ऊर्जा कार्यक्षम गूळ प्रक्रिया यंत्र

ऊर्जा कार्यक्षम गूळ प्रक्रिया यंत्र
ऊर्जा कार्यक्षम गूळ प्रक्रिया यंत्र

साखरेच्या तुलनेत गूळ हा अधिक प्रमाणात पौष्टीक, सात्त्वीक असून, ग्रामीण पातळीवरील गुऱ्हाळे हा लघुउद्योग आहे. त्यांचे सबलीकरण महत्त्वाचे असल्याचे मत महात्मा गांधींनी म्हटले होते. (हरिजन १०/०८/ १९३५) तसे पाहिले तर आजही ८५ वर्षांनंतर हे विचार तंतोतंत लागू पडत असले तरीही गुऱ्हाळांची कार्यक्षमता वाढवण्याची आवश्यकता होती. त्यासाठी उष्णता अभियांत्रिकी पूरक तंत्रज्ञानावर आधारीत संसाधन कार्यक्षम गूळ प्रक्रिया यंत्र विकसित केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुळाचा दरडोई वापर १३.६ किलोवरून ३.६ किलो (२०१४) इतका कमी झाला आहे. गुळाचा वापर कमी होण्याच्या मुख्य कारणामध्ये गूळ निर्मितीतील कमतरता आणि ग्राहकांचे साखरेकडे वाढत चाललेले आकर्षण हे होय.  पूर्वी गुऱ्हाळ हे मुख्यतः मुख्यतः मोठ्या शेतकऱ्यांकडून स्वतःच्या शेतातील ऊस व परिसरातील उसावर प्रक्रियेसाठी तयार केले जाई. मात्र, गेल्या दशकांमध्ये कुटुंबाचे धारणाक्षेत्र कमी होत गेले. यामुळे गुऱ्हाळघर चालविण्याइतपत क्षेत्र एका कुटुंबाकडे राहिले नाही. त्याच प्रमाणे सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे जाळे ग्रामीण भागामध्ये पसरत गेले. शेतकऱ्याला स्वतः गूळ निर्मितीची सर्व उठाठेव करण्याऐवजी ऊस साखर कारखान्यांना देणे जास्त सोयीचे वाटू लागले.  कुशल मजुरांची कमतरता ः गुऱ्हाळामध्ये गुळाच्या निर्मितीसाठी कुशल व मेहनती कामगाराची गरज लागते. यामध्ये कुशल कामगार म्हणजे ‘गुळव्या’ (गूळ बनल्याचे ठरविणारा) व ‘जळव्या’ (इंधन/ जाळ घालणारा). गुळव्या हा आपल्या अनुभवाच्या जोरावर गूळ बनविण्याच्या प्रक्रियेत वेगवेगळे निर्णय घेऊन गूळ बनवितो. जळव्या हा आदेशानुसार खालीक जाळ कमी जास्त करतो. गुळाच्या उत्तम प्रतीसाठी गुळव्याचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. गुऱ्हाळ मालक तळ हातावरच्या फोडाप्रमाणे गुळव्याला जपत असतात. फोड. गुळव्यासारख्या अलीकडे मजुरांची कमतरता हा सर्वत्रच चिंतेचा विषय आहे. त्यात कोणत्याही कुशल कामगाराला सतत जपत राहणे शक्य होत नाही. कुशल कामगाराअभावी हा उद्योग कधीही बंद होऊ शकतो. अशा स्थितीत कुशल कामगारावर अवलंबून राहत उद्योग करणे गुऱ्हाळ मालकांना जोखमीचे ठरते. गूळ निर्मितीतील अन्य अडचणी ः

  • कमी कार्यक्षम भट्टी ः पारंपरिक भट्टीची कार्यक्षमता कमी असल्यामुळे अधिक बायोमास जाळले जाते. पर्यायाने ऊर्जेसाठी केवळ उसाची चुईट्या किंवा चोथऱ्या पुरेशा पडत नाहीत. परिणामी खर्चात वाढ होते.  
  • परंपरागत गुऱ्हाळांची मांडणी व आरेखन हे साधारणपणे स्वच्छता ठेवण्यामध्ये अडचणीचे ठरते. तसेच कामगारांच्या कार्यक्षमतेला मारक ठरते. - बऱ्याच गुऱ्हाळांमध्ये गुळाचा रंग (तांबूस व पिवळा) व कठीणपणा मिळविण्यासाठी कृत्रिम रंग व काही रसायनांचा वापर केला जातो. हे रंग व रसायने मानवी शरिरासाठी अपायकारक ठरतात. त्याच प्रमाणे त्यांच्या वापराने टिकवण क्षमता कमी होते. 
  • पूर्वी गुळाच्या मोठ्या ढेपी असत. अलीकडे त्यांचा आकार ग्राहकांच्या मागणीनुसार अर्धा ते एक किलोपर्यंत कमी झाला आहे. मात्र, शहरी धावपळीच्या जीवनामध्ये दर वापरावेळी तो फोडणे, खडे करणे अडचणीचेच ठरते. अशा काही कारणांप्रमाणेच रंग, रसायने, अस्वच्छता यामुळे ग्राहक गूळ वापरण्यास निरूत्साही होतो व साखरेकडे वळतो.
  • अडचणीवर मात करण्यासाठी प्रक्रिया यंत्र गूळ उत्पादक शेतकरी व गूळ वापरणारे ग्राहक यांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही संसाधन कार्यक्षम गूळ प्रक्रिया यंत्राची (Resource Efficient Jaggery Processing Plant) ची निर्मिती केली आहे. हा सुधारीत पद्धतीचा प्रकल्प पुण्याजवळ बसवला असून, तो गेल्या आठ महिन्यांपासून कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये परंपरागत गुऱ्हाळाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. यातील भट्टीची संरचना ही ज्वलन कार्यक्षमतेला पूरक अशी केली आहे. उष्णता अभियांत्रिकी निकषांवर भट्टीचे आकारमान व क्षेत्रफळ यांचा योग्य समन्वय साधला आहे. उष्णतेचे जास्तीत जास्त वहन कढाईकडे होणे, ज्वलनासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन (हवा) उपलब्ध होणे यासाठी खास चिमणीचा वापर केला आहे.

  • भट्टीवर बसवलेली कढई की साधारणपणे माणसांच्या कमरेच्या उंचीची असून, कामगारांचे कष्ट आणि जोखिम कमी होते. त्या भोवती चालण्यासाठी सुलभ अशी रचना केली आहे.
  • भट्टी आणि कढईचे तापमान मोजले जाण्यासोबत त्याच्या ज्वाला योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी संगणकाद्वारे स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. परिणामी जळव्या आणि गुळव्या या दोघांच्या कष्टामध्ये बचत होणार आहे. माफक प्रशिक्षणामध्ये कमी कौशल्यांमध्येही उत्तम दर्जाचा गूळ बनवणे शक्य होणार आहे.
  • कोणत्याही रसायनाच्या वापराशिवाय एकाच प्रतीचा गूळ बनवणे शक्य होते.
  • भट्टीच्या सुलभ रचनेमुळे स्वच्छता ठेवणेही सोपे झाले आहे.
  • कमी जागेमध्ये गुऱ्हाळ ः REJP Plant हा १००० स्क्वें. फूट (एक गुंठा) जागेत बसतो. यामध्ये आपल्याला २४ तासांत ४०० ते ५०० किलो गुळाची निर्मिती करता येते. हा प्रकल्प चालविण्यासाठी एका शिफ्टमध्ये ४ कामगारांची गरज लागते. या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये ः   १) औद्योगिक शिस्त- गूळ प्रक्रियेत वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर  २) कामगारांची कार्यक्षमता- स्वयंचलित यंत्रणा वापरून कामगारांच्या श्रमाचा योग्य उपयोग ३) प्रक्रिया नियंत्रण- थोड्या परिश्रमात कोणीही गूळ बनवू शकेल असे तंत्रज्ञान ४) नेटके डिझाईन- कमी जागेत व कमी वेळात उभे करण्याजोगे नेटके डिझाईन ५) फायदेशीर उद्योग पर्याय- रसायन विरहीत, स्वच्छ प्रक्रियेद्वारे चांगल्या प्रतिची गुळाची निर्मिती ज्यास चांगली मागणी व योग्य/ जास्त दर. संपर्क ः ८७८८४६०७६६ (प्रा. विशाल सरदेशपांडे हे ग्रामीण क्षेत्र हेतू प्रौद्योगिकी विकल्प केंद्र (सितारा) आय. आय. टी. मुंबई येथे अनुबंध सह प्राध्यापक आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com