नियोजन आडसाली ऊस लागवडीचे...

आडसाली ऊस लागवड अनेकार्थाने फायदेशीर आहे. ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीची निवडीपासून तोडणीपर्यंत योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
नियोजन आडसाली ऊस लागवडीचे...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचे...

राज्यामध्ये उसाची लागवड आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू अशा तीनही हंगामात केली जात असली तरी आडसाली हंगाम फायदेशीर दिसून येतो. उगवणीपासूनच आडसाली उसास अनुकूल हवामान मिळाल्याने उगवण चांगली होऊन फुटवा जोमदार येतो. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसणाऱ्या कालावधीत आडसाली ऊस आठ ते नऊ महिन्यांचा असल्याने पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करू शकते.  कीड व रोग यांचा प्रादुर्भाव सुरू व खोडवा उसाच्या तुलनेत कमी राहतो.  जमिनीची निवड :   उसासाठी ७.५ ते ८ सामू असलेली मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. अशा जमिनीची खोली ६० ते १२० सेंटिमीटर असावी. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्‍क्‍यापेक्षा जास्त असावे.  बेणे निवड : राज्यामध्ये उसाचे उत्पादन घटण्यामागील कारणामध्ये बेण्याच्या दर्जाकडे होणारे दुर्लक्ष हे एक प्रमुख कारण आहे. यासाठी बेणे मळ्यात वाढवलेले ९ ते ११  महिने वयाचे निरोगी रसरशीत आणि अनुवंशिक दृष्ट्या शुद्ध बेणे वापरावे. ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. दर ३ वर्षांनी नव्या बीजोत्पादनामधील बेणे  वापरावे.

 आडसाली उसाच्या सुधारीत जाती  
जात हंगाम सरासरी  ऊस उत्पादन  (मे.टन./ हेक्टर) सरासरी  साखर उत्पादन  (मे.टन./ हेक्टर) वैशिष्ट्ये
को- ४१९ आडसाली १५४.७० १९.२० रसवंतीसाठी उत्तम व गुळासाठी चांगली.
को- ८६०३२ ( नीरा ) आडसाली १५९.०० २२.४२ अधिक ऊस व साखर उतारा, उत्तम खोडवा.
को.एम -०२६५ (फुले २६५) आडसाली २००.०० २६.८२ अधिक उत्पादकता, उत्तम खोडवा व क्षारपड  जमिनीसाठी योग्य.
को .एम -८८१२१ (कृष्णा) आडसाली १६६.०० २३.०० उशिरा पक्वता, पाण्याचा ताण सहन करते व कानी रोगास मध्यम प्रतिकारक, उत्तम खोडवा.
 व्ही.एस.आय ०८००५ आडसाली १६२.१६ १८.७३ अधिक उत्पादकता व साखर उतारा, उत्तम खोडवा तसेच जलद वाढणारी.

      चांगल्या बेण्याची वैशिष्ट्ये 

  • उसाचे बेणे रसरशीत व सशक्त असावे. बेणे शुद्ध , भेसळ विरहित असावे.
  • बेण्याचे डोळे फुगीर व हिरवेगार असावेत. बेणे ९-११ महिने वयाचे असावे.
  • रोग व कीड विरहित असावे.डोळ्यावरील पाचट काढलेले नसावे.
  • १० टक्के पेक्षा जास्त लोळलेला नसावा. 
  •       लागवड तंत्र 

  • आडसाली लागवड १५ ऑगस्ट या कालावधीत करावी. 
  • सरी पद्धत ः लागवडीसाठी मध्यम जमिनीत १०० ते १२० सें.मी.  व भारी जमिनीत १२० ते १५० सें.मी. अंतरावर सरी पाडावी.
  • जोडओळ पट्टा पद्धत ः  जोडओळ पट्टा पद्धतीने लागवड करायची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फुटावर तर भारी जमिनीसाठी ३.० फुटावर सलग सऱ्या पाडाव्यात. दोन सरीत उसाची लागवड करून एक सरी रिकामी सोडावी. त्यामुळे ७५-१५० सें.मी. व ९०-१८० सें.मी. या पद्धतीने सरी पडेल. रिकाम्या ओळीत दोन्ही बगलेला आंतरपीक किंवा हिरवळीच्या खतासाठी धैंचा किंवा ताग घेता येईल. 
  • उसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डोळा पद्धतीने डोळा वरच्या बाजूस ठेवून ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी.
  • दोन डोळ्यांची टिपरी वापरायची असल्यास दोन टिपऱ्या मधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावे.
  • वरील पद्धतीने लागवड करण्यासाठी एकरी दहा हजार टिपरी भारी जमिनीसाठी व बारा हजार टिपरी मध्यम जमिनीसाठी लागतात. भारी जमिनीत कोरड्या पद्धतीने लागवड करून पाणी द्यावे.
  •     रोपे तयार करून लागवड 

  • ट्रेमध्ये कोकोपीट व बेणे मळ्यातील शुद्ध निरोगी बेणे वापरून रोपे तयार करावीत. अशी ३० ते ४५ दिवसांची रोपे लागवडीसाठी वापरावीत.
  • ऊस रोपे तयार करताना कांड्यासाठी बुरशीनाशक, कीटकनाशक व जिवाणूंची बीजप्रक्रिया करावी. 
  • रोपे वापरून उसाची लागवड केल्यास एकरी उसाची संख्या ४० ते ५० हजार मिळू शकते. उसाचे वजन २ ते ३ किलोपर्यंत मिळते.
  • एकरी हमखास ७५ टनांपेक्षा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी रोप लागवड तंत्राचा व शिफारशींचा वापर करावा.
  • रोप लागवड पद्धतीत नेहमीच्या लागवडीस ३० ते ४५ दिवसांपर्यंत जोपासण्यासाठी लागणारे पाणी, तणनियंत्रण, खते देखरेख यामध्ये बचत होते. बेणेप्रक्रिया 
  •  बुरशीजन्य रोग, खवले कीड, पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी ‌
  • कार्बेन्डाझिम १ ग्रॅम व डायमेथोएट (३०% प्रवाही) २.६५ मिली प्रति लिटर पाणी या द्रावणात बेणे १० मिनिटे बुडवावे. (ॲग्रेस्को शिफारस)
  • हुमणी किडीचा प्रादुर्भाव असल्यास

  • इमिडाक्लोप्रिड ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १० मिनिटे बेणे बुडवून ठेवावे.  (ॲग्रेस्को शिफारस)
  • ॲसेटोबॅक्टर १० किलो आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक १.२५ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून तयार केलेल्या द्रावणात उसाच्या टिपऱ्या ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. यामुळे नत्र खतामध्ये ५० टक्के तर स्फुरद खतामध्ये २५ टक्के बचत होते.
  •  आंतरपिके -  जमिनीच्या प्रकारानुसार खरीप हंगामात भुईमूग, चवळी, भाजीपाला इ. आंतरपिके घेता येतात.
  •     एकात्मिक खत व्यवस्थापन

  • शिफारशीनुसार चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत टाकून जमिनीत मिसळावे. यापैकी अर्धी मात्रा दुसऱ्या नांगरटी पूर्वी द्यावी. उर्वरित मात्रा सरीमध्ये द्यावी. 
  • शेणखत अगर कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन पीक फुलकळी अवस्थेत असताना जमिनीत गाडावे. 
  • जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे. त्यानुसार खतांचे नियोजन करावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास गरजेनुसार हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मँगनीज सल्फेट व ५ किलो बोरॅक्‍स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये (१०: १ प्रमाणात) २ ते ३ दिवस मुरवून सरीमध्ये चळी घेऊन मातीआड करावे.
  • को-८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या जादा खत मात्रेस प्रतिसाद देते. प्रती हेक्‍टरी नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची २५ टक्के जादा मात्रा द्यावी.
  • अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू या जिवाणू खताची बीजप्रक्रिया केल्यास नत्र खताची मात्रा ५० टक्के व स्फुरद खताची मात्रा २५ टक्के कमी करून द्यावी.
  • आडसाली उसासाठी रासायनिक खते देण्याचे वेळापत्रक (किलो प्रती हेक्टर)
    खत मात्रा  देण्याची वेळ  नत्र (युरिया) स्फुरद (सिंगल  सुपर फॉस्फेट) पालाश (म्युरेट  ऑफ पोटॅश) 
    लागवडी वेळी ४०(८७) ८५(५३१) ८५(१४२)
    लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी १६०(३४७) - -
    लागवडीनंतर १२ ते १६ आठवड्यांनी ४०(८७) - -
    मोठ्या बांधणीच्या वेळी १६०(३४७) ८५(५३१) ८५(१४२)
    एकूण ४००(८६८) १७०(१०६२) १७०( २८४ )

     : डॉ. शरद जाधव, ९९७०९९६८९०,  ( विषय विशेषज्ञ (कृषी विद्या), कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com