भाजीपाला, फळपिकांची बहुस्तरीय शेती

भाजीपाला, फळपिकांची बहुस्तरीय शेती
भाजीपाला, फळपिकांची बहुस्तरीय शेती

बहुस्तरीय पीक पद्धतीमधून वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळांची उपलब्धता होते. या पीक पद्धतीचा अवलंब करून लहान, मध्यम गटातील शेतकरी कमी जागेत विविध पिके घेऊ शकतात. बहुस्तरीय पीक पद्धतीने लागवड कशी करावी, याबाबतचा हा आराखडा... लहान, मध्यम लागवड क्षेत्र असलेले शेतकरी खरीप हंगामात आपल्या कुटुंबासाठी ४ ते ५ प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. त्यानंतर रब्बी आणि उन्हाळी हंगामात भाजीपाल्यासाठी आठवडी बाजारावर अवलंबून राहावे लागते. सर्व गावांमध्ये आठवडी बाजार भरत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेजारील गावात जावे लागते. काहीवेळा भाजीपाला व फळे महाग असल्यास कमी प्रमाणात विकत घेतली जातात. यामुळे संपूर्ण कुटुंबाला सकस आहार मिळेलच याची शाश्‍वती नसते. बऱ्याचदा कुटुंबातील सदस्य कुपोषित राहतात (उदा. रक्ताचे प्रमाण कमी होणे, कॅल्शिअम ची कमतरता असणे इ.) हे लक्षात घेऊन कुटुंबाला वर्षभर पुरेल यासाठी बहूपीक पद्धतीने भाजीपाला आणि फळपिकांची लागवड फायदेशीर ठरते. बहुस्तरीय पीक पद्धतीचे नियोजन ः १) या पीक पद्धतीमध्ये स्थानिक पातळीनुसार पिकांची त्यांच्या उंची व कालावधीनुसार निवड केली जाते. या आराखड्यामध्ये ३६ बाय ३६ चौरस फुटांमध्ये सरासरी २५ ते ३० पिकांची लागवड करता येते. यातून शेतकऱ्याला वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला व फळे उपलब्ध होतात. तसेच त्या कुटुंबाची गरज भागवून उरलेल्या भाजीपाला व फळांची विक्री करता येते. २) बहुस्तरीय शेतीमुळे कुटुंबासाठी मुबलक प्रमाणात पौष्टिक आहार उपलब्ध होतो. या पीक पद्धतीचा अवलंब करून लहान व मध्यम गटातील शेतकरी कमी जागेत विविध पिके घेऊन जास्त नफा मिळवू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य व आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. या पद्धतीच्या परसबागा शेतकऱ्यांनी तयार केल्या आहेत. बहुस्तरीय शेती पद्धतीची वैशिष्ट्ये ः

  • विविध प्रकारच्या पिकांची लागवड.
  • पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • कुटुंबाला दररोज पोषक, सेंद्रिय भाजीपाला व फळे मिळू शकतात. आहारातून जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कर्बोदके मिळतात.
  • भाजीपाला व फळांच्या खरेदीवरील खर्च कमी होतो. कुटुंबाच्या गरजा भागवून उरलेला भाजीपाला विकता येतो.
  • दुष्काळी परिस्थितीमध्ये कुटुंबाच्या गरजेच्या भाजीपाल्याची लागवड. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, कर्बोदकांचा तुटवडा भासत नाही.
  • सकस आहारामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत.
  • परिपूर्ण आहार मिळाल्यामुळे कुपोषण कमी होण्यास मदत.
  • लागवड पद्धती ः १) सुरुवातीला जमिनीची चांगली मशागत करावी. वाफे तयार करण्याच्या आधी प्रती गुंठ्यामध्ये ३०० किलो शेणखत किंवा गांडूळखतामध्ये एक किलो ट्रायकोडर्मा मिसळून पसरावे. २) उत्तर-दक्षिण दिशेने वाफे तयार करावेत. प्रत्येक वाफा पावणे तीन फूट रुंद आणि ३६ फूट लांब असावा. प्रत्येक वाफ्यानंतर प्रत्येकी १.५ व २ फूट रुंदीच्या सऱ्या बनवाव्यात. वाफे तयार झाल्यावर सर्व बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी एक फुटाचा चर काढावा. ३) सर्व वाफ्यांच्या मध्यभागी प्रत्येक ४.५ फुटावर काठ्या लावून घ्याव्यात. लागवड करताना प्रथम बहुवार्षिक झाडांची लागवड करावी. त्यासाठी मध्यभागी १ आणि सर्व चारही कोपऱ्यात १.५ फूट खोल व १.५ फूट रुंद असे ५ खड्डे घ्यावेत. खड्यातील मातीमध्ये २ किलो शेणखत किंवा गांडूळखत मिसळून झाडे लावावीत. ४) त्यानंतर प्रत्येक वाफ्यात आलटून पालटून पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वाफ्यावर पपई, शेवगा आणि दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या वाफ्यावर केळी व मका + तूर लागवड करावी. झाडे नागमोडी पद्धतीने लावावीत. ५) झाडे लावून झाल्यानंतर पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वाफ्यावर प्रत्येक झाडाच्या पुढेमागे प्रत्येकी १ फुटावर मिरची आणि दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या वाफ्यावर प्रत्येक झाडाच्या पुढेमागे झेंडूचे रोप लावावे. ६) सर्व वाफ्यांवर दोन मिरचीची रोपे व झेंडूच्या मध्यभागी उडदाचे बी पेरावे. ७) सर्व वाफ्यावरची मधली ओळ पूर्ण झाल्यानंतर रेन पाइपच्या सरीच्या बाजूला मधल्या ओळीपासून साधारण १५ सेंमी अंतरावर दुसरी ओळ म्हणजेच पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वाफ्यावर मुळा आणि दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या वाफ्यावर बीट लावावे. ८) त्यानंतर दोन फुटाच्या सरीच्या बाजूला मधल्या ओळीपासून साधारण १५ सेंमी अंतरावर दुसरी ओळ म्हणजेच पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वाफ्यावर हळद किंवा आले लावावे (लागवड करताना २ रोपांमध्ये १ फूट अंतर ठेवून त्यामध्ये कांद्याचे रोप लावावे) आणि दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या वाफ्यावर काळा/लाल/वाघ्या घेवडा लागवड करावी. ९) रेन पाइपच्या सरीमध्ये पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वाफ्यावर खालच्या बाजूला तिसरी ओळ कोथिंबीर (धने) आणि दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या वाफ्यावर खालच्या बाजूला तिसरी ओळ पालकाची लावावी. त्यानंतर दोन फुटाच्या सरीच्या बाजूला पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या वाफ्यावर खालच्या बाजूला तिसरी ओळ मेथी व दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या, आठव्या वाफ्यावर खालच्या बाजूला तिसरी ओळ शेपू लावावे. १०) पहिल्या, तिसऱ्या रेन पाइपच्या सरीच्या बाजूला दोन्ही बाजूने प्रत्येकी ९ फुटावर नागमोडी पद्धतीने भेंडी, दुसऱ्या रेन पाइपच्या बाजूला वांगी व चौथ्या रेन पाइपच्या बाजूला टोमॅटो लावावा. ११) पहिल्या वाफ्याच्या बाहेरच्या बाजूने लाल भोपळा आणि आठव्याच्या बाजूने दोडका प्रत्येकी नऊ फुटांवर लावावा. १२) शेताच्या कडेला निचऱ्यासाठी चर काढलेल्या बाजूला प्रत्येकी ९ फुटावर एरंड लावून, त्यामध्ये प्रत्येकी ४.५ फुटावर मका व या दोन्हींच्या मध्ये चवळी लावावी. यामध्येच सर्व बाजूने गवती चहा व तुळस लावावी. पीक व्यवस्थापन ः

  • जीवामृताची १० दिवसांच्या अंतराने मुळांजवळ आळवणी करावी.
  • अमृतपाण्याची १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  • निमार्क किंवा दशपर्णी अर्काची १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  • कंपोस्टखत किंवा गांडूळखत १०० किलो प्रति १ गुंठ्यासाठी जमिनीत मिसळून द्यावे.
  • संपर्क ः पृथ्वीराज गायकवाड, ९४०३९६१५८२ ( लेखक वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com