agriculture stories in Marathi technowon story, Pravin Modani | Page 2 ||| Agrowon

एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोड

संतोष मुंढे
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

हवामानाचा अंदाज घेत त्यानुसार पिकांचे नियोजन, त्याला आधुनिक यंत्रांची दिलेली जोड यामुळे शेती व्यावसायिकदृष्ट्या फायद्याची होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील दावरवाडी (ता. पैठण) येथील मोदानी कुटुंबाची शेती होय.

अल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील शेतीच्याही वेगळ्याच समस्या आहेत. त्याला मराठवाड्यातील दुष्काळाच्या सावटाची कायमची साथ. अशा स्थितीत हवामानाचा अंदाज घेत त्यानुसार पिकांचे नियोजन, त्याला आधुनिक यंत्रांची दिलेली जोड यामुळे शेती व्यावसायिकदृष्ट्या फायद्याची होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील दावरवाडी (ता. पैठण) येथील मोदानी कुटुंबाची शेती होय. चार भावंडांची एकत्रित २०० एकर शेती सध्याच्या मजूर टंचाईच्या काळात केवळ यांत्रिकीकरणामुळे दोन्ही हंगामात उत्पादन घेणे शक्य होत असल्याचे ते सांगतात.

दावरवाडी (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील मोदानी कुटुंबात प्रवीण मोदानी, राजेंद्रप्रसाद मोदानी, चंपालाल मोदानी व ज्ञानप्रकाश मोदानी अशी चार भावंडे असून, त्यांची एकत्रित २०० एकर शेती आहे. चारही भावडांचा शेती नियोजनात सहभाग असला तरी प्रामुख्याने प्रत्यक्ष पीक नियोजन, व्यवस्थापन, उत्पादन व विक्री ही जबाबदारी प्रवीण मोदानी यांच्याकडे आहे.

जाणकार शेतकऱ्यांच्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील शेतीतील तंत्रज्ञान व आधुनिक यंत्रांचा स्वीकार करणारे कुटुंब म्हणून दावरवाडी येथील मोदानी कुटुंबाकडे पाहिले जाते. याविषयी माहिती देताना मोदानी कुटुंबाच्या शेतीच्या एकूणच व्यवस्थापनावर नियंत्रण असणारे मोदानी कुटुंबातील प्रवीण मोदानी सांगतात, की १९५० मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ज्या पहिल्या पाच शेतकरी कुटुंबाकडे ट्रॅक्टर होते, त्यापैकी एक आमचे कुटुंब. शेतीला नेहमीच आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न आमच्या कुटुंबाचा राहिला आहे.

बैलआधारित शेती हळूहळू बदलत यंत्राकडे आली
पूर्वी शेतीतील मशागतीच्या कामासाठी सुमारे ६ बैलजोड्या होत्या. बैलांचे भरणपोषण शक्य असले तरी त्यासाठी आवश्यक मजुरांची उपलब्धता कमी होत गेली. त्यांच्यावाचून अनेक वेळा व्यवस्थापन कोलमडून जायचे. हा सारा व्याप सांभाळण्यातही अडचणी येत.

अनेकदा खरिपाऐवजी केवळ रब्बीतील पीक घेणे शक्य होई. खरिपामध्ये पारंपरिक कपाशीचे पीक घेताना त्यात आंतरपीक म्हणून तूर घेतली जायची. या साऱ्यांवर मात करण्यासाठी मोदानी कुटुंबांचे प्रयत्न सुरू होते. त्याला यांत्रिकीकरणामुळे बळ मिळाले. आता मोदानी कुटुंबाकडे सुमारे पंधरा वर्षापासून शेती कसण्यासाठी म्हणून बैल नाहीत.

यांत्रिकीकरणावर भर
शेती अधिक प्रमाणात असल्याने मजुरावरील अवलंबित्वही मोठ्या प्रमाणात होते. सुरवातीला कष्ट करण्यासाठी सुरू झालेल्या यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेने मजुरांच्या उपलब्धतेची समस्या भेडसावू लागल्यापासून वेग घेतला आहे. मोदानी कुटुंबाने जवळपास तीस वर्षापासून विविध यंत्राचा वापर सुरू केला आहे. सुमारे ३० वर्षापासून या कुटुंबाकडे दोन ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, ट्रॉली, मोघडा, रोटाव्हेटर, नांगर, आदी ट्रॅक्टरशी निगडित बहुतांश सर्व यंत्रे वापरली जात आहेत.

हवामानाचा अंदाज घेऊन शेती नियोजनाची पद्धत
पारंपरिक शेतीच्या पद्धतीत हवामानावरील अवलंबित्व मोठे आहे. त्याला हवामानाच्या अंदाजाची जोड देत मोदानी बंधू शेती पिकाचे नियोजन करतात. त्यासाठी आवश्यक तिथे तज्ज्ञांची मदत घेतली जाते. परिणामी पिकातून होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी राखणे शक्य होत असल्याचे प्रवीण मोदानी सांगतात.

फळपिकांसह हंगामी पिके
मोदानी कुटुंबाकडे जवळपास दहा वर्षापासून दहा एकर मोसंबी बाग आहे. गत दोन वर्षापासून दहा एकर क्षेत्रात पपईचे पीक ते घेतात. याशिवाय यंदाच्या खरीप हंगामात पाऊस चांगला राहणार संकेत मिळताच ११० एकरावर मुग तर ५० एकरावर सोयाबीनचे पीक त्यांनी घेतले.

उपयुक्त यंत्राचा सुरू असतो सातत्याने शोध

 • आपल्या शेतीसाठी आवश्यक आणि उपयुक्त ठरणाऱ्या यंत्रांचा शोध मोदानी सतत घेत असतात. अलीकडे सामाजिक माध्यमातून विविध यंत्रांचे व्हिडिओ येत असतात. मात्र, अनेकवेळा त्यात नाव, पत्ते उपलब्ध नसतात. अशा वेळी त्यांचा मागोवा घेणे, खरे खोटेपणा तपासणे अत्यंत अवघड जाते. मात्र, चिकाटीने त्यांचा शोध सुरू असतो.
 • मोदानी यांनी दीड वर्षांपूर्वी दोन बियाणे टोकण यंत्रे पुण्यावरून आणली. या सुधारित यंत्रामुळे दोन रोपांमधील अंतर योग्य राखले जाते. बियाण्यांची अपेक्षित संख्या कायम राखणे शक्य होते. पिकांना वाढीसाठी पुरेशी जागा उपलब्ध होते. रोग किडीचे प्रमाण आटोक्यात राहण्यासाठी मदत होते.
 • वर्षभरापूर्वी इंटरनेटच्या मदतीने शोध घेऊन लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथून ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र विकत आणले.
 • मध्यप्रदेशातील इंदोर जवळच्या सणवार येथून ट्रॅक्टरचलित कोळपणी यंत्राचीही खरेदी केली आहे.

किरकोळ बदलही ठरतात महत्त्वाचे
अनेकवेळा कोळपणी किंवा फवारणी यंत्रासाठी छोटा ट्रॅक्टर घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे खर्चात वाढ होते. त्यावर मोदानी बंधूंनी मोठ्या ट्रॅक्टरला असणाऱ्या १३ इंच रुंदीच्या टायरऐवजी ९ इंची टायरचा वापर केला आहे. हे टायर खास अहमदाबादवरून विकत आणले. त्याची जोडणी फवारणी व कोळपणीच्या वेळी आपल्याकडे असलेल्या मोठ्या ट्रॅक्टरला करतात. त्यामुळे उपलब्ध ट्रॅक्टरद्वारेच शेतीतील कोळपणी व फवारणीची कामे करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे किरकोळ वाटणाऱ्या बदलामुळे सुमारे चार ते पाच लाखाची बचत झाली. या नव्या टायरसह ट्रॅक्टरचा वापर यंदाच्या खरीप पिकात पहिल्यांदा यशस्वीपणे केला आहे.

हार्वेस्टरने काढणी
फवारणी व कोळपणीचा पिकातील प्रश्न मिटला. काढणीसाठी पुन्हा मजुराची वाट पाहावी लागणार होती. त्याऐवजी ११० एकर क्षेत्रावरील मुगाची काढणी करण्यासाठी हार्वेस्टरचा वापर केला. परिणामी साधारणपणे तीन हजारापेक्षा जास्त होणारा पीक काढणीचा खर्च केवळ एक हजारावर आल्याचे प्रवीण मोदानी सांगतात.

असा झाला फायदा

 • यंत्रांमुळे शेतीसाठी लागणाऱ्या मजुराची समस्या कमी करण्यात यश.
 • कोळपणीचा खर्च झाला तीन पट कमी.
 • फवारणीसाठीचा खर्च झाला चार पट कमी.
 • २५ टक्‍क्‍यांवर आला वार्षिक शेती खर्च.
 • आधुनिक यंत्रांमुळे वापसा येताच रात्रीही शेतीकामे करणे झाले शक्य.

अशी आहेत यंत्रांची वैशिष्ट्ये

 • टोकण यंत्रामुळे दोन रोपातील व ओळीतील अंतर योग्य राखता येते. शिवाय सोबतच खतही गाडून दिले जाते. योग्य प्रमाणात एकरी बियाणे लागवड होते शक्य. खताचीही कार्यक्षमता वाढते.
 • फवारणीयंत्राद्वारे कीडनाशकांच्या फवारणीची कार्यक्षमता वाढली आहे. सोबतच स्वतंत्र नोझल वापरून तणनाशकाची फवारणी शक्य होत आहे.
 • झिगझॅग पद्धतीच्या कोळपणी यंत्रामुळे एकावेळी सहा ओळीतील कोळपणी शक्य होते.
 • यंत्रामुळे कामाचा वेग वाढला आहे.

असे शेतीचे नियोजन

 • पाच व्यक्ती शेती व्यवस्थापनाच्या कामात. त्यापैकी २ चालक तर तिघे करतात देखरेखीचे काम.
 • २० एकर फळपिके संपूर्णपणे ठिबक खाली आणली आहेत.
 • पिकांच्या सिंचनासाठी ८ विहिरी आहेत.
 • दरवर्षी मे मध्येच खत, औषधे व बियाण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार योग्य वेळी उपलब्धता करण्याचेही नियोजन असते.
 •  हवामानाचा अंदाज घेऊन प्रसंगानुरूप शेती कामे वेळेत करण्याला प्राधान्य
 • रब्बीतील हरभरा पिकाच्या सिंचन व्यवस्थापनासाठी ८ रेन गनची तयारी.
 • येत्या रब्बीत १६० एकरवर हरभरा लागवडीचे नियोजन.
 • अपेक्षित दर मिळण्यासाठी प्रसंगी करतात साठवणूक
 • ११० एकरातील मुगाची हार्वेस्टरने केली काढणी
 • ५० एकरातील सोयाबीनचीही हार्वेस्टरनेच काढणीचे नियोजन केले आहे.
 • पूर्वी शेतीत खरिपात कपाशी, तूर तर रब्बीत असायचे ज्वारी पीक. गेल्या दहा वर्षापासून कपाशी पीक कमी केले आहे.

नव्याने घेतलेल्या यंत्रातील गुंतवणूक

 • टोकन यंत्र २ : प्रत्येकी ६५ हजार रु.
 • फवारणी यंत्र २ : प्रत्येकी ७० हजार रु.
 • कोळपणी यंत्र : ३० हजार रु.
 • ट्रॅक्टरची छोटी चाके : ३१ हजार रु.

 

कोणत्याही उद्योगात वेळीच कामे करण्याला महत्त्व असते. तसेच शेती उद्योगातही वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे. हवामानाचा अंदाज घेऊन पीक नियोजन, उत्तम बियाण्यांचा वापर, वेळीच खताचा डोस व फवारणी, आंतरमशागतीची कामे, जमीन सुपीकता टिकवण्यासाठी पिकाचे अवशेष शेतात कुजविण्यावर आमचा भर असतो. यंत्राच्या वापरातून शेती करणे बऱ्यापैकी सोपे झाले आहे. उत्पादन खर्चातही बचत झाली.
- प्रवीण मोदानी, ९९७५६६३३५१

 

(कृपया सायंकाळी ५ ते ६ या वेळात संपर्क करावा)


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...
एकीमुळे सुधारित तंत्रज्ञान वापराला...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील...
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...
निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ...अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले...
कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी...नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण...
पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही...
प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा :...नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार...
राज्यात १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे...पुणे: राज्यात यंदा जास्त ऊस उत्पादनाची शक्यता...
शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नावर तोडगा...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...