बावीस एकरांत शंभर टक्के ‘ड्रीप अॅटोमेशन’

ग्राहकाच्या तसेच बाजारपेठेच्या मागणीनुसार आपल्या उत्पादनाची गुणवत्ता नेमकी कशी असायला हवी हे ठरविताना ॲटोमेशन तंत्राचा हातभार लागतो. दिलेल्या पाण्याचा, खताचा प्रत्येक थेंब, प्रत्येक कण उपयोगात आणला जातो. परिणामी निर्यातक्षम उत्पादन मिळते. : रतन निकम- ९८६०२६८१३२
ड्रीप ॲटोमेशन यंत्रणेसह रतन निकम.
ड्रीप ॲटोमेशन यंत्रणेसह रतन निकम.

नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील रतन आनंदराव निकम या अभ्यासू शेतकऱ्याने आपल्या २२ एकर निर्यातक्षम बागेसाठी संपूर्ण स्वयंचलित ठिबक (ड्रीप ॲटोमेशन) केले आहे. या तंत्राचा वापर केल्याने मजुरी, वेळ, श्रम यात बचत झालीच, शिवाय उत्पादनाचा दर्जाही एकसमान मिळण्यास मदत झाली आहे.    ना शिक जिल्हा निर्यातक्षम द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. याच जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील रतन आनंदराव निकम या वय वर्षे ३२ असलेल्या युवा शेतकऱ्याची यशकथा प्रेरणादायी म्हणावी लागेल. बीकॉम, एमबीएपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. रतन यांच्या अनुषंगाने बोलायचे तर उच्चशिक्षित तरुण जेव्हा जाणीवपूर्वक शेती हे करिअर निवडतो, तेव्हा तो वेगळं काही करण्याचा ध्यास घेतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. त्यातून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. 

रतन यांची प्रयोगशील शेती  चांदवड तालुक्यात येणाऱ्या वडनेर भैरव, शिंदवड या गावांच्या शिवेजवळ रतन यांची २२ एकर शेती आहे. संपूर्ण २२ एकरांत द्राक्ष हेच पीक असून त्यात १८ एकर सोनाका तर चार एकर थॉमसन वाण आहे. एकीकडे निर्यातक्षम गुणवत्तेचा ध्यास आणि दुसरीकडे पाणी टंचाईचा अडथळा ही कसरत त्यांना प्रत्येक हंगामात करावी लागली आहे. सर्व समस्यांवर मात करण्यासाठीच रतन शंभर टक्के ड्रीप ॲटोमेशनकडे वळले. 

ड्रीप ॲटोमेशन व पाणी व्यवस्थापन 

  • विहिरी व कालव्याचे पाणी शेततळ्यात साठविले जाते. 
  • तेथून पाणी फर्टिगेशन प्लॅंटमध्ये जाते.
  • तेथून ठिबकद्वारे बागेला दिले जाते.
  • शेततळे व पंपांसाठी प्लॅस्टिक ड्रम  २०१६ मध्ये २०० फूट रुंद, २०० फूट लांब तर ३२ फूट खोल शेततळे घेतले आहे. त्याची क्षमता एक कोटी लिटरची आहे. त्यात दोन मोटार पंप टाकून ते पाणी फर्टिगेशन प्लॅंटपर्यंत नेता येते. पंप पाण्याच्या तळाशी न टाकता ते पाण्यात वरच्या तरंगते राहून गरजेपुरतेच पाण्यात बुडतील यासाठी प्लॅस्टिक ड्रमचा वापर केला आहे. त्यामुळे मातीच्या तळाशी पंपाचा संपर्क येत नाही. तसेच ‘हेडलॉस’ कमी होतो. पंपाची क्षमता वाढते.  

    फर्टिगेशन प्लॅंटची रचना   

  • फर्टिगेशन प्लॅंटची स्वतंत्र इमारत
  • त्यात प्रत्येकी २० हजार लिटर क्षमतेचे चार सॅन्ड फिल्टर्स ,त्यापुढे अतिसूक्ष्म कचरा गाळून जाण्यासाठी स्पिन क्‍लिन फिल्टर, त्यापुढे वॉटर मीटर, त्याला पुन्हा पाच फर्टिलायझर्स टॅंक अशी जोडणी
  • पुढे प्रत्येक प्लॉटसाठी स्वतंत्र व्हॉल्व्ह यंत्रणा
  • या सर्व बाबींना नियंत्रित करणारे मध्यवर्ती युनिट
  • पाणी व खत देण्यासंदर्भात संगणकीय प्रणालीद्वारे ‘प्रोग्रॅमिंग केले जाते. यात पुढील १४ दिवसांचे पाणी व खतांचे नियोजन आगाऊ करता येते. त्यात गरजेनुसार बदलही (एडिटिंग) करता येतो. 
  • कार्यपद्धती 

  • विद्राव्य खत योग्य प्रमाणात ‘फर्टिगेशन टॅंक’मध्ये टाकले जाते.
  • मुख्य युनिटमध्ये कालावधी, प्लॉट नंबर, किती प्रमाणात खत द्यावयचे याबाबत ‘प्रोग्रॅम’ दिला जातो.
  • यात ‘बेसिक प्रोग्रॅम’ व त्यानंतर ‘डोसिंग’ हा ‘उप प्रोग्रॅम’ असतो. त्यात अधिक सविस्तर माहिती भरली जाते. हा ‘प्रोग्रॅम’ किती दिवस कालावधीसाठी करायचा याचीही माहिती नोंदली जाते. 
  • प्रत्यक्ष फर्टिगेशन सुरू झाल्यानंतर काही काळ फक्त पाणी सोडले जाते. तर फर्टिगेशन सुरू झाल्यानंतर अखेरची १० ते १५ मिनिटे पुन्हा पाणी दिले जाते.
  • गुणवत्तेत वाढ रतन युके मार्केटसाठी एकरी १३ ते १४ टन उत्पादन तर बांगलादेश निर्यातीसाठी १५ ते १६ टन उत्पादन घेतात. सोनाका बांगलादेशात तर थॉमसन युके मार्केटला निर्यात होते. एका भारतीय निर्यातदार कंपनीसोबत त्यांनी करार केला आहे. त्यामुळे परदेशात मागणीनुसार द्राक्षे देण्यासाठी आवश्यक व एकसमान गुणवत्ता मिळावी यादृष्टीने अनेक कारणांमध्ये ॲटोमेशन तंत्राचाही वाटा राहिला आहे. ॲटोमेशन तंत्रासाठी एकूण ३२ लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे.  संपूर्ण ॲटोमेशन पद्धतीचे झाले फायदे 

  • सर्वात महत्त्वाचा फायदा द्राक्ष बागेची वाढीची अवस्था पाहणे, योग्य निर्णय घेणे व प्रत्यक्ष वापर या तीन मुख्य गोष्टींचे व्यवस्थापन एकच व्यक्ती अत्यंत प्रभावी करू शकते.
  • संपूर्ण २२ एकरांवर अगदी बागेतील शेवटच्या झाडालाही एकसमान प्रमाणात पाणी व खते देणे शक्‍य झाले. 
  • द्राक्षवेलीची नेमकी अवस्था सांभाळता आली. 
  • रात्रीच्या वेळीही फर्टिगेशन करता येते.
  • थंडीत काही वेळा चार अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली जाते. अशावेळी बागेत जाणे शक्य नसते. अशावेळी पूर्वनियोजित ‘प्रोग्रॅम’ दिला तर पाणी किंवा खते देता येतात.   दुष्काळी परिस्थितीत अत्यंत कमी पाण्यातही खत व्यवस्थापन करणे शक्‍य झाले. 
  • ''वॉटर मीटर’ द्वारे नेमके किती पाणी उपलब्ध आहे, किती दिले जात आहे याचे नेमके मापन शक्‍य झाले. मजुरांवरील अवलंबित्व कमी झाले. मजूर टंचाईच्या काळात हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल. 
  • खतांचे उर्वरित भाग, क्षार गाळूनच जात असल्याने खते व पाणी एकसमान प्रमाणात पुरवली जात असल्याने क्षारांचे प्रमाण नियंत्रित राहते असे आढळले आहे.
  • फॉस्फोरीक ॲसिड ठिबकद्वारे देताना एकरी सात लिटर किंवा किलो दिले जाते. या तंत्राद्वारे ते एकसमान पद्धतीने योग्य कालावधीने व योग्य प्रमाणात देणे शक्य होत आहे.  ग्राहकाच्या तसेच बाजारपेठेच्या मागणीनुसार आपल्या उत्पादनाची गुणवत्ता नेमकी कशी असायला हवी हे ठरविताना ॲटोमेशन तंत्राचा हातभार लागतो. दिलेल्या पाण्याचा, खताचा प्रत्येक थेंब, प्रत्येक कण उपयोगात आणला जातो. परिणामी निर्यातक्षम उत्पादन मिळते.   : रतन निकम - ९८६०२६८१३२ drip, 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com