गाव पातळीवर दूध प्रक्रियेसाठी यंत्रे
गाव पातळीवर दूध प्रक्रियेसाठी यंत्रे

गाव पातळीवर दूध प्रक्रियेसाठी यंत्रे

ग्रामीण पातळीवर दुग्ध व्यवसाय हा पूरक व्यवसाय म्हणून चांगला रुजला आहे. मात्र, सर्वसामान्यपणे दूध काढून ते डेअरीला घालणे या पातळीवर त्याची व्याप्ती असते. मात्र, प्रत्येक गावामध्ये एकतरी दुग्धप्रक्रिया उद्योग उभारला गेला, तरी शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्यास मदत होईल. दूध गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे यासाठी सामान्यतः दूध टाकीबरोबरच तापमापी, रिफ्रेक्टोमीटर (साखरेचे प्रमाण मोजण्याचे उपकरण), व्हिस्कॉमीटर (दुधाची गती मोजण्याचे उपकरण), पीएच मीटर (हायड्रोजन, आयर्नचे प्रमाण मोजण्याचे उपकरण) यासोबतच नमुने तपासणीसाठी परीक्षा नळ्या व पिपेट (बारीक नळी) अशा प्राथमिक उपकरणांची आवश्यकता भासते. प्रमुख उपकरणे व यंत्रांमध्ये पाश्चेरायझर (पाश्चरणी), होमोजिनायझर (एकजीव करण्याचे उपकरण), फ्रिजर (गरम दूध थंड करण्याचे उपकरण), टाकी धुण्याची उपकरणे, दुधाच्या पॅकेजिंगसाठी यंत्रणा लागतात. दुधावरील पुढील प्रक्रिया कोणती करायची यानुसार खवा बनविण्याचे यंत्र, ड्रायर (दुधातील पाण्याचे प्रमाण कमी करण्याचे उपकरण) यांची आवश्यकता असते. १. दूध साठवण टाकी ः यात दूध साठवण्यासोबतच थंड केले जात असल्याने कुलिंग टॅंक म्हणूनही ओळखले जाते. स्टेनलेस स्टीलपासून निर्मित टाकीची क्षमता आपल्या आवश्यकतेनुसार १५० लिटरपासून दहा हजार लिटरपर्यंत उपलब्ध आहेत. या टाकीअंतर्गत काही जागा पॉलीयुरेथिन फोमने वेगळी केलेली असते. त्यामुळे बाह्य तापमानाच्या अपरोक्ष आतील दुधाचे तापमान स्थिर राहण्यास मदत होते. टाकीसाठी ४० सेंटिमीटरचे व्यासाचे छिद्र असून, रबर रिंगद्वारे हवाबंद करणारे झाकण असते. क्षमतेनुसार चार ते आठ पाय असतात. दुधाचा शेवटचा थेंबही बाहेर निघण्यायोग रचना केलेली असते. त्याचप्रमाणे तळाला एक व्हॉल्व्ह व एक थ्रेडेड आऊटलेट असते. या उपकरणामध्ये थर्मामीटर जोडलेली असल्याने आतील तापमानाच्या नोंदी घेता येतात. याची किंमत २५० ते २००० लिटर क्षमतेपर्यंत साधारण एक लाख रुपये आहे. दुधाची टाकी स्वयंचलित किंवा माणसांच्या साह्याने साफ करता येते. स्वयंचलित पद्धतीमध्ये पुष्ठभाग ओला करण्यासाठी पाण्याचे प्रेसिंग करणे आणि उर्वरित दुधाचे अवशेश स्वच्छ धुणे, दुसरी गरम साबणाच्या पाण्याने धुणे व नंतर साबण काढण्यासाठी पाण्याने स्वच्छ धुणे या दोन पायऱ्यानंतर सॅनिटायझर सोल्यूशनद्वारे अंतिम स्वच्छता करतात. पुन्हा टाकी गरम पाण्याने स्वच्छ धुतली जाते. टाकी धुण्याचे उपकरण ३५ हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. २. पाश्चरायझर ः या उपकरणाद्वारे दुधाचे तापमान ३० मिनिटे ६३ अंश सेल्सिअस तापमान आणि ७२ अंश सेल्सिअस तापमान १५ मिनिटे ठेवतात. त्यामुळे हानिकारक जिवाणू मारले जाते. याची क्षमता प्रतितास ५०० ते ५००० लिटरपर्यंत उपलब्ध आहेत. यात तंत्रानुसार एचटीएसटी (हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम), एलटीएलटी (लो टेम्परेचर लाँग टाइम), यूएचटी (अल्ट्रा हाय टेम्परेचर), व्हॅट(व्हॅट पाश्चेरायझर) असे चार प्रकार उपलब्ध आहेत. त्यांची किंमत चाळीस हजारापासून पुढे आहे. यात सेमी अॅटोमॅटिक प्रकारही उपलब्ध आहे. एक बॅचमध्ये २०० ते ३०० लिटर दूध पाश्चराईज होते. हे यंत्र थ्री फ्रेजवर चालते. ३. होमोजिनायझर (एकजीव करण्याचे उपकरण)ः या उपकरणाच्या मदतीने ३३ ते निश्चित ५५अंश सेल्सिअस तापमानावर दूध एकजीव (होमोजिनायझ) केले जाते. २००० ते २५०० पीएसआय दाबांवर दूध एकजीव केले जाते. एक हजार लिटर क्षमतेच्या या यंत्राची किंमत साठ हजार रुपये पर्यंत आहे. या अर्धस्वयंचलित यंत्रासाठी थ्री फेज व ४१० व्होल्ट ऊर्जा लागते. ४. फ्रीजर (दूध व दुधाचे पदार्थ थंड करण्याचे उपकरण)ः फ्रिजरमध्ये - १६ ते -२४ अंश सेल्सिअस तापमान ठेवता येते. हे प्रामुख्याने दूध व दुधाचे पदार्थ थंड करणअयासाठी वापरतात. एक, दोन आणि तीन फ्रिजरमध्ये अनुक्रमे २७०, ३१०, ४२५ लिटर दूध व दुधाचे पदार्थ साठवता येतात. किंमत २८ हजार रुपयांपासून सुरू होतात. पूर्ण स्वयंचलित स्टील व मिश्र धातूपासून बनलेले हे उपकरण सिंगल फेजवर चालते. ५. स्वच्छता करणारी उपकरणे ः याद्वारे प्रतिमिनिट ४ ते १२ कॅन धुता येतात. यात टाकी धुण्यासाठी डिटरजंट पावडर टाकीत टाकतात. पंपाने वाफ व ८८ ते ९३ अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी दाबाने सोडले जाते. टाकी स्वच्छ झाल्यानंतर ९५ ते ११५ अंश सेल्सिअस तापमानावर टाकी वाळवली जाते. या यंत्रामध्ये मिल्क स्क्रबरही उपलब्ध आहे. स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले हे यंत्र १४४० फेरे प्रतिमिनिट वेगाने फिरते. त्यासाठी २२० व्होल्ट ऊर्जा लागते. याची किंमत ५० हजार रुपयांपासून पुढे आहेत. ६. पाऊच फिलिंग मशिन ः या अर्धस्वयंचलित उपकरणाची क्षमता प्रतितास २०० पाऊच इतकी असून, याला २२० व्होल्ट ऊर्जा लागते. ५०० ते १००० मिलि पाऊच बनवता येतात. याची किंमत १८,५०० रुपयांपासून सुरू होते. पूर्ण स्वयंचलित पाऊच पॅकिंग मशिनही उपलब्ध असून, त्यात २०० मिलि ते १००० मिलि दुधाचे पाऊच पॅक करता येतात. प्रतितास १५०० ते २००० पाऊच पॅक होतात. या उपकरणामध्ये २ ते ३ एचपीची मोटर असून, २२० व्होल्ट ऊर्जा लागते. या मशिनचे वजन २०० ते २५० किलो असून, या यंत्राची किंमत ही एक लाखापासून पुढे आहे.

7. खवा मेकिंग मशिन - दूध तापवून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करत खव्याची निर्मिती केली जाते. भारतामध्ये दरवर्षी ६ लाख टन खव्याचे उत्पादन हे प्रामुख्याने मिठाई निर्मितीसाठी केले जाते. पारंपरिक पद्धतीमध्ये काही तासांकरिता मोठ्या व उथळ लोखंडी कढईमध्ये दूध मंद आचेवर उकळत ठेवले जाते. खवा हा पांढरा किंवा फिकट तपकिरी रंगाचा असतो. खव्याचे प्रकार : १. चिकना खवा - ५० टक्के पाणी २. दाणेदार खवा - कलाकंद, बर्फी बनविण्यासाठी वापर. ३. पिंडी खवा - पेढा निर्मितीसाठी वापर. ४. धाप खवा - गुलाबजामून बनविण्यासाठी वापर. खवा निर्मितीसाठी पूर्ण स्वयंचलित यंत्र उपलब्ध असून, त्याची किंमत ४५ हजार रुपयांपासून पुढे आहेत. १२० लीटर क्षमतेच्या यंत्रामध्ये ३५ किलो खवा बॅच काढता येते. स्टेनलेस स्टीलचे बनलेले हे उपकरण सिंगल फ्रेजवरही चालते. या उपकरणाद्वारे बासुंदी, रबडी बनविण्यासाठी वापरता येते. त्याच प्रमाणे पनीर, कुल्फी, तूप यांच्या निर्मितीपूर्वी दूध तापविण्यासाठीही वापरता येते. याचप्रमाणे चॉकलेट, टोमॅटो रस, प्युरी, सॉस गरम करण्यासाठीही वापरता येते. 8. मिल्क ड्रायर ः या उपकरणामध्ये गरम वाफेच्या साह्याने दुधातील पाण्याचे प्रमाण कमी केले जाते. प्रति दिन ४४० लाख लीटर दुधावर सलग प्रक्रिया करता येते. त्यातून ३० टन दूध पावडर निर्माण होते. कोरड्या स्वरूपामध्ये भुकटी तयार झाल्याने दुधाची साठवणक्षमता वाढते. ड्रायरचे ड्रम ड्रायर, व्हॅक्युम ड्रायर, रोटरी ड्रायर, फ्लूडाइज्ड ड्रायर, स्प्रे ड्रायर, फ्लॅश ड्रायर असे प्रकार उपलब्ध आहेत. १८० ते २२० अंश सेल्सिअस तापमानामध्ये दुधापासून भुकटी बनवली जाते. भुकटी बाहेर पडतेवेळी त्याचे तापमान ७० ते ७५ अंश सेल्सिअस असते. सचिन शेळके, ८८८८९९२५२२ (अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान विभाग, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com