पावणेतीनशे एकर शेतीत फुलवलं पांढरं सोनं

पावणेतीनशे एकर शेतीत फुलवलं पांढरं सोनं
पावणेतीनशे एकर शेतीत फुलवलं पांढरं सोनं

शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख यांनी सुमारे २८४ एकरांवर कापूस लागवडीचा प्रयोग अंमलात आणला आहे. त्यातील २२० एकरांवर करार शेती आहे. खारपाणपट्टा असूनही योग्य व्यवस्थापनातून कपाशीची एकरी उत्पादकता १४ क्विंटलपर्यंत जपली आहे. विस्तृत क्षेत्रावरील व्यवस्थापन सुलभ होण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख पूर्वी सोयाबीन, तूर, हरभरा कापूस अशी पीकपध्दती घ्यायचे. अलीकडील वर्षांत नगदी पीक म्हणून मुख्य कापसालाच त्यांनी पसंती दिली आहे. वडिलोपार्जित ५० एकरांला नव्याने खरेदी केलेली १४ एकर अशी ६४ एकर शेती त्यांच्याकडे आहे. सोबतच तीन जणांकडील मिळून २२० एकरांवर करार शेती त्यांच्याव्दारे होते. अशा रितीने एकूण २८४ एकरांवर त्यांनी कापूस लागवड अंमलात आणली आहे. एकीकडे मजुरांच्या उपलब्धतेअभावी शेती कसणे अनेकांना अवघड झाले असताना देशमुख यांची मात्र विस्तारलेली शेतीत उत्साह निर्माण करणारी आहे. त्यासाठी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. पीक व्यवस्थापन- वैशिष्ट्ये सहा बोअरवेल्सच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन होते. आधुनिक तंत्राचा अवलंब करताना ५० एकर क्षेत्र ठिबकखाली आणले आहे. गरजेनुसार तुषार सिंचनाचाही वापर होतो. खारपाणपट्टा असल्याने सिंचन पध्दती मर्यादित व काटेकोर स्वरूपात वापरावी लागते. राज्यात २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे पूर्वहंगामी त्यासोबतच कमी कालावधीच्या कापूस वाणाच्या लागवडीचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. ही बाब लक्षात घेत देशमुख यांनी तशा वाणाचे नियोजन केले आहे.सुमारे १४५ ते १५० दिवस कालावधीच्या वाणाची निवड ते करतात. त्यामुळे वेचणीनंतर लवकर शेत मोकळे होते. किडी-रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यावरील खर्चही वाचतो. लागवडही जूनमध्ये करण्यावर भर असतो. सुमारे २८४ एकर शेतीचे व्यवस्थापन हा सोपा विषय नाही. त्यामुळे सकाळी सातपासूनच देशमुख शेतात हजेरी लावतात. त्यांचा सुरवातीपासूनच यांत्रिकीकरणावर भर राहिला आहे. पंधरा वर्षांपूर्वी एक ट्रॅक्‍टर होता. शेतीचा लळा लागल्याने त्यासोबतच उत्पादकता व उत्पन्नाचा ताळेबंद जुळू लागल्याने त्यांनी करार शेतीवर अधिक भर दिला. आजमितीला त्यांच्याकडील ट्रॅक्‍टर्सची संख्या पाचवर पोचली आहे. पेरणी व मळणी यंत्रही आहे. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक होते. हंगामात तूर उभी असताना सोयाबीन काढणी शक्‍य झाली पाहिजे यासाठी पंजाबहून हार्वेस्टर आणला. चौदा लाख रुपयांच्या या यंत्रात आवश्‍यक ते बदल करून घेण्यात आले. तासाला सरासरी दीड एकरांवरील कापणी व मळणी त्यातून शक्‍य होते. सलग शेतीत हेच काम दोन एकरांवर शक्‍य होते. पेरणीयंत्रातही गरजेनुरूप बदल केले आहेत. यंत्रे भाडेतत्त्वावरही उपलब्ध करून देतात. पंधराशे रुपये प्रतिएकर याप्रमाणे शेतकऱ्यांना सोयाबीन कापणी व मळणी करून देण्यात येते. हंगामात सुमारे ३५० एकरांवर हे काम होते. अशाप्रकारची व्यावसायिकता जपत शेती फायदेशीर करण्यावर भर आहे. मोठ्या क्षेत्रावरील कापसाची खरेदी करणे व्यापाऱ्यांना अधिक सोयीचे होते. त्यामुळे वाहतूक खर्चाचा भार देशमुख यांना सोसावा लागत नाही. दरवर्षी दिवाळीपूर्वी वेचणी होऊन बाजारात कापूस दाखल होतो. दिवाळीसाठीच्या पैशांची सोय यातून करता येते. परंतु, यावर्षी पावसामुळे हंगाम लांबला आहे. एकरी उल्लेखनीय उत्पादन  दरवर्षी एकरी सरासरी १४ क्‍विंटल उत्पादन देशमुख यांना मिळते. काही क्षेत्रात १३, काही क्षेत्रात २० क्विंटल असे उत्पादन राहते. फरदड घेण्यात येत नाही. एकरी उत्पादन खर्च सुमारे २२ हजार रुपये येतो. व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेल्या व्यक्‍तींची शेती देशमुख यांनी कसण्यास घेतली आहे. सन २०१७-१८ मध्ये एकरी १३ हजार रुपयांप्रमाणे करारावर शेती मिळायची.आता हे दर १५ हजार रुपयांवर पोचले आहेत. साहजिकच खर्चामध्ये या बाबीचाही समावेश करण्यात येतो. योग्य वेळी कापूस विक्री दरवर्षी योग्य वेळी म्हणजेच चांगले दर असतानाच कापसाची विक्री करण्याचे देशमुख यांचे नियोजन असते. गेल्यावर्षी सुमारे दोनशे एकरांत त्यांनी २८०० क्विंटल कपाशीचे उत्पादन घेतले. पहिल्या वेचणीचा ५०० क्विंटल कापूस ५८०० रुपये प्रतिक्‍विंटल दराने विकण्यात आला. त्यानंतर जून-जुलै या काळात दर ६५०० रुपयांवर पोचले असतानाच्या काळात उर्वरित विक्री केली. दरवर्षी पाचहजार ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत हा दर मिळतो. ट्रॅक्‍टरचलित फवारणी देशमुख यांनी ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्रही विकसित केले आहे. झाडे उंच वाढली तरी या यंत्राद्वारे फवारणी सुलभ करता येते. सात नोझल्सचा वापर यंत्रात करण्यात आला आहे. तणनाशकाची फवारणी करणेही याव्दारे शक्‍य होणार आहे. या यंत्रनिर्मितीसाठी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च आला. मोठ्या क्षेत्रावरील फवारणीसाठी पाण्याची देखील गरज भासते. ही गरज भागविण्यासाठी चार हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टॅंकर खरेदी केला आहे. अनुकरणीय शेती गावातील सुमारे १४ शेतकऱ्यांनी देशमुख यांच्या शेती पध्दतीचा आदर्श घेतला आहे. अनेक शेतकरी त्यांचे मार्गदर्शन घेतात. काही शेतकरी प्रत्येकी ८० ते १५० एकरांपर्यंत शेती करतात. साहजिकच स्वतःसाठी व शेतकऱ्यांसाठी मिळून सुमारे सहाहजार बियाणे पाकिटांची गावातच पुरवठा करण्यासाठी देशमुख यांनी पुढाकार घेतला. संपर्क- मनोहर देशमुख-९८६०३१०६५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com