मुळांतील स्रावके ठरतात पिकासाठी संजीवनी

जिवाणूंना आकर्षित करणे, सेंद्रिय घटक किंवा खनिज विरघळून पिकांना उपलब्ध करणे, प्रदुषकांचे प्रमाण कमी करणे अशी विविध कार्ये वनस्पतींच्या मुळांद्वारे सोडलेल्या स्त्रावकाकडून केली जातात.
मुळांतील स्रावके ठरतात पिकासाठी संजीवनी
मुळांतील स्रावके ठरतात पिकासाठी संजीवनी

वनस्पतींच्या वाढीमध्ये मुळाच्या परिवेशामध्ये कार्यरत सूक्ष्मजीवाचा मोठा वाटा आहे. या जिवाणूंना आकर्षित करणे, सेंद्रिय घटक किंवा खनिज विरघळून पिकांना उपलब्ध करणे, प्रदुषकांचे प्रमाण कमी करणे अशी विविध कार्ये वनस्पतींच्या मुळांद्वारे सोडलेल्या स्त्रावकाकडून केली जातात. एकूण पिकांच्या वाढीमध्ये ही स्त्रावके महत्त्वाची भूमिका निभावत असतात. वनस्पतींची वाढ ही मातीमध्ये होत असते. या मातीचे गुणधर्म व त्यावर परिणाम करणारे घटक या संबंधी फारशी माहिती नव्हती. गेल्या दशकामध्ये या अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. आजही वनस्पतींच्या मुळांच्या सान्निध्यातील मातीविषयीची अनेक रहस्ये अज्ञात आहेत. मुळांच्या सान्निध्यातील मातीला इंग्रजीमध्ये ‘रायझोस्फीअर’ असे म्हणतात. मुळांच्या सान्निध्यात असलेल्या मातीमध्ये असंख्य प्रजातींचे सूक्ष्म जिवाणू कार्यरत असतात. मुळांद्वारे पाझरणारी स्रावके आणि जिवाणू यांच्यामध्ये एक समन्वय अनेकवेळा दिसून आला आहे. ही स्त्रावके आणि जिवाणू एकत्रितरीत्या रायझोस्फीअरला सजीव आणि सक्रिय बनवतात. सक्रिय किंवा सजीव माती ही पिकाच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी वाढीमध्ये अत्यंत महत्त्वाची असते. मुळांच्या संपर्कातील मुठभर मातीमध्ये असंख्य प्रक्रीया होत असतात. हीच माती त्यात जन्म घेणाऱ्या प्रत्येक जिवाला परिपूर्ण बनवते. जंगलात वनस्पतींची जैवविविधता आढळून येते. गवते, झुडुपे, मोठे वृक्ष यांची वाढ होत असते. या प्रत्येक वनस्पतींच्या मुळाची वाढ ही वेगवेगळ्या प्रकारची असते. ही मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या थरातून वनस्पतींना नैसर्गिकरित्या अन्नद्रव्ये पुरविण्याचे काम करतात. पिकाप्रमाणे जंगलामध्ये पाणी, खते कोणी देत नाही. कर्ब चक्रीकरणातून सूक्ष्मजीवाणूंची वाढ व कर्ब विघटणातून निर्माण झालेले अन्नघटक वनस्पतींना नैसर्गिकरित्या मिळत असतात. थोडक्यात, या साऱ्या वनस्पती नैसर्गिकरित्या आपली वाढ करून घेत असतात. मुळांद्वारे जमिनीत पाझरणारी स्रावके ः मुळांद्वारे पाझरणारी स्रावके म्हणजे मुळांद्वारे पाझरणारे घटक व त्यावर सूक्ष्म जिवाणूंनी केलेल्या प्रक्रियेचा परिपाक होय. जमिनीतील विद्राव्य सेंद्रिय पदार्थांचे जटिल मिश्रणातून ही स्रावके तयार होतात. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. १) उच्च आण्विक वजन स्रावके. उदा. सेल्युलोज व म्युसीलेज. २) कमी आण्विक वजन स्रावके. उदा. अमिनो आम्ल (ग्लायसिन, हिस्टीडीन, लायसीन, मिथीओनीन प्रोलीन), सेंद्रिय आम्ल (सायट्रिक आम्ल, मॅलिक आम्ल, अॅसेटिक आम्ल, ब्युटीक आम्ल, ऑक्झालिक आम्ल, टारटारिक आम्ल, फ्युमरिक आम्ल), विकरे (अमायलेज, इनव्हरटेज, फॉस्पटेन, प्रोटीयेज) व दुय्यम वनस्पती घटक (फ्लॅवनाइड्स, टरपेनाइडस). हे पदार्थ रायझोस्फिअर (मुलपरिवेश) मध्ये अत्यंत महत्त्वाची कार्य बजावतात. मुळांना हवे ते अन्न उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा असतो. मुळांद्वारे सोडलेल्या कमी आण्विक वजन स्रावकांची जमिनीतील महत्त्वाची कार्ये ः १. संदेशवहन आणि वनस्पती संप्रेरकांना सक्रिय करणे ः जमिनीतील विशिष्ट जिवाणूंना त्यांच्या वसाहती निर्माण करण्यासाठी आवश्यक तो संदेश पोचवण्याचे काम ही स्रावके करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या जमिनीत असलेले फ्लेवनाइड्स. ही स्रावके रायझोबीअम या जिवाणूस संदेश देऊन त्याला आकर्षित व सक्रिय करतात. परिणामी जमिनीत द्विदल वनस्पतींमध्ये नत्र स्थिरीकरणास मदत होते. मुळातील सर्वांत बाहेरच्या म्हणजेच सीमाभागावर असणाऱ्या पेशी विशिष्ट जीवाणूबरोबर संयोग करण्यासाठी काही स्रावके सोडतात. काही वनस्पतीच्या मुळातील स्रावके उदा. निलगिरी हे मृदाजन्य बुरशीवर नकारात्मक प्रभाव टाकून मुळांचे रक्षण करतात. ॲझेटोबॅक्टर या जीवाणूंच्या काही प्रजाती मका मुलपरीवेशात अत्यंत सक्रिय होतात. त्या पिकास पोषक असे ऑक्झीन हे संप्रेरक तयार करतात. प्रोलीन सारखे अमिनो आम्ल घटकांमुळे वनस्पतींना उन्हाळ्यामध्ये तग धरून राहण्याची ताकद मिळते. स्रावकातील विकर घटक वनस्पतींना विविध अन्नद्रव्यांचे उपलब्ध स्थितीत रूपांतर करून देतात. २. सेंद्रिय आम्लाचे कार्य ः मुळांद्वारे पाझरणाऱ्या सेंद्रिय आम्लामुळे खडकाचा मुरूम, मुरमाची माती होण्यास मदत होते. ही आम्ले मातीतील खनिजांपासून अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देतात. जमिनीतील काही सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या चिलेट स्वरूपात बांधून ठेवते. ती पिकांना हळूहळू उपलब्ध करून देते. यामुळे अन्नद्रव्यांचा अपव्ययदेखील टळतो. सेंद्रिय आम्ल पिकांना कॅडमियम सारख्या जड धातूच्या विषारीपणापासूनसुद्धा वाचवते. उदा. कडुनिंब वृक्ष कोरड्या, कमी पावसाच्या व चुनखडीयुक्त प्रदेशात चांगले वाढतात. बाभूळ वृक्ष भारी काळ्या जमिनीत, तर विलायती बाभूळ ही कोणत्याही समस्यायुक्त जमिनीत वाढतात. अति पावसाच्या प्रदेशात व जांभ्या खडकापासून तयार झालेल्या जमिनीत काजू, आंबा, फणस, कोकण नारळ इ. वृक्ष चांगले वाढतात. याचाच अर्थ या वृक्षांच्या मुळामधून स्रवलेल्या घटकांपासून अन्नद्रव्ये घेण्याची किमया विभागनिहाय वेगवेगळी आहे. ३. जमिनीतील प्रदुषकांचे विघटन ः मुळांद्वारे जमिनीत पाझरणाऱ्या स्रावकांमुळे मुलपरीवेशात जिवाणूंची संख्या नेहमी जास्त असते. हेच जिवाणू मृदेतील प्रदुषक घटकांचे विघटन करतात. यामुळे जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होते. काही स्रावके अशा प्रदूषकांचे स्वरूप बदलून टाकतात. त्यामुळे पिकांना कुठलाही धोका राहत नाही. ४. स्रावकांची अन्य कार्ये ः अत्यंत विस्तृत श्रेणीतील ही स्रावके मृदेच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांवर चांगलाच प्रभाव टाकतात. मुळांचा आणि मृदेचा संपर्क ठेवणे, मुळांच्या टोकावर वंगणाचे कार्य करणे, मुळाला इजा होण्यापासून वाचविणे, जमिनीतील सूक्ष्म संरचनेचे स्थिरीकरण करणे, अन्नद्रव्यांच्या नियंत्रित शोषणात मदत करणे अशी असंख्य कार्य ही स्रावके बजावतात. सेंद्रिय शेतीमध्ये मातीतील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य हीच स्रावके करतात. हिरवळीचे पीक चवळी घेतल्यास चवळीच्या मुळाद्वारे फुमॅरिक आम्ल मातीत सोडले जाते. हे आम्ल जमिनीतील स्थिर स्फुरद उपलब्ध स्थितीत पिकांना उपलब्ध करून देतात. एकूणच नैसर्गिकरित्या, सेंद्रिय पद्धतीत पिके, वनस्पती किंवा वृक्षांना अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम मुळांनी सोडलेल्या स्रावकांद्वारे केले जाते. सेंद्रिय पदार्थांद्वारे सुद्धा (कर्ब चक्रिकरणाद्वारे) विघटनानंतर त्यामधील असलेल्या मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये ही पिकांना मिळतात. म्हणूनच सेंद्रिय शेतीमध्ये आपण वेगवेगळ्या सेंद्रिय पदार्थांचा वापर, जैविक खतांचा वापर, पिकांची फेरपालट, आच्छादनाचा वापर, हिरवळीची पिके, भूसुधारके इ. सातत्याने वापर करतो. या घटकातून सेंद्रिय शेतीमध्येही कालांतराने शाश्वत उत्पादन मिळू शकते. शुभम दुरगुडे, ९४२०००७७३२ (आचार्य पदवीचे विद्यार्थी, जी.बी.पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ पंतनगर, उत्तराखंड.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com