सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रे

सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रे
सोयादूध, पनीर बनवण्याची यंत्रे

सोयाबीनपासून दूध आणि त्याचे पनीर ही उत्पादने बनवल्यास उत्तम मूल्यवर्धन होते. यासाठी अनेक यंत्रे उपलब्ध असून, त्याच्या वापराने कामे सुलभ होतात. सोयाबीन ही पूर्व आशियातील कडधान्य गटातील वनस्पती असून, यापासून तेल मिळत असल्याने तेलबियामध्येही समावेश होतो. सोयाबीन हे खरिपातील महत्त्वाचे पीक बनले आहे. या पिकाची लागवड मुख्यत्वे करून सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातूर या विभागात मोठ्या प्रमाणात केली जाते. दरामध्ये चढ उतार असले तरी मागणी सातत्याने वाढत आहे. सोयाबीनपासून तेल, पशुखाद्य या दोन मुख्य उत्पादनासह सोयादूध आणि पनीर, योगर्ट, श्रीखंड सारखे अन्य पदार्थ बनवता येतात. त्याच प्रमाणे सोयाबीनपासून डाळ, सोया नट्स, सोया सॉस, बिस्किटे, ब्रेड, पाव, केक, शेव, ढोकळा, प्लेक्स असे अनेक पदार्थ तयार करता येतात. सोयाबीनचे आरोग्यासाठी फायदे  १. कर्बोदके कमी असल्याने मधुमेहींसाठी उत्तम कडधान्य ठरते. २. यातून मिळाणारे लेसीथिन आरोग्याला उपयुक्त. ३. रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत. ४. आयसो फ्लेव्हन संयुगामुळे वजन नियंत्रणास मदत. ५. हाडांना मजबुती देते. ६. तंतुमय पदार्थांमुळे पचनक्रियेस मदत. सोया दूध  आधुनिक यंत्राद्वारे एक किलो सोयाबीनपासून सहा ते सात लीटर दूध तयार करता येते. सोयाबीन दुधाला गाईच्या दुधासारखी चव नसली तरी त्यात साखरेबरोबर चॉकलेट, इलायची, व्हॅनिला अशा या स्वादांचा वापर केल्यास सर्वांना आवडते. सोयादुधामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असते. सोया दूध हे कोलेस्टेरॉलयुक्त लॅक्टोज नसलेले, संपृक्त स्निग्ध पदार्थाचे व सोडिअमचे अत्यल्प प्रमाण असलेले बहुगुणी पेय आहे. सोया दुधाचा वापर पनीर (त्याला इंग्रजीमध्ये टोफू असे नाव आहे.), गरम व शीत पेय, फळांचा शेक, दही, योगर्ट, आईस्क्रीम इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी करतात. बनवण्याची प्रक्रिया  १. सोयाबीन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. सोयाबीनच्या तीनपट पाणी घेवून ६ ते ७ तास भिजवावे. २. सोयाबीन स्वच्छ धुवून १ किलो सोयाबीनसाठी ६ ते ७ लीटर ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाचे गरम पाणी घ्यावे. हे मिश्रण मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यावे. ३. तयार झालेले मिश्रण हे १५ ते २० मिनिटे ३० ते ४५ अंश सेल्सिअस तापमानाला गॅसवर ठेवून सतत हलवत उकळून घ्यावे. ४. त्यानंतर हे तयार झालेल दूध हे मलमलच्या कापडातून गाळून पुन्हा ५ ते ७ मिनिटे ३० अंश सेल्सिअस तापमानात उकळावे. सोयादूध बनविणारे यंत्र  सोयाबीनपासून दुधाच्या निर्मितीसाठी सोया मिल्कर मशिन बाजारात उपलब्ध आहे. या यंत्रामध्ये मिलिंग युनिट, स्टोरेज टँक, बॉयलर युनिट, कुकर, सेपरेटर आणि कंट्रोल पॅनल इत्यादींचा समावेश होतो. या यंत्रामध्ये रात्रभर भिजत घातलेले सोयाबीन हे स्वच्छ पाण्याने धुवून योग्य प्रमाणातील पाण्यासोबत यंत्रामध्ये टाकल्यानंतर ग्राइंडिंग सिस्टीममध्ये बारीक केले जाते. त्यानंतर यंत्राच्या बॉयलर युनिटमध्ये १०० अंश सेल्सिअसमध्ये गरम केले जाते. त्यामुळे त्यातील घातक घटक व सोयाबीनचा विशिष्ट गंध कमी होतो. त्यानंतर मिश्रण कुकर सेपरेटरमध्ये गाळले जाते. त्यातून चोथा वेगळा करून दूध वेगळे होते. तयार झालेले सोया दूध हे साठवणीच्या टाकीमध्ये साठवले जाते. यंत्राची क्षमता ताशी ३०, ६०, १२५ लीटर अशा उपलब्ध आहेत. या क्षमतेनुसार यंत्राची किंमती ४० हजारांपासून पुढे आहेत. ताशी १०० लीटर क्षमतेचे यंत्र २२० ते २४० व्होल्टवर चालते. हे यंत्र पूर्णपणे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असते. मानवचलीत व स्वयंचलीत अशा दोन्ही प्रकारामध्ये उपलब्ध आहे. या यंत्राचे वजन १२० किलो असून, आवश्यक जागा ५ फूट बाय ५ फूट इतकी आहे. त्याची किंमत दीड लाख रुपये एवढी आहे. सोया पनीर  सोया दुधाप्रमाणेच सोया पनीर (टोफू) लाही मोठी मागणी आहे. सोया पनीरची किंमत ही १५० ते २०० रुपये प्रति किलो आहे. सोयापनीरमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. परदेशामध्ये विविध पदार्थामध्ये टोफूचा वापर लोकप्रिय आहे. सोया दूध हे १०० अंश सेल्सिअस तापमानाला ३० मिनिटे उकळावे. त्यानंतर त्याचे तापमान ३५ ते ४०अंशांपर्यंत कमी करावे. त्यात सायट्रिक अॅसिड २ ग्रॅम (निंबूसत्व) पाण्यात विरघळवून ते सोयादुधामध्ये हळुवारपणे मिसळावे. सोया दूध हळूवारपणे हलवून ५ ते ७ मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर फाटलेले सोयादूध हे एका मखमलच्या कपड्यामध्ये गाळून घ्यावे. त्यातील निवळी वेगळी करून कापडातील साका (पनीर) हे बाजूला करून घ्यावे. त्यानंतर हा साका पनीर प्रेसमध्ये ठेवून १५ मिनिटांसाठी दाबून घ्यावा. त्यामुळे त्यातील शिल्लक असलेले पाणीही कमी होईल. हा तयार झालेला घट्ट पदार्थ म्हणजेच सोया पनीर (टोफू) होय. त्यानंतर त्या सोयापनीरला आपण ४ अंश सेल्सिअसला पाण्यामध्ये १० ते १५ मिनिटे ठेवावे. यामुळे पनीरला उत्तम दर्जाचे होते. हे तयार झालेले सोया पनीर फ्रीजमध्ये ५ अंश सेल्सिअस तापमानाला ठेवावे. त्यात १० ते १५ दिवस टिकते. एक किलो सोयाबीनपासून एक ते दीड किलो सोया पनीर तयार होते. त्याला बाजारामध्ये १५० ते २०० रुपये किंमतीला विकले जाते. सोयापनीर प्रेस मशीन यामध्ये स्वयंचलित आणि मानवी शक्तीद्वारे चालवण्याचे यंत्र उपलब्ध आहे. सोयादुधापासून मिळवलेला साका दाबण्यासाठी त्याचा वापर होतो. मानवी शक्तीद्वारे चालवण्याचे यंत्र १० हजारापासून उपलब्ध आहे. पूर्ण स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले हे यंत्र ५ ते १० किलो क्षमतेचे असून, त्यात बॉक्स टाईप पनीर तयार होते. स्वयंचलित पनीर प्रेस यंत्र सुमारे २२ हजार रुपयांपासून पुढे सुरू होते. पूर्णपणे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेल्या यंत्राची क्षमता १० किलो प्रति ट्रे इतकी आहे. याला २८० व्होल्ट ऊर्जा आवश्यक असते. त्याचे वजन ३० किलो असून, जागाही कमी लागते. हे यंत्र एअर कॉम्प्रेसरच्या साह्याने काम करते. सोयापनीरमधील पाणी काढले जाते. यंत्र चालवण्यासाठी एक व्यक्ती पुरेशी आहे. सोयाबीन शास्त्रीय नाव - ग्लापसीन मॅक्स. पोषक घटक (प्रमाण प्रति १०० ग्रॅम) कॅलरी (ऊर्जा) - ४४६ (किलो कॅलरी) लिपिड - २० ग्रॅम सोडिअम - २ ते ३ मिली ग्रॅम कर्बोदके - ३० ग्रॅम प्रथिने - ३६ ग्रॅम क - जीवनसत्त्व - ६ ग्रॅम लोह - १५.७ मिलिग्रॅम बी ६ जीवनसत्त्व - ०.४ मिलिग्रॅम मॅग्नेशिअम - २८० मिलिग्रॅम. सचिन अर्जुन शेळके, ८८८८९९२५२२ साधना मगर, ८१४९७३९१६४ (अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान विभाग, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com