शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
कृषिपूरक
शाश्वत भविष्यासाठी मृदा संवर्धनाकडे लक्ष आवश्यक
मृदा दिन या संकल्पनेचे एक प्रमुख उद्गाते व थायलंडचे राजे भूमिबोलल अद्दुल्यदेज यांच्या जयंतीचा दिवस (५ डिसेंबर) हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो.
मृदा दिन या संकल्पनेचे एक प्रमुख उद्गाते व थायलंडचे राजे भूमिबोलल अद्दुल्यदेज यांच्या जयंतीचा दिवस (५ डिसेंबर) हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मृदाशास्त्र संघाच्या वतीने (आययूएसएस) २००२ मध्ये शिफारस केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जागतिक कृषी संघटनेद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
प्रत्येक सजीवाच्या आहारासाठी कृषी उत्पादन महत्त्वाचे असून, त्याचा मुख्य आधार हा माती आहे. गेल्या अर्ध शतकापासून रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर, चुकीच्या सिंचन पद्धती, भूसुधारकांचा अशास्त्रीय पद्धतीने वापर यामुळे मृदेचा ऱ्हास वाढत चालला आहे. त्यातून जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. जमिनीचे आरोग्य म्हणजे मातीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म चांगले असणे गरजेचे आहे. त्यातूनच अन्नधान्य सुरक्षा आणि एकूणच प्राणिमात्रांचे आरोग्य जपण्यास मदत होईल. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वेगाने घटत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून केवळ पिकांच्या उत्पादकतेच्या आशेने रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जात आहे. जमिनीवरील सुपीक थर तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. तो जपण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजेच मृदा संवर्धनाचे उपाय राबवणे गरजेचे आहे.
पिकांची फेरपालट व पीक अवशेषांचा वापर
एकाच जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतल्यास जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते. फेरपालटीमुळे तणे, किडी, व रोगांचे तीव्रता कमी होते. जमिनीची धूप थांबवते. नत्राचे स्थिरीकरण होते. शेतामध्ये उरलेल्या पीक अवशेषांचा आच्छादन यांचा कोरडवाहू पिकामध्ये वापर केल्यास ओलावा टिकवून ठेवला जातो. फळबागेत आच्छादनाचा वापर केल्यास तापमान नियंत्रित राहण्यासोबतच तणांच्या प्रादुर्भावाला आळा बसतो. सेंद्रिय आच्छादनाच्या विघटनानंतर त्याचे सेंद्रिय कर्बात रूपांतर होते. ते उपयुक्त सूक्ष्मजीवांसाठी खाद्य म्हणून उपयुक्त ठरते. त्याच प्रमाणे शेतात येणारी अनावश्यक तणे फुले येण्यापूर्वी उपटून जमिनीत गाडल्यास सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
खतांचा संतुलित वापर
रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर दूरगामी विपरीत परिणाम होतात.माती परीक्षणानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. रासायनिक खतांबरोबरच जैविक खतांचा (उदा. कडधान्य पिकांसाठी रायझोबिअम, तृणधान्य पिकांमध्ये ॲझोटोबॅक्टर) वापर करावा. विविध सहजिवी उपयुक्त घटकांचा वापर बीजप्रक्रीयेद्वारे किंवा शेणखत स्लरीतून करावा.
हिरवळीच्या खतांचा वापर
समस्याप्रधान जमिनींमध्ये दोन किंवा तीन वर्षातून किमान एकदा ताग किंवा धैंचा यासारखी हिरवळीची पिके घ्यावीत. ती जमिनीत फुले लागणीच्या वेळी गाडावीत. त्यातून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन
सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेला बळकट करणारा महत्त्वाचा घटक आहे. तोच जागतिक हवामान बदलाला बळी पडणारा मृदेतील सर्वांत संवेदनशील घटकही आहे. त्यासाठी उत्तर प्रकारे कुजलेल्या शेणखताचा पुरवठा जमिनीला केला पाहिजे. मात्र, शेणखताचा अपुरा पुरवठा असलेल्या शेतकऱ्यांनी दर दोन ते तीन वर्षातून किमान एकदा हिरवळीचे पीक घेऊन ते जमिनीत गाडावे. उदा. धैंचा, ताग, चवळी इ.
रासायनिक खतांबरोबर निंबोळी किंवा करंज पेंडीचा (५:१ प्रमाण) वापर करावा. यामुळे अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होऊन सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल. शेतातील तणे फुले येण्यापूर्वी जमिनीत जागेवर टाकावीत, ती कुजल्यानंतर मातीत सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. पिकांच्या अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर केल्यास ओलावा व्यवस्थापनाबरोबर अवशेष कुजल्यानंतर सेंद्रिय कर्बात वाढ होते.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा कमतरतेनुसार वापर
महाराष्ट्रातील जमिनींमध्ये प्रामुख्याने जस्त (३९ टक्के) व लोह (२३ टक्के) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते. जमिनीत माती परिक्षणानुसार जस्त ०.६ पीपीएम पेक्षा कमी असल्यास तसेच लोह ४.५ पीपीएम पेक्षा कमी असल्यास ती कमतरता समजावी. ही कमतरता विशेषतः जास्त विम्ल प्रकारचा सामू (८.५ पेक्षा जास्त), जास्त क्षारता (०.५ डेसी सायमनपेक्षा जास्त), चुनखडीयुक्त (मुक्त चुना १० टक्केपेक्षा जास्त) व कमी सेंद्रिय कर्ब (०.४० टक्केपेक्षा कमी) असलेल्या जमिनींमध्ये दिसून येते. यामुळे विविध पिकांवर कमतरतेची लक्षणे दिसून पिकाच्या उत्पादन आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज ही अत्यंत कमी असली तरी पिकांच्या एकूण वाढीमध्ये व उत्पादनात अनन्यसाधारण महत्त्वाची आहेत. ही अन्नद्रव्ये पिकांमधील अनेक मूलभूत प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. (उदा. वनस्पतीत उत्प्रेरक, संप्रेरक निर्मितीचे कार्य, हरितद्रव्य निर्मिती, फूल व फळधारणेस मदत आणि प्रथिने तयार करणे इ.) अशा सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकास पुरवलेल्या अन्य मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
सिंचनाचे योग्य व्यवस्थापन
सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचेही परिक्षण करून घ्यावे. पाणी हे केवळ पिकाच्या वाढीशी संबंधित नसून, त्याचे दृश्य अदृश्य परिणाम हे जमिनीच्या रासायनिक तसेच भौतिक गुणधर्मांवर पडतात. गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यामध्ये व भारी काळ्या जमिनीत क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन ही मोठी समस्या ठरत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी पुढील उपाययोजना कराव्यात.
जर पाण्याचा सामू ८.० पेक्षा कमी असेल व क्षारता १.० डेसी सायमन पेक्षा कमी असल्यास ठिबकद्वारे सिंचनाची व्यवस्था करावी.
पाण्यात मध्यम प्रमाणात क्षार असतील व चुनखडी कमी असेल, तर पाणी जिप्समच्या पिशवीतून प्रवाहित करावे.
जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर करावा.
पिकाच्या गरजेनुसार व योग्य प्रमाणात ओलित करावे.
पिकांची फेरपालट करावी.
आच्छादकांचा वापर करावा. उदा. पिकांचे अवशेष किंवा उसाचे पाचट, पॉलिथिन पेपर इ.
पिकांची लागवड सरी वरंब्याच्या बगलेत करावी म्हणजे क्षारयुक्त पाण्याचा पिकाशी थेट संपर्क येणार नाही.
अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य अंतरावर चर खणावेत.
क्षारयुक्त पाण्याबरोबर गोडे पाणी उपलब्ध असल्यास आलटून पालटून दोन्ही प्रकारचे पाणी वापरावे.
पाणी अल्कधर्मी असल्यास शिफारशीपेक्षा २५ टक्के अधिक नत्र द्यावे.
क्षारांचा ताण सहन करणारी पिके घ्यावीत. (उदा. गहू, कापूस, बार्ली (सातू), करडई, सूर्यफूल, शर्कराकंद, पालक इ.) हेक्टरी बियाण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढवावे.
काटेकोर शेती तंत्रज्ञानाचा वापर व संरक्षित शेती
बिगर हंगामी पिके शेडनेट किंवा हरितगृहात घेणे.
ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा पीक वाढीच्या अवस्थेनुसार काटेकोर वापर करणे. विशेषतः कोरडवाहू भागात कमीत कमी मशागत करावी. त्यामुळे मृदेची धूप थांबवून, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे शक्य
होते.
जमिनीची खोली व पिकांचे व्यवस्थापन
फळझाडांचे उत्पादित आयुष्य हे प्रामुख्याने जमिनीच्या खोलीवर अवलंबून असते, त्यामुळे फळबाग लागवडीसाठी जमिनीची योग्य निवड करावी. फळबाग लागवडीसाठी मध्यम ते खोल, चांगल्या निचऱ्याची, तर अन्य हंगामी पिकांसाठी मध्यम ते हलक्या जमिनीची निवड करावी. निवड करताना जमिनीच्या सर्व थरांमध्ये मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असावे.
समस्याप्रधान जमिनींचे व्यवस्थापन
जमीन चोपण असेल (सामू ८.५ पेक्षा जास्त, क्षारता १.५० डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा कमी आणि विनिमयक्षम सोडिअम १५ टक्क्यांपेक्षा जास्त) तर माती परिक्षणानुसार शिफारशीत जिप्सम मात्रा शेणखतात मिसळून किंवा हिरवळीची खते गाडताना द्यावी.
जमीन चुनखडीयुक्त असेल (सामू ८.० पेक्षा जास्त, मुक्त चुनखडी १० टक्केपेक्षा जास्त) तर साखर कारखान्याची मळी, कंपोस्ट एकरी १ ते २ टनांपर्यंत पाच वर्षांतून एक वेळा वापरावी. तसेच स्फुरद उपलब्धता वाढविण्यासाठी प्रोम (PROM) खत वापरावे. यामध्ये एकूण स्फुरदाचे प्रमाण १० टक्के असते किंवा बोनमिल (हाडाचे खत - स्फुरद २१ टक्के) याचाही वापर करता येईल.
क्षारयुक्त जमिनीमध्ये (सामू ८.५ पेक्षा कमी, क्षारता १.५० डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त आणि विनिमय सोडिअम १५ टक्केपेक्षा कमी) अतिरिक्त पाण्याबरोबर क्षारांचा निचरा होण्यासाठी निचऱ्याची व्यवस्था करावी. जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा (शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत, प्रोम खत इ.) वापर करावा.
आम्ल जमिनीमध्ये (कोकणातील -सामू ६.५ पेक्षा कमी, क्षारता ०.२५ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी, चुनखडीचे प्रमाण नसते) शेणखतात लाइम सामूनुसार मिसळून सुधारणा करून घ्यावी. स्फुरद उपलब्धतेसाठी रॉक फॉस्फेटचाही वापर करता येतो. पालाशसाठी शेणखतात आठवडाभर मुरवून बायोचारचा वापर केल्यास सामू वाढविण्यास मदत होते. अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. तसेच या बायोचारचा उपयोग फळझाडांसाठी केल्यास जमिनीत कर्ब, सूक्ष्मजीवांचे प्रमाणही वाढते.
सर्वसाधारण हलक्या जमिनीत सेंद्रिय भरखते, जोरखते, शहरी खत, गांडूळखत अशा सेंद्रिय खतात झिओलाइटसारखी खनिज वापरता येतात. त्यातून सिलिकॉन व पालाशसारखी अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
: शुभम दुरगुडे, ९४२०००७७३२,
डॉ. अनिल दुरगुडे, ९४२०००७७३१
(शुभम दुरगुडे हे जी.बी.पंत. कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, पंतनगर, उत्तराखंड येथे मृदविज्ञान आचार्य पदवीचे विद्यार्थी असून, डॉ. अनिल दुरगुडे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.
- 1 of 33
- ››