ऊस शेतीसाठी आवश्यक यंत्रे

ऊस शेतीसाठी आवश्यक यंत्रे
ऊस शेतीसाठी आवश्यक यंत्रे

ऊस उत्पादनात केवळ मजुरीवर ३५ ते ४० टक्के खर्च होतो. ऊस पिकाच्या विविध अवस्थांनुसार पेरणीपूर्व व्यवस्थापन, ऊस लागवड यंत्रे, आंतरमशागतीसाठी यंत्रे, ऊस तोडणी यंत्रे, उसाच्या पाचटाचे तुकडे करणारी यंत्रे उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केल्यास खर्चामध्ये मोठी बचत शक्य होते. महाराष्ट्रातील नगदी पिकांमध्ये ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. अन्य पिकाच्या तुलनेमध्ये काटक आणि रोग किडींचा प्रादुर्भाव कमी असलेले पीक बागायती शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. व्यवस्थापनामध्ये मजुरांचे प्रमाण कमी असले तरी लागवड आणि तोडणी या दोन्ही वेळी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असते. उपलब्ध मनुष्यबळामध्ये काम करताना वेळही अधिक लागतो. अशा वेळी कमी वेळात व कमी खर्चात कामे करण्यासाठी विविध प्रकारची यंत्रे, अवजारे उपलब्ध आहेत. त्याची माहिती या लेखात घेऊ. १. पेरणीपूर्व व्यवस्थापन - ऊस पीक व त्यानंतर खोडवा अशा प्रकारे हे पीक दीर्घकाळ शेतात राहते. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीला महत्त्वाचे स्थान आहे. मातीच्या पोतानुसार नांगरणी करावी. आपली माती काळी कसदार असल्यास त्यामधील ओलाव्याचे प्रमाण मध्यम स्वरूपात असताना दोन फाळी नांगर वापरून खोलपर्यंत नांगरणी करावी. जर मातीमध्ये ओलाव्याचे प्रमाण कमी असेल, त्यामध्ये दगडांचा समावेश असल्यास नांगर वापरावा. ऊस या पिकांच्या खोडवा घेण्यासाठी सब सॉयलर वापरून जमीन ४५ ते ७५ सेंमीपर्यंत खोल नांगरणी करणे गरजेचे असते, त्यामुळे पिकाची मुळे खोलवर जाण्यास मदत होते. सब सॉयलर - कडक झालेली जमीन किंवा खडकाळ जमीन आतून खोलवर फोडण्यासाठी सब सॉयलरचा वापर केला जातो. या ट्रॅक्टरचलित अवजाराद्वारे ४५ ते ७५ सेंमी खोली किंवा त्यापेक्षा जास्त खोलीवरील जमीन मोकळी करता येते. त्याची खोली ही दोन फाळी नांगरापेक्षा अधिक असते. मुळांची वाढ होण्यासाठी मोकळीक मिळाल्याने पिकांची वाढ चांगली होण्यास मदत होते. आॅपरेट केली जाऊ शकते, तसेच सबसोईलर खोलीपर्यंत पोचते आणि मातीला आतून सुपीक करते. सबसॉयलर हे लोखंड, मॅंगनीज, स्टील मिश्र धातूंपासून बनवले जाते. यामध्ये सिंगल बेडचे सबसॉईलरसुद्धा उपलब्ध आहेत. याची किंमत बाजारामध्ये ३५ हजारांपासून सुरू होते. २. ऊस लागवड यंत्र (प्लॅंटर) : ऊस लागवडीसाठी वापरला जाणारा प्लॅंटर ४० ते ५० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरद्वारे चालवला जातो. यामध्ये फक्त मजुराने शेतातील बेणे तोडून, वाडे खांडून, पाचट साळून प्लॅंटरला पुरवावे लागतात. यासाठी टिपऱ्यांचा आकार साधारणतः ३७ सेंमीपर्यंत पाहिजे. यामुळे दिवसभरामध्ये ६ ते ७ एकर उसाची लागवड करता येते. या यंत्राद्वारे लागवड कण्यासाठी एकरी २००० रुपये इतका खर्च येतो. पाण्यामध्येही २० ते ३० टक्के बचत होते. बेणे प्रक्रिया खत घालणे, बेण्याच्या टिपऱ्यांची कोरडी लागवड करणे ही सर्व कामे उत्तम प्रकारे होतात. एका दिवसामध्ये केवळ ३ ते ४ मजुरांच्या साह्याने यंत्राद्वारे ६ ते ७ एकर ऊस लागवड करता येते. मजुरीमध्ये ५० ते ६० टक्के बचत होते. हंगामामध्ये मजुरांची कमतरता भासत असताना वेळेमध्ये लागवड करणे शक्य होते. या यंत्रांची किंमत बाजारामध्ये ८५ हजार रुपयांपासून पुढे आहे. ३. ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) ः ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या न मिळाल्यामुळे महिनोंमहिने ऊस शेतामध्ये राहतो. पर्यायाने त्याच्या साखरेच्या उताऱ्याबरोबरच वजनामध्येही घट होते. अनेक कारखान्यांनी त्याला पर्याय म्हणून शुगरकेन हार्वेस्टरचा वापर सुरू केला आहे. यामधील हार्वेस्टरमुळे ऊस जमिनीलगत तोडणे शक्य होते. अगदी लोळलेला, पडलेला ऊससुद्धा योग्य पद्धतीने तोडला जातो. प्रति तास ४ टन ऊस तोडण्याची क्षमता या यंत्रामध्ये आहे. प्रति दिन सुमारे ३ एकर ऊस तोडला जातो. मजुरी खर्चाच्या निम्म्या खर्च तोडणी शक्य होते. या यंत्रामुळे तोडणी जलद होत असल्याने कारखान्यांना त्याच्या क्षमतेएवढा ऊस सतत पुरवता येतो. ४. पाचट कुट्टी यंत्र (लीफ श्रेडर)ः उसाचे पाचट पूर्वी जाळले जाई. मात्र, त्यातील सेंद्रिय पदार्थांचा वापर पुढील पिकांसाठी करून घेणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने पाचटाच्या व्यवस्थापनाच्या काही पद्धती तयार झाल्या आहेत. पाचट लवकर कुजण्याच्या दृष्टीने पाचटाचे बारीक तुकडे करणे आवश्यक असते. बारीक तुकड्याचे आच्छादन शेतामध्ये केल्यास पिकाच्या मुळाजवळ ओलावा टिकून राहतो. मुळाच्या जवळ सूक्ष्म वातावरण तयार होते. पाचट बारीक करण्यासाठी लीफ श्रेडर उपलब्ध आहे. प्रति एकरामध्ये सुमारे ३ ते ४ टन पाचट उपलब्ध होते. हे यंत्र दर्जेदार स्टीलपासून बनवले जाते. या यंत्राला ५०० ते १००० फेरे प्रति मिनीट याप्रमाणे गती दिली जाते. ४० ते ६० एचपी ट्रॅक्टरच्या पीटीओद्वारे यंत्र शेतामध्ये चालवता येते. या यंत्राच्या क्षमतेनुसार सुमारे ६५ हजारांपासून बाजारामध्ये उपलब्ध आहेत. प्रशांत डिक्कर, ९४०४७०९०६४ (कृषी शक्ती व अवजारे विभाग, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, लोदगा, लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com