माती परीक्षणानुसार करा खतांचे नियोजन

माती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. आगामी खरीप हंगामात आपल्या स्वतःच्या जमिनीतील माती नमुन्याचे परीक्षण करून घ्यावे. त्यानुसार खताचे किंवा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन पिकात करणे गरजेचे आहे.
माती परीक्षणानुसार करा खतांचे नियोजन
माती परीक्षणानुसार करा खतांचे नियोजन

माती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. आगामी खरीप हंगामात आपल्या स्वतःच्या जमिनीतील माती नमुन्याचे परीक्षण करून घ्यावे. त्यानुसार खताचे किंवा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन पिकात करणे गरजेचे आहे. माती परीक्षण म्हणजे काय? आपल्या स्वतःच्या शेत जमिनीतील पीक पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी प्रातिनिधिक माती नमुना काढून प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून घेणे म्हणजे माती परीक्षण होय. यात प्रामुख्याने मातीतील मुख्य अन्नद्रव्ये (नत्र, स्फुरद व पालाश ), दुय्यम अन्नद्रव्ये (कॅल्शिअम मॅग्नेशिअम व गंधक ) तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये (लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम इ.) यांचे प्रमाण तपासले जाते. त्याच प्रमाणे जमिनीच्या भौतिक व जैविक गुणधर्मासोबत जमिनीचा सामू, विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब इ. बाबी ची सुद्धा तपासणी होते. माती परीक्षणामुळे होणारे फायदे : (१) जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या आधारे पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात रासायनिक खते देणे शक्य होते. अनावश्यक खताचा वापर कमी होऊन खर्चात बचत होते. (२) जमिनीची नेमकी सुपीकता, उपलब्ध असलेले जमिनीतील क्षार, सेंद्रिय कर्ब, सामू इ. बाबीची माहिती मिळते. त्यातून जमिनीच्या नेमक्या समस्या जाणून वेळीच उपाययोजना करता येतात. (३) जमिनीतील काही घटकाच्या उपलब्धतेनुसार किंवा माती परीक्षण अहवालाच्या आधारावर पिकाचे योग्य नियोजन करता येते. उदा. जमिनीत १० टक्क्यापेक्षा अधिक चुनखडीचे प्रमाण जमिनीत आढळल्यास संत्रावर्गीय पिके न घेण्याचा सल्ला दिला जातो. नमुना केव्हा घ्यावा? (१) मातीचा नमुना वर्षभर केव्हाही आवश्यक असेल तेव्हा घेता येतो. मात्र, सर्वसाधारण पिकाकरिता रब्बी पिकाची काढणी झाल्यानंतर उन्हाळ्यात किंवा खरिपासाठी शेणखत टाकण्यापूर्वी जमिनीतून मातीचा नमुना काढणे योग्य ठरते. (२) जमिनीवर पीक उभे असताना मातीचा नमुना घ्यावयाचा असेल तर खते दिल्यानंतर दोन महिन्यांनी मातीचा नमुना पिकाच्या दोन ओळीमधून घ्यावा. असा मातीचा नमुना घेणे टाळावे (१) नुकतेच खत टाकलेल्या जमिनी, खोलगट भाग, पाणथळ जागा, झाडाखालील जमीन, बांधाजवळील जागा, शेणखताच्या ढिगाऱ्याजवळील जागा, शेतातील बांधकामाजवळचा परिसर, कंपोस्ट खताच्या जवळपासची जागा अशा ठिकाणातून मातीचा नमुना घेऊ नये. (२) कोणत्याही परिस्थितीत पिकांना दिलेल्या खताच्या मात्रेनंतर लगेच मातीचा नमुना घेऊ नये. (३) पिकाची नांगरणी केल्यानंतर नमुना घेणे टाळावे. सर्वसाधारण पिकासाठी मातीचा नमुना असा घ्यावा (१) प्रथम आपल्या शेताची पाहणी करून जमिनीचे वेगवेगळे किती प्रकार पडतात, ते निश्चित करावे. उदा. हलकी, भारी, मध्यम या प्रकारच्या वेगवेगळ्या जमिनीकरिता स्वतंत्र वेगळा नमुना घ्यावा. (२) नमुना घ्यावयाच्या शेतात जमिनीचे चार कोपरे सोडून, झाडाखालचा भाग सोडून, जनावरे बांधत असलेला भाग सोडावेत. शेताचा अंतर्गत भाग समाविष्ट होईल, अशा प्रकारे शेताचे काल्पनिक आठ ते दहा भाग पाडावेत. ३) प्रत्येक भागात जागेवरील काडीकचरा बाजूला करून सर्वसाधारण पिकाकरिता (सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी, भात) १५ ते २० सेंटिमीटर, तर कपाशी, ऊस, केळी या पिकाकरिता ३० सेंटिमीटर खोलीपर्यंत नमुना घ्यावा. ४) साधारणतः इंग्रजी व्ही आकाराचे आठ ते दहा खड्डे तयार करावेत. या प्रत्येक खड्ड्याच्या आतल्या पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती खुरपीच्या साह्याने खरडून काढावी. प्रति खड्डा साधारणतः १०० ग्रॅम माती या प्रमाणे आठ ते दहा खड्ड्यातून सुमारे एक किलो माती गोळा होते. ५) ही माती एका स्वच्छ प्लॅस्टिकच्या कागदावर घेऊन चांगली मिसळावी. ओली असल्यास वाळवावी. नंतर या मातीचे चार समान भाग करावेत. समोरासमोरील दोन भाग काढून टाकावे. उरलेले दोन भाग एकत्र मिसळावे. ही प्रक्रिया साधारणतः अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत करा. उरलेली अंदाजे अर्धा किलो माती स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरावी. ६) या पिशवीत आपले नाव, पत्ता, संपर्क इ. माहितीपत्रक टाकावे. एक लेबल पिशवीला बांधावे. नंतर ही माती मान्यताप्राप्त मातीपरीक्षण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवावी. ७) साधारणपणे नमुना गोळा करणे व प्रयोगशाळेत पाठवणे यात दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ नसावा. फळबागेसाठी मातीचा नमुना घेताना.. . फळझाडाची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे उथळ जमिनी फळबागेसाठी अयोग्य ठरतात. फळबागेसाठी नमुना घेताना खड्ड्याच्या उभ्या छेदाप्रमाणे पहिल्या एक फुटातील, त्याच्याच खाली दुसऱ्या एक फुटातील, त्याच्या खाली तिसऱ्या एक फुटातील व त्याच्याखाली चौथ्या एक फुटातील माती वेगवेगळी गोळा करावी. असे चार फूट आतील चार नमुने एकच नमुना म्हणून मातीच्या प्रत्येक नमुन्यात लेबल टाकून व जमिनीतील खोलीचा उल्लेख करून माहिती पत्रकासह कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र किंवा शासनाच्या किंवा शासनाच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे. नमुन्यासोबत जोडायची माहिती

  • शेतकऱ्याचे नाव, पत्ता, शेत सर्वे क्रमांक.
  • मागील हंगामात घेतलेले पीक व पुढील हंगामात घ्यावयाची पिके इ.
  • माती परीक्षण अहवालातून समजणाऱ्या बाबी ः जमिनीत उपलब्ध सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, तपासलेली संबंधित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचे प्रमाण, सामू, विद्युत वाहकता इ. आपण प्रस्तावित केलेल्या पिकासंदर्भात एकात्मिक पद्धतीने खते कोणती व किती प्रमाणात द्यावी,याच्या सूचना दिलेल्या असतात. यानुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीने नियोजन केल्यास खतमात्रेत बचत होते. जमिनीची सुपीकता टिकून राहते. महत्त्वाचे

  • सर्वसाधारण पिकासाठी एकदा मातीचा नमुना तपासला की त्यामधून कोणत्या पिकाला किती प्रमाणात व कोणत्या रूपात खते द्यायची ते कळू शकते.
  • वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या मातीचा नमुना घेण्याची गरज नाही. वर सुचवलेल्या पद्धतीप्रमाणे फळ पिकाकरिता व सर्वसाधारण पिकाकरिता वेगवेगळ्या पद्धतीने नमुने घ्यावेत.
  • साधारणतः तीन ते चार वर्षानंतर पुन्हा एकदा माती परीक्षण करून घेणे चांगले.
  • डॉ. रवींद्र काळे, ७३५०२०५७४६ वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com