ऊस पीक सल्ला

ऊस पीक सल्ला
ऊस पीक सल्ला

१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्वहंगामी ऊस लागवड करावी. जेणेकरून पुढील काळात पूर कालावधीत जुलै-सप्टेंबरमध्ये उसाचे पूर्ण पीक नदीपूर पाण्याखाली संपूर्ण न जाता उसाचे वाढे (शेंडे) पुराच्या पाण्यावर राहतील. पुरामुळे होणारे उसाचे नुकसान कमी होईल. २) नदी पूर बुडीत क्षेत्रात जलद उंच वाढणाऱ्या, खतमात्रेला प्रतिसाद देणाऱ्या, मध्यम ते उशिरा कालावधीत पक्व होणाऱ्या ऊस जाती उदा. को एम ०२६५, को ८६०३२, को ९२००५, को एम ०९०५७, एम एस १०००१ या सध्या प्रचलित असलेल्या आणि को ८०१४, को ९४०१२, को ७५२७, को ७२१९, को सी ६७१, को ८३७१, को ७४०, को ७७५ आणि को ४१९ या पूर्वीच्या शिफारसीत जातींची निवड करावी. ३) लागवड करण्यासाठी पट्टा पद्धत, जोड ओळ पद्धत, सोड ओळ पद्धत, रुंद सरी पद्धत तसेच लांब सरी पद्धतीचा अवलंब करावा म्हणजे अतिरिक्त पाण्याचा निचरा करताना अडचणी येणार नाहीत शिवाय योग्य आंतरपिके घेता येतील, पीक संरक्षण करता येईल. ४) डिसेंबर-जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लागवड झालेल्या उसास शिफारशीच्या २५ टक्के नत्र, स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खते वाफशावर सरीतून द्यावीत. म्हणजे उसाची वाढ चांगली होऊन उत्पादनातील घट कमी करता येईल. ५) पूरबाधित ऊस बुडख्यातून कापून खोडवा राखावा. त्यासाठी एकात्मिक खात व्यवस्थापन करावे. नांगे पडलेल्या ठिकाणी रोपवाटिकेत प्लॅस्टिक पिशवीत वाढविलेली एक डोळा कांडी रोपांनी नांगे भरावेत. ६) उसाच्या पुन्हा जोमदार वाढीसाठी हेक्टरी ६० किलो नत्र (१३० किलो युरिया), ४० किलो पालाश (६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) मात्रा द्यावी. याचबरोबरीने २ टक्के डीएपी, १ टक्के युरिया, १ टक्के पोटॅशच्या मिश्रणाची फवारणी पिकावर करावी. नदी पूर बुडीत परिस्थित उसावर झालेले परिणाम ः मातीच्या गुणधर्मावर होणारे परिणाम ः १) निचऱ्याच्या जमिनी पूर बुडीत झाल्यास मातीतील सल्फाईड आयनमुळे सामू वाढतो आणि अशा जमिनीत पुन्हा पाण्याचा निचरा झालेनंतर सल्फेट ऑयनमुळे तीचा सामू कमी होतो. २) जमिनीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने लोह, अॅल्युमिनियम आणि मँगनीज या धातूंचे विद्राविकरण वाढते. ३) जमिनीतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मुळे आणि सूक्ष्म जीवजंतूंची कार्यक्षमता कमी होऊन ऑक्सिजनविरहित परिस्थिती निर्माण होते. ४) जमिनीतील अन्नद्रव्यांचे विशेषतः नत्राचे मोठ्या प्रमाणात डीनायट्रीफिकेशन होऊन ऱ्हास होतो. ५) पीक क्षेत्रात जास्त दिवस पाणी राहिल्याने जमिनीची सछिद्रता व जैविक गुणधर्म, तसेच जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये वाहून जाऊन अथवा त्याचे स्थिरीकरण होऊन रासायनिक सुपीकता कमी होते. परिणामी नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, जस्त या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊन पिक वाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता आणि पाण्याचे शोषण कमी होऊन त्यांचा ऊस उत्पादनावर आणि रसातील साखरेवर अनिष्ठ परिणाम होतो. उसावर होणारा परिणाम ः १) पुरबुडीत क्षेत्रात पिकाच्या वाढीसाठी, विकासासाठी आवश्यक ऑक्सिजनच्या तुटवड्यात अडीनोसीन ट्राय फॉस्फेटचा पुरवठा कमी होऊन मुळांच्या वाढीसाठी आणि कार्यक्षमतेसाठी पुरविण्यात येणारी शक्ती अपुरी पडते आणि अतितीव्र ऑक्सिजन पुरवठा कमतरतेच्या ठिकाणी पिकाच्या श्वासोच्छवासाची प्रक्रिया ही पूर्णता किण्वनाकडे वळते. अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे ः १) नदी पूर बुडीत क्षेत्रात नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक या अन्नद्रव्यांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पिकाची पाने पिवळी पडून वाढ खुंटते, पिकाच्या पानाच्या पेशीतील नत्राचे प्रमाण घटते. २) पानातील प्रथिनांचे आणि अॅमिनो आम्लांची जडण घडण आणि प्रमाण घटून पीक वाढीसाठी आवश्यक एन्झाईम्सची क्रिया मंदावते, एकंदरीत नत्राचे संतुलन बिघडते. अन्नद्रव्यांचे वहन ः १) ऑक्सिजन आणि कार्बोदकांच्या वहनावर अनिष्ठ परिणाम होऊन पिकातील एकूण नत्राच्या जवळपास ९० टक्के क्षेत्र हे नॉन प्रोटीन- नायट्रोजन स्वरुपात राहते. हे असंतुलन ऊस रसाची गुणवत्ता बिघडवून साखर उतारा कमी होतो. २) दलदल जमिनीतील ऊस रसात इन्व्हर्ट शुगरचे प्रमाण, नॉन प्रोटीन नत्र, कोलाइड्स आणि अॅशचे जास्त प्रमाण हे घटक साखर तयार करण्याच्या क्रियेत अडथळे आणतात. असा ऊस साखर तयार करणेसाठी अयोग्य ठरतो. संपर्क ः ०२३१- २६५१४४५४ (प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com