हळद पिकातील महिलांच्या कामांसाठी सुधारित अवजारे 

हळद पिकातील महिलांच्या कामांसाठी सुधारित अवजारे 
हळद पिकातील महिलांच्या कामांसाठी सुधारित अवजारे 

हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील महिलांचे कष्ट व ताण कमी करणारी साधने विकसित केली आहेत. या सुधारित अवजारांमुळे १० ते ३३ टक्क्यांपर्यंत काम वेगाने होते.  हळद पिकाचा कालावधी ९ ते १० महिन्यांचा असून, काढणीपश्चात प्रक्रियेचा कालावधी धरला तर वर्षभराचे पीक ठरते. कष्टाच्या दृष्टीने हे जिकिरीचे पीक ठरते. लागवडीपासून काढणीपश्चात सर्व कामांमध्ये महिला व पुरुष कामगारांचा सहभाग असतो. त्यातील काही कामे केवळ पुरुष, तर काही कामे केवळ महिलांची मानली जातात. काही कामांमध्ये दोघांचाही सहभाग दिसून येतो.  अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत हळद पीक उत्पादन पद्धतीचा अभ्यास केला गेला. त्यात सर्वेक्षणाद्वारे महिला व पुरुषांच्या कामांची वर्गवारी करताना त्यात वापरल्या जाणाऱ्या सुधारित अवजारांचा वापरही विचारात घेतला. त्यात महिला पार पाडत असलेल्या कामांसाठी सुधारित साधनेच बाजारात उपलब्ध नसल्याचे दिसून आले. हे लक्षात येताच हळद पिकामध्ये काम करण्यामध्ये सुलभता येण्यासाठी अवजारांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.  महिलांसाठी विकसित सुधारित साधने ः  १) काडी-कचरा वेचणे : हे शेत तयार करण्याच्या आधी म्हणजेच मे-जून दरम्यान केले जाणारे काम. हे काम भरउन्हात पूर्णपणे वाकून महिलांना करावे लागते. यासाठी बाजारात विविध प्रकारचे दाताळे उपलब्ध आहेत. या दाताळ्यांच्या वापरामुळे महिलांचे काडी-कचरा वेचण्यातील कष्ट कमी होतात. शारीरिक स्थिती सुधारल्याने काम जलद गतीने होते. हात सुरक्षित राहतात.  २) हळद कंद लागवड : गादीवाफ्यावर हळदीचे कंद लावण्यासाठी महिलांना उकिडवे बसून, हाताच्या बोटांनी माती उकरून कंद लावावा लागतो. त्यानंतर त्यावर माती झाकली जाते. सातत्याने माती उकरावी लागत असल्याने बोटांना जखमा होतात. काही महिला या कामासाठी खुरप्याचा वापर करतात. मात्र, खुरप्यामुळे कामाचा वेग मंदावतो. या कामासाठी प्रकल्पांतर्गत माती उकरण्याची साधने म्हणजेच उकरी व नखाळ्या ही साधने तयार केली. या उकरीमुळे माती जलद गतीने उकरता येते. हळद लागवडीचे काम (२६ टक्के) जलद होते. नखाळ्यांचा संच बोटात घालून लागवड केल्यास १३ टक्के काम अधिक होते. सुधारित पद्धतीमुळे महिलांना जाणवणारा थकवाही २३ टक्क्यांनी कमी झालेला आढळला.  ३) तण काढणे : हळदीतील तण काढण्याचे काम पूर्णपणे महिलाच करतात. हे काम करताना अवघडून बसावे लागत असल्याने शरीरामध्ये ताण येतो. पारंपरिक खुरप्याने तण काढणेही अवघड जाते. यासाठी नवीन खुरपे विकसित केले आहे. त्याचा वापर हळद पिकातील तण काढण्यासाठी केला असता पारंपरिक खुरप्यापेक्षा ९ टक्के काम अधिक होते. म्हणजेच कामाचा वेग वाढतो.  ४) हळदीच्या रोपांच्या मुळांना माती लावणे : हे अन्य पिकांमध्ये फारसे न आढळणारे काम बहुतांश ठिकाणी महिला करतात. काही ठिकाणी पुरुषही करतात. मात्र, दोघांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये तफावत दिसून येते. पुरुष हळदीच्या मुळांना माती लावण्याचे काम खोऱ्यांद्वारे करतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे खोरे बाजारात उपलब्ध आहे. परिणामी पुरुषांना उभे राहून माती लावणे सहज शक्य होते. मात्र, हे खोरे वजनदार असल्याने महिलांसाठी उपयुक्त नाही.  महिला उकिडवे बसून हळदीच्या मुळांना माती लावतात, त्यासाठी हाताने किंवा काही महिला तुटलेल्या पाइपचा तुकडा, स्टीलची थाळी यांचा वापर करतात. मात्र, या कामामध्येही हाताला जखमा होतात. यासाठी प्रकल्पांतर्गत माती लावण्याचे साधन सावडी तयार केले आहे. या साधनाला लाकडी मूठ असून, त्यावर हाताची पकड चांगली बसते. या साधनाच्या वापरामुळे महिलांच्या हाताला होणाऱ्या जखमा कमी झाल्या. काम करण्याचा वेग वाढला. सावडी वापरून माती लावण्याचे काम केल्यामुळे (दर तासाला) २२ टक्के काम जास्त झाले. या कामामुळे महिलांना जाणवणारा थकवा लक्षणीयरीत्या म्हणजेच ३३ टक्क्यांनी कमी झाला.  ५) खत देणे : सामान्यतः सरी पद्धतीच्या हळद लागवडीमध्ये बैलाच्या साहाय्याने खत देता येते. मात्र, गादी वाफ्यावर हळद लागवडीत हातानेच खत पेरावे लागते. या खत पेरणीच्या कामामध्ये ३ व्यक्ती सहभागी होतात. एका गादी वाफ्यावर लावलेल्या दोन ओळींमध्ये खत दिले तर ते थेट मुळांपर्यंत पोचते. एक महिला दोन रोपांच्या मधोमध पारंपरिक खुरपे किंवा हाताने माती उकरते. नंतर एक महिला बादलीमध्ये खत घेऊन हाताने वाकून खत टाकते, तर एक महिला त्यावर माती टाकून बुजवते. या कामामध्ये माती उकरताना महिलांच्या बोटांची कातडी निघते, तसेच नखांनादेखील दुखापत होते. जेव्हा हेच काम उकरीद्वारे केले तेव्हा हात सुरक्षित राहून काम जलद झाले. खत पेरताना बादलीमध्ये त्या महिला ७-८ किलो खत घेऊन पिकामध्ये खत पेरत होत्या. प्रत्येक वेळी बकेट उचलावी लागे. हे टाळण्यासाठी खत नेण्यासाठी सुलभा बॅग दिली. परिणामी त्यांचे दोन्ही हात मोकळे राहू लागले. खत पेरणीचे कामदेखील २३ टक्क्यांनी जास्त झाले. महिलांना जाणवणारा थकवादेखील २३ टक्क्यांनी कमी झाला. म्हणून उकरी व सुलभा बॅगचा वापर करून खत देणे फायदेशीर ठरते. सरी पद्धतीतही खत देताना सुलभा बॅग उपयुक्त आहेत.  ६) हळद काढणी : शेतकरी बैल व नांगराच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरद्वारे एक-एक सरी/गादी वाफ्यामधून नांगर फिरवतो. जमिनीमध्ये वाढलेली हळद उघडी पडते. नंतर महिला हळदीचा प्रत्येक गड्डा हाताने फोडून त्यातील माती काढून टाकते. हाताने नवीन आलेले हळदीचे कंद व लागवडीसाठी तयार होणारे कंद/बंडा (जेठा गड्डा) व कोचा मातृकंद वेगळा करतात. हे सर्व काम महिला बोटांच्या साह्याने करतात. सततच्या घर्षणामुळे महिलांच्या बोटांची कातडी निघते. बोटे हुळहुळी होतात. काही महिला या कामासाठी लोकरी मोजे वापरतात. मात्र, हे मोजे एक दिवसात फाटतात. या कामासाठी प्रकल्पांतर्गत विकसित केलेले सोयाबिन हातमोजे वापरले असता महिलांचे हात सुरक्षित झाले. प्रतिमहिला २० टक्के काम जास्त झाले. महिलांना जाणवणारा थकवाही लक्षणीयरीत्या (म्हणजेच २६ टक्क्यांनी) कमी झाला.  ७) हळद वाळवणे : हळद वेगळी काढल्यानंतर ही हळद कूकरमध्ये शिजवून नंतर वाळवली जाते. (हळद वाळवण्यासाठी साडी किंवा हिरवी जाळी वापरली जाते). हळद शिजवल्यामुळे खूप गरम असते, त्यामुळे पहिले २४ तास तसेच ढीग ठेवून नंतर पसरवतात. शिजवलेली हळद थंड होण्यासाठी २-३ दिवस लागतात. हळद चांगली वाळावी म्हणून दररोज खाली-वर करावी लागते. हे काम महिला हातानेच करतात. हळद जसजशी टणक होत जाते, तशी ती हाताला टोचते. हाताचे कातडे निघून आग होते. या कामासाठी मजूर मिळणेदेखील कठीण आहे. हळद खाली- वर करण्यासाठी प्रकल्पांतर्गत लाकडी दाताळे विकसित केले गेले. या दाताळ्याचा वापर करून हळद खाली- वर करणे अत्यंत सोपे जाते. कामाची गती प्रतिक्विंटल १० टक्क्याने वाढते. या कामासाठी मजूरदेखील कमी लागतात.  हळद लागवड ते काढणी दरम्यान महिलांद्वारे केल्या जाणाऱ्या कामांतील कष्ट कमी करण्याचा प्रयत्न या प्रकल्पामध्ये केला आहे. कामाचा वेग वाढण्यासोबतच पारंपरिक पद्धतीमुळे होणाऱ्या इजा यातून टाळल्या जातात, काम सोपे होते. तेव्हा महिलांनी या नव्या सुधारित ७ अवजारांचा वापर आपल्या कामामध्ये करणे आवश्यक आहे.  डॉ. जयश्री प्र. झेंड (वरिष्ठ संशोधिका), ९४२३४४४८१९  (अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प - कौटुंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com