खडकाळ जमिनीतही पिकवला दर्जेदार पेरू

पेरुची बाग
पेरुची बाग

शेतीच्या ओढीने स्वेच्छा निवृत्ती घेऊन नंदकुमार मगर यांनी डोंगराळ भागातही उत्तम पेरूची फळबाग फुलवली आहे. त्यांच्या शेतीची वाटचाल संपूर्ण सेंद्रियकडे सुरू आहे. विविध पिकांसह वनसंपदेच्या जपणुकीतून एकात्मिक शेतीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

नगर महापालिकेमध्ये अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या नंदकुमार मगर यांना शेतीची फार आवड. नगर शहरापासून उत्तरेकडे आठ किलोमीटरवर असलेल्या जेऊर (बायजाबाई) येथे वडिलोपार्जित शेतीमध्ये डोंगराळ भागातील शेती विकत घेत भर घातली. नोकरी करतानाही डाळिंब, पेरू लागवड यात त्यांचे बारकाईने लक्ष असे. पूर्ण वेळ शेती करण्यासाठी म्हणून त्यांनी दोन वर्षांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतली.  मगर यांची एकूण शेती ४२ एकर असून, एका तळावर असलेल्या ३७ एकर क्षेत्रामध्ये २६ एकर पेरू लागवड १६ वर्षांपूर्वी केलेली आहे.  डोंगराळ आणि खाचखळग्यांच्या शेतीचे सपाटीकरण करून, त्याची योग्य बांधबंदिस्ती केली. शेतीच्या बाजूला मोठा डोंगर असून, येथून येणाऱ्या पावसाच्या व शेतातील पाण्याचे विहिरीत पुनर्भरण केले. अधिक खडकाळ शेतीत तलावातील गाळ टाकून सुपीक केली. यासाठी बॅंकेतून कर्जाऊ रक्कम मिळवली. चार एकर क्षेत्रामध्ये शेवगा लागवड होती. मात्र, नव्या मोठ्या आकाराच्या पेरू लागवडीसाठी एक महिन्यापूर्वी तो काढला. जिरायती शेतीमध्ये डाळिंब लागवड होती, मात्र मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे तिथेही पेरू लागवड केली. अशा प्रकारे हळूहळू त्यांचे पेरू हे मुख्य पीक झाले. आता पेरूचा दर्जा व प्रतिझाड उत्पादनामुळे उत्तम पेरू उत्पादक असा लौकिक परिसरामध्ये मिळवला आहे.   

पेरू लागवड 

  • २००० मध्ये ‘लखनौ ४९ (सरदार पेरू)’ पेरूची दोन हजार रोपे लावली. अंतर २० बाय २० फूट.
  • २०१० मध्ये ‘जी. विलास’ जात. पाच हजार रोपांची सहा बाय सात फूट अंतरावर लागवड. 
  • २६ एकर पेरू बागेमध्ये सुरवातीच्या अवस्थेमध्ये कांदा, सोयाबीन, हरभरा, शेवगा ही आंतरपिके घेतली. लागवडीनंतर तीन वर्षांनी उत्पादन मिळू लागले. 
  • शेतीतील सुविधा  

  • शेतात सौरकंदील, सौरशक्तीवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. एचटीपी पंप, पॉवर टिलर, रोटाव्हेटर अशी यंत्रे आहेत. 
  • सिंचनासाठी पाच विहिरी आहेत. तसेच १३ किमी अंतरावरून नगर येथून उपसा सिंचन केले आहे. हे सर्व पाणी एका विहिरीत एकत्र करून, ठिबकद्वारे दिले जाते. 
  • सेंद्रियकडे जोमदार वाटचाल 

  • सेंद्रिय शेतीचा ओढा असला तरी गेल्या वर्षीपर्यंत ते रासायनिक खतांचा वापर ५० टक्के करत असत. मात्र, या वर्षी संपूर्ण सेंद्रिय करण्याचा निर्णय घेतला. त्याचे चांगले परिणाम शेतीमध्ये दिसू लागले आहेत.  
  • फवारणीसाठी पंचगव्य, जीवामृत, तसेच व्हर्टिसिलिअम लेकॅनी, ट्रायकोडर्मा यांसारख्या जैविक घटकांचा वापर केला जातो. 
  • त्यांच्याकडे चार देशी गाई व तीन म्हशी आहेत. या देशी गाईचे मूत्र, दूध, तूप, दही, शेण वापरून पंचगव्य व जीवामृत तयार केले जाते. शेतात पंचगव्यासाठी दोन ठिकाणी हौद आणि जीवामृतासाठी टाक्‍या तयार केल्या आहेत.  
  • पेरूतील मिलीबगचे नियंत्रण व्हर्टिसिलियम लेकॅनीमुळे ९८ टक्‍क्‍यांपर्यंत होत असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रायकोडर्माच्या वापरामुळे बुरशींचा प्रादुर्भाव मर्यादेमध्ये राहतो. 
  • गांडूळ, कंपोस्ट खतांमुळे  मिळते दर्जेदार उत्पादन  

    झाडाभोवती ४ बाय १ बाय १ फूट आकाराचे चर घेऊन, प्रतिझाड चार ते सहा घमेले शेणखत, गांडूळखत व कंपोस्ट खत देतात. त्यात शेतातील सर्व पालापाचोळा मिसळून गाडले जाते. शेतामध्ये स्वतः दीड टन गांडूळखत तयार करत असले तरी प्रति वर्ष ८ ते ९ टन गांडूळखत विकत घ्यावे लागते.  

    विक्रीचे नियोजन  

  • पूर्वी व्यापाऱ्याला बाग विकत असत. मात्र, त्यातून एकरी केवळ एक ते सव्वा लाख रुपये निव्वळ फायदा होई. गेल्या दोन वर्षांपासून स्वतः विक्रीचे नियोजन करतात. दर्जेदार पेरू अशी ओळख मिळाल्याने अनेक व्यापारी स्वतः संपर्क करतात. स्थानिक पातळीवर हातविक्री करणारे विक्रेतेही येथून खरेदी करतात.  
  • प्रतिझाड सरासरी ३०० किलोपर्यंत फळे मिळतात. काही झाडांना तर ४०० किलोपर्यंत फळे मिळत असल्याचे नंदकुमार यांनी सांगितले. प्रतिक्रेट सहाशे ते साडेसहाशे रुपये सरासरी दर मिळतो. वार्षिक ७० ते ८० हजार रुपये उत्पादनखर्च होतो.  
  • स्थानिक मजुरांना रोजगार 

    झाडांचे एप्रिलपासून पाणी बंद करून ताण दिला जातो. मेअखेरीस खते देऊन, पुढे जूनपासून पुन्हा पाणी देण्याला सुरवात केली जाते. पेरूचा मृग बहर धरतात. त्याची तोडणी नोव्हेंबरमध्ये सुरू होते. तोडणीच्या काळात दररोज साधारण सत्तर स्थानिक मजूर लागतात. बारमाही आठ ते दहा मजूर कामाला असतात.

    शंभर फुटी कांदा चाळ 

    मगर यांच्याकडे कांद्याचे पीक असते. कांदा साठवणीसाठी त्यांनी शंभर फूट लांबीची कांदाचाळ उभारली असून, पन्नास टन कांदा साठवणीची क्षमता आहे.

    मगर यांच्या शेतीची वैशिष्ट्ये  

  • सपाटीकरण, बांधबंदिस्ती, गाळांचा वापर यातून वाढवली सुपीकता.
  • खडकाळ जमिनीवर दर्जेदार व भरघोस पेरू उत्पादन. 
  • गांडूळखत, जीवामृत, पंचगव्यनिर्मिती व नियमित वापर. 
  • गेल्या वर्षापासून संपूर्णपणे थांबवला रासायनिक खतांचा वापर. 
  • मूलस्थानी जलसंधारण, विहीर पुनर्भरणावर भर. 
  • ठिबकद्वारे संपूर्ण सिंचन व्यवस्था.
  • वनसंपदाही जपली... शेतातील एकही झाड तोडायचे नाही, असा पणच नंदकुमार यांनी केला आहे. त्यानुसार घरगुती खाण्यासाठी फळे व भाजीपाल्याचे नियोजन शेतीमध्ये केले आहे. त्यांच्याकडे पेरूसह शंभर नारळ, वीस आंबा, पन्नास सीताफळ, तीन बोर, पाच शेवगा, दोन जांभूळ, आठ आवळा, लिंबू व अंजीर प्रत्येकी दोन, चिंच व चिकू प्रत्येकी एक अशी झाडे जपलेली आहेत. परिसरातील वन्यजीवांसाठी पाणवठे केले आहेत.

    शेतीचे नियोजन  

  • २७ एकर - पेरू
  • दोन एकर - बाजरी
  • वीस गुंठे - ऊस
  • चार एकर १० गुंठे - 
  • कडवळ, मका व चारापिके. 
  • संपर्क : नंदकुमार मगर, ९५६१००४६१२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com