फळांच्या थेट विक्रीतून मिळवला दुप्पट फायदा

नगर जिल्ह्यातील हंडीनिमगाव (ता. नेवासा) येथील रमेश गणपत पिसाळ यांनी पपई, कलिंगड व खरबूज फळांचीथेट ग्राहकांना विक्री करत दुप्पट नफा मिळवला आहे.
फळांच्या थेट विक्रीतून मिळवला दुप्पट फायदा
फळांच्या थेट विक्रीतून मिळवला दुप्पट फायदा

नगर जिल्ह्यातील हंडीनिमगाव (ता. नेवासा) येथील रमेश गणपत पिसाळ यांनी घाऊक बाजारात पपईला दर नसल्याने थेट ग्राहकांना विक्री करत दुप्पट नफा मिळवला आहे. ऊस, पपई, डाळिंबात आंतरपीक घेणाऱ्या पिसाळ यांनी लॉकडाऊनच्या काळातही वाहनाने व शेतात पंधरा टन कलिंगड व आठ टन खरबुजाची थेट विक्री करून ३ लाखापर्यंतचे उत्पन्न मिळवले आहे. नगर-औरंगाबाद रस्त्यावरील हंडीनिमगाव (नेवासा फाटा) येथील रमेश पिसाळ हे एमए, बीएड उच्चशिक्षित असून, पुढे कृषी पदविकाही घेतली आहे. त्यांच्याकडे पंधरा एकर शेती असून, त्यात सध्या दोन एकर तैवान पपई, दोन एकर कापूस, तीन एकर भगवा डाळिंब, चार एकर ऊस पीक आहे. खरिपात तीन एकरावर बाजरीही घेतली आहे. शेतीमध्ये विविध पिकांचे प्रयोग करताना बंधू ॲड. कल्याणराव पिसाळ यांची मदत आणि मार्गदर्शन होते. या वर्षी पपई विक्रीवेळी व्यापाऱ्यांनी ८ ते रुपये प्रती किलोने मागणी केली. सर्व खर्च व अन्य बाबींचा विचार करता हे परवडणारे नव्हते. त्यामुळे पिसाळ यांनी थेट ग्राहकांना पपई विक्रीचा निर्णय घेतला. नगर- औरंगाबाद रस्त्यावर त्यांचे त्रिवेणीश्वर कृषी सेवा केंद्र आहे. तिथेच शेजारी स्टॉल लावून २० रुपये किलो या प्रमाणे विक्री सुरु केली. यात ग्राहकांनाही ती स्वस्तामध्ये मिळत असल्याने पिसाळ यांच्यासोबत ग्राहकांचाही फायदा होत आहे. गेल्या तीन वर्षापासून ते कलिंगड व खरबुजाचे पीक घेतात. यंदा उन्हाळ्यात एक एकर कलिंगड व एक एकरवर खरबूज लागवड होती. मात्र, विक्रीवेळी नेमकी कोरोना समस्या उद्भवली. लॉकडाऊनच्या दरम्यान नुकसान टाळण्यासाठी शेतात व परिसरातील ग्राहकांना थेट विक्री केली. प्रति दिन १००० रुपये भाड्याने वाहन घेऊन आजूबाजूच्या गावामध्ये १० रुपये किलो कलिंगड व २० रुपये किलो खरबूज या प्रमाणे सुमारे पंधरा टन फळांची विक्री केली. तर शेतातून साधारण आठ टन विक्री केली. शेतामध्ये थेट विक्रीसाठी त्यांना दोन पुतण्यांची मदत झाली. सिंचनासाठी शेततळ्याचा मोठा आधार या भागाला मुळा धरणाचे पाणी मिळते. मात्र गरजेनुसार कधी-कधी वेळेत आवर्तन मिळत नाही. अशा वेळी पिकांचे नुकसान, उत्पन्नात घट होत असे. यावर मात करण्यासाठी रमेश पिसाळ यांनी सहा वर्षापूर्वी सहा लाख लाख रुपये खर्च करून तीस गुंठे क्षेत्रावर शेततळे केले. पाणी कमतरतेच्या काळात पपई, डाळिंबासह ऊस पिकाला संरक्षित पाणी देता येते. सोबत या पिकातील विविध आंतरपिकांनाही फायदा होतो. वेगळा प्रयोग नेवासा तालुक्यात कापसाचे क्षेत्र फारसे नसते. पाच वर्षापूर्वी पिसाळ यांनी ठिबकवर कापसाचा वेगळा प्रयोग केला. ७ जून रोजी ५ बाय १ फूट अंतरावर लागवड करत कापसाचा ८५ व्या दिवशी शेंडे खुडणी केली. त्यामुळे फुटव्यांची योग्य प्रमाणात वाढ होऊन एकरी २३ क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा उसात एक एकरावर भेंडीचे आंतरपीक घेतले. पीक चांगले आले. विक्रीवेळी लॉकडाऊनचा फटका बसला. आंतरपिके घेण्यात हातखंडा रमेश पिसाळ हे गेल्या पाच वर्षापासून दर वर्षी ऊस पिकात किमान दोन एकरवर कांद्याचे आंतरपीक घेतात. गेल्या वर्षी दोन एकर आंतरपिकातून कांद्याचे ३५ टन उत्पादन मिळाले. यंदा तीन एकर उसात कांदा, पपईत कलिंगड व खरबुजाचे आंतरपीक घेतले. यंदा एक आंतरपीक कांद्याचे एकरी १५ टन उत्पादन आले. प्रति दिन सुमारे १५ क्रेट (१५ किलो प्रति क्रेट) या प्रमाणे कलिंगड, खरबुजाची विक्री झाली. त्यातून सुमारे तीन लाख रुपये मिळाले. पिसाळ यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • जास्तीच्या पावसाचा पपईला फटका बसतो हा अनुभव आहे. त्यामुळे
  • पावसाळ्याआधी शेताच्या मधोमध चर खोदून ठेवला. त्यामुळे या वर्षी अतिवृष्टी होऊनही पपईसह अन्य पिकांत पाणी साठवून राहिले नाही.
  • जास्तीच्या पावसाने पपईची पानगळ झाली. पाऊस उघडल्यानंतर कडाक्याचे ऊन पडत आहे. फळांवर उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम होऊ नये, यासाठी फळांवर वृत्तपत्राच्या कागदाचे आवरण लावले. यामुळे फळांचे उन्हामुळे होणारे नुकसान टळले.
  • पिसाळ यांनी सर्व क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे. त्यात चार एकर उसामध्येही ठिबक आहे. ऊसतोडणी वेळी लॅटरल खराब होत असत. या वर्षी लागवडीवेळी पाच फुटी सरी पद्धतीचा अवलंब केला. परिणामी पिकाच्या उत्पादनवाढीसोबतच लॅटरल काढणे सोपे झाले.
  • रासायनिक खतांसोबत सुमारे ४० टक्के सेंद्रिय खताचा वापर करतात. पिकांना जिवामृत देण्यावर त्यांचा भर असतो. उत्पादन वाढ, फळांना चकाकी येत असल्याचा रमेश पिसाळ यांचा अनुभव आहे.
  • ऊस तोडणीनंतर उसाचा पाला न जाळता पाल्याचे दहा वर्षापासून आच्छादन करतात. शिवाय डाळिंबालाही तीन वर्षापासून पाचटाचे आच्छादन करतात. यामुळे पाण्यात बचतीसोबत पाचट कुजून सेंद्रिय खत मिळते. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला असून, जमीन भुसभुशीत झाली आहे. गांडुळांची संख्या वाढली असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
  • शेतकामांसाठी त्यांच्याकडे नियमित साधारण चार ते पाच मजूर काम करतात.
  • रमेश पिसाळ, ८९९९६१४०६२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com