agriculture stories in Marathi The solution discovered through mechanization On salinity issues | Agrowon

खारपाणपट्ट्यातील समस्यांवर यांत्रिकीकरणातून शोधला उपाय

गोपाल हागे
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या गावंडे बंधूंनी डवरणी, वखरणी, फवारणी आदी कामांसाठी सुधारित यंत्रांची निर्मिती केली आहे.

दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या गावंडे बंधूंनी डवरणी, वखरणी, फवारणी आदी कामांसाठी सुधारित यंत्रांची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे खारपाण पट्ट्यात जिथे शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो तेथे ही शेतीकामे सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. सोयाबीन, तूर, कपाशी तसेच रब्बी हंगामातील काही पिकांसाठीही यंत्रांचा वापर शक्य होणार आहे. आपल्या शेतातील वापराबरोबरच अन्य शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ गावंडे बंधू करून देत आहेत.

अकोले जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यात बारमाही पिके घेण्याची सोय नाही. हंगामी पिकांवरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. अनेक अडचणींमुळे शेतीत अत्याधुनिक साधनांचा पुरेसा वापरही आजवर होत नव्हता. अलीकडे मात्र बदल दिसतो आहे. मजूर टंचाई, एकाचवेळेस पिकांची मशागत किंवा
ती काढणीस येणे आदी कारणांमुळे कोरडवाहू शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन दापुरा ( ता. जि. अकोला) येथील शेतकरी कुटुंबातील स्वप्नील व संदीप या गावंडे बंधूंनी यांत्रिकीकरण साध्य केले आहे. आपल्या शेतातील वापराबरोबरच अन्य शेतकऱ्यांना माफक दरात गरजेनुसार यंत्र तयार करून देण्याची त्यांची धडपड आहे.

गावडे यांची यांत्रिक कुशलता

गावडे बंधूंचे वडील भास्करराव यांनी वडिलोपार्जीत शेती सांभाळत जवळपास ३० वर्षे वेल्डिंग व्यवसाय केला. यांत्रिकीकरणातही लक्ष घातले. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. आता गावंडे बंधूंनी हा व्यवसाय पुढे सुरु ठेवला आहे. शेतीसाठी बैल व ट्रॅक्टरचलीत कुठलेही यंत्र हवे असेल तर या भागातील शेतकरी त्यांच्याकडील यंत्रांना प्राधान्य देतात असा नावलौकीक तयार झाला आहे. गावंडे यांची १६ एकर शेती आहे. त्यात सोयाबीन, तूर, कापूस अशी पिके ते घेतात. सोयाबीन काढणीनंतर हरभरा घेतला जातो.
हा संपूर्ण भाग खारपाण असल्याने सिंचनाची बारमाही सोय नाही. पावसाच्या पाण्यावरच शेती अवलंबून आहे. ज्यांच्याकडे शेततळे आहे असे शेतकरी रब्बीत हरभऱ्याला एक-दोन पाणी पाळ्या देतात. याही परिस्थितीत शेतीचे योग्य व्यवस्थापन करण्याची धडपड गावंडे बंधूंनी सुरू ठेवली आहे.
कोरडवाहू शेतीत सोयाबीनचे एकरी १० क्विंटल, तूर ४ ते ५ क्विंटल तर कापूस एकरी १० क्विंटलपर्यंत ते पिकवतात. हरभऱ्याचे एकरी ८ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले ते. शेती आणि यंत्र निर्मितीच्या व्यवसायातून या कुटुंबाने गावात टुमदार घर बांधले. धान्य, यंत्र ठेवण्यासाठी गोदाम तयार केले.

फवारणी यंत्र निर्मितीत हातखंडा

काळाची गरज ओळखून भास्कररावांनी १० वर्षांपूर्वी फवारणी, डवरणी, वखरणी यंत्रांची निर्मिती सुरु केली. गुणवत्ता ही खासियत जपली. अनुभवातून त्यांचे ज्ञान वाढले. हा व्यवसाय पुढील पिढीने अधिक तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने करावा या हेतूने मुलगा संदीप यास दहावीनंतर शासकीय विद्यालयातून आयटीआयचे प्रशिक्षण घेण्यासाठी तयार केले. आग गावंडे बंधू ट्रॅक्टर चलीत फवारणी, डवरणी, वखरणीसाठीची वैशिष्ट्यपूर्ण यंत्रे तयार करतात. गरजेनुसार १६ पासून २० ते २३ नोझल्स जोडलेला ट्रॅक्टचलित फवारणी पंप त्यांनी तयार केला आहे. त्याच्या निर्मितीसाठी दर्जेदार व टिकाऊ पाइप वापरले आहेत. त्याच्या वापरातून एकावेळी सुमारे २३ पर्यंतच्या ओळी ‘कव्हर’ करणे, वेळ व श्रमांची बचत करणे शक्य झाले आहे.

पाणी घेण्याची सोय

खारपाण पट्ट्यात शेतात कुठलेही काम करायचे असेल तर घरूनच पाणी न्यावे लागते. प्रामुख्याने फवारणीसाठी तर अनेक शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीत टाक्या ठेवून पाणी नेतात. गेल्या काही वर्षांत खारपाण पट्ट्यात शेततळ्यांची संख्या वाढली. पावसाळ्यात ही शेततळी तुडूंब भरतात. हे पाणी शेतकरी फवारणी व अन्य कामांसाठी
वापरतात. वीजपुरवठा नसल्याने पाणी काढण्याची
अडचण राहते. ही समस्या लक्षात घेत गावंडे यांनी फवारणी पंप, कॉम्प्रेसर, पाइप व अन्य यंत्रणा जोडून देण्याचे काम केले आहे. याद्वारे ५०० लिटर क्षमतेची टाकी अवघ्या काही मिनिटांत भरली जाते.

डवरणी, वखरणी यंत्र

सलग पाऊस पडला तर खारपाण पट्ट्यात गवत अधिक प्रमाणात वाढते. जमीन टणक बनते. अशावेळी बैलांच्‍या साह्याने डवरणीचे काम कठीण होते. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरद्वारे आंतरमशागतीचे काम करतात. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांची वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती गावंडे बंधू करतात.
त्यातून काम अधिक सुलभ होते. जमीन भुसभुशीत होते. पिकाच्या दोन्ही ओळींना कोणती बाधा पोचत नाही.

बीबीएफ यंत्राच्या रचनेत केले बदल

‘बीबीएफ’ (रूंद वरंबा सरी) यंत्र उपयोगात आणताना अडचणी येतात हे सर्वश्रुत आहे. गावंडे यांनी
त्याच्या उपयोगासाठी कल्पकतेने काही बदल केले. प्रामुख्याने पेरणी करताना समान अंतर सुटावे यासाठी यंत्राच्या दोन्ही बाजूंना फोल्डिंग असलेले दाते बसविले. बियाणे, खत टाकण्यासाठी पेटीची उंची वाढविली. बियाणे व खत जमिनीत व्यवस्थित पडावे यासाठी विशिष्ट प्रकारचा पाइप बसविला. या बदलांमुळे या यंत्राचा वापर करणे सोपे झाल्याचे संदीप सांगतात.

ट्रॅक्टरच्या चाकांमध्ये बदल

ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकांमुळे अनेकवेळा मशागतीच्या कामांमध्ये अडचणी येतात.
ही अडचण लक्षात घेत दोन्ही चाकांमधील अंतर वाढवले. कपाशी, सोयाबीन पिकांत त्याचा उपयोग होतो. कमी रुंदीची चाके असल्याने आंतरमशागतीच्या कामांना गती मिळून कमी वेळेत अधिक काम करणे शक्य होते.

अन्य शेतकऱ्यांना लाभ

फवारणी पंप अन्य शेतकऱ्यांच्या पसंतीस पडल्याने आजवर १५० पर्यंत त्यांची विक्री झाली. तसेच
मोठ्या ट्रॅक्टचलित डवरणी यंत्रांचाही वर्षाला २० पर्यंत उठाव होत असल्याचे संदीप म्हणाले.

प्रशिक्षणाला उपस्थिती

यांत्रिकीकरणातील कौशल्याचा गुण स्वप्नील, संदीप यांना वडिलांकडून मिळाला. संदीप यांनी या क्षेत्रातील तंत्रशुद्ध ज्ञानही घेतले. यामुळे कामात निपुणता आली. ते सातत्याने नवीन काही करण्याचा प्रयत्न करतात. ‘आत्मा’ प्रकल्पातून त्यांनी नागपूर येथे ‘वनामती’मध्ये निवासी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणात विविध उद्योजक सहभागी होते. त्यांच्या अनुभवाचे बोल यंत्र निर्मितीसाठी महत्त्वाचे ठरल्याचे संदीप सांगतात.

संदीप गावंडे- ८८०५४३२५१०


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...
राज्यातील पाणीसाठा ४४ टक्क्यांवर पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला...
हरभरा दर पाच हजारांवर अकोला ः यंदा हरभऱ्याचा दर शासनाने जाहीर केलेल्या...
साठ कृषी कर्मचाऱ्यांचा कोरोनाने घेतला...पुणे ः कोविड १९ साथीच्या तडाख्यात सापडल्याने कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
अन्न प्रक्रियेसाठी ‘थ्री डी प्रिंटिंग’...सर्वसामान्यपणे आपल्याला विविध आकारातील कुकीज,...
मराठवाडा, विदर्भात पाऊस वाढण्याची...पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रिय वाऱ्याची...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
कापूस बियाणे विक्री एक जूनपासून पुणे ः राज्यात कापूस बियाणे विक्रीवर यंदा देखील...
कारखान्यांकडून इथेनॉलचे ३०२ कोटी  लिटर...कोल्हापूर : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल कंपन्या...
मोहफुलांवरील दारूबंदी कायद्याचे निर्बंध...पुणे ः मोहफुलांच्या प्रक्रिया उद्योगातून आदिवासी...
तुरळक ठिकाणी हलक्या सरी पुणे : पूर्वमोसमी पावसाचा काहीसा प्रभाव कमी झाला...
बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर स्थिरावले अकोला ः यंदा तुरीचे उत्पादन कमी झाले. शिवाय...
ठिकठिकाणी गारपीट, पावसाचा दणका पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात...