावरण बदलास यशस्वीपणे सामोरे जात अनेक यशोगाथा तयार केल्या आहेत. याची साधक बाधक चर्चा या लेख मालिकेमधून करणार आहोत. 

काय करता येईल?

  •   वादळ, वारे, पावसाची अनियमितता, पडणारे दुष्काळ ही सर्व देवाची अथवा अज्ञात शक्तीची अवकृपा म्हणून जे नशिबात आहे, ते स्वीकारणे योग्य नव्हे! 
  •   विज्ञानाच्या साह्याने यामागचे कारण शोधण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञांच्या पातळीवर सुरू आहेत. मात्र या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. अर्थात, हे एकट्याचे काम निश्चितच नव्हे! देशामधील सर्वच लहान मोठ्या शेतकऱ्यांनी यासाठी एकत्र येऊन सकारात्मक दिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे. 
  •   वातावरण बदल हा अवघ्या विश्वाचा प्रश्न आहे. श्रीमंत राष्ट्रांनी विकास करताना केलेली अनियंत्रित पापे, त्यांना विकसनशील राष्ट्रांनी दिलेली साथ यामुळे सर्वांना वातावरण बदलांतून शिक्षा मिळत आहे. 
  •   वातावरण बदलास आपण औद्योगिक क्षेत्रास आणि निसर्गावर कुरघोडी करून केलेल्या विकासाला जबाबदार धरत असलो, तरी आपलाही त्यात कुठेतरी सहभाग आहे, हे नाकारण्यात काय अर्थ आहे?
  •   वातावरण बदलाचा भारतीय शेती आणि शेतकरी यांच्यावर आज फार मोठा अनिष्ट परिणाम झाला आहे.  यामध्ये अल्पभूधारक  शेतकरी जास्त भाजला जात आहे. त्यामुळे देशाचे कृषी व्यवस्थापन ढासळत असून, पुढील दोन दशके अतिशय कसोटीची असणार आहेत. 
  • (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com