फळांच्या व्यावसायिक प्रतवारीसाठी यंत्र विकसित

फळांच्या व्यावसायिक प्रतवारीसाठी यंत्र विकसित
फळांच्या व्यावसायिक प्रतवारीसाठी यंत्र विकसित

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने आकारानुसार फळांची प्रतवारी करण्याचे व्यावसायिक यंत्र विकसित केले आहे. त्याची क्षमता ५ टन प्रति तास असून, मनुष्य खर्चामध्ये मोठी बचत होणार आहे. उत्तम प्रतवारीमुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होईल. भारतामध्ये जागतिक फळ उत्पादनाच्या सुमारे १५ टक्के उत्पादन होते. २०१७-१८ मध्ये भारत ९८ दशलक्ष टन उत्पादनासह जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर होता. सध्या फळांची प्रतवारी ही प्रामुख्याने माणसांच्या साह्याने केली जाते. मात्र, हंगामामध्ये मजुरांची उपलब्धता होण्यामध्ये अडचणी येतात. पर्यायाने शेतकऱ्यांना अधिक मजुरी दर द्यावा लागतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने वेगवेगळ्या फळांच्या प्रतवारीसाठी व्यावसायिक प्रतवारी यंत्र (ग्रेडर) विकसित केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गोल आकाराच्या फळांची प्रतवारी करता येते. या यंत्रामध्ये ग्रेडिंग युनिट, आडवा बेल्ट कन्व्हेयर आणि फिडिंग युनिट असे भाग आहेत.

  • पाच वेगवेगळ्या आकारांची फळे यात वेगळी केली जातात. त्यासाठी फ्लॅपमधील अंतर ३० आणि १४५ मि.मी. या दरम्यान कमी बदलता येते.
  • हे यंत्र चालवण्यासाठी ०.७४ किलोवॉट सिंगल फेज मोटार पुरेशी होते.
  • या यंत्राची कार्यक्षमता सफरचंद, मोसंबी, संत्रा आणि चिकू या फळांसाठी ९५ ते ९७ टक्क्यांपर्यंत अचूक आहे.
  • यंत्राची क्षमता कन्व्हेअर बेल्टच्या ७ मीटर प्रति मिनिट वेगासाठी प्रति तास ५ टन इतकी आहे.
  • प्रतवारीवेळी फळांचे कोणतेही नुकसान होत नाही.
  • प्रतवारी यंत्राची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे.
  • प्रतवारीचा खर्च प्रति किलो ०.८० रुपये आणि ऊर्जा वापर ०.३० किलोवॉट प्रति टन इतका आहे.
  • चाचणीदरम्यानचा अनुभव ः

  • जोतपूर (मध्य प्रदेश) येथील श्रीधर पाटीदार यांच्या वृंदावन फळबाग आणि रोपवाटिकेमध्ये या यंत्राच्या चाचण्या घेतल्या गेल्या. त्यांच्याकडे मोसंबी आणि सफेद मुसळीचे उत्पादन घेतले जाते. ६५ एकर क्षेत्रामध्ये मोसंबी लागवड आहे. दरवर्षी पाटीदार यांच्याकडे १२५० टन मोसंबी उत्पादनाची सात प्रकारामध्ये प्रतवारी केली जाते. माणसांच्या साह्याने प्रतवारी करताना एक माणूस प्रति दिन सुमारे ४५० किलो फळांची प्रतवारी करतो. १२५० टन फळांच्या प्रतवारीसाठी २२७८ मानवी तास आवश्यक असतात. माणसांची मजूरी प्रति दिन ४०० रुपये आहे. १२५० टन फळांच्या केवळ प्रतवारी करिता ११.१२ लाख रुपये लागतात.
  • या यंत्राची क्षमता ५ टन प्रति तास असून, १२५० टन फळांची प्रतवारी करण्यासाठी ८ तासाचा एक दिवस या प्रमाणे ३२ दिवस लागू शकतात. म्हणजेच वेळ आणि मजुरांच्या संख्येमध्ये ९८.८४ टक्के बचत शक्य आहे. त्याचा खर्च ८०० रुपये प्रति टन इतका असून, १२५० टनाच्या प्रतवारीसाठी एकूण खर्च १० लाख रुपये लागतात. म्हणजेच प्रतवारीच्या खर्चामध्ये १.१२ लाख रुपयांची बचत होते.
  • प्रतवारीशिवाय बाजारपेठेमध्ये मोसंबीची किंमत २० रुपये प्रति किलो आहे. तर प्रतवारी केलेल्या फळांना २५ रुपये प्रति किलो दर मिळतो. म्हणजेच प्रतवारी केल्यामुळे दरवर्षी सुमारे ६२.५० लाख रुपये निव्वळ फायदा होऊ शकतो.
  • लाखो रुपयांची बचत शक्य...

  • जोतपूर येथील वृंदावन गार्डन येथे मोसंबीच्या व्यावसायिक प्रतवारीचे काम गेल्या पाच हंगामापासून केले जात आहे. त्यामुळे मजूराच्या खर्चामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये ५.६ लाख रुपयांची बचत शक्य झाली.
  • एकसारख्या आकाराची फळे बाजारात नेल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होते. गेल्या पाच वर्षामध्ये या नव्या प्रतवारी यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांना सुमारे ३.१२ कोटी रुपयांची वेळ आणि मजूर खर्चात बचत झाली.
  • या यंत्राचा नफा मिळण्यास सुरवात होण्याचा काळ (ब्रेक इव्हन पॉइंट) ३० टन फळे, गुंतवणुकीवर परतावा (रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट) ४९६% आणि गुंतवणुकीपासून उत्पन्न मिळण्याचा काळ ०.०४५ वर्षे (सुमारे १६ दिवस) इतका आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com