agriculture stories in Marathi soil water measurement techniques | Page 2 ||| Agrowon

जमिनीतील बाष्प मोजण्याच्या पद्धती

डॉ. प्रल्हाद जायभाये
शनिवार, 9 जानेवारी 2021

मुळाच्या कक्षेतील ओलावा वाफशाच्या आसपास राहणे हे हंगाम (हवामान घटक यावर), जमिनीचा प्रकार, पीक प्रकार आणि पिकाच्या वाढीची अवस्था यावर अवलंबून असते.

या पूर्वीच्या लेखांमध्ये वातावरणातील पाण्याचे मोजमाप पर्जन्य आणि सापेक्ष आर्द्रता, बाष्पदाब, दव, वनस्पतीच्या शरीरातील पाणी मोजणे (पर्णजल विभव) याची माहिती घेतली. तसेच जमीन, माती आणि वनस्पतीतील पाण्याचा ऱ्हास कसा होतो, हेही पाहिले आहे. मृदबाष्प मोजण्याविषयी समजून घेऊ.

कुठल्याही पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पिकांच्या गरजेप्रमाणे जमिनीत मुळांच्या कक्षेमध्ये ओलावा ठेवणे आवश्यक आहे. मुळांच्या कक्षेमध्ये ओलावा साधारणपणे वाफसा (फिल्ड कॅपॅसिटी) आणि मरणोक्त बिंदू (विल्टिंग पॉइंट) या दरम्यान असतो. सिंचन किंवा पावसामुळे मुळांच्या कक्षेमध्ये योग्य तो ओलावा उपलब्ध झाल्यावर दररोज पिकाच्या बाष्पोत्सर्जनाप्रमाणे (हे पिकाची वाढ आणि हवामान यावर अवलंबून असते.) तो कमी होत जातो. या काळात योग्य वेळी पाणी मिळाले नाही, तर ओलावा मरणोक्त बिंदूपर्यंत पोचतो. ही स्थिती काही काळ अशीच राहिली तर पिकाची वाढ खुंटते. पिकाचे उत्पादन कमी होते.
वाफशापासून जमिनीतील ओलावा कमी होत मरणोक्त बिंदूकडे जात असताना पिकास जमिनीतून पाणी घेण्यासाठी ताण पडतो/कष्ट पडतात. ओलावा कमी होताना या ताणामध्ये वाढ होत जाते. मुळांच्या कक्षेतील ओलाव्याचे प्रमाण वाफशाच्या जवळपास असेल, तर पिकावरील ताण कमी असतो. मात्र, ओलावा मरणोक्त बिंदूच्या जवळ असेल, तर पिकावर ताण जास्त राहून वाढ खुंटते. मुळाच्या कक्षेतील ओलावा वाफशाच्या आसपास राहणे हे हंगाम (हवामान घटक यावर), जमिनीचा प्रकार, पीक प्रकार आणि पिकाच्या वाढीची अवस्था यावर अवलंबून असते.

जमिनीतील ओलाव्याचे सिंचनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मृदबाष्पाचे मोजमाप करण्याच्या शास्त्रीय पद्धती व उपकरणे विकसित झालेली आहेत. त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन मुख्य प्रकार आहेत.
अ) प्रत्यक्ष मृदबाष्प काढण्याची पद्धती ः ही थोडीशी क्लिष्ट आणि वेळखाऊ असली तरी अधिक अचूक असते. साधारणपणे प्रत्यक्ष पद्धतीचा वापर अप्रत्यक्ष पद्धतीसाठी मापदंड निश्चित करण्यासाठी किंवा त्यांच्या अचूकतेची तपासणी करण्यासाठी वापरली जाते. ही पद्धत विविध विज्ञान शाखांमध्ये प्रयोगासाठी/संशोधनासाठी, पीक पाणी व्यवस्थापनासाठी, पाण्याची मात्रा किंवा प्रमाण ठरविण्यासाठी वापरली जाते. याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.

१. ग्रॅव्हीमेट्रिक पद्धत ः
मातीचे नमुने घेण्याची पद्धत ः माती एकसमान, मुळे व दगडविरहित असल्यास त्याचे नमुने घेऊन पाण्याचा अंदाज घेता येतो. जमिनीमध्ये किती खोलीपर्यंत ओलावा आहे, हे त्यातून समजू शकते. -वेगवेगळ्या खोलीवरील माती नमुने काढण्यासाठी अगरचा वापर करतात. हा साधारणपणे तीन इंची व्यासाचा व ९ इंची लांबीचा पाइप असतो. ॲल्युमिनिअम पाइपच्या साह्याने त्याची लांबी वाढवत अगदी ५५ फुटांपर्यंतचे माती नमुने घेता येतात. . वेगवेगळ्या खोलीवरील मातीचे नमुने अगरच्या साह्याने गोळा करावेत.
या आर्द्रतायुक्त मातीच्या नमुन्याचे वजन घ्यावे. 
 मातीचे नमुने ओव्हनमध्ये १०५ अंश सेल्सिअस तापमानात २४ तासांसाठी ठेवावे. त्यातील आर्द्रता नाहीशी होऊन ते कोरडे होईल.
या मातीचे पुन्हा वजन घ्यावे. पुढील सूत्र वापरून मातीतील ओलावा मोजता येतो. ही पद्धत अन्य सर्व पद्धतींसाठी तपासणी म्हणून वापरली जाते.

मातीतील मृदबाष्प (टक्के)  =
(ओल्या मातीचे वजन - कोरड्या मातीचे वजन)
 --------------------------------------------- x   १००
कोरड्या मातीचे वजन

२. व्हॉल्युमेट्रिक पद्धत
या पद्धतीमध्ये कोअर सॅंप्लरद्वारे मातीचे नमुने गोळा केले जातात. नंतर ग्रॅव्हिमेट्रिक पद्धतीप्रमाणे ओल्या मातीचे वजन करून ते ओव्हनमध्ये १०५ अंश सेल्सिअस तापमानात २४ तास ठेवावेत. नंतर कोरड्या
मातीचे वजन घ्यावे. पुढील सूत्राने जमिनीतील ओलावा मोजता येतो.

व्हॉल्युमेट्रिक मृदबाष्प  =
ओल्या मातीचे वजन - कोरड्या मातीचे वजन
--------------------------------------------------    x १००
कोअर सॅंप्लरचे आकारमान गुणिले पाण्याची घनता

ब) अप्रत्यक्ष मृदबाष्प काढण्याची पद्धत :
अप्रत्यक्ष पद्धतीद्वारे केलेले ओलाव्याचे मोजमाप जलद, सोपे आणि सरळ असले तरी त्याची अचूकता ही कमी असते.
१. इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स ब्लॉक/जिप्सम ब्लॉक पद्धत
जमिनीतील ओलाव्यानुसार होणारा विद्युत रोधकतेतील या तत्त्वावर ही पद्धत कार्य करते. यामध्ये  जिप्समपासून बनविलेला सछिद्र ब्लॉक वापरलेला असतो. म्हणून तिला ‘जिप्सम ब्लॉक पद्धत’ असेही म्हणतात. सामान्यतः या ब्लॉकमध्ये दोन इलेक्ट्रोड असून, ते इन्सुलेटेड लिड वायरशी जोडलेले असतात. त्या वायर वापरात असताना दोन इलेक्ट्रोडसह जिप्सम ब्लॉक जमिनीमध्ये योग्य त्या खोलीवर ठेवला जातो. त्याच्या वायर भूपृष्ठभागावर आणून सोडलेल्या असतात. 
मातीतील ओलावा व जिप्सम ब्लॉक यांच्यामध्ये आर्द्रतेचा समतोल होण्यास सुरवात होते. समतोल राखण्यासाठी लागलेली अथवा प्रवाहित झालेली आर्द्रता विद्युत प्रतिरोध मीटरमध्ये मोजली जाते. विद्युत प्रतिरोध हा मातीतील पाण्याच्या व्यस्त प्रमाणात बदलत असतो. म्हणजेच ओलावा जास्त असेल, तर विद्युत प्रतिरोध कमी असतो. ओलावा कमी असल्यास विद्युत प्रतिरोध जास्त असतो. यामध्ये कॅलिब्रेशन कर्व्हचा वापर करून मातीतील ओलावा अचूकरीत्या मोजला जातो. ही पद्धत शेतकरीही वापरू शकतात.

२. टेन्सिओमीटर
मातीने पाणी किती दृढतेने धरून ठेवले आहे, हे दर्शवण्याचे काम टेन्सिओमीटर करतो. टेन्सिओमीटरमध्ये एक सछिद्र सिरॅमिक कप असून, एका ट्यूबद्वारे तो मॅनोमीटरला जोडलेला असतो. 
टेन्सिओमीटर जमिनीत योग्य खोलीवर ठेवण्यापूर्वी तो पाण्याने भरलेला असतो. त्या पाण्याचा दाब सामान्य वातावरणाच्या दाबाएवढा असतो. मात्र, सामान्यतः जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने त्याचा दाब कमी असतो. परिणामी, टेन्सिओमीटरमधून काही पाणी जमिनीकडे खेचले जाते. अखेरीला दोन्हींमध्ये समतोल साधला जातो. या प्रक्रियेमध्ये टेन्सिओमीटरमध्ये नकारात्मक वातावरणीय दाब तयार होतो. तो मॅन्यूमीटरवर दर्शवला जातो. तो नकारात्मक दाब म्हणजे मेट्रिक संभाव्यता असते. अशाप्रकारे मेट्रिक संभाव्यता आणि मातीतील ओलाव्याचे प्रमाण यांचा संबंध दर्शविणाऱ्या आलेखाच्या साह्याने ओलाव्याचे प्रमाण मिळवता येतात. टेन्सिओमीटरची संवेदनशीलता ही ०.८५ बार अथवा वातावरणीय दाबाइतकीच असते. ही पद्धत फक्त वालुकामय अथवा मुरमाड जमिनीतील ओलावा मोजण्यास उपयुक्त ठरते. काळ्या कसदार आणि कापसाच्या जमिनीमध्ये ही पद्धत फारशी उपयुक्त ठरत नाही. ही पद्धत शेतकरी वापरू शकतो. यामध्ये स्थानिक स्वरूपातही आपल्याला टेन्सिओमीटर वापरता येतात.

३. सॉईल मॉईश्चर प्रोब (न्यूट्रॉन प्रोब) -
किरणोत्सर्गी पदार्थ जमिनीतील पिकाच्या मुळांच्या क्षेत्रात, विविध खोलीवर सोडले जातात. जमिनीतील पाण्याच्या प्रमाणानुसार हायड्रोजन अणूंची संख्या कमी-जास्त असते. किरणोत्सर्गी किरणांचा वेग कमी करणे हा हायड्रोजन गुणधर्म होय. अधिक पाणी असल्यास किरणोत्सर्गी अणूंचा वेग कमी होतो आणि कमी पाणी असता याउलट स्थिती आढळते. यावरून जमिनीतील ओलाव्याचे अथवा मृद बाष्पाचे अचूक मापन करता येते. ही पद्धत खर्चिक आहे. किरणोत्सर्गी पदार्थांचा वापर होत असल्यानेही मुख्यतः संशोधनासाठी या पद्धतीचा अधिक वापर होतो.

४. सोईल मॉईश्चर मीटर -
ग्रॅव्हीमेट्रिक मापन पद्धतीवर आधारित आणि त्याच्याशी तुलना करून, डिजिटल सॉईल मॉईश्चर मीटर अनेक कंपन्यानी बाजारात आणले आहे. त्याचा वापर शेतकरी सहज करू शकतात.

५. सॉईल मॉईश्चर इंडीकेटर -
जमिनीतील पाणी उपलब्धतेनुसार मृदबाष्प मीटरमध्ये विविध रंगाचे एलईडी दिवे लागतात, त्यावरून जमिनीतील उपलब्ध पाणी पातळी किंवा मृदबाष्प कळते. हे उपकरण शेतकरीही सहज वापरू शकतात.

डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९
(कृषी हवामान शास्त्रज्ञ तथा प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना, अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
हुमणी भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी गंध...भारतीय कृषी संशोधन  संस्थेच्या बंगळूर येथील...
तुषार सिंचनाने वाढवले कडधान्य पिकांचे...हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी...
मळणी यंत्राची क्षमता, गुणवत्ता...काढणीनंतर पिकांची मळणी केली जाते. मळणीसाठी...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
कोबीवर्गीय पिकांतील कीडनियंत्रणासाठी...बंगळूर येथील भारतीय फळबाग संशोधन संस्थेने...
जमिनीतील बाष्प मोजण्याच्या पद्धतीया पूर्वीच्या लेखांमध्ये वातावरणातील पाण्याचे...
मत्स्य बीजोत्पादनातून पर्यायी...कोवालम गाव (जि. चेंगलपट्टू) येथील गटाने खारवट...
निचरा प्रणाली सुधारण्यासाठी सबसॉयलर,...फळबागांमध्ये कमी अधिक प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
मजुरी, वेळेत बचत करणारी अवजारेकृषी यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईवर मात करणे शक्य...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करता येईल...पारंपरिक पद्धतीची शेती करताना शेतकरी मेटाकुटीला...
अवघ्या सात हजारांत बनवली स्वयंचलित ठिबक...सोलापूर ः वीजपंपाच्या स्टार्टरला स्वतःच्या...
दोन एकर ‘व्हर्टिकल फार्म’ मध्ये ७२०...सॅनफ्रान्सिस्को येथील प्लेन्टी या कंपनीने...
पाण्यातील प्रतिमाही घेता येतील सहजतेनेस्टॅनफोर्ड येथील अभियंत्यांनी पाण्याबाहेरून...
डाळिंबाचे नवीन अधिक पोषक वाण ः सोलापूर... भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय डाळिंब...
पीक व्यवस्थापनात स्मार्ट कॅमेऱ्याचा वापरकृषी यंत्रणेमध्ये स्मार्ट कॅमेरा प्रणालीचा विकास...
बहुउद्देशीय टोकण यंत्राने वाचवले...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील सौरभ कदम व...
शेतीमाल वाळविण्यासाठी सोलर टनेल ड्रायर...भाजीपाला, फळांचे काप वाळविण्यासाठी सौर ऊर्जेचा...
शास्त्रीय हाताळणी, पॅकिंग...खानदेश हा केळीसाठी प्रसिद्ध असलेला प्रदेश मानला...
सूक्ष्म वातावरणावर होतो वाहत्या...वारे नुसते वाहत नाहीत, तर सोबत पावसाचे ढग,...