गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंड

गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंड
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंड

कुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी बचत गटाने कोकण मेवा, भाजीपाला, फळभाज्यांच्या लागवडीतून अर्थार्जनाचा मार्ग शोधला आहे. गेल्या सहा वर्षांपासून अथक परिश्रम आणि बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करून या बचत गटाने शेती विकासाबरोबरीने प्रक्रिया उद्योगाची दिशा पकडली आहे. कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) हे निसर्गरम्य गाव. या गावाच्या शिंदेवाडीतील महिलांनी शेतीबरोबरीने प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला. गावखडी पंचायत समिती गटाच्या तत्कालीन पंचायत समिती सदस्या सौ. भिवंदे यांनी गावातील महिलांचा बचत गट स्थापन करण्यासाठी श्वेता संतोष शिंदे आणि स्वाती सतीश शिंदे यांना पुढाकार घेण्यास सांगितले. बचत गट उभारणीसाठी तत्कालीन विस्तार अधिकारी श्री. गिरी यांचे मार्गदर्शन लाभले. बचत गटाचे फायदे लक्षात घेऊन २०१३ मध्ये गावातील तेरा महिलांनी एकत्र येत श्री नवलाई देवी महिला समूह या गटाची स्थापना केली. या गटाने पहिल्यांदा बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन तळलेले गरे, फणस पोळी, आंबा पोळी तयार करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यात भर पडली सांडगी मिरचीची. पावस, गावखडी, गणेशगुळे या परिसरातील सांडगी मिरची संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. गटातील महिलांनी बनविलेल्या सांडगी मिरचीला बाजारात चांगली मागणी असते. सध्या या गटामध्ये अपूर्वा अजय माईण (अध्यक्ष), स्वाती सतीश शिंदे (सचिव), श्वेता संतोष शिंदे, माधुरी महेंद्र शिंदे, वैशाली विष्णू शिंदे, रसिका राजेंद्र शिंदे, शेवंती सदाशिव शिंदे, वेदिका राजेंद्र भरणकर, गोपिका गोपाळ माईण, सावित्री सहदेव खर्डे या सदस्या कार्यरत आहेत. शासनाच्या उमेद अभियानांतर्गत श्री नवलाई देवी गटाला पंधरा हजार रुपये भांडवल मिळाले; मात्र ही रक्कम कच्चा माल खरेदी करण्यासाठी पुरेशी नव्हती. अखेर गटातील तेरा महिलांनी मिळून प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले. या रकमेतून तळलेले फणस गरे, सांडगी मिरची, कोकम सरबतासाठी आवश्यक कच्चा माल खरेदी केला. पहिल्याच वर्षी रत्नागिरी शहरातील एका प्रदर्शनामध्ये गटाने विविध प्रक्रिया पदार्थांची विक्री करत पाच दिवसांमध्ये सात हजार रुपयांचा नफा मिळविला. सुरवात चांगली झाल्यामुळे गटाचा उत्साह वाढला आणि प्रक्रिया उद्योगाने गती घेतली. ग्राहकांच्या मागणीनुसार गटाने वडापीठ, कुळीथपीठाच्या निर्मितीला सुरवात केली आहे. भाजीपाला, हळद लागवडीला प्राधान्य ः महिला बचत गटाने पहिल्या वर्षी कोकणी मेव्याबरोबरच भाजीपाला लागवड करण्याचा निर्णय घेतला. गटाला गावातील शालेय पोषण आहार शिजवण्याचे कंत्राट मिळाले आहे. याची जबाबदारी गटातील दोन महिलांनी घेतली. उर्वरित महिलांनी एकत्र येऊन २०१४ मध्ये श्वेता शिंदे यांच्या पाच गुंठे जमिनीत भाजीपाला लागवड करण्यास सुरवात केली. शेतजमिनीजवळच पाण्याची व्यवस्था असल्यामुळे टप्प्याटप्प्याने भाजीपाला लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने पालेभाजी, मुळा, वांगी, चवळी, गवार, तोंडली, पावटा, हळद लागवडीवर भर दिला. भाजीपाला पिकांसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. उत्पादित भाजीपाल्याची विक्री गाव परिसर आणि काही अंतरावर असलेल्या पावस बाजारात केली जाते. दिवसाला दीडशे ते दोनशे रुपयांची भाजी गावामध्येच विकली जाते. सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने चार वेळा भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. साधारणपणे मंगळवारी, गुरुवारी पावस येथील बाजारात गटातील दोन महिला भाजी विक्रीसाठी जातात. लागवड केलेल्या भाजीला पाणी लावणे, बेणणीची कामे गटातील महिलांनी वाटून घेतली आहेत. शोधले मार्केट ः गटातील महिलांनी मेहनत घेऊन तयार केलेली प्रक्रिया उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ शोधण्याचे मोठे आव्हान होते. यासाठी उमेदच्या अधिकाऱ्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे यांचे चांगले सहकार्य महिला गटाला मिळाले. प्राची शिंदे यांनी रत्नागिरी शहरात उत्पादन विक्रीसाठी व्यवस्था तयार करून दिली. गणपतीपुळे येथील सरस प्रदर्शन, मुंबईत दरवर्षी होणारे महालक्ष्मी प्रदर्शनातही गटाने आपली उत्पादने विक्रीस ठेवली. याचबरोबरीने ठाणे, जोगेश्‍वरी, बेलापूर येथील प्रदर्शनातही गटातील महिला सहभागी होतात. घाटकोपर येथील मॉलमध्येही बचत गटाच्या उत्पादनाला मागणी आहे. महाराष्ट्राबाहेर हरियाणा आणि दिल्लीमधील प्रदर्शनात गटाने सहभाग नोंदविला. हरियाणातील प्रदर्शनात अपेक्षित विक्री झाली नाही, मात्र बाजारपेठेचा चांगला अनुभव मिळाल्याचे श्वेता शिंदे आवर्जून सांगतात. प्रदर्शनासाठी त्यांना पती संतोष शिंदे यांची चांगली मदत मिळते. प्रक्रिया उत्पादनांचे नियोजन ः १) बचत गटातर्फे सांडगी मिरची तयार केली जाते. शंभर ग्रॅम पाकिटामध्ये मिरचीचे पॅकिंग होते. दरवर्षी सरासरी २०० किलो मिरचीची विक्री होते. प्रति किलोस ६०० रुपये दर मिळतो. २) दरवर्षी आंबा पोळीची सुमारे २५ ते ३० किलोपर्यंत विक्री होते. ३) गऱ्यासाठी लागणारे फणस उपलब्ध होण्यासाठी करारावर झाडे घेतली जातात. दरवर्षी पाचशे किलो गऱ्यांची विक्री होते. प्रति किलोस ४०० रुपये दर मिळतो. ४) ग्राहकांकडून हळद पावडरीला चांगली मागणी आहे. प्रति किलो २०० ते २५० रुपये दराने हळद पावडरीची विक्री होते. ५) गटातर्फे नाचणीचे उत्पादन घेतले जाते. नाचणीला ५० रुपये किलो दर मिळतो. प्रक्रिया पदार्थांचा तयार केला ब्रॅंड ः फेब्रुवारी महिन्यात गटातील महिला सांडगी मिरची तयार करतात. त्यानंतर मार्च, एप्रिल, मे, जून या कालावधीत आंबा, फणसापासून विविध पदार्थ बनवले जातात. पदार्थ विक्रीसाठी गटाने ‘कोकणरत्न’ ब्रॅंड तयार केला आहे. सर्व पदार्थ गटातील महिला एकत्र येऊन बनवितात. पदार्थ निर्मितीसाठी ज्या महिला काम करतात, त्यांना त्याचा मोबदला दिला जातो. दर महिन्याला गटाची बैठक होते. त्यावेळी प्रत्येक महिलेला कामानुसार पैसे दिले जातात. बचत गटाने तयार केलेल्या पदार्थांचा दर्जा चांगला राहावा यासाठी महिला विशेष काळजी घेतात. गटाने तयार केलेले पदार्थ प्रयोगशाळेत तपासून घेतले जातात. पॅकिंगवर तपासलेल्या नमुन्यांचा उल्लेख असतो. त्यामुळेच नवलाई बचत गटाने दिल्ली बाजारपेठेत वेगळी ओळख तयार केली. परगावी भरणाऱ्या प्रदर्शनात उत्पादनांच्या विक्रीची जबाबदारी श्वेता शिंदे आणि स्वाती यांनी घेतली आहे. असा आहे गट ः

  • गटामध्ये तेरा महिलांचा सहभाग.
  • हंगामानुसार विविध भाजीपाला लागवड.
  • कोकम सरबत, आंबा पोळी, फणस गरे, सांडगी मिरची उत्पादन.
  • रत्नागिरी, मुंबई, ठाणे, गणपतीपुळे बाजारपेठांमध्ये वर्षभर विक्री.
  • वर्षाला सरासरी साठ हजारांपर्यंत उलाढाल.
  • राजमाता जिजाऊ स्वावलंबन जिल्हास्तरीय पुरस्कार, लायन्स क्लबतर्फे सन्मान.
  • संपर्क ः १) श्‍वेता शिंदे, ८००७०८८०९७, २) स्वाती शिंदे, ८६९८१००६८९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com