तंत्र लसूण लागवडीचे...

लसूण लागवडीसाठी १.५ मीटर रुंद, १५ सें.मी. उंच आणि उपलब्ध जमिनीप्रमाणे लांबी ठेऊन गादी वाफे तयार करावेत. दोन वाफ्यामधील अंतर ५० ते ६० सें.मी. ठेवावे.
तंत्र लसूण लागवडीचे...
तंत्र लसूण लागवडीचे...

लसूण लागवडीसाठी १.५ मीटर रुंद, १५ सें.मी. उंच आणि उपलब्ध जमिनीप्रमाणे लांबी ठेऊन गादी वाफे तयार करावेत. दोन वाफ्यामधील अंतर ५० ते ६० सें.मी. ठेवावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे प्रत्येक गादीवाफ्यावर एक किंवा दोन ठिबकच्या नळ्या अंथराव्यात. वापसा अवस्थेमध्ये पाकळ्यांची लागवड करावी. लसूण तापमानास अत्यंत संवेदनशील आहे. म्हणून अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीचा योग्य हंगाम साधावा. वाढीच्या काळात थंड आणि किंचित दमट हवामान, तर कंद परिपक्व होताना काढणीच्या काळात कोरडे हवामान लागते. उशिरा लागवड झाली तर कंदाचा आकार कमी होतो, वजन कमी भरते,उत्पादन कमी येते. १) कंदाच्या चांगल्या वाढीकरिता पाण्याचा उत्तम निचरा होणारी भुसभुशीत व कसदार जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७ असावा. मध्यम काळ्या जमिनीत सेंद्रिय खतांची मात्रा वाढवावी. भारी काळ्या, चोपण, मुरमाड व हलक्या जमिनीत कंद नीट पोसला जात नाही. त्यामुळे अशा जमिनीत लागवड करू नये. २) सुधारित जातींचे शुद्ध व खात्रीलायक बेणे वापरावे. पाकळ्या वेगळ्या करताना वरच्या पापुद्रयाला किंवा पाकळ्यांना इजा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. साधारणपणे ३.५ ते ५.८ ग्रॅम वजनाच्या आणि ०.५ ते १ सें.मी. व्यास असलेल्या पाकळ्या लागवडीसाठी वापराव्यात. लहान पाकळ्या लावल्या तर गड्डा उशिरा तयार होतो. उत्पादनात घट होते. ३) मागील हंगामात तयार झालेल्या थंड व कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले मोठ्या आकाराचे गड्डे लागवडीसाठी निवडावेत. एक हेक्टर लागवडीकरिता ३०० ते ५०० किलो पाकळ्या लागतात. पोचट किंवा पिवळसर रंगाच्या, लहान पाकळ्या वापरू नयेत. ४) चांगला कंद पोसण्यासाठी जमिनीचा एक ते दीड फुटापर्यंतचा भाग भुसभुशीत असणे आवश्यक आहे. शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. लागवड सर्वसाधारणपणे सपाट वाफ्यात केली जाते. परंतु गादी वाफ्यावर लागवड केल्यास कंद मोठे होऊन उत्पादनात वाढ होते. लागवड तंत्र ः १) १.५ मीटर रुंद, १५ सें.मी. उंच आणि उपलब्ध जमिनीप्रमाणे लांबी ठेऊन गादी वाफे तयार करावेत. दोन वाफ्यामधील अंतर ५० ते ६० सें.मी. ठेवावे. २) जमिनीच्या मगदुराप्रमाणे प्रत्येक गादीवाफ्यावर एक किंवा दोन ठिबकच्या नळ्या अंथराव्यात. लागवडीच्या आधी वाफे भिजवून घ्यावेत. वापसा अवस्थेमध्ये पाकळ्यांची लागवड करावी. ३) गादी वाफ्यात रुंदीशी समांतर १० सें.मी. अंतरावर खुरप्याने रेषा पाडून त्यात १० सें.मी. अंतरावर पाकळ्या उभ्या ५-७.५ सें.मी. खोलीवर लावून गांडूळखत मिश्रित मातीने झाकाव्यात. लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्यांवर बुरशीनाशकाची (२ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाणी) प्रक्रिया करावी. खत व्यवस्थापन ः १) चांगल्या वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी पुरेशा प्रमाणात शेणखत जमिनीत मिसळावे. या व्यतिरिक्त नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा रासायनिक खतातून देणे आवश्यक आहे. २) माती परिक्षणानुसार प्रती हेक्टर १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. ५० टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद, पालाश याची मात्रा पाकळ्यांची टोकण करण्यापूर्वी द्यावी. उरलेली नत्राची मात्रा दोन भागात किंवा हप्त्यात विभागून द्यावी. पहिली मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी आणि दुसरी मात्रा ४५ ते ५० दिवसांनी द्यावी. नत्राची मात्रा लागवडीनंतर ६० दिवसांनी देऊ नये. त्यामुळे उत्पादन व साठवणुकीवर विपरीत परिणाम होतो. हे पीक गंधकयुक्त खतास चांगला प्रतिसाद देतात. मिश्रखते वापरल्यामुळे आवश्यक गंधकाची पूर्ती होत नसल्याने लागवड करण्यापूर्वी प्रती हेक्टर ५o किलो गंधक जमिनीत मिसळावे. ३) वाढीच्या टप्यात झिंक फॉस्फेट, मॅंगेनीज सल्फेट व कॉपर सल्फेट यांची फवारणी ०.५ टक्के तर फेरस सल्फेटची फवारणी ०.५ ते १.० टक्के फायदेशीर ठरते. सुधारीत जाती भीमा ओंकार ः कंद मध्यम आकाराचे, घट्ट आणि पांढरे, एका कंदात १८ ते २० पाकळ्या असतात. लागवडीपासून १२० ते १३५ दिवसांत काढणीस येते. ५.५ टन प्रती एकर उत्पादन मिळू शकते. भीमा पर्पल ः कंद मध्यम आकाराचे, घट्ट व जांभळे, एका कंदात १६ ते २० पाकळ्या, लागवडीपासून १३५ ते १५० दिवसांत पीक तयार होते, ६.५ टन प्रती एकर पर्यंत उत्पादन मिळू शकते. अॅग्रीफाउंड व्हाईट (जी ४१) ः लागवडीपासून १२० ते १३५ दिवसात काढणीस येतो. कंद मध्यम ते मोठा साधारण जाडी ४ ते ४.५ सेंमी व उंची ४.५ सेंमी असते. गड्ड्यामध्ये १३ ते १८ पाकळ्या असून रंग पांढरा असतो. स्वाद मध्यम तिखट असून सरासरी एकरी ५ ते ६ टन उत्पादन मिळते. श्वेता ः कंद पांढरा शुभ्र, ५.२ सेंमी जाड व ५ सेंमी उंचीचा असतो. एका कंदामध्ये २२ ते ३३ पाकळ्या असतात. १३० ते १३५ दिवसात काढणीस तयार होऊन एकरी ४० क्विंटल उत्पादन मिळते. गोदावरी ः कंद मध्यम, जांभळट पांढरा असतो. कंदामध्ये २० -२५ पाकळ्या असतात. कंद ४.३५ सेंमी जाड व ४.३ सेंमी उंचीचा असतो. १४० ते १४५ दिवसात काढणीस तयार होऊन एकरी ४० ते ४५ क्विंटल उत्पादन मिळते. यमुना सफेद (जी २८२) ः कंद घट्ट, पांढरा १ ते ६ पाकळ्यांचा असून ५.६ सेंमी जाड व ५.५ ते ६ सेंमी उंचीचा असतो. १४० ते १५० दिवसात काढणीला येतो. निर्यातक्षम गुणवत्ता, एकरी ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळते. पाणी व्यवस्थापन ः १) लसणाची मुळे जमिनीच्या १५ ते २० सें.मी. च्या थरात असतात. त्यामुळे वरच्या थरात ओलावा कायम राहणे आवश्यक असते. या पिकास थोडे परंतु नियमित पाणी लागते. लसणाच्या पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे. २) लागवड करण्यापूर्वी ठिबक किंवा तुषार सिंचन चालू करून वाफ्याचा १५ ते २० सें.मी. खोलीपर्यंतचा भाग पूर्ण ओला होईपर्यंत पाणी द्यावे. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. ३) ठिबक सिंचनावर लसणाची वाढ चांगली होते. उत्पादन अधिक येते. पाण्याची बचत होते, तण व किडींचा उपद्रव कमी होतो व उत्पादनात वाढ होते. संपर्क ः डॉ. संजुला भावर,८६००३४४०९७ (कृषि विज्ञान केंद्र खामगाव, जि.बीड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com