सूक्ष्म वातावरणावर होतो वाहत्या वाऱ्याचा परिणाम

वारे नुसते वाहत नाहीत, तर सोबत पावसाचे ढग, आर्द्रता वाहून आणतात किंवा नेतात. यामुळे शेत शिवारातील सूक्ष्म वातावरणामध्ये अनेक बदल घडत असतात.
सूक्ष्म वातावरणावर होतो वाहत्या वाऱ्याचा परिणाम
सूक्ष्म वातावरणावर होतो वाहत्या वाऱ्याचा परिणाम

वारे नुसते वाहत नाहीत, तर सोबत पावसाचे ढग, आर्द्रता वाहून आणतात किंवा नेतात. यामुळे शेत शिवारातील सूक्ष्म वातावरणामध्ये अनेक बदल घडत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या वातावरणातील घटकाकडे लक्षपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे. बदलत्या वातावरणामध्ये चक्रीवादळाचे प्रमाण वाढत आहे. वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञ भविष्यातही अशा घटनांमध्ये वाढ होणार असल्याचे सूचित करतात. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याच प्रमाणे संरक्षित शेतीसाठी उभारलेल्या शेडनेट, पॉलिहाऊस यांचेही मोठे नुकसान होते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे वारे नुसते वाहत नाहीत, तर सोबत पावसाचे ढग, आर्द्रता वाहून आणतात किंवा नेतात. यामुळे शेत शिवारातील सूक्ष्म वातावरणामध्ये अनेक बदल घडत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या वातावरणातील घटकाकडे लक्षपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे. सामान्यतः वेधशाळा वाहत्या वाऱ्याचे मोजमाप करणे, पुढील वाऱ्याचा अंदाज मिळवणे ही कामे करत असतात. मात्र, शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील वाऱ्याचे मोजमाप करण्यासाठी साधी, सोपी उपकरणे उपलब्ध आहेत. त्याचा वापर करण्याची सवय शेतकऱ्यांनी लावून घेतली पाहिजे. वादळ कशाला म्हणतात? वाऱ्याचा वेग साठ किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास त्याला वादळ असे म्हणतात. या वर्षी नुकतेच आलेले निवार, त्या आधी गती, निसर्ग व अम्फान ही वादळे येऊन गेली. त्याचे वातावरणावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होताना दिसतात. वाऱ्याच्या वेगानुसार वर्गीकरण केले जाते. या वाऱ्याचे शेतीवर काय दृश्य परिणाम होतात, याची माहिती थोडक्यात घेऊ.

वाऱ्याचे शेतीवर काय दृश्य परिणाम होतात, याची माहिती
अ.नं. हवेचा वेग (किमी प्रति तास वाऱ्याचा प्रकार दृश्य स्वरूपातील शेतीवर होणारा परिणाम
१ पेक्षा कमी शांत/ हवा नाही हवा वाहत नाही, शांत हवा असते. (अशाप्रकारची वाऱ्याची परिस्थिती दीर्घकाल राहिल्यास पिकांचे प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. कीडींसाठी उपयुक्त अशा सूक्ष्म वातावरणाची निर्मिती होते.)
१ ते ५ मंद हवा झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येते. शेतातील पिके डूलतात.(अशा प्रकारचा वारा हा पिकांमधील प्रकाशसंश्‍लेषण वाढण्यासाठी; खताच्या शोषणासाठी उपयुक्त असतो; आणि अशा प्रकारचा वारा वाढ, विकास व उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त असतो.)
६ ते ११ हलका वारा झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येते. शेतातील पिके डूलतात.(अशा प्रकारचा वारा हा पिकांमधील प्रकाश संश्‍लेषण वाढण्यासाठी आणि पिकाची वाढ, विकास आणि उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त असतो.)
१२ ते १९ झुळझुळ वारा/वाऱ्याची झुळूक ळझाडांच्या झाडांच्या फांद्या सारख्या हलतात. शेतातील पिके मोठ्या प्रमाणावर हलतात. (अशा प्रकारे वाऱ्याची स्थिती ही बाष्पोत्सर्जनास गती देते. म्हणजेच पिकाची पाण्याची गरज वाढवते. तसेच प्रकाश संश्‍लेषण क्रिया कमी करण्यासही ही स्थिती उपयुक्त ठरते, परंतु तुडतुडे, मावा, पांढरी माशी या सारख्या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासही मदत करते. मात्र, टोळधाडीसारख्या किडींच्या प्रसारास उपयुक्त ठरते.)
२० ते २८ मध्यम वारा धुळीचे लोट, पालापाचोळा हवेमध्ये उडतो. (वावटळ तयार होते).अशा प्रकारची वाऱ्याची स्थिती बाष्पोत्सर्जनास गती देते. म्हणजेच पिकाची पाण्याची गरज वाढवते. तसेच प्रकाश संश्‍लेषण क्रिया कमी करण्यासही ही स्थिती उपयुक्त ठरते. मात्र, तुडतुडे, मावा, पांढरी माशी या सारख्या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासही मदत करते. मात्र, टोळधाडीसारख्या किडींच्या प्रसारास उपयुक्त ठरते. पाळीव पशू, पक्षी, प्राण्यांना त्रास होतो.
२९ ते ३८ वेगवान वारा शेतातील पिके वाऱ्यासमोर आडवी होतात, लोळतात. लहान झाडे, झुडपे या बरोबरच फळझाडांच्या मुळांना इजा होते. पाळीव पशू, पक्षी, प्राण्यांना त्रास होतो. तलावातील पाण्यावर लाटा निर्माण होतात.
३९ ते ४९ जोरदार वारा विजेच्या तारा, टेलिफोनच्या तारा शीळ वाजू लागतात. हातातील छत्री उडून जाते. मोठमोठ्या झाडांच्या फांद्या झोके खेळायला लागतात. मोठ्या झाडांच्या फांद्या झोके खेळू लागतात. फळ, फळबागेतील झाडांची फळ गळ होते, फळझाडांच्या फांद्या तुटू शकतात. काही शेती पिके लोळू लागतात. पाळीव पशुपक्ष्यांना आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात.
५० ते ६१ वादळी वारे मोठमोठी झाडे बुडापासून हलायला लागतात, मुळांना इजा होते, फळबागेतील झाडे उन्मळून पडतात. शेत पीक पूर्णपणे झोपते. पाळीव पशू व पक्षी यांना विविध प्रकारचे आजार होतात, आरोग्य बिघडते. त्यांच्या निवाऱ्याचे नुकसान होते. संरक्षित शेतीच्या सांगाड्याचे किंवा छताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या क्षेत्रातील वाहणाऱ्या वाऱ्याच्या नोंदी, स्थळ आणि वेळ यासह कराव्यात. वेगाच्या वाऱ्यामुळे झालेले नुकसान पंचनामे करताना याची मदत होऊ शकते. या नोंदी विविध कारणांसाठी उपयुक्त ठरू शकतात. कारण वेधशाळांकडून घेतलेल्या नोंदीना पूरक माहिती यातून उपलब्ध होऊ शकतात. काही प्रमाणात आधीच अंदाज घेऊन प्राणहानी, पीक हानी वाचवता येते.       तीव्र वादळांमध्ये प्राणहानी टाळण्यासाठी भारत सरकारच्या पातळीवर चांगले काम केले जात आहे. अगदी मोठ्या वादळांचा अंदाज आधीच घेता आल्याने शून्य प्राणहानी अशी स्थिती निर्माण करण्यात यश आले आहे. -शेती क्षेत्रातही वाऱ्याचे अंदाज आधीच मिळाल्यास नुकसान काही प्रमाणात कमी करणे शक्य होऊ शकते. उदा. फळबागेतील पक्व फळांची काढणी वादळी वाऱ्याच्या किंवा वादळाच्या आधी करता येऊ शकते. विविध पिकांची परिपक्व अवस्था गाठली असल्यास त्याचीही आगाप काढणी करता येऊ शकते. परिणामी पिकांचे नुकसान काही प्रमाणात तरी कमी करता येईल. -वाऱ्याच्या वहनासाठी योग्य प्रकारे वाट करून दिल्यास संरक्षित शेतीमधील सांगाडे, छत यांचे नुकसान काही प्रमाणात तरी कमी करता येईल. अशी आहेत उपकरणे ः

  • वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला ‘वातकुकुट’ असे म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये कप काऊंटर ॲनायमीटर म्हणतात. 
  •  वाऱ्याची दिशा समजण्यासाठी वातकुकुट. 
  •  अलीकडे इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पद्धतीची लहान आणि हाताळण्यायोग्य वातकुकुट उपकरणे उपलब्ध आहेत. 
  • डिजिटल पद्धतीचे वातकुकुट उपकरणे उपलब्ध असून, त्यांच्याशी मोबाईल, लॅपटॉपसारखी उपकरणे जोडता येतात. त्यावर वाऱ्याचा वेग, दिशा यांची माहिती सातत्याने नोंदवता येते.
  • वाऱ्याचा वेग आणि हवेचा दाब मोजण्याचे एकत्रित डिजिटल उपकरणही बाजारात उपलब्ध आहे. 
  • अलीकडे फळबाग क्षेत्रामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी केली जात आहे. यात विविध हवामान घटकांसह वाऱ्याची दिशा व वेग मोजण्यासाठी वातकुक्कुट उपकरण बसवलेले असते. 
  • डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (कृषी हवामान शास्त्रज्ञ तथा प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना, अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com