सोयाबीन लागवडीतील समस्यावरील उपाययोजना

वेधशाळेच्या अंदाजानुसार या वर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर होण्याची शक्यता असून, पेरणीची लगबग सुरु आहे. खरिपातील प्रमुख पिकांमध्ये सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे. त्यात उद्भवणाऱ्या समस्या व प्रश्नाची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
सोयाबीन लागवडीतील समस्यावरील उपाययोजना
सोयाबीन लागवडीतील समस्यावरील उपाययोजना

सोयाबीनचे योग्य वाण निवडताना... सध्या बाजारात सोयाबीनचे अनेक वाण उपलब्ध असले तरी आपल्या शेतावर योग्य वाणाची निवड करताना काही निकष लावावे लागतात. एखाद्या ठिकाणी एखाद्या वाणाने चांगले उत्पादन दिले म्हणून आपल्या शेतावर तोच वाण घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. मात्र, उपलब्ध सर्व वाणाची उत्पादकता ही सांख्यिकीय दृष्ट्या सारखीच असते. एखाद्या वाणाची वैशिष्ट्ये व आपल्याकडील उपलब्ध संसाधने व निविष्ठा यांचे गणित जुळून आल्यास तो वाण त्या भागात किंवा शेतावर इतर वाणाच्या तुलनेत सरस दिसून येतो. यामुळे वाणाची निवड करताना त्या वाणाची वैशिष्ट्ये, आपल्याकडील संसाधने व निविष्ठा याचा अभ्यास व अनुभव यांची सांगड घालणे गरजेचे आहे.

वाण प्रसारित वर्ष पिकाचा कालावधी सरासरी उत्पादन (क्विं/हे) ठळक वैशिष्ट्ये
एमएयुएस ७१(समृद्धी ) २००२ ९३-१०० २८-३० शारीरिक पक्वतेनंतर १२-१५ दिवस शेंगा तडकण्यास सहनशील, रोग व किडींना प्रतिकारक, जेएस ३३५ पेक्षा १५ टक्के अधिक उत्पादन (महाराष्ट्र)
एमएयुएस १५८ २००९ ९३-९८ २६-३१ शारीरिक पक्वतेनंतर १२-१५ दिवस शेंगा तडकण्यास सहनशील, खोडमाशी या किडीसाठी प्रतिकारक (मराठवाडा)
एमएयुएस१६२ २०१२ १००-१०३ २५-३० मशीनद्वारे कापणीस योग्य, शारीरिक पक्वतेनंतर १२-१५ दिवस शेंगा तडकण्यास सहनशील (मराठवाडा)
एमएयुएस ६१२ २०१६ ९५-१०० ३२-३६ रोग व किडींना सहनशील
एनआरसी ३७ (अहिल्या) २००१ ९९-१०५ ३५-४० रोग व किडींना सहनशील, सोयाबीन संशोधन संचालनालय, इंदोर येथून प्रसारित (महाराष्ट्र)
डीएस २२८ (फुले कल्याणी) २००५ ९५-१०० २३-२४ म.फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून प्रसारित (प.महाराष्ट्र)
एमएसीएस  ११८८ २०१३ १०० ३०-३५ ओलिताखालील लागवडीस योग्य, (प.महाराष्ट्र)
जे एस -३३५  १९९४  ९५-९८  २५-२८  बॅक्टेरियल पुरळ साठी सहनशील, भारतात लागवडीखाली सर्वात जास्त क्षेत्र

बियाण्याच्या उगवणीतील समस्या टाळण्यासाठी उपाययोजना ः

  • दरवर्षी कृषी विभाग व कृषी शास्त्रज्ञ यांच्याकडे सोयाबीन उगवणीसंबंधी काही तक्रारी येतात.
  • प्रत्यक्ष भेटीनंतर बियाणे ८ ते १० सेंमी खोल जमिनीमध्ये पेरले गेल्याचे दिसून येते. अशा बियाण्याची उगवण व्यवस्थित होत नाही. पेरणीतला दोष टाळण्यासाठी सोयाबीनची पेरणी जमिनीमध्ये २.५ ते ३ सेंमी खोलीपर्यंतच केली पाहिजे.
  • काही ठिकाणी शेतकऱ्याने घरचे बियाणे उगवण क्षमता न तपासता पेरलेले असते. मुळातच उगवण क्षमता कमी असलेले बियाणे जमिनीत योग्य खोलीवर पडले तरी बियाण्याला सुरकुत्या पडून जागीच कुजून जाते. अपेक्षित उगवण दिसून येत नाही. हे टाळण्यासाठी घरचे बियाणे वापरण्यापूर्वी उगवण क्षमता तपासून घ्यावी.
  • सोयाबीन बियाणे उगवणशक्ती नुसार बियाणे वापर

    आढळलेली बियाणे उगवणशक्ती उगवणशक्तीनुसार प्रति एकरी वापरावयाचे बियाणे
    ७० % व त्यापेक्षा जास्त २६ किलो
    ६९% २६.३७ किलो
    ६८% २६.७४ किलो
    ६७% २७.११ किलो
    ६६% २७.४८ किलो
    ६५% २७.८५ किलो
    ६४% २८.२२ किलो
    ६३% २८.५९ किलो
    ६२% २८.९६ किलो
    ६१% २९.३३ किलो
    ६०% २९.७० किलो
    ६० % पेक्षा कमी उगवणशक्ती असलेले सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरू नये.

    तणनियंत्रण आणि तणनाशकाचा वापर बऱ्याच वेळेला शेतकरी सोयाबीन पेरणीच्या ४० दिवसानंतरही तण नियंत्रणासंबंधी रासायनिक तणनाशकाची फवारणी करण्याविषयी चौकशी करतात. मात्र, सोयाबीनमध्ये उगवणीपूर्वीची तणनाशके ही पेरणीनंतर तीन दिवसाच्या आत फवारावी लागतात. उगवणीपश्चात वापरायची तणनाशके तण कोवळे व तीन ते चार पानांवर असेपर्यंतच तण नियंत्रणाचे कार्य करते. पेरणीनंतर ३५-४० दिवसाच्या पुढे ही तणे काटक बनलेली असतात. अशा काटक तणांवर तणनाशके नियंत्रणाचे कार्य करत नाहीत. उगवणी पश्चातची तणनाशके फवारताना जमिनीत ओलावा असण्याची गरज असते. तेव्हाच ती अधिक कार्यशील ठरतात. तणनाशकांचा वापर १) पेरणीनंतर, परंतु बियाणे उगवण पूर्वी - पेंडीमिथिलीन २.५ ते ३.० लीटर/हेक्टर - ७५० लीटर पाणी हेक्टर वापरावे. २) पेरणीनंतर १५-२० दिवसांनी - क्लोरीम्युरॉन इथाईल ३६ ग्रॅम/हेक्टर किंवा इमॅझीथॅपायार १ लीटर/हेक्टर किंवा क्विझॉलफॉप इथाईल १ लीटर/हेक्टर किंवा इमॅझीथॅपायार (३५%) अधिक इमॅझमॅक्स (३५%) १०० ग्रॅम/हेक्टर - ५०० लीटर पाणी प्रति हेक्टर वापरावे. तणनाशकाची फवारणी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल लावून ओलावा असताना जमिनीवर करावी. १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी घेणे योग्य आहे का ? सोयाबीन पिकाची वाढ समाधानकारक असेल तर विनाकारण १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी करणे गरजेचे नसते. सोयाबीन पिकास फुलोरा येण्याआधी पावसाचा खंड पडल्यास पिकाची वाढ खुंटते. अशा परिस्थितीत १९:१९:१९ या विद्राव्य खताची (१% प्रमाणात- १० ग्रॅम प्रती लीटर) फवारणी केल्यास फायद्याचे दिसून आले आहे. सामान्य परिस्थितीत गरज नसताना १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी केल्यास सोयाबीनच्या कांड्याची संख्या न वाढता लांबी वाढते. सोयाबीन उंच होऊन माजते. अशा सोयाबीनपासून अधिक उत्पादन मिळत नाही. सोयाबीनसाठी खतांचे नियोजन ः सोयाबीनमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, गंधक ३०:६०:३०:२० किलो प्रती हेक्टर (म्हणजेच १२:२४:१२:०८ किलो प्रती एकर) अशी खताची शिफारस आहे. यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश ही अन्नद्रव्ये देण्यासाठी शेतकरी सहसा डीएपी या खताचा आग्रह धरतात. डीएपी खतामधून पालाश पिकाला मिळत नाही. डीएपी व्यतिरिक्त इतरही सरळ व संयुक्त खते यांचे योग्य प्रमाण घेऊन वरील शिफारशी प्रमाणे अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करावी. एखाद्या विशिष्ट खताचा आग्रह धरण्याऐवजी आपल्या विभागात उपलब्ध होणाऱ्या अन्य खतांच्या माध्यमातूनही पिकांच्या अन्नद्रव्यांची गरज भागवता येते. संपर्क : डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी, ९४२३७७७३१४ (विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, लातूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com