नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
कृषिपूरक
जनावरांच्या कातडी आजारांवरील उपचार
कातडीच्या आजारामुळे त्वचेवरील जखमा व वेदना यामुळे जनावरांच्या वाढीवर व उत्पादनावरही परिणाम होतो.
जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार होत असतात. यामध्ये संसर्गजन्य आजार, कमतरतेचे चयापचयाचे आजार, कातडीचे आजार इत्यादीचा प्रामुख्याने समावेश होतो. कातडीच्या आजारामुळे त्वचेवरील जखमा व वेदना यामुळे जनावरांच्या वाढीवर व उत्पादनावरही परिणाम होतो.
कातडीच्या आजारामुळे होणारे दुष्परिणाम
१. जनावर बेचैन राहते.
२. चारा खाण्यावरील लक्ष कमी होऊन कुपोषण होते.
३. कातडी खाजवण्यासाठी भिंत, झाड, जमिनीला शरीर घासते. यामुळे कातडीवर जखमा होतात.
४. आजारामुळे कातडीवर फोड येतात. त्यामुळे जनावर खूप विचित्र दिसते.
५. कातडीवर पुरळ येऊन ते फुटतात. त्याचे जखमांत रूपांतर होते.
६. काही ठरावीक भागांवरील केस जातात, त्वचेला खाज सुटते.
७. कासेवर फोड, पुरळ आले तर या ठिकाणच्या जखमा लवकर कमी होत नाहीत. जनावरांचे शरीर अशक्त दिसते.
८. जनावरांचे बाजारमूल्य कमी होते.
९. शारीरिक वाढ, उत्पादनात घट होते.
१०. जनावर शांत राहत नाही, व्यवस्थित पान्हा सोडत नाही.
११. कातडीवरील जखमांकडे दुर्लक्ष झाल्यास त्या ठिकाणी आसाडी पडून जखमेत आळ्या तयार होतात. जखम खोलवर वाढत जाते.
उपाययोजना ः
१. जनावरांना संतुलित आहार द्यावा.
२. आहारात क्षारमिश्रणाचा वापर गरजेनुसार करावा.
३. जनावरांचे बाह्यपरोपजीवी उदा. गोचिड, पिसवा, उवा इ. पासून संरक्षण करावे.
४. गोठा व गोठ्या भोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा. यामुळे कीटक, डास, माश्या यांचा प्रादुर्भाव कमी होऊन कातडीचे आजार कमी होतात.
५. गोठ्यात भोवताली माश्या, डास यांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर नीम तेल, करंजी तेल अर्क वेळोवेळी फवारणी करावी. गोठ्यात धूर करावा. सभोवताली पाणी साठत असेल असे खड्डे बुजवून घ्यावेत. साठलेल्या पाण्यावर रॉकेल किंवा थोडे तेल टाकल्यास माश्या, डास यांची संख्या वाढत नाही. साठलेल्या पाण्यात अझोला वनस्पती सोडावी. यामुळेही डास, माश्या यांची उत्पत्ती कमी होते.
६. जनावरांना नियमित खरारा करावा.
७. मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा.
८. ज्या जनावरांना कातडीचा आजार झाला आहे, त्यांना तत्काळ वेगळे करून उपचार करावेत. इतर जनावरात मिसळू नये.
९. कातडीवर थोड्या प्रमाणात पुरळ, फोड असतील त्या वेळीच तत्काळ उपचार करून घ्यावेत.
१०. जनावर नियमित स्वच्छ राहतील याची दक्षता घ्यावी.
११. ज्या जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचा अभाव आहे त्यांना जीवनसत्त्व ‘अ’ ‘ई’ व सेलेनियम पुरवठा करावा.
१२. संसर्गजन्य आजारांचे वेळीच लसीकरण करून घ्यावे. कारण बऱ्याच संसर्गजन्य आजारामुळे त्वचेवर, कातडीवर पुरळ फोड येतात.
१३. जनावरांचे गरजेनुसार जंतनिर्मूलन करावे. यामुळेही प्रत्यक्ष त्वचा आजार तसेच क्षार व जीवनसत्त्वांच्या अभावामुळे उद्भवणारे त्वचेच्या समस्या टाळता येतात.
१४. जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले राहण्यासाठी प्रयत्न करावेत.
१५. जनावरांना बसण्यासाठी मऊ व सपाट जागा असावी.
संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील,७५८८०६२५५६
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर, महाराष्ट्र )