मधमाश्यांना वाचविण्यासाठी कुरण पट्टे फायद्याचे

मधमाश्यांना वाचविण्यासाठी कुरण पट्टे फायद्याचे
मधमाश्यांना वाचविण्यासाठी कुरण पट्टे फायद्याचे

एकसलग एक पीक पद्धतीच्या शेतीमुळे मधमाश्यांसाठी हंगामानंतर खाद्याची चणचण भासू शकते. विशेषतः हिवाळ्यामध्ये मधमाश्यांसाठी ताणाची स्थिती राहते. त्यावर मात करण्यासाठी अशा शेतीक्षेत्रामध्ये काही एकराचे कुरण पट्टे अत्यंत फायद्याचे ठरू शकतात, असे आयोवा विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनात दिसून आले आहे. हे संशोधन ‘प्रोसिडिंग्स ऑफ दी नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मधमाश्या वाचविण्यासाठी संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध दृष्टिकोनातून त्यांचा अभ्यास केला जात आहे. जेव्हा या माश्यांनी आपल्या वसाहती आजपासच्या गवताळ कुरणांमध्ये विशेषतः उशिरा फुले येणाऱ्या वनस्पतींच्या भागांमध्ये केल्या, तेव्हा उलट त्यांच्याकडे अधिक मध साठवण झाली. यापूर्वीच्या काही अभ्यासामध्ये अन्य प्रदेशाच्या तुलनेमध्ये शेतीक्षेत्रामध्ये मधमाश्‍यांची स्थिती अधिक चांगली असल्याचे मांडण्यात आले होते. मात्र, या अभ्यासातून वेगळीच बाब पुढे आली. आयोवा राज्य विद्यापीठातील प्रो. अॅमी टॉथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते मधमाश्यांची उत्क्रांती इतक्या सरळ पद्धतीने झालेली नाही. एखाद्या उन्हाळ्यामध्ये मधमाश्यांनी चांगल्या प्रकारे तग धरला तरी एकूण वर्षामध्ये त्यांच्यासाठी काही बाबी हानिकारक ठरू शकतात. संशोधकांनी मधमाश्यांच्या पेट्या जेव्हा सोयाबीनच्या शेतीजवळ ठेवून, त्यांच्या एकूण हालचालीचा मागोवा घेतला असता अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. मधमाश्यांच्या वजनामध्ये वाढ झाली, त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये मधाची साठवण केली आणि चांगल्या प्रकारे तग धरला. मात्र, ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळामध्ये मधमाश्यांकडून त्यांचा मध आणि परागाचा साठा संपूर्णपणे वापरला गेल्यानंतर त्यांची उपासमार सुरू झाली. त्यांच्या शरीरावर कुपोषणाच्या खुणा जाणवू लागल्या. कारण अगदी सोपे होते- अन्नाची कमतरता. आयोवा राज्य विद्यापीठातील परिस्थितीकी, उत्क्रांती आणि सजीव जीवशास्त्र विषयाचे प्रो. अॅमी टॉथ यांनी सांगितले, की एकाच ठिकाणी हंगामानुसार मधमाश्यांच्या खाद्याची चंगळ ते दुष्काळी स्थिती यांचा अनुभव मिळाला. वास्तविक अधिक कृषी क्षेत्र असलेल्या ठिकाणच्या मधमाशी पोळ्यांना कमी सोयाबीन उत्पादन असलेल्या पोळ्यांच्या तुलनेमध्ये अधिक स्पर्धा करावी लागली. संशोधक अॅडम डोलेझाल यांनी सांगितले, की मधमाश्‍या मानवाने केलेल्या शेतीला कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात, हे पाहणे कुतूहलजनक आहे. एकसलग पिके, कीडनाशकांचा वापर, फुलोऱ्याच्या स्थितीची कमतरता अशा अनेक अडचणींमध्ये मधमाश्‍यांना काम करावे लागते. एक गृहितक असेही आहे, की कृषी क्षेत्राच्या जवळ असलेल्या मधमाश्‍यांना फुलोऱ्यातील पिकांसोबतच तणांपासून फुलांचे प्रमाण कमी असलेल्या जंगलाच्या तुलनेमध्ये अन्नाची मोठी उपलब्धता होते. या गृहितकाचा मागोवा घेताना मधमाश्‍या कोणत्या वनस्पतीवर अवलंबून राहतात, याचा विचार करण्यात आला. त्यासाठी मधमाश्यांनी गोळा केलेल्या परागाचे विश्लेषण केले असता आश्चर्याची गोष्टी म्हणजे सुमारे ६० टक्के पराग हे क्लोव्हरचे होते, सोयाबीनचे नव्हते. शेती क्षेत्रामध्ये कुरणाचे पट्टे उपयुक्त ः सामान्यतः शेतीचे बांध आणि रिकामे परिसर हे शेतकऱ्यांकडून तणविरहीत किंवा स्वच्छ ठेवले जातात. अशा ठिकाणी उगवणारी क्लोव्हरसारखी तणे माणसांच्या दृष्टीने महत्त्वाची नसली तरी मधमाश्यांसाठी महत्त्वाची ठरत असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. ही तणे जुलैमध्ये उशिरा किंवा ऑगस्टच्या पूर्वार्धामध्ये फुलोऱ्यावर येतात. ऑगस्टच्या अखेरीस मधमाश्यांसाठी अन्नाच्या पुरवठ्यामध्ये कमतरता भासू लागते. या काळामध्ये व त्यानंतर फुलोऱ्यावर येणाऱ्या लहान मोठ्या कुरणांची व्यवस्था शेती परिसरामध्ये करता आली तर फायदा होऊ शकतो. अर्थात, अद्याप संशोधकांनी मधमाशीपालकांना त्यांच्या पेट्या इतरत्र फिरवण्याची शिफारस केलेली नाही. कारण ते अवघड, वेळखाऊ आहे. त्याचप्रमाणे मधमाश्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा कुरणाची उपलब्धताही महत्त्वाची आहे. त्याऐवजी मोठ्या कृषी क्षेत्रासाठी पाच ते आठ एकर क्षेत्रामध्ये गवताची वाढ अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. या कुरण पट्ट्यामुळे मातीची धूपही थांबेल. पाण्यासोबत निचरा होऊन जाणारी अन्नद्रव्येही रोखली जातील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com