फळप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रे

फळप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रे
फळप्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रे

कोणत्याही अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये येणाऱ्या शेतीमालाची प्रतवारी, स्वच्छता, विविध आकारांमध्ये तुकडे करण्यासाठी यंत्रांचा वापर वाढत आहे. छोट्या यंत्रांच्या साह्याने स्थानिक पातळीवरही प्रक्रिया उत्पादने तयार करणे शक्य आहे. यातून शेतीमालाचा साठवण कालावधी वाढवणे शक्य होते. परिणामी दरातील चढ-उतारांवर काही अंशी मात करता येते. १. प्रतवारी यंत्र (ग्रेडिंग मशिन) ः फळे किंवा फळभाज्यांचा व्यास, लांबी आणि आकार अशा मापदंडानुसार वर्गीकरण करण्याची आवश्यकता भासते. केवळ व्यवस्थित वर्गीकरणामुळेही शेतीमालाची किंमत वाढण्यास मदत होते, त्यासाठी विविध प्रकारची यंत्रे उपलब्ध आहेत. आकाराप्रमाणेच रंग, पक्वता यानुसारही विभागणी करणे गरजेचे असते. यासाठी अत्याधुनिक प्रतवारी यंत्रे (सॉर्टर) उपलब्ध आहेत. यामुळे फळांच्या प्रत्येक गुणवत्तेची पातळी सुरक्षित करता येते. २. स्वच्छतेसाठी यंत्र (वॉशर) ः प्रक्रियेसाठी फळे स्वच्छ करणे, धुणे, निर्जंतूक करणे यासाठी विविध यंत्रे उपलब्ध आहेत. ती समूहात किंवा सलग एकामागोमाग एक या प्रकारे वापरता येतात. नियंत्रित वेगाने कन्व्हेयर बेल्टमधून प्रवास करतेवेळी त्यावर योग्य वेगाने पाणी फवारले जाते. फळे पूर्णपणे स्वच्छ झाल्याची खात्री मजुरांच्या साह्याने किंवा अलीकडे कॅमेरानियंत्रित कृत्रिम बुद्धिमत्तेने केली जाते. अशा प्रकारे स्वच्छ केलेल्या फळांची विक्री खाण्यासाठी तयार (रेडी-टू-इट) किंवा "वॉश" किंवा "ट्रिपल वॉश" अशा लेबलखाली करता येते. अशी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. ३. इलेव्हेटर ः या यंत्रांचा वापर केल्यास फळे शेतातून गाडीमध्ये चढवणे किंवा एका यंत्रापासून दुसऱ्या यंत्रापर्यंत नेण्यासाठी लागणारे मजूरबळ कमी करता येते. यामध्येही विविध क्षमतेचे इलेव्हेटर उपलब्ध आहेत. ४. तुकडे करण्याचे मशिन ः शेतीमालावर प्रक्रिया करताना त्यांचा आकार विशिष्ट प्रकारचा असावा लागतो. उदा. आवळा मुरंबा, आंब्याचे लोणचे. मोठ्या उद्योगासाठी फळांचे तुकडे करण्यासाठी वेगवेगळ्या आकारांचे कटिग मशिन उपलब्ध आहेत. ५. साल काढण्याचे मशिन (पीलर) ः हाताने साल काढण्याचा वेग अत्यंत कमी राहतो, त्याचप्रमाणे हाताला इजा होण्याचाही धोका असतो. यावर साल काढण्याची यंत्रे उपलब्ध आहेत. त्यात सिस्टम चाकू आणि ब्लेड, अपघर्षक, रोलर्स, मिलिंग कटर आणि रोटरी कटर वापरले जातात. परिणामी वेगाने फळे सोलणे शक्य होते. ६. फळांचा गर वेगळा करणे (क्रशर) ः रस काढण्यापूर्वी बियाणेविरहित फळे चिरडण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. त्यात फिरणाऱ्या हातोडीसारख्या घटकांचा समावेश असतो. त्याखाली असलेल्या जाळीच्या आकारानुसार गराचा कणीदार परिणाम आपल्याला मिळू शकतो. तसेच, आवश्यकता असल्यास पूर्ण रसही मिळवता येतो. यामुळे रसाची गुणवत्ता आणि किंमत वाढण्यास मदत होते. ७. घट्ट रस काढण्याचे यंत्र (पल्पर) ः द्रवयुक्त घन पदार्थ (गर) एका विशिष्ट पडद्यावरून फिरणाऱ्या पॅडलद्वारे विभाजित केले जातात. त्यातून द्रव आणि इच्छित पदार्थांचे प्रमाण जाळीदार पडद्यावरून ठरते. रस काढल्यानंतरचा उर्वरित चोथा मोठ्या नॉन-प्लगिंग पोर्टद्वारे बाहेर टाकला जातो. उदा. आंब्याचा रस. ८. पूर्ण रस काढण्याचे मशिन (ज्यूस एक्स्ट्रॅक्टर) ः या यंत्रामध्ये फळे किंवा चिरडलेल्या फळांपासून रस काढला जातो. यामध्ये वेगवेगळ्या वेगाने फिरणारे स्क्रू असतात. ९. रस एकरूप करण्याचे यंत्र (ब्लेंडिंग) विविध प्रकारचे रस, स्वाद किंवा गंध यांचे एकत्रीकरण करण्याच्या प्रक्रियेला ब्लेडिंग असे म्हणतात. उदा. द्राक्षाचा रस एक समान करण्यासाठी हवेवर आधारित एका विशिष्ट प्रणालीचा वापर केला जातो. १०. गाळण्याची यंत्रणा (फिल्टरेशन) फळांच्या रसामध्ये मोठ्या आकाराचे तंतुमय घटक उदा. फळांच्या तुटलेल्या बिया, साल किंवा चोथ्याचे लहान कण मिसळलेले असू शकतात. अशा कणांमुळे फळरसाची गुणवत्ता कमी होते. यासाठी विविध प्रकारच्या गाळण यंत्रणा उपलब्ध आहेत. ११. फिलिंग मशिन ः तयार केलेला पदार्थ किंवा रस विक्रीसाठी योग्य आकाराच्या बाटल्या किंवा पाकिटांमध्ये भरला जातो. अनेक वेळा भरण्याची प्रक्रिया ही पदार्थ गरम असताना करावी लागते. अशा वेळी माणसांच्या साह्याने पाकिटे किंवा बाटल्या भरणे हे तुलनेने धोकादायक ठरू शकते. शक्यतो अतिगरम पदार्थांसाठी धातूच्या बाटल्यांचा वापर केला जातो. मात्र, असे पदार्थ प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भरल्यानंतर हवाबंद करून त्वरित थंड पाण्याच्या टबमध्ये टाकली जाते. परिणामी बाटली खराब होत नाही. यासोबत भरण्यापूर्वी रस हा सातत्याने ढवळत राहणे गरजेचे असते, त्याचीही सुविधा काही यंत्रणेमध्ये केलेली असते. संपर्क ः ईश्वर शिंदे, ९४०४७५८६१७ अभिजित आडसरे, ९४०३३२१०१३) (अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान विभाग, अन्न तंत्र महाविद्यालय आष्टी, जि. बीड.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com