जिद्द, कष्टातून फळबागेत भामरे यांनी साधली प्रगती

सुनिल भामरे यांची द्राक्ष शेती.
सुनिल भामरे यांची द्राक्ष शेती.

नाशिक जिल्ह्यातील पिंगळवाडे (ता. सटाणा) येथील सुनील राजाराम भामरे यांनी कष्ट अन् जिद्दीच्या बळावर द्राक्ष व डाळिंबाची शेती यशस्वी केली. हंगामनिहाय पाण्याचे काटेकोर नियोजन, जैविक घटकांचा वापर, आच्छादन पद्धती यातून निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंबाचे उत्तम नियोजन साधले आहे. यावर्षीच्या प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीवर मात करण्यासाठी आंतरपिकांवर जोर देत आहेत. नाशिक जिल्ह्यातील पिंगळवाडे (ता. सटाणा) येथे सुनील राजाराम भामरे यांची वडिलोपार्जित ७ एकर शेती आहे. १९८७ मध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे शेतीची जबाबदारी आली. सुरुवातीला एक दोन वर्षे पारंपरिक शेती केली तरी पुढे त्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. शेतीचे व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापन करण्यावर त्यांनी भर दिला. दरवर्षी पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादनातून त्यांच्या अर्थकारणाला चांगली गती मिळाली. आपल्याकडील उपलब्ध भांडवल शेतीत गुंतवत त्यातून अधिक परतावा मिळवण्याचे त्यांचे हंगामनिहाय नियोजन यशस्वी ठरले आहे. पुढे त्यांनी ९ एकर क्षेत्र खरेदी केले असून, त्यांचे क्षेत्र १६ एकरपर्यंत पोचले आहे.  

एकूण क्षेत्र : १६ एकर
फळपीक .वाण क्षेत्र (एकर)
द्राक्ष क्लोन, सुधाकर, सुपर सोनाका.
डाळिंब आरक्ता.
सीताफळ एनएमके१
प्रति एकर उत्पादन, उत्पन्न
पीक उत्पादन (टन) उत्पादन खर्च (रुपये) दर (रुपये प्रति किलो)
डाळिंब १५ ते १६ १.७० लाख ७० ते ८० (व्यापारी)
द्राक्षे ८ ते १० २.४० लाख ७० ते ८० (स्थानिक बाजारपेठ) आणि ९० ते १०० (निर्यातीसाठी)

असे आहे जलव्यवस्थापन : त्यांच्याकडे असलेल्या विहिरी, बोअरवेल यांचे पाणी खरीप आणि रब्बी हंगामासाठी पुरते. उन्हाळ्यामध्ये विशेषतः मार्च मध्यावधीपासून पुढे पाऊस सुरू होईपर्यंत द्राक्ष बागांसाठी पाण्याची टंचाई भासते. त्यावर मात करण्यासाठी सुनील यांनी २० गुंठे क्षेत्रात २० लाख लिटर क्षमतेचे शेततळे केले आहे. पावसाळ्यामध्ये शेततळ्यात पाणी साठवून, त्याचा टंचाईच्या काळामध्ये वापर केला जातो. प्रवाही सिंचनाचा वापर टाळून संपूर्ण क्षेत्रावर सुक्ष्मसिंचन पद्धत वापरली आहे. सिंचनाचे नियोजन करताना...

  • पाण्याची टंचाई असल्याने झाडाच्या गरजेनुसार पाणीपुरवठा.
  • आर्द्रता टिकून राहण्यासाठी गरजेनुसार जैविक आच्छादनाचा वापर करतात.
  • पाण्याच्या उपलब्धतेचा सातत्याने आढावा घेऊन आगामी सिंचनाचे नियोजन करतात.
  • पूर्वहंगामी द्राक्ष हंगामाचे व्यवस्थापन : दरवर्षी द्राक्ष काढणीनंतर पुढील हंगामाच्या कामांचे नियोजन केले जाते. सुरुवातीला खरड छाटणीची कामे नंतर काडी विरळणी, सबकेन, बगलफूट, शेंडाबाळी, शेंडे मारणे ही सर्व कामे शेतमजुरांकडून वेळेवर केली जातात. किमान खर्चात गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन हे ध्येय ठेवत केलेले सुनील भामरे यांचे नियोजन वाखाणण्यासारखे आहे.

  • द्राक्ष काढणी हंगाम संपल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात खरड छाटणी.
  • खरड छाटणीनंतर पुढील दोन महिने काडी तयार करण्याचे व्यवस्थापन.
  • एप्रिल, मे महिन्यात पाणी व खत व्यवस्थापनाकडे काटेकोर लक्ष देतात.
  • रेसिड्यू फ्री निर्यातक्षम द्राक्षनिर्मितीसाठी जैविक घटकांचा भरपूर वापर.
  • जैविक आच्छादनावर भर देत पाण्याची बचत.
  • उत्पादन वाढ व निर्यातक्षम द्राक्षासाठी सातत्याने विविध माती व देठ परीक्षण करून वेळोवेळी निर्णय घेतले जातात.
  • हवामानासंबंधी माहिती मिळवण्यासाठी मोबाईलचा योग्य वापर, त्यानुसार आगामी उपाययोजनांचे नियोजन.
  • कुटुंबात कामाची विभागणी : सुनील भामरे यांचे थोरले चिरंजीव अरुण या दोघांचाही कमी खर्चात बागांचे नियोजन करण्याकडे कल असतो. सुनील भामरे हे खत व्यवस्थापन, आर्थिक नियोजन करतात. गुणवत्तापूर्ण व रसायन अवशेषमुक्त द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी जैविक खताचा अधिक वापर ते करतात. अरुण याच्याकडे पीक संरक्षण, सिंचन, मशागती यांचे नियोजन असते. दोघांनी हंगामपूर्व निर्यातक्षम द्राक्ष व डाळिंब उत्पादनासाठी वेळापत्रक तयार केले आहे. त्याचा अवलंब करतात. विक्री नियोजन : उत्पन्न एकूण उत्पादनापैकी ८० टक्के द्राक्षे व डाळिंबाची निर्यात करण्यात येते. उर्वरित २० टक्के शेतीमाल स्थानिक बाजारात मागणीनुसार दिला जातो. रशिया, दुबई, बांगलादेश येथे अधिक निर्यात होते. उर्वरित द्राक्ष व डाळिंब स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री करतात. कौटुंबिक खर्चाचेही उत्तम नियोजन : कौटुंबिक गरजा भागविताना अनावश्यक खर्चाला फाटा देत आर्थिक नियोजन बारकाईने केले जाते. शेतातील मुख्य पिकांव्यतिरिक्त जमिनीमध्ये आवळा, चिकू व विविध भाजीपाला पिकांची लागवड करतात. अगदी शेताच्या बांधाजवळील ५ आवळ्याच्या झाडांपासून दरवर्षी दिवाळीआधी ५ क्विंटल आवळा उत्पादन होते. यातून २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. हे उत्पन्न दिवाळी सणाचा फराळ, लहान मुलांचे कपडे व अन्य किरकोळ खरेदीसाठी उपयुक्त ठरत असल्याचे सुनील भामरे सांगतात. कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला हा शेतातच रसायन अवशेषमुक्त तयार करण्यावर भर असतो. परिणामी, उत्तम दर्जेदार, ताज्या भाज्या कमी खर्चात उपलब्ध होतात. आधुनिक यंत्रसामग्री शेतीमध्ये आवश्यक सर्व यंत्रसामग्री उदा. २ ट्रॅक्टर, १ स्प्रे युनिट, १ स्लरी गाडी व अन्य छोटीमोठी यंत्रे, अवजारे स्वमालकीची घेतली आहेत. ती ठेवण्यासाठी घराशेजारी स्वतंत्र शेड बांधले आहे. नावीन्याचा ध्यास पारंपरिक शेतीला फाटा देत फलोत्पादन आणि आधुनिक शेतीकडे वळलेले भामरे कुटुंबीय सातत्याने द्राक्ष व डाळिंब तज्ज्ञांच्या संपर्कात असते. द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने आयोजित चर्चासत्रे, परिसंवाद यात भाग घेतात. नाशिक येथील द्राक्ष विज्ञान मंडळाचे अरुण भामरे हे सक्रिय सदस्य आहेत. विविध शेतकरी मेळावे, प्रदर्शनांना भेटी देऊन हवामानविषयक ॲप, खते, कीड व रोग नियंत्रण व निर्यातक्षम उत्पादन यावरील नवीन माहिती ते मिळवतात. कष्ट, नियोजनाचा गौरव : सुनील भामरे यांच्या कुटुंबीयांमध्ये त्यांची पत्नी संगीता, अरुण आणि कल्पेश ही दोन मुले, सुना व दोन नाती यांचा समावेश आहे. अरुण यांनी १० वी नंतर आयटीआयचा मोटर मेकॅनिक अभ्यासक्रम केल्यानंतर पूर्णवेळ शेती करतात. कल्पेशने इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेली कम्युनिकेशन ही अभियांत्रिकीची पदवी मिळविली असून, पुणे नामांकित कंपनीत कार्यरत आहे. कुटुंबासाठी टुमदार बंगला, चारचाकी अशी सर्व स्वप्ने कष्टातून पूर्ण केली आहेत. द्राक्ष व डाळिंब शेतीतील नव्या प्रयोगाची दखल घेत अरुण यांना ‘ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन’ यांनी ‘राज्यस्तरीय डाळिंब उत्पादक पुरस्कार’ दिला आहे. त्यांच्या आई सौ. संगीता यांनागी महिला शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. संकटाशी दोन हात चालू वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, उत्पादनाची प्रत घसरली. मात्र, नैसर्गिक आपत्तीचे संकट व मोठे आर्थिक नुकसान सोसूनही मोठ्या उमेदीने ते पुन्हा उभे राहिले आहेत. चालू वर्षी नवीन पीक म्हणून कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळाची दोन एकर क्षेत्रावर लागवड केली. या नवीन लागवडीमध्ये टरबुजाचे आंतरपीक घेण्याचे नियोजन केले आहे. बागांची काढणी झाल्यानंतर बागांमध्ये काकडी लागवड केली आहे. द्राक्ष हंगामात नुकसान झाले असले तरी आर्थिक गणित सावरण्यासाठी आंतरपिकाचे नियोजन केले आहे. संपर्क : अरुण सुनील भामरे, ९४२१३९३०९७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com