बायोगॅसद्वारे विद्युतनिर्मिती फायदेशीर

बायोगॅसद्वारे विद्युतनिर्मिती फायदेशीर
बायोगॅसद्वारे विद्युतनिर्मिती फायदेशीर

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामध्ये बायोगॅसद्वारे विद्युतनिर्मितीचा पथदर्शक प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विद्युतनिर्मिती झाली, त्याचबरोबरीने बायोगॅस संयंत्रामधून मिळणारी शेणस्लरी सेंद्रिय खत म्हणून उपयुक्त ठरली आहे. बायोगॅस हे एक ज्वलनशील वायूचे मिश्रण आहे. बायोगॅसमध्ये मुख्यत: मिथेन, कार्बनडाय ऑक्‍साईड, हायड्रोजन सल्फाईड इत्यादी वायू असतात. यातील मिथेन हा वायू ज्वलनशील आहे. बायोगॅस उत्पादनाकरिता जनावरे तसेच मनुष्याचे मलमूत्र उपयोगात येते. सयंत्रामध्ये शेण, मल आणि इतर वनस्पतिजन्य पदार्थांना हवेच्या अनुपस्थितीत कुजवून बायोगॅस तयार होतो. बायोगॅसचा वापर ः १) बायोगॅसचा वापर स्वयंपाकासाठी इंधन म्हणून केल्यास गोवऱ्या, लाकूड तसेच पिकांचे अवशेष यांची इंधनासाठी गरज भासणार नाही. २) लाकूड तसेच गोवऱ्यांच्या ज्वलनातून निघणाऱ्या धुरापासून महिला आणि लहान मुलांमध्ये डोळे आणि फुप्फुसांच्या आजाराचे प्रमाण वाढते. यावर बायोगॅस हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. बायोगॅस वापरामुळे धुराचे प्रदूषण होत नाही. ३) बायोगॅसचा वापर स्वयंपाकासाठी इंधन तसेच वीजनिर्मितीद्वारे प्रकाश व्यवस्था, इंजिन चालवून पाणी उपसण्यासाठी करता येतो. ४) बायोगॅसची उपयोगिता व औष्णीक क्षमता पांरपरिक इंधनाच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी कमी वेळ लागतो. ५) बायोगॅसद्वारे डिझेल आणि पेट्रोलची बचत होते. उदाहरणार्थ, विहिरीतून पाणी खेचणारा पंप चालवणे, मळणी यंत्र चालविणे. ६) बायोगॅस संयंत्रामधून मिळणारी शेणस्लरी उत्तम खत म्हणून वापरणे शक्य आहे. ७) ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या संख्येने जनावरे आहेत, त्यांनी बायोगॅस सयंत्र आणि त्यापासून विद्युतनिर्मिती केल्यास त्याचा उपयोग गोठ्यामध्ये स्वच्छ प्रकाशनिर्मिती आणि पाणी उपसण्याचा पंप चालविण्याकरिता करणे शक्य आहे. बायोगॅसपासून वीजनिर्मिती प्रकल्प ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग तसेच अपांरपरिक ऊर्जा स्रोत आणि विद्युत अभियांत्रिकी विभागातंर्गत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून ५० घन मीटर क्षमतेचे सुधारित जनता बायोगॅस संयंत्र बांधले आहे. शेण मिश्रण टाकी, डायजेस्टर, घुमट आणि स्लरी निष्कासन टाकी अशी संयंत्राची विभागणी आहे. १) बायोगॅस सयंत्राचे संपूर्ण बांधकाम हे विटा, सिमेंट व रेती वापरून केले आहे. संयंत्र उभारणीसाठी प्रशिक्षित कारागिराची आवश्‍यकता असते. २) बायोगॅस संयंत्राची शेण मिश्रण टाकी ही जमिनीपासून एक फूट उंचावर ठेवण्यात आली आहे. या टाकीपासून ते डायजेस्टरपर्यंत एक फूट व्यास आणि १५ फूट लांबीचा एचडीपीई पाइप जमिनीसोबत ७५ अंशाच्या कोनात बसविण्यात आला आहे. या पाइपमधून शेणकाल्याचे मिश्रण डायजेस्टरमध्ये टाकण्यास सोईस्कर होते. ३) डायजेस्टर हे दंडगोलाकार आकाराचे आहे. त्याची उंची व व्यास १५ फूट ठेवण्यात आला आहे. ४) डायजेस्टरमध्ये सूक्ष्मजीवामार्फत हवेच्या अनुपस्थितीत बायोगॅस तयार होण्याची प्रक्रिया होते. मिथेन उत्पादन करणाऱ्या सूक्ष्मजीवापासून मिथेन, कार्बन डायऑक्‍साईड आणि थोड्या प्रमाणात हायड्रोजन सल्फाईड वायुची निर्मिती होते. ५) सुरवातीला शेण व पाणी यांनी भरलेल्या डायजेस्टरमधून बायोगॅस तयार होण्यास ३० दिवसांचा कालावधी लागतो. हा बायोगॅस अर्धगोलाकार घुमटामध्ये साठविण्यात येतो. ५) सयंत्रामध्ये बायोगॅस तयार होण्यास सुरू झाल्यानंतर दररोज १२०० किलो एवढे ताजे शेण लागते. साधारणपणे १:१ अशा समप्रमाणात पाणी व शेणाचे मिश्रण करून संयंत्रात भरावे लागते. तयार झालेल्या बायोगॅसच्या दाबाने डायजेस्टरमधील कुजलेली शेण स्लरी निष्कासन साठवणूक टाकीमध्ये येते. ६) सयंत्राद्वारे दररोज ५० घनमिटर बायोगॅस तयार होतो. हा वायू ५० घनमिटर आकाराच्या बलूनमध्ये साठविला जातो. ७) बायोगॅसपासून वीजनिर्मिती करण्यासाठी ६ किलो वॉट क्षमतेचे बायोगॅसवर चालणारे इंजिन बसविण्यात आले आहे. तयार झालेला बायोगॅस समप्रमाणामध्ये ४ स्ट्रोक, ४ सिलेंडर आणि १०० टक्के बायोगॅस चलित इंजिनला ७.५ के. व्ही. ए. वीजनिर्मिती यंत्र चालविण्यासाठी पुरविण्यात येतो. त्याकरिता एक एच पी चे ब्लोअर यंत्र बसविण्यात आले आहे. हे इंजिन सुरवातीला बॅटरीद्वारे सुरू होते. त्यानंतर हे इंजीन बायोगॅसवर सतत सुरू राहते. ८) सहा किलो वॉट विद्युतनिर्मिती करिता प्रती तासाला ८ ते १० घनमीटर बायोगॅस लागतो. सदर बायोगॅस सयंत्र वापरून चार ते पाच तास विद्युतनिर्मिती होते. ९) पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातील जनावरांच्या गोठ्यातील सर्व लाइट आणि तीन एचपी सबमर्सिबल पंप चालविण्यासाठी ही वीज वापरली जाते. स्लरी हे उत्तम खत ः १) बायोगॅस संयंत्रातून निघणाऱ्या शेण स्लरीमध्ये नत्र, स्फुरद व पालाश या पोषक घटकांची चांगली वाढ झालेली असते. २) बायोगॅस सयंत्रामध्ये निघणारी शेणस्लरी हे उत्तम प्रकारचे खत आहे. यामध्ये २० टक्के नत्र, २३ टक्के स्फुरद आणि १० टक्के पालाशची वाढ झालेली दिसून आली. संपर्क ः डॉ. सुरेंद्र काळबांडे, ७५८८७६३७८७ (अपांरपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com