एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी सापळा विकसित

एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी सापळा विकसित
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित प्रभावी सापळा विकसित

किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो. मात्र, प्रत्येक किडीसाठी वेगळा सापळा वापरण्याऐवजी एकाच सापळ्यामध्ये तीनही प्रकार एकत्र करण्याची कल्पकता जळगाव जिल्ह्यातील मंगरुळ (ता. चोपडा) येथील संशोधक शेतकरी कांतिलाल भोमराज पाटील यांनी दाखवली आहे. त्यांनी तयार केलेल्या ‘इकोपेस्ट ट्रॅप’मुळे अल्प खर्चामध्ये, विषारी कीटकनाशकांशिवाय किडींचे प्रभावी सर्वेक्षण, नियंत्रण करणे शक्य होते. पिकाच्या उत्पादनामध्ये कीडरोगाचे नियंत्रण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. किडीच्या नियंत्रणासाठी अलीकडे असंतुलित प्रमाणात रसायनांचा वापर होत आहे. अन्नधान्यांमध्ये विषारी अंश शिल्लक राहण्यासोबतच किडीमध्ये प्रतिकारकता विकसित होण्याचा धोका वाढत आहे. किडींच्या नियंत्रणासाठी शास्त्रज्ञांकडून प्रामुख्याने एकात्मिक कीड व्यवस्थापनाची शिफारस केली जाते. त्यामध्ये विविध सापळ्यांचा वापर केला जातो. एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या सापळ्याची निर्मिती जळगाव जिल्ह्यातील मंगरूळ (ता. चोपडा) येथील कांतिलाल पाटील यांनी केली आहे. विज्ञान शाखेचे पदवीधर असलेल्या कांतिलाल यांनी कल्पकतेने पिकातील रसशोषक किडीसह विविध पतंगवर्गीय किडींना आकर्षित करून सापळ्यांमध्ये बंदिस्त करणारा सापळा तयार केला आहे. त्याला ‘इकोपेस्ट ट्रॅप’ असे नाव दिले आहे. इको पेस्ट सापळ्याची कार्यपद्धती : पिकांमध्ये येणाऱ्या विविध किडी वेगवेगळ्या घटकांकडे आकर्षित होत असतात. त्यापैकी काही प्रकाशाकडे आकर्षित होतात, तर काही विशिष्ट अशा गंधाकडे, तर काही किडी या विशिष्ट रंगाकडे आकर्षित होतात. या कारणामुळे सध्या किडींच्या सर्वेक्षणासाठी प्रकाश सापळा, चिकट सापळा आणि कामगंध सापळा अशा तीन प्रकारचे सापळे वापरले जातात. या तिन्ही प्रकारे काम करणारा संयुक्त असा ‘इकोपेस्ट ट्रॅप’ कांतिलाल यांनी तयार केला आहे. 

कांतिलाल पाटील यांच्या एकत्रित कुटुंबाची १७ एकर शेती आहे. त्यामध्ये केळी, कापूस, बटाटे, वांगी, मिरची अशी पिके घेतली जातात. या पिकांमध्ये सापळ्याच्या चाचण्या घेतल्या. आवश्यक त्या सुधारणा केल्या. सापळ्याचे चांगले परिणाम मिळाल्यानंतर त्याचे पेटंट मिळवले आहे. (पेटंट क्रमांक ः २०१८२१००२१८७, जर्नल नं. ०५/२०१९, प्रकाशन-०१-०२-२०१९)

अत्यंत कमी खर्चात तयार केलेल्या या सापळ्यांमध्ये पांढरी माशी, तुडतुडे, फळमाशी, फुलकिडी, पंखाचा मावा, नागअळीची माशी व अन्य छोटेमोठे कीटक निळ्या आणि पिवळ्या रंगाकडे आकर्षित होऊन चिकटतात. रात्रीच्या वेळी कार्यरत राहणारे अनेक पतंग प्रकाशाकडे आकर्षित होतात. याचा फायदा घेण्यासाठी या सापळ्यामध्ये स्वयंचलित दिवा वापरला असून, तो अंधार पडल्यानंतर प्रकाशित होतो. या विशिष्ट प्रकाशाकडे रात्री शेत व परिसरातील विविध अळ्यांचे पतंग, गुलाबी बोंडअळी पतंग, अमेरिकन बोंडअळी पतंग, ठिबक्याची बोंड अळी, उंटअळी पतंग, पाने खाणारी बोंडअळी पतंग, फळ पोखरणाऱ्या अळीचा पतंग, शेंडे पोखरणाऱ्या अळीचा पतंग, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा पतंग व कीटक आकर्षित होतात. यातील दिवा सूर्योदयानंतर आपोआप बंद होतो. अशा प्रकारे दिवसरात्र दोन्ही वेळा वेगवेगळ्या प्रकारे किडीच्या नियंत्रणासाठी हा सापळा प्रभावी ठरतो, अशी माहिती संशोधक शेतकरी कांतिलाल पाटील यांनी दिली. ज्या पिकामध्ये फळमाशीचा त्रास होतो, अशा ठिकाणी मिथिल युजेनॉल किंवा क्यू ल्युअरचा वापर याच सापळ्यामध्ये केला जातो. वापरण्याची पद्धत : या भौतिक सापळ्याचा वापर द्राक्ष, टोमॅटो, वांगी, कलिंगड, कापूस, मिरची यांसह विविध पिकामध्ये करता येतो. किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी केवळ रासायनिक कीडनाशकांवर अवलंबून राहण्यापेक्षा हे सापळे उपयुक्त ठरू शकतात. परिसरातील अनेक शेतकरी असे सापळे तयार करून वापरू लागले आहेत. -गरजेनुसार एकरी ५ ते १० इकोपेस्ट ट्रॅप वापरावेत. -हे सापळे पुन्हा पुन्हा वापरता येतात. - सापळ्यातील दिवा कार्यान्वित ठेवण्यासाठी साध्या पेन्सिल सेलचा वापर केला आहे. एकदा लावल्यानंतर सुमारे २० ते २५ दिवस सेल चालतात. सापळा वापरण्याचे फायदे :

  • एकाच सापळ्यामध्ये तिन्ही प्रकारच्या घटकांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे विस्तृत प्रकारातील किडींच्या सर्वेक्षण, नियंत्रणासाठी उपयुक्त.
  • महागड्या व विषारी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होण्यास मदत.
  • सेलवर चालणारा असल्यामुळे यातील दिव्यासाठी विद्युत जोड असण्याची आवश्यकता नाही.
  • यातील दिवे स्वयंचलित असल्याने अंधार पडताच सुरू होतो, तर सकाळ होताच आपोआप बंद होतो. मजुराची गरज नाही.
  • पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये २४ तास प्रभावी कार्य करतो.
  • सेंद्रिय शेतीमध्ये किडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी साधन ठरू शकतो.
  • हाताळणी व वापर सहज, सोपा आहे.
  • साहित्य ः पिवळे किंवा निळे कार्डशीट, चिकट द्रव घटक, इलेक्ट्रॉनिक सर्किट, ०.५ वॉट क्षमतेचा एलईडी दिवा व पेन्सिल सेल. एका सापळ्यासाठी कमाल २०० रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, दीर्घकाळ चालत असल्यामुळे त्याचा पुनर्वापर शक्य आहे. कृषी संशोधन संस्थांमध्ये सादरीकरण : २०१७ साली जळगाव येथील राष्ट्रीय परिषदेमध्ये इकोपेस्ट ट्रॅपचे सादरीकरण केले. तसेच भारतीय कृषी संशोधन परिषद (नवी दिल्ली), राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, कृषी विज्ञान केंद्र, मुमराबाद (जळगाव) यांच्या वतीने आयोजित कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमामध्ये हा सापळा मांडला होता. त्यामध्ये त्यांना ‘नवोन्मेश संशोधक शेतकरी’ हा पुरस्कार मिळाला आहे. २०१८ साली अटारी (पुणे ) व कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (पुणे) येथे प्रयोगशील शेतकरी संमेलनात शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी निमंत्रित केले होते. वीर नर्मदा साउथ गुजरात विद्यापीठ येथे राष्ट्रीय परिसंवादामध्ये या सापळ्याचे सादरीकरण विविध शास्त्रज्ञांसमोर करण्याची संधी मिळाली. संपर्क : कांतिलाल पाटील, ९४०५६६९४६१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com